पाळणाघरे, अपप्रवृत्ती कशी?

आजचा सुधारकच्या डिसेंबर ९८ च्या अंकात (९:९, २७६-२७८), पाळणाघरांची वाढ : एक अपप्रवृत्ती’ हा स्फुट लेख प्रसिद्ध झाला असून, त्यामध्ये याच विषयावर सप्टेंबर १९९८ च्या अंकातील स्फुट लेखावरील वाचकांच्या प्रतिक्रियांना संपादकांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्या ताज्या स्फुटात कोणताही नवा मुद्दा अथवा विचार आलेला नाही. या विषयावरील संपादकांची भूमिका अवास्तव, असंतुलित व काहीशी दुराग्रही आहे असे खेदाने म्हणावे लागते. या विषयावरील चालू चर्चेत आम्ही खालील मुद्दे मांडू इच्छितो.

(१) महागाई फार झाली आहे, हा या वर्षीचा नैमित्तिक अपवाद वगळता, म्हणणे खरे नाही. जगात सर्वत्र यथाक्रम दरवर्षी मुद्रावाढ (inflation) सातत्याने होत असते. दर दहा वर्षांत वस्तूंच्या किंमती दुप्पट होतात व श्रमांचा मोबदलाही त्याच प्रमाणात वाढत असतो. १९४० च्या दशकात भारतात सोने ८० रुपये तोळा होते, ते आज ५००० रुपये तोळा आहे. १९८७ साली बजाज स्कूटर १२००० रुपयांची होती, ती आता २५००० ची आहे. १९४० साली सरकारी कारकुनाचा पगार ३० ते ४५ रुपये होता, तो आता सुमारे २००० रुपये आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत कुटुंबाचा जीवनस्तर (living standard) घसरू नये म्हणूनच महिलांना नोकरी/व्यवसाय करावा लागतो व म्हणून पाळणाघरांच्या संख्येत वाढ होत आहे असे म्हणणे बरोबर नाही. महागाई (Inflation) का होते हा स्वतंत्र विषय आहे व त्यावर “आ. सु.’ मध्ये चर्चा अवश्य व्हावी. महागाई रोखणे हे समाजाच्याच नव्हे तर शासनाच्याही हाती नाही हे कटु सत्य आहे.
संपादकांनी आपल्या लेखाच्या ४ थ्या परिच्छेदात “श्रमांना मिळणारा मोबदला’ हा मुद्दा विशद करण्याचा प्रयत्न केला असला तरी तो त्यांचा प्रयत्न फसला आहे. सगळा मजकूर संभ्रम निर्माण करणारा आहे कारण मुळातच संपादकांचे याविषयीचे विचार अवास्तव व अति आदर्शवादी (Utopian) आहेत. देशामध्ये निर्माण होणा-या संपत्तीची वाटणी व स्त्रियांनी केलेल्या उत्पादनावाचून देशाला आपला गाडा हाकता आला पाहिजे यासंबंधी संपादकांचे प्रतिपादन स्वप्नाळू आणि समाजाला किमान एक शतक मागे ढकलणारे आहे!

(२) महिला नोकरी/व्यवसाय करतात याचे प्रमुख कारण म्हणजे सर्व जगभर स्त्रीशिक्षणात झालेली वाढ हेच आहे असे आमचे मत आहे. मजूर स्त्रियांच्या काम करण्याच्या प्रमाणात विशेष फरक पडला नसला तरी शिक्षित महिलांच्या काम (घराबाहेर) करण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ गेल्या ५० वर्षांत सतत होत आहे व ही वाढ स्त्रीशिक्षणात झालेल्या वाढीशी समांतर आहे. मुली, मुलांच्या बरोबरीने शिकतात आणि पालक साहजिकच मुलींना हवे तेवढे शिकू देतात. (हे किमानपक्षी महाराष्ट्रातील शहरी भागापुरते तरी खरे आहे. हिंदी पट्टयात व महाराष्ट्रातील दुर्गम भागात परिस्थिती भिन्न आहे.) बुद्धीने पुरुषांच्या तोडीच्या असून शिवाय पुरुषांपेक्षा महिला अधिक निष्ठावान व चिकाटीच्या असल्याने; महिला, शिक्षणाच्या सर्व क्षेत्रांत पुरुषांना मागे टाकतात असे आढळते. अशा प्रकारे उत्तम शिक्षण प्राप्त केलेल्या महिलांची अस्मिता व काहीतरी करून दाखविण्याची सार्थ ऊर्मी दाबणे अशक्य व अयोग्य आहे. त्यामुळे चढाओढीच्या युगातही महिलांना नोक-या/व्यवसाय सहजपणे उपलब्ध होतात. वयाच्या योग्य कालखंडातच नोकरी/व्यवसायास प्रारंभ केला नाही व मुले मोठी झाल्यावर विचार करू असे म्हणणे सुशिक्षित तसेच प्रशिक्षित महिलांना महागात पडते कारण वय झाल्यावर व अनेक वर्षे आपल्या प्रशिक्षणाचा वापर न केल्याने त्यांचे ज्ञान व कार्यक्षमता गंजते व मग नोकरी/ व्यवसाय मिळविणे व टिकविणे स्त्रियांना शक्य होत नाही. म्हणून एकीकडे विवाह व प्रजोत्पादन हे बहुसंख्य महिलांना अपरिहार्य असणारे कार्य करीत असतानाच महिलांना नोकरी/व्यवसाय करण्यावाचून गत्यंतर नसते. जर त्यांनी असे केले नाही व संपादकांच्या म्हणण्यानुसार आपल्या बालकांचे संगोपन करण्यातच दिवस घालविले तर उत्तम शिक्षण घेतलेल्या महिलांच्या मानसिकतेला कीड लागते व त्या असमाधानी व दुःखी होतात. डॉक्टर झालेल्या मुली आपल्या ज्ञानाचा काहीही उपयोग न करता, कमरेला किल्ल्यांचा जुडगा लटकावून काही वर्षे केवळ मादीपण पार पाडीत राहिल्यावर त्यांची मनःस्थिती कशी होते याची अनेक उदाहरणे आपणांस दिसतात! तेव्हा महिला, नोकरी केवळ आर्थिक गरज म्हणूनच करतात असे समजणे सर्वस्वी चूक असून त्या तसे आपल्या विजिगीषु अस्मितेखातर करतात. महिलांनी शिकावे पण नोकरी/ व्यवसाय करू नये असे जर कोणास वाटत असेल तर मग सर्व मुलींनी गृहशास्त्र (Home Science) विषयाचेच शिक्षण घेणे योग्य होईल ! वैद्यक, अभियांत्रिकी, न्यायशास्त्र, प्रशासन, व्यवस्थापन, माहिती तंत्रविद्या (Infotech), विज्ञान, शिक्षणशास्त्र, राजकारण, ग्रंथपालन, कार्यालयीन व्यवहार इत्यादी शिक्षणक्षेत्रांकडे महिलांनी मुळीच फिरकू नये असे संपादकांना वाटते काय ? कारण त्यांच्या मताप्रमाणे सुशिक्षित महिलांनी आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्षे बालसंगोपनातच घालविली पाहिजेत!

(३) विवाह करणे व मुले होऊ देणे या गोष्टी एका विशिष्ट वयातच करणे आरोग्यासाठी आणि कुटुंबकल्याणासाठी (Family Welfare) आवश्यक असते. विवाह व प्रजोत्पादन लांबणीवर टाकल्याने अथवा नाकारल्यामुळे आयुष्य भकास झालेल्या स्त्रियांची अनेक उदाहरणे समाजात आढळतात. तेव्हा योग्य वयात म्हणजे नोकरी/व्यवसाय उमेदीने करण्याच्या काळातच, मुले होणे अपरिहार्य असते ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अशा वयात झालेल्या मुलांचे संगोपन, संस्कार व उत्तम भावनिक बुद्ध्यंकवृद्धीसाठी मातेच्या सवासाइतकी इष्ट परिस्थिती असूच शकत नाही याविषयी दुमत असण्याचे कारणच नाही. प्रत्येक नोकरी करणारी माता या बाबतीत संवेदनशील असतेच. परंतु नोकरी/व्यवसायाकडे दुर्लक्ष करणेही तिला अनिष्ट वाटते. त्यामुळे नाइलाज म्हणूनच, मन घट्ट करून महिला आपल्या बालकांना पाळणाघरात ठेवण्यास तयार होतात. पाळणाघरात ठेवून ऑफिसात जाताना महिला “आपले मूल सायंकाळी जिवंत व धडधाकट परत मिळाले तरी पुरे” असेच अगतिकपणे आपल्या मनात घोकत असते हे सत्य आहे!

(४) हल्ली संयुक्त कुटुंबे तर जवळपास संपुष्टात आली आहेत. काही घरांत वृद्ध आजी आजोबा असतात व ते नातवंडे सांभाळण्याइतपत सशक्तही असतात, परंतु अशी उदाहरणे विरळाच. बहुसंख्य आजी आजोबा थकलेले असतात व या वयात कोणतीही काळजी न करता विश्रांत जीवन घालविण्याची त्यांची सार्थ इच्छा असते. सारे आयुष्य धकाधकीत घालविल्यानंतर जीवनाच्या सायंकाळी तरी स्वस्थता लाभावी अशी त्यांची इच्छा असते. तरुणपणी आपल्या मुलांच्या खस्ता खाल्ल्या, आता म्हातारपणी नातवंडांच्या खस्ता आम्हीच खावयाच्या काय असा त्यांचा रास्त सवाल असतो व तो योग्यच असतो, कारण ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना सतत ८-१० तास सांभाळणे म्हणजे काय असते ते ज्यांनी केले आहे त्यांनाच समजू शकते! त्यामुळे नोकरीपेशा करणा-या महिलांना पाळणाघर या संस्थेवाचून खरोखरच पर्याय उरत नाही.

(५) आजचा सुधारकच्या कार्यकारी संपादकांनी “प्राप्त परिस्थिती कोणत्या दिशेने बदलावी’ ह्यावर खुलासा केला असून त्यामुळे सर्व मतभेद संपतील’ असे म्हटले आहे. हा संपादकांचा विश्वास मात्र केवळ स्वप्नरंजनच आहे. प्राप्त परिस्थिती बदलणे ही संपादकांच्या खुलाशाने साध्य होण्याइतकी सोपी गोष्ट नाही. जगातील सद्यःस्थितीचा जो रेटा आहे तो थोपविणे व पुन्हा महिलांना आयुष्यातील उमेदीच्या वर्षात “राधा, वाढा, उष्टी काढा, दुपटी धुवा, अंगाई गा’ याकडे कोण परतवू शकेल? त्याऐवजी प्राप्त परिस्थितीत नोकरीपेशा करणाच्या लेकुरवाळ्या महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी यथार्थ व वास्तव उपाययोजना करणे हेच महत्त्वाचे आणि शहाणपणाचे ठरेल.

(६) सर्व जगांत-विशेषतः पाश्चात्त्य राष्ट्रांत-स्त्रीमुक्तीच्या चळवळीचा एक प्रमुख भाग म्हणजे चांगल्या “Day-care Centres” ची स्थापना हा आहे. त्याविषयी शासनाने, उद्योगपतींनी व मोठ्या संस्थांनी आपली जबाबदारी पार पाडावी अशी स्त्रीमुक्तीआंदोलनकर्त्यांची सतत मागणी असते. असे असताना भारतात पाळणाघरांना अपप्रवृत्ती मानणे ही घोर मागासपणाची व स्त्रीविरोधी भूमिका आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. त्याऐवजी या देशात अधिक संख्येत (अनेकपट) उत्तम संचालन व व्यवस्थापन असलेली पाळणाघरे वस्तीवस्तीत कशी स्थापन होतील यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. शहरी तसेच ग्रामीण क्षेत्रातील रहिवासी वसाहतींमध्ये (Residential Areas) मोकळ्या, स्वच्छ इमारतीत, प्रशिक्षित संचालकांकडून संचलित, पुरेशा प्रमाणात प्रशिक्षित दाई कर्मचा-यांकडून पाळणाघरे चालविली गेली पाहिजेत. पाळणाघरांची नोंदणी, वारंवार तपासणी, कर्मचा-यांच्या प्रशिक्षणाची सोय, पाळणाघरांना गरज पडेल तेव्हा वैद्यकीय साहाय्य उपलब्ध करून देणे याबाबतीत शासनाने कायदा व नियम तयार करणे आवश्यक आहे. उद्योगपती, मोठ्या संस्था, कार्यालये यांनीही या बाबतीत पुढाकार घ्यावा यासाठी त्यांच्यावर दबाव आणणेही आवश्यक आहे. पाळणाघर-संचालनाचे व दाई कर्मचा-यांसाठी पदविका व प्रमाणपत्रे देणारे अभ्यासक्रम शासनाने व सामाजिक संस्थांनी सुरू करणे अगत्याचे आहे. जसे शिक्षणक्रम औद्योगिक कर्मचारी महिलांच्या मुलांना सांभाळण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी उपलब्ध आहेत. पाळणाघरातील कर्मचा-यांची अर्हता, वेतनमान, शिस्त यांविषयी नियम करणे, पाळणाघरांकडून बालकांच्या देखभालीसाठी आकारण्यात येणा-या शुल्कावर नियंत्रण ठेवणे, पाळणाघरातील सुविधा (physical facilities) सुनिश्चित करणे यांसाठी महिलासंघटना, विधायक/सामाजिक संघटना, प्रसारमाध्यमे यांनी सातत्याने पाठपुरावा करीत राहिले पाहिजे.

पाळणाघरांना “अपप्रवृत्ती’ संबोधून या अत्यंत उपयुक्त संस्थेचा विरोध करणे हे सुधारणावादी व विवेकी मंडळींना शोभत नाही असेच खेदाने म्हणावे लागते !

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.