स्फुट लेख- हजाराची नोट

‘काही वर्षांपूर्वीपर्यंत चालू असलेल्या मध्यंतरी बंद केलेल्या हजाराच्या नोटा पुन्हा सुरू करण्यात आल्या’ अशी बातमी अलिकडेच वाचली. हे काम फार पूर्वीच व्हायला हवे होते. दुसरे महायुद्ध सुरू असताना त्यावेळच्या सरकारला गरज वाटल्यावरून एक रुपयाच्या नोटा प्रसृत करण्यात आल्या आणि चलनवाढीला ख-या अर्थाने सुरुवात झाली. पहिले महायुद्ध सुरू झाले त्यावेळी बाजारातून कवड्या, गंडे, टोल्या यांचे उच्चाटन झाले आणि दुस-या महायुद्धानंतर चांदीची नाणी चलनातून हद्दपार झाली.
खाजगी मालकी जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत पैशांची गरज पडणारच. पैशाचे स्वरूप मात्र बदलत जाणार आणि धातूच्या नाण्यांच्या ऐवजी किंवा नोटांच्या ऐवजी नुसताच आकडा या खात्यावरून त्या खात्यात हिंडणार. आजच्या Credit Card मुळे नाणी जमविण्याची ती गाडग्या-मडक्यांमध्ये किंवा हंड्यांमध्ये पुरून ठेवण्याची गरज पार नष्ट केली आहे.
Credit Card मुळे माणसाची फारच मोठी सोय होणार आहे. तुमची ऐपत सांगणारे आणि दाखविणारे ते अत्यंत सोयीस्कर साधन माणसाच्या मेंदूतून बाहेर पडले आहे. अडीअडचणीत उपयोगी पडेल म्हणून आणि आपल्या ऐपतीचा पुरावा म्हणून हातात सोन्याची अंगठी किंवा गळ्यात सोन्याची साखळी घालून लोक प्रवास करीत. परंतु या वस्तू चोरीला जाण्याची भीती होतीच..Credit Card मुळे त्यांची गरज राहिलेली नाही.
पंधरा-वीस वर्षापूर्वी रोखीचे व्यवहार करण्यावर निबंध आले आणि चेकने बँकांच्यामार्फत मोठे सर्व व्यवहार करण्याचे बंधन आले. पण ह्या बंधनाला कोणी फारसे जुमानले नाही. परिणाम असा झाला की आपल्या सरकारला लहान रकमांच्या नोटा खूप : मोठ्या प्रमाणावर छापाव्या लागल्या. दहा रुपयांच्या नोटा निघाल्या त्यावेळी त्यांचा जो आकार होता तेवढाच तो आजही आहे. परंतु दहा रुपयांच्या नोटांची क्रयशक्ती मात्र पार नष्ट झाली आहे, ती दोनशेपटीने घसरली असेल की काय कोण जाणे! काही बाबतींत (उदा. सोन्याची किंमत) तर ती नक्कीच घसरली आहे. परिणाम असा झाला की बँकेतील कारकुनांचे नोटा मोजण्याचे काम दोनशेपटीने वाढले आहे आणि पूर्वीच्या मानाने नोटांच्या नावाने दोनशेपट कागदांची नासाडी होत आहे. तेव्हा हजाराच्या नोटा प्रचलित केल्या हे फार चांगले झाले.
खाजगी मालकी म्हणजे प्रत्येकाची ऐपत वेगळी आणि सार्वजनिक मालकी म्हणजे प्रत्येकाची ऐपत सारखी. सार्वजनिक मालकीच्या वस्तू जितक्या प्रमाणात वाढतील तितक्या प्रमाणात आपली सार्वजनिक मालकीकडे आणि तितकीच समतेकडे वाटचाल होईल.
कारागीराला टिकवून काय साधणार?
परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय कारागीर हक्क परिषदे’मध्ये, त्या परिषदेचे उद्घाटन करताना समाजवादी जनपरिषदेचे राष्ट्रीय महामंत्री भाई वैद्य ह्यांचे भाषण झाले. त्यात भाई वैद्य एका ठिकाणी म्हणाले, “जातिविध्वंसन आणि नवीन आर्थिक धोरणाला कडवा विरोध हे समाजवादी जनपरिषदेचे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. अलीकडे व्यवसायाचे आणि जातीचे संबंध पूर्णपणे तुटले गेले आहेत. येथील कारागीरांना संपविण्याचा कुटिल डाव रचला जात आहे. ज्या क्षणाला येथील कारागिरांचे महत्त्व संपेल त्याच वेळी आपला संपूर्ण देश संपुष्टात येईल. शेतीनंतर सर्वाधिक व्यवसाय पुरविणारा कारागीर हा एकमेव उद्योग आहे, त्यावरच वज्राघात करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, परंतु आम्ही कदापि ते चालू देणार नाही.’ वगैरे.
भाई वैद्यांनी आपले हे धोरण बदलावे अशी त्यांना आमची नम्र विनंती आहे. सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, साळी, सोनार, चांभार, मच्छीमार, गवंडी, शिंपी, आणि ह्यां सारखीच एकमेकांच्या उपयोगी पडण्याची कामे करणारे जे लोक ते कारागीर अशी या मंडळींची व्याख्या त्या लेखात पुढे केलेली आहे.
वर उल्लेखिलेले उद्योग हे सगळे माणसाने एकमेकांच्या उपयोगाचे उद्योग म्हणून चालू केले आहेत. मानवसमूहाला उपयोगी नसेल असा कोणताही उद्योग उभा राहू शकत नाही. हे उद्योग कोणीही न करता जर माणसाच्या गरजा भागत असतील किंवा त्या अजिबात बदलल्या असतील तर कृत्रिमपणे हे उद्योग चालू ठेवण्यात काही हशील नाही. ह्या मंडळींना आज ना उद्या दुसरे कोठलेतरी उद्योग स्वीकारावेच लागतील; हे जाणून ते नवीन उद्योग त्यांना लवकर मिळावे अशी खटपट करणे योग्य आहे. हे उद्योग नष्ट झाल्यामुळे जे लोक बेरोजगार होतील त्यांना बेरोजगारी भत्ता मिळावा. नवा व्यवसाय सापडेपर्यंत त्यांनी उपाशी राहावे असे मात्र आमचे मुळीच म्हणणे नाही. त्यांच्या योगक्षेमाची चिंता आम्ही सान्यांनी मिळून वाहिली पाहिजे व त्याची तरतूद केलीच पाहिजे. पुरेसा बेकारभत्ता त्यांना दिल्याशिवाय बेकारीची समस्या सुटणार नाही. आपल्याला माणूस जिवंत ठेवावयाचा आहे, तो करीत असलेला व्यवसाय जिवंत ठेवलाच पाहिजे हे बंधन आपल्यावर नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.