जातिव्यवस्थेमधील दोष

वतनपद्धति ही जातिधर्माच्या अपार कुंडाचा गांवापुरता एक लहानसा हौद आहे. तिने जसे वतनदारांना व्यक्तिशः व समुच्चयाने तुटक, स्वार्थी व कमजोर करून एकंदर गांवगाड्याचा विचका केला, तीच गति एकंर हिंदुसमाजाची केली. जे आडांत तेच पोहळ्यांत येणार. जे धंदे ज्या जातीच्या हाती पडले ते तिच्या बाहेर जाऊं नयेत, ह्या धोरणाने जातधंदे धर्माच्या पदवीस चढविले. धंदेवाल्या जातींतील व्यक्तींचा लोभ वाढून त्यांना असे वाटू लागलें कीं, कांहीं प्रदेशापुरता का होईना, जातधंदा आपल्या विवक्षित कुळांच्या बाहेर जाऊ देऊ नये. त्यांच्या ह्या आपमतलबी धोरणाने वतन निर्माण केले. वतनांत राजाधिकाराचा अंश प्रमुख व जातिधर्मात धर्माधिकाराचा अंश प्रमुख असतो; तथापि दोघांनाही समाजाचे पाठबळ लागते व होतेंही. ज्या कारणांनी वतनी धंदे खालावले आणि अव्वल वतनदारांच्या हातून गेले, त्याच कारणांनीं अव्वलच्या जातधंद्यांची तटबंदी ढासळली. जात-धंदा आणि वतन ह्या संस्था लोकसंग्रहाच्या आटोपसर बाल्यावस्थेमध्ये समाजस्थिति कशीबशी सांवरून धरण्याला कितीहि उपकारक असल्या तरी त्या जातीजातींमध्ये व व्यक्तीव्यक्तींमध्ये सामाजिक जवाबदारी समतोल वांटून देण्याला, व्यक्तिगुणपोषणाला, आणि त्याच्या द्वारे समुच्चयाने सर्व प्रकारच्या कौशल्यवृद्धीला पूर्णपणें असमर्थ आहेत. वतनदारीपेक्षां जातिधर्माचा व्याप फार मोठा असल्यामुळे त्याचे परिणामही फार खोल व दूरवर गेले आहेत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.