संपादकीय

मागच्या अंकात पुष्कळ पत्रे प्रकाशित झाली. त्यांपैकी काही पत्रांना उत्तरे देण्याची गरज आहे. बारीकसारीक सूचनांचा अगोदर परामर्श घेऊ आणि गंभीर सूचनांचा मागाहून. श्री. मनोज करमरकर ह्यांनी मुखपृष्ठावर कॅप्टन ब्रीज यांचा उतारा छापून काय साधले असा प्रश्न उपस्थित केला आहे आणि श्री. मधुकर कांबळे ह्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या लेखातील उतारे आवर्जून प्रकाशित करावे अशी आम्हाला विनंती केली. ही दोन्ही पत्रे आम्ही कोणता मजकूर पुनःप्रकाशित करतो वा करावा ह्यासंबंधी आहेत. तरी त्या संबंधीचे धोरण पुन्हा एकदा स्पष्ट करतो.
आमच्या मासिकाच्या मुखपृष्ठावर एखाद्या जुन्या अथवा अल्पपरिचित पुस्तकातील जो भाग आम्हाला स्वतःला अंतर्मुख करतो, विचार करायला लावतो, अशा मजकुरातला एक अंश प्रकाशित करण्याचा आमचा प्रघात आहे. कॅप्टन ब्रिग्ज ह्यांच्या उता-याच्या साहाय्याने पेशवाई संपतानाचा काळ आणि आता त्यानंतर पावणेदोनशे वर्षानंतरचा काळ ह्या काळामध्ये महाराष्ट्रीय मंडळींच्या स्वभावात कितपत फरक पडला, पडला नसल्यास का पडला नाही ? असे विचार वाचकाच्या मनात निर्माण व्हावे एवढाच हेतु तो उतारा निवडण्यामागे होता. त्यासंबंधी एवढा खुलासा पुरे.
आता श्री. कांबळे यांच्या सूचनेविषयी. सुधारकामध्ये प्रकाशित करण्यात येणारे प्रत्येक वाक्य विचारप्रवर्तक असावे ही इच्छा जशी असते, त्याचप्रमाणे ते शक्यतोवर पूर्वप्रकाशित असू नये अशीही असते. सुधारकाचा वाचक हा मनाने प्रौढधी, प्राज्ञ वा सुजाण आहे असे गृहीत धरून आमचे लेखन होत असते. अशा वाचकाला डॉ. बाबासाहेबांचे लेख हे सहजप्राप्य आहेत. असा सङ्गप्राप्य मजकूर पुनःप्रकाशित करून काही उपयोग नाही हे आम्ही जाणतो. एवढ्यासाठीच आम्ही त्यांचे लेखन छापू इच्छित नाही. ते विचारप्रवर्तक नाही असे आमचे म्हणणे नाही.
काही ठरावीक जातीचेच लोक विचारप्रवर्तक लेखन करू शकतात असे आजचा सुधारक मानत नाही. त्याचप्रमाणे काही ठराविक जातीचे लोक विचारप्रवर्तक लेखन करूच शकत नाहीत असेही तो मानत नाही. त्यामुळे जातीकडे पाहून कोणत्याहि लेखनाचे प्रथमप्रकाशन वा पुनःप्रकाशन त्याला करता येत नाही.
पाळणाघरे हवीत की नकोत?
पाळणाघरे भरमसाठ वाढू देण्याऐवजी ज्या स्त्रियांना नाइलाजाने आपल्या मुलांना आपल्या सहवासापासून वंचित ठेवावे लागते त्यांना ते तसे ठेवावे लागू नये, त्यासाठी स्त्रियांची जी कामे कॉम्प्युटरकडून करून घेता येतील ती त्याच्याकडून करून घेण्यात यावी, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून कामाची ठिकाणे जवळ असावी; स्त्रियांना अर्धवेळ काम देण्यात यावे. आपापल्या घराची काळजी घेणे आणि मुले सांभाळणे ही कामे संपूर्ण समाजाच्या हिताचा विचार करता अत्यन्त महत्वाची, अत्यावश्यक आहेत हे सगळ्यांनी जाणावे, पुरुषाच्या
उत्पन्नातला स्त्रियांचा वाटा पुरुषांनी मान्य करावा ह्या दिशेकडे आम्हाला आमच्या चर्चेचे तोंड वळविण्याची इच्छा होती. परंतु त्या बाबतीत आम्ही सपशेल हरलो आहोत.
प्रस्तुत अंकात श्रीमती ललिता गंडभीर ह्यांचे त्या विषयावरचे पत्र आम्ही इतरत्र प्रकाशित करीत आहोत. त्याचा आता परामर्श घ्यावयाचा आहे.
श्रीमती गंडभीर ह्यांचे प्रस्तुत लेखन काय किंवा श्री. र.वि. पंडित ह्यांनी ज्यांचा मागच्या अंकात विस्तृत ऊहापोह केला आहे ते मुद्दे काय पुष्कळसे स्त्रियांच्या परिस्थितिशरणतेबाबतचे आहेत. सुधारकाचे कामच मुळी परिस्थितिशरणतेवर मात करण्याचे आहे. जेथे कोठे आपले वर्तन परिस्थितिशरणतेमुळे घडत असेल ते सारे हुडकून काढणे हे आमचे कार्य आहे. आमचा समज असा आहे की आमच्या परिस्थितीदास्याचे, परिस्थितीच्या गुलामीचे आम्हाला नीट आकलन होत नाही. ते आकलन करून घेण्याचा आम्ही सतत प्रयत्न करीत असतो, आणि आमचे आकलन यथायोग्य आहे की नाही हे इतरांशी बोलून आम्ही खात्री करून घेत असतो. ह्या परिस्थितीच्या त्याचप्रमाणे देवसंकल्पनेच्या दास्यातून बाहेर पडण्यासाठी, भलेही आम्हाला किती विलंब लागो, आमचा त्यांच्याशी संघर्ष चालू राहणार.
परिस्थितिशरणतेमुळे स्त्रियांनी आपली मुले पाळणाघरांच्या हवाली करू नयेत; मुलांच्या निकोप वाढीसाठी त्यांचा आणि मुलांचा जितका सवास घडणे आवश्यक आहे. तितका घडण्यामध्ये कोणताही अडथळा त्यांना जाणवू नये, त्यांच्या अनुभवास येऊ नये, एवढाच हेतू आमच्या लेखनाचा होता.
आमच्या प्रस्तुत विषयावरच्या लेखकांना नोकरी करणा-या स्त्रियांच्या अडचणी जेवढ्या जाणवतात तेवढ्या पाळणाघरे चालविणा-यांच्या जाणवत नाहीत. त्याही स्त्रियाच आहेत हे आमचे लेखक विसरून जातात की काय अशी शंका येते. पाळणाघरात एका महिलेने किती मुलांना सांभाळावे अशी त्यांची अपेक्षा आहे ? एखादीला जुळे झाले तरी तिची त्रेधातिरपीट होते. मुले किरकिरी असतात, खोडकर किंवा भांडखोर असतात आणि अशा मुलांना सांभाळणे अतिशय अवघड काम असते. अडीच-तीन महिन्यांची मुले आणि अडीच-तीन वर्षांची मुले ह्यांच्याकडे एकाचवेळी लक्ष देणे फारच अवघड असते, प्रायः अशक्य असते. त्यामुळे मुलांच्या निकोप वाढीसाठी आईमुलांचे किंवा दाई (धात्री) मुलांचे गुणोत्तर एकास एक असणे हेच इष्ट आहे.
आजचा सुधारक जशी स्त्रीपुरुषांमधील विषमता नष्ट करण्याचा विचार करतो तशीच तो स्त्रिया-स्त्रियांमधील विषमतादेखील नष्ट व्हावी अशा प्रयत्नात असतो. एखाद्या डॉक्टर महिलेने दोन, चार हजार रुपये रोज कमवावा आणि आपले मूल आपल्या गैरहजरीत वाढविणा-या आणि ते नीट वाढवून, मोठे करून तिच्या स्वाधीन करणा-या महिलेला मात्र तिने त्या कामाबद्दल २० रु. रोज देण्यास कांकू करावे. हे कितपत योग्य आहे ? आजचे हे दरदाम बदलावे आणि सर्वत्र समानता यावी यासाठीच तर सगळा खटाटोप आहे. परिस्थितिशरणतेतून आम्हाला बाहेर पडावयाचे आहे; ह्या आपद्धर्मातून सत्वर मुक्त व्हावयाचे आहे. उद्या काम करणाच्या सर्व स्त्रियांना आणि सगळ्या स्त्री-पुरुषांना सगळ्या कामांसाठी सारखाच पगार मिळू लागण्यासाठी आवश्यक ते मानस आम्ही निर्माण करू शकलो तर जी कोणती परिस्थिती येईल तिच्यामध्येही पाळणाघरे तितकीच आवश्यक राहतील काय?
मुलांना लहानपणापासून एकमेकांचा सहवास घडावा हा मुद्दा आम्हाला मुळीच अमान्य नाही, पण त्यासाठी पाळणाघरांची गरज काय ? आपल्याला मुलांना घेऊन एका ठिकाणी येऊन घरातले पापड लाटणे, लोणची घालणे, विणकाम, भरतकाम एकमेकांपासून शिकणे वा करणे, ही आणि अशासारखी कामे करून मुलांना एकमेकांचा सहवास देता येईल. त्यांनी एकत्र येऊन नुसत्या गप्पा मारल्या तरी हरकत नाही.
स्त्रिया नोक-या करीत राहिल्यामुळे त्यांचे जे अन्य हक्क आहेत त्यांकडे (म्हणजे नोकरी न करता पुरूषांच्या बरोबरीच्या दर्जाने राहण्याचे) दुर्लक्ष होते; पाळणाघरे वाढू दिली म्हणजे झाले असा विचार समाज करू लागतो, तो अनिष्ट आहे. पाळणाघरे वाढू दिल्यास स्त्रियांना वाटणा-या असुरक्षिततेच्या परिस्थितीत फरक पडत नाही. उलट ती बळकट होते. त्यांनी घर सांभाळणे आणि मुले सांभाळणे हे नोकरी करण्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कार्य आहे, हे समाजाने ओळखावयास नको काय?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.