चर्चा – विवेक, श्रद्धा आणि विज्ञान

नोव्हेंबर १९९८ च्या आ.सु. च्या अंकातील प्रा. दि.य. देशपांडे यांच्या ‘विवेकाचे अधिकार’ हा लेख वाचून सुचलेले विचार शब्दांकित करीत आहे.
मूळ लेखामागील भूमिकेत खालील कल्पना अध्याहृत आहेत असे वाटते:
अ) “सत्य” हे स्थलकालनिरपेक्ष स्वरूपाचे असते.
ब) अशा प्रकारचे सत्य कोणालाही समजून घेणे किंवा अनुभवणे शक्य असावे.
क) सत्यात व्याघात असता कामा नये. निरनिराळ्या श्रद्धाविषयांमध्ये व्याघात दिसतो त्यामुळे त्यांच्या सत्यतेबद्दल शंका निर्माण होते.
विज्ञानाच्या क्षेत्रातली काही उदाहरणे घेऊन अ, ब आणि क या कल्पना तपासून पाहणे उपयुक्त किंवा निदान मनोरंजक ठरावे ही आशा.
विज्ञानाच्या इतिहासाकडे दृष्टी टाकल्यास असे दिसते की सत्याचे मानवाला दिसणारे स्वरूप हळूहळू बदलत असते.
आज दिसणारे “सत्य” उद्या निराळ्या स्वरूपात शास्त्रज्ञांना दिसू शकते. न्यूटनच्या गतिविषयक नियमात बद्ध केलेले सत्य ही वैचारिक जगातली एक महत्त्वाची घटना समजली जाते. हे नियम प्रथम प्रसिद्ध झाले तेव्हा अनेकांची झोप उडाली. “लहानशा चेंडूपासून ग्रहगोल, तारे, इ. तमाम खेचर वस्तू आपापल्या कक्षेतून न्यूटनच्या नियमांप्रमाणे फिरत असतात त्यामुळे यापुढे ईश्वराची काही गरज नाही असे विचार मांडले गेले. विल्यम ब्लेकसारख्या विचारवंतांनी आपली व्यथा व्यक्त केली. त्यानंतरच्या काळात भौतिक शास्त्रात (classical physics) एवढे यश प्राप्त झाले की एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस शास्त्रज्ञांना असे वाटू लागले की त्यांना सोडवता येणार नाहीत असे फारसे प्रश्न उरले नसावेत.
पुढे प्रयोगांतून सापेक्षवादाचा सिद्धान्त मान्यता पावल्यानंतर सत्याचे स्वरूप बदलले. मायकेलसनच्या प्रयोगानंतर न्यूटनचे नियम असत्यात जमा करायचे काय या प्रश्नाचे उत्तर नाही” असे द्यावे लागेल. काही विशिष्ट मर्यादांच्या अंतर्गत (within a certain domain) न्यूटनचे नियम अचूक उत्तरे देतात. त्याच प्रश्नांची उत्तरे सापेक्षवादाच्या सिद्धान्तातूनदेखील मिळू शकतात. या दोन उत्तरांतला फरक फार सूक्ष्म असतो. शिवाय सापेक्षवादापेक्षा न्यूटनचे नियम वापरायला फार सोपे आहेत त्यामुळे दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवण्यासाठी न्यूटनचे “सत्य’ पुरेसे आहे. गणितात गती नसेल तर सापेक्षवादातून प्रगट झालेले वरच्या दर्जाचे “सत्य’ समजून घेण्याची आकांक्षा न ठेवलेलीच बरी. सत्य कोणालाही समजून घेणे किंवा अनुभवणे शक्य असावे ही कल्पना (ब) येथे लागू पडत नाही. आध्यात्मिक क्षेत्रातदेखील अशी काही सत्ये असू शकतात की जी काही थोड्या व्यक्तींनाच त्यांच्या अभ्यासामुळे, पात्रतेमुळे स्पष्ट दिसतात. अशा व्यक्तींना येणारे अनुभव सर्वांना मिळू शकत नाहीत म्हणून ते खोटे असले पाहिजेत असे विधान करणे आणि आईनस्टाईनचा सिद्धान्त सर्वांना समजू शकत नाही म्हणून सापेक्षवाद हे एक थोतांड असले पाहिजे असे विधान करणे यांत काही फरक आहे काय?
१९०० ते १९२० च्या सुमारास निर्माण झालेले Quantum Mechanics दुसरे एक वैचारिक वादळ ठरले. त्या वेळची मध्यवर्ती समस्या फार बिकट स्वरूपाची होती. विश्वाचा एक मूल घटक इलेक्ट्रॉन हा कणरूप आहे की तरंगरूप आहे (particle or wave) यावर मतभेद होता. काही प्रयोगांतून पहिल्या पर्यायाला पुष्टी मिळाली तर इतर प्रयोगांतून दुस-या. कण आणि तरंग यांचे गुणधर्म एवढे भिन्न आहेत की या दोन्ही क्षमता एकाच वस्तूत निवास करत असतील तर निसर्गनियमांतच व्याघात आहे असे मान्य करावे लागेल असे प्रतिपादन करून काही विनोदी मंडळी म्हणत की सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी इलेक्ट्रॉन कणाप्रमाणे वर्तन करतो आणि इतर दिवशी तरंगाप्रमाणे! हा विनोद करणारे लोक स्वतः भौतिक शास्त्राचे जाणकार होते. तरीदेखील ते हा विनोद खिलाडूपणे करीत. त्या विनोदात स्वत:च्या अज्ञानाची प्रांजळ कबुली होती. आपण सर्वांनी असा खिलाडूपणा दाखवला तर सत्य शोधण्याच्या मार्गातला दुराग्रहाचा एक अडसर दूर होईल.
कणतरंगद्वैताचे (wave – particle duality) कोडे सोडवण्यास अनेक पर्यायांचा विचार झाला. कायम ऊर्जेचा सिद्धान्त (Principle of Conservation of Energy) सोडून द्यावा लागला तरी चालेल परंतु निसर्गनियमांत व्याघात असण्याची आपत्ती टाळावी असेदेखील सुचविण्यात आले. आज असे दिसते की कण आणि तरंग यांमध्ये सकृद्दर्शनी दिसणारा व्याघात हा निसर्गनियमांच्या आविष्काराचाच एक भाग आहे. त्याला बिचकण्याचे कारण नाही. निखळ विज्ञानाच्या प्रांतात ही परिस्थिती दिसते तर अनेक शतकांपूर्वी, जगाच्या निरनिराळ्या भागांत, तत्कालीन समाजरचनेप्रमाणे त्या काळच्या विचारवंतांनी, धर्मगुरूंनी, समाजधारणेसाठी जी तत्त्वे, जे नियम घालून दिले त्यात व्याघात असणारच, त्याला अवास्तव महत्त्व द्यावे काय?
सापेक्षता सिद्धान्ताची गरज अत्यंत गतिमान कणांच्या अभ्यासासाठी भासते. त्याचप्रमाणे अत्यंत सूक्ष्म कणांच्या अभ्यासासाठी Quantum Mechanics ची गरज भासते. (अत्यंत सूक्ष्म आणि गतिमान कणांचा अभ्यास कशाने करतात असा प्रश्न सुज्ञ वाचकांना जाणवला असेलच.) न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांच्या अणुगर्भातील रचनेचे वर्णन करण्यासाठी अनेक models उपलब्ध आहेत. प्रत्येक model ची सत्यता काही विशिष्ट मर्यादित प्रकट होते. त्यामुळे या ‘अनेक models पैकी ‘खरे सत्य” कोणते ?’ असा प्रश्न विचारता येत नाही. एकाच सत्याचे हे निरनिराळे आविष्कार आहेत. विचारलेला प्रश्न तपासून त्याचे उत्तर मिळण्यासाठी योग्य ते model निवडावे लागते. एकाच सत्याचे वेगवेगळे आविष्कार क्वचितप्रसंगी परस्परविरोधीसुद्धा असू शकतात.
गणित विषय भौतिकशास्त्राचा कणा समजला जातो. गणितात संयुक्त संख्यांचा (complex numbers) उपयोग होतो. संयुक्त संख्येचा एक भाग खरा (real) आणि एक भाग काल्पनिक (imaginary) असतो. Quantum Mechanics मध्ये संयुक्त संख्यांशिवाय पान हलत नाही तर न्यूटनच्या भौतिकशास्त्रात I(sq. root-1) ला प्रवेश नसतो. प्रयोगशाळेत अमुक प्रयोग केल्यास काय दिसेल या प्रश्नाचे उत्तर Quantum Mechanics वापरून काढता येते. गंमत अशी की उत्तर मिळण्यासाठी वापरलेले गणित कितीही गुंतागुंतीचे असले तरी शेवटी उत्तर ख-या संख्येच्या स्वरूपातच येईल अशी रचना केलेली आहे. कारण दृश्य जगाचे वर्णन ख-या संख्यांनीच करावे लागेल. म्हणजे काय की एखादा हुशार वकील जशी आपली केस मांडतो तशी या theory ची रचना केलेली आहे. काल्पनिक संख्यांचा उपयोग तर करायचा पण शेवटी उत्तर खरे आले पाहिजे. पण म्हणून खरी परिस्थिती वकिलाने / शास्त्रज्ञाने वर्णन केल्याप्रमाणेच आहे असे मुळीच नाही. हुशार वकील खोट्याचे खरे करून दाखवू शकतो. वैज्ञानिक हे हुशार वकील असतात. फरक इतकाच की ते प्रामाणिक असतात. परंतु प्रामाणिक असणे आणि खरोखर सत्य जाणणे यात फरक आहे व तो लक्षात घेणे जरूर आहे.
तात्पर्य काय की भौतिकशास्त्रासारख्या तर्ककर्कश विषयातदेखील खरे आणि काल्पनिक, दृश्य आणि आभासमय, सत्य आणि असत्य यांच्यातल्या सीमारेषा हळूहळू पुसट होतात. आपल्याला समजलेले सत्य म्हणजे abstract models चा एक समुदाय आहे. असे म्हणावे लागेल. प्रयोगशाळेत अमुक प्रयोग केल्यास काय दिसेल याचा अंदाज ही models वापरून बांधता येतो. हा अंदाज प्रयोगशाळेत जरी खरा ठरला तरी त्यावरून models नी वर्णन केल्याप्रमाणे घटना घडतातच असे म्हणता येत नाही. तेच उत्तर दुस-या models च्या आधाराने देखील मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीदेखील अनेक वर्षे अचूक उत्तरे देणारया model वर वैज्ञानिकांची “श्रद्धा असते. उदाहरणार्थ कायम ऊर्जेचे तत्त्व (Principle of Conservation of Energy) हे सिद्ध करता येत नाही. आजपर्यंत केलेल्या एकाही प्रयोगाचा निष्कर्ष या तत्त्वाशी विसंगत नव्हता आणि त्यामुळे या तत्त्वाला सिद्धान्तरूप सत्याचा दर्जा दिला आहे. हा सिद्धान्त झुगारून देण्यासाठी असामान्य धैर्य लागेल.
विवेक आणि त्यातून निर्माण झालेले तर्कशास्त्र ही मानवी बुद्धीची सर्वांत तीक्ष्ण हत्यारे आहेत अशी कल्पना पाश्चात्त्य संस्कृतीत प्रबळ आहे. तिचा प्रभाव आपल्याकडेदेखील दिसतो. पूर्वेकडील अनेक विचारवंतांनी मानवी मनाच्या पलीकडे जाऊन त्याला प्रेरणा देणा-या शक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. हजारो वर्षांच्या त्यांच्या प्रयत्नांतून लागलेले शोध समजून घेण्यासाठी लागणारी साधना करण्याची तयारी आपल्यापैकी फार थोड्या लोकांची आहे. गंमत अशी की आईनस्टाईनचा सापेक्षवाद समजण्यासाठी गणिताचा अभ्यास (साधना) काही वर्षे करावा लागेल अशी अट बुद्धिवादी मान्य करतील परंतु स्वतःचे मनोव्यापार समजण्यासाठी साधना करावी लागेल, नियम पाळावे लागतील असे म्हटल्यास तेच बुद्धिवादी अनेक आक्षेप, शंका उपस्थित करतात. मानवी मनाचे पापुद्रे एकामागे एक उघडून त्यापलीकडल्या अज्ञात तत्त्वाची चाहूल घेणे हा एक प्रयोगच म्हणता येईल. तो करून बघण्याची आपली तयारी आहे काय हा खरा प्रश्न आहे. निखळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा प्रयोग करायला हरकत नसावी.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.