सत्याविषयीचा प्रकारभेद गैरलागू

प्रा. अनिलकुमार भाटे यांस,
स.न.
आपण माझ्या विवेकवादावरील लेखांसंबंधी (आ.सु. जानेवारी ९८, पृ. ३०८) विचारले. या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यापूर्वी या उत्तरांतील त्रोटकपणाबद्दल आपली क्षमा मागतो. तीन वर्षांपूर्वी मला झालेल्या आजारानंतर माझी लिहिण्याची ताकद भराभर कमी होत गेली आहे, आणि लिहिणे कष्टप्रद झाले आहे.
माझ्या लेखांसंबंधी आपले अवलोकन (observation) असे आहे की त्याचा सर्व भर Anglo-American तत्त्वज्ञानावर आहे. आपला हा समज कशामुळे झाला असेल ते मला सांगता येत नाही. कारण विवेकवाद ही सर्वच तत्त्वज्ञानांत समान असणारी विचारसरणी आहे अशी माझी समजूत आहे. सत्य विधाने प्राप्त करायची असतील तर त्यांना पुरेसा पुरावा असला पाहिजे हे विवेकवादाचे पहिले प्रतिपादन आहे. आणि हा पुरावा शेवटी इंद्रियानुभवाहून अन्य असू शकत नाही हे निःसंशय. तसेच आपले जीवन जर शहाणपणाने जगायचे असेल तर आपण केव्हा काय करायचे आणि काय टाळायचे हे ठरविता आले पाहिजे. त्यालाच मी विवेकाने वागणे म्हणतो. त्याचे स्वरूप काय आहे ते विवेकवादाने सांगायचे असते. या दोन्ही प्रश्नासंबंधी मतभेद शक्य आहे, परंतु त्यांची विविध उत्तरे स्थूलमानाने सारखीच आहेत असे मला वाटते. त्यामुळे मी कोणत्याच तत्त्वज्ञानाचा उल्लेख केला नाही. Continental वर्तमान तत्त्वज्ञानाविषयी माझे मत अनुकूल झालेले नाही हे मात्र मी कबूल करतो.
आपण म्हणता की Anglo-American तत्त्वज्ञानाचा सगळा भर formalism वर आहे, पण अनेक लॉजिके निर्माण होऊनही formalization चा प्रश्न सुटलेला नाही, हे आपले म्हणणे मला समजले नाही. Formalism म्हणजे आपल्याला काय अभिप्रेत आहे ते मला माहीत नाही. तरी ते कृपया समजावून सांगावे.
आपण म्हणता की सत्याचे दोन प्रकार आहेत, objective आणि subjective. मला वाटते की सत्याविषयी subjective आणि objective हा भेद गैरलागू आहे. आपण म्हणता की आपला हात दुखत असेल तर त्याच्या बाह्य expression च्या अभावी ते असल्याखेरीज अन्य कोणालाही ज्ञान होऊ शकणार नाही. हे internal truth. पण सत्य किती लोकांना ज्ञात आहे याचा सत्यतेशी काही संबंध नाही. जर आपला हात दुखत असेल, म्हणजे ती वस्तुस्थिती असेल तर ते सत्य आहे, मग ते कोणाला ज्ञात होवो अगर न होवो. मनुष्य पृथ्वीवर येण्यापूर्वी तिच्यावर काय घडले हे कोणालाही माहीत नव्हते, पण म्हणून सर्व शून्य होते असा त्याचा अर्थ होत नाही. आजही पशूची सर्वच सुखदुःखे आपल्याला माहीत नसतात, पण म्हणून ती नाहीत असे होत नाही.
आपण पुढे जाऊन म्हणता की हिंदू तत्त्वज्ञानातील बरीचशी सत्ये subjective ** truths आहेत. त्याची काही उदाहरणे दिली असती तर बरे झाले असते. हिंदू तत्त्वज्ञानातील सत्ये ही सर्व परोक्षानुभूति आणि अपरोक्षानुभूति अशा दोन अनुभूतींवर आधारलेली आहेत असे आपण म्हणता. पण तेही अनाकलनीय आहे. ते सोदाहरण स्पष्ट करावे अशी विनंती आहे.
अमेरिकन तत्त्वज्ञांना आपले म्हणणे पटले नाही याचे मला आश्चर्य वाटले नाही. मी भारतीय असूनही मला ते समजले नाही.
दि. य. देशपांडे
अनुभव न येणे हाही अनुभवच
संपादक, आजचा सुधारक
यांस सप्रेम नमस्कार
आ. सु. च्या जाने ९९ च्या अंकात भाट्यांचे जे पत्र आले आहे त्याला उत्तर मी भाट्यांकडेच पाठवले आहे. त्याची नक्कल सोबत पाठवीत आहे.
आपण ज्याला अनुभव म्हणतो त्यात आपला घडवलेला भाग असतोच. बाह्य सृष्टीचे तटस्थ आकलन इतक्यापुरताच ‘अनुभव’ मर्यादित नसतो ह्या अनुभवाच्या (म्हणजे आकलन+आपण लावलेला अर्थ याच्या) आधारावर आपले जीवन अपेक्षेनुसार नीट झाले की तो अनुभव सार्थ होतो. व्यवहाराच्या कक्षेबाहेर असलेल्या विधानाला माझ्या मते काहीच मूल्य नाही. देव आहे. देव नाही, निर्यात म्हणून काही वस्तू आहे नाही पुनर्जन्म आहे/नाही या कल्पनांचा पडताळा व्यवहारातून कधी येत नाही. त्यामुळे त्यांच्या संबंधीचे वाद हे वितंडवाद
आहेत असे मला वाटते.
हे माझे म्हणणे मी निराळ्या प्रकाराने आ.सु. मध्ये पूर्वी मांडलेले आहे. पुन्हा एकदा आ. सु. मध्ये हा वाद निघाला म्हणून पुन्हा लिहीत आहे इतकेच.
आपला भ. पां. पाटणकर

श्री. भाटे यांस सप्रेम नमस्कार,
आजचा सुधारक, जाने. ९९ मधील आपला लेख वाचला. Logic चे अनेक प्रकार आहेत हे प्रथमच समजले. तुम्ही देव-धर्म यांना बकवास म्हणता आणि ब्रह्मान्वेषण हेच फक्त खरे आहे असे म्हणता हे गोंधळात टाकणारे आहे. ह्या गोंधळाला ह्या पत्राद्वारे वाचा फोडत आहे असे समजून हे पत्र वाचावे व इच्छा असल्यास उत्तर द्यावे.
तुम्ही हात दुखण्याचे उदाहरण दिले आहे. तसेच एक खरे उदाहरण देतो. माझी एका गृहस्थाची ओळख झाल्यावर कळले की त्याचे डोके सतत दुखत असते. मी त्याला म्हटले की माझे डोके कधीच दुखत नाही. त्याला आश्चर्य वाटले व तो म्हणाला की डोके ही मुळातच दुखणारी वस्तू आहे!
त्याचे डोके दुखणे हे जसे त्याच्यापुरते खरे तसेच माझे डोके न दुखणे हे माझ्यापुरते खरे, पण त्याच्या डोके दुखण्याची कारणेही subjective (मानसिक) असू शकतात असे मानसशास्त्र सांगते. माझे डोके न दुखण हे माझ्या मानसिकतेवर अवलंबून आहे, (म्हणजे डोके दुखण्याची objective स्थिती आहे, फक्त मानसिक कारणांमुळे डोके दुखण्याचा अनुभव येत नाही) असे प्रतिपादन कोठे वाचलेले नाही.
ब्रह्म नावाच्या अनुभवाचेही असेच म्हणता येईल. एक प्रकारच्या subjective conditioning शिवाय हा अनुभव येत नाही असेच सर्वत्र मानले जाते. ब्रह्माचा किंवा देवाचा अनुभव ‘न’ येणे याला काही conditioning लागत नाही. हा अनुभव ‘न’ येणे हाही एक प्रकारचा अनुभवच आहे, नाही का ? असे अनुभवाचे अनेक प्रकार एकाच वेळी अस्तित्वात असू शकतात.
त्यांपैकी एका अनुभवाला खरे म्हणायचे आणि दुस-याला बकवास म्हणायचे किंवा थोड्या सभ्य भाषेत ‘माया’ म्हणायचे हा पंक्तिप्रपंच कशाच्या आधारावर करायचा ? विशेषतः conditioned अनुभवाला खरे म्हणायचे आणि unconditioned अनुभवाला खोटे म्हणायचे हे तर फारच विचित्र वाटते.
तुम्हाला योगसाधनेतून काही अनुभव आले याचा अर्थ इतकाच होतो की तुमच्यात काही जाणिवा अस्तित्वात आल्या. तीच जाणीव फक्त खरी आहे, इतर सर्व बकवास आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तुमच्या subjective अनुभवाला objective मूल्य देता कामा नये.
असे- असे अनुभव येतात एवढेच फक्त म्हणून हा प्रश्न सुटणारा नाही. त्या अनुभवांना किंमत काय द्यायची हा प्रश्न त्या अनुभवांबाहेरचा आहे. तुम्हाला एक अनुभव येतो याला स्वतः- सिद्ध मूल्य काही नाही. मला तसा अनुभव येत नाही यालाही स्वतःसिद्ध मूल्य काही नाही. या अनुभवांची मूल्ये कशी ठरवायची हा खरा प्रश्न आहे. मला काही हा प्रश्न सुटला नाही, तेव्हा मी प्रयत्न सोडून दिला आहे. तुम्हाला काही उत्तर सापडले असल्यास कळवावे.
3-4, 208 Kashigada भ. पां. पाटणकर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.