अमेरिकेत आजचा सुधारक

काही एका कौटुंबिक कारणाने अमेरिकेला जायचा योग आला. जाताना मोहनींकडून तिथल्या वर्गणीदारांची यादी घेतली. म्हटले, विचारू कसा वाटतो आजचा सुधारक ? खरोखरी वाचता की कोणाच्या भिडेखातर १० डॉलर्स भरले, असे झाले ? यादी तीसेक जणांची होती. पण काही वाचक निश्चल होते. वर्ष उलटले, स्मरणपत्रे गेली तरी हूँ की चूं नाही. न्यू जर्सीत ४ जण, त्यातली एक मुलगीच मधू. तिने इंटरनेटवरून पत्त्यावरून एकदोन फोन नंबर काढून दिले. एका सकाळी फडणिसांना फोन केला. उत्तर आले, ते आंघोळीला गेले आहेत. नंबर ठेवून द्या. तेच फोन करतील. दोन दिवस उलटले. फोन आला नाही. मधू म्हणाली, वाट पाहू नका,
इथे बोलायचे नसले तर तसेच सांगतात. तिस-या दिवशी फोन, फडणीस म्हणाले, माफ करा विसरूनच गेलो होतो. त्यांना मनाशी योजून ठेवलेले प्रश्न विचारले. म्हणाले, मासिक फर्स्टक्लास आहे. मी वाचतो. पण वर्गणीदार सासूबाईंच्या भिडेखातर झाले हे मात्र खरे. म्हटले, पुन्हा वर्गणी आली नाही म्हणून शंका आली. पण मी वर्गणीकरिता फोन नाही केला. यावर ते जे बोलले त्याने पुढची सगळी सांगण्यासारखी कहाणी घडली. माझ्या तिथल्या वास्तव्याला एक दिशा मिळाली.
फडणिसांनी चौकशी केली होती, न्यू जर्सीत किती वर्गणीदार ? जवळपासच्या राज्यात ? एकूण अमेरिकेत आणि सगळे मिळून खप किती ? तुमचा मुक्काम किती ? म्हणाले, एक बैठक बोलवा, न्यू जर्सीतले ४ आणि जवळपासचे ८-१० अशांची. मी एक जेवण देतो. वर्गणीदार कसे वाढतील ते सांगतो. मी सेल्सचा माणूस आहे. मी वर्गणी मागत नाही असे कोणाला म्हणू नका. हा देश विक्रेत्यांचा आहे. तुमच्या चार महिन्यांत तुम्हाला चाळीस वर्गणीदार मिळतील. मी सांगतो तसे करा.
ही गोष्ट ऑगस्टमधली. मी २४ नोव्हेंबरला न्यू जर्सी सोडले. तेवीस तारखेपर्यंत तेथे मला एकूण एक्क्यांशी वर्गणीदार मिळाले. त्यांतले तीस तेथले, एक्कावन्न तेथल्यांनी भारतात प्रायोजित केलेले. साठांच्यावर आजीव सदस्य,
फडणिसांचे १६ नोव्हेंबरचे पत्र आहे : Dear Prof. Kulkarni
Enclosed is the balance of payment for Life Membership for Dilip Phadnis.
It was nice working with you on this activity.
Once again, you are doing a phenomenal work in this superb magazine,
My regards to all your colleagues also.
Best Regards,
Dilip Phadnis
Please do contact me on your next trip.
राजन् मराठे अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा उत्साही तरुण. त्याचे उत्तर आले. त्याला पत्र मिळाले होते. वाचकांचे अर्ध्या दिवसाचे शिबिर घ्यायची कल्पना त्याने उचलून धरली. चला, मला एक साथी मिळाला. फडणीस दरम्यान भारताला निघून गेलेले. त्यांच्या लाडक्या भाचीच्या साखरपुड्यासाठी. राजन् येऊन भेटला. त्याला आमंत्रणपत्राचा मसुदा दिला. यादी दिली. आठवड्यात पत्रे रवाना होतील. आम्ही सप्टेंबर १२ वीकेण्डचा शनिवार हा दिवस सुचवला. पर्यायी सूचना मागवल्या. दहा ऑगस्टला राजनला विचारले तर अजून पत्रेच रवाना व्हायची होती. बॉस्टनचा डॉ. ललिता गंडभीरांचा फोन, फैक्स दिला. म्हटले, उद्या मी त्यांच्याकडे जात आहे. पत्रे रवाना झाली की एक या त्यांच्या पत्त्यावर फॅक्स कर. राजनने १४ ऑगस्टला पत्रे रवाना केली. ललिता म्हणाल्या, मी यायचा प्रयत्न करते. बॉस्टनहून राजनचे घर (Summit) ६ तासांचा कारचा रस्ता. कनेक्टिकटमधून स्टॅम्फर्डहून सुनील देशमुखांनी यावे म्हणून आमचा, (राजनचा अन् माझा) प्रयत्न होता. ते महाराष्ट्र फौंडेशनचे अध्यक्ष म्हणून मला माहीत होते. राजनला ते न्यूयॉर्कचे वॉलस्ट्रीटवरचे जादूगार म्हणूनही ज्ञात होते. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातले शिक्षणशास्त्राचे प्राध्यापक नरेन् तांबे यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते. न्यूयॉर्क राज्यातल्या व्हेस्टलच्या सरिता करंदीकरही ४-५ तास ड्राइव्ह करून येणार म्हणाल्या. प्रोफेसर तांब्यांना तर ८ तास ड्राइव्ह करावा लागणार होता.
दरम्यान ५ सप्टेंबरला ‘मराठीविश्व’चा गणेशोत्सव मेळावा होता. चाळीस मैलांवरील मानालपन येथील शाळेत – न्यू जर्सी आणि आसमंतातले महाराष्ट्रीय मराठी विश्व’चे आश्रयदाते – असे त्या दिवशी पाच सहाशे लोक जमणार. राजन म्हणाला, तिथे आपल्याला स्टॉल मांडता येईल. एक टेबल मिळेल. आपण सुधारकाचे जुने अंक लोकांना दाखवू. माहिती देऊ. मराठीविश्वचे अध्यक्ष डॉ. लोथे यांनी त्याला तशी परवानगी दिली होती. टेबलावर लोकांचे लक्ष वेधण्यासाठी दीड फूट बाय दीड फूट अशा दोन रंगीत खड्वर ‘सुधारक’ची ठळक माहिती, वार्षिक वर्गणी, मिळण्याचे ठिकाण इत्यादी माहिती मोठ्या अक्षरांत लिहिली. आणि दुस-या एका एकपानी माहितीपत्रकावर आजचा सुधारक काय आहे असा प्रश्न करून प्रश्नोत्तराच्या रूपात १५-२० ओळी माहिती दिली होती. बुद्धिवादी विचारसरणी काय आहे ? ऐहिक सुखाचे स्वरूप कोणते ? ते कशात आहे ? सुजीवनासाठी विज्ञाननिष्ठेशिवाय आणखी काय हवे ? आता जग सुधारले तरी आम्हाला आणखी कोणत्या सुधारणा हव्या ? असे प्रश्न आणि थोडक्यात उत्तरे असलेल्या या माहितीपत्रकाच्या ४०० प्रती घेऊन आम्ही स्टॉल मांडला. राजन नियोजित वेळेपेक्षा थोडा उशीरा थेट पोचणार होता. मला तेथे पोचवायला मधूच्या मैत्रिणीने मदत केली. आमचा स्टॉल चांगल्या जागी होता. राजनची ६ वर्षांची मेघना येणाच्या जाणारांना हाताने थांबवून आमचे माहितीपत्रक घ्यायला भाग पाडत होती. पुष्कळांनी चौकशी केली. आ.सु. च्या प्रती मागितल्या. त्या आमच्याकडे ज्यादा नव्हत्या. पाच वाजेपर्यंत ६ वर्गणीदार मिळाले. सुधारक वाढविण्यासाठी मराठ्यांच्या तिस-या पिढीचा हातभार लागला होता. राजचे वडील वारल्यानंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे सुधारकाला ५ हजार रु. ची देणगी राजनच्या आईकडून बडोद्याहून आली होती.
पुढचा शनिवार, सप्टेंबरची १२ तारीख, Summit मुक्कामी ११ हॅरिसन कोर्ट, या राजनच्या निवासस्थानी आ.सु. चा अमेरिकेतील पहिला वाचक-मेळावा! किती येतील, या माझ्या शंकायुक्त प्रश्नावर, निदान ‘दहा-बारा’ असे त्याचे विश्वासयुक्त उत्तर होते.
त्याच आठवड्यात फडणिसांशी फोनवर बोलणे झाले. ते भारतातून परतले होते. घरी पत्नीचे ऑपरेशन झाले होते. त्या आता ठीक आहेत. मी वाचक-मेळाव्याला नक्की येतो म्हणाले.
मेळाव्याच्या दिवशीची योजना अशी होती. दुपारी २ ते ४ ह्या पूर्वार्धात आ. सुधारकची विचारसरणी या विषयावर सुमारे १५ ते २० मिनिटे मी बीजभाषण करावे. श्री. सुनील देशमुख, ललिता गंडभीर, प्रो. नरेन् तांबे हे मुख्य चर्चक. सर्वांनी मनमोकळे विचार मांडावेत. या सत्राच्या अध्यक्ष सरिता करंदीकर. उपाहारानंतरचे सत्र ‘आ. सुधारकाचा विस्तार’ या विषयावर चर्चेचे. त्याच्या अध्यक्ष ललिता गंडभीर, आश्चर्य म्हणजे सर्व गोष्टी योजल्याप्रमाणे झाल्या. अपेक्षित मंडळी आली. सर्व मिळून २२ जण उपस्थित होते. ‘मराठी विश्व’ च्या पूर्वाध्यक्षा शैला विद्वांस व श्री अशोक विद्वांस आवर्जून आले होते. दोन्ही सत्रांत भरपूर प्रश्नोत्तरे झाली. आमच्या भक्त मंडळींनी देवाला व्यापायाच्या पातळीवर आणून बसवले आहे, मी तुला अमुक देतो तू मला तमुक दे, अशा मागण्या स्तुतीच्या बदल्यात कृपा-प्रसादाची अपेक्षा इ. गोष्टींवर बीजभाषणात टीका होती. तिच्यावर एक श्रोते म्हणाले, जे मला जसे भजतील त्यांना मी तसा पावेन (ये यथा मां प्रपद्यन्ते । तांस्तथैव भजाम्यहम् ||) यात Newton’s Law चेच दर्शन होते. त्यावर देवदेवतांची प्रसिद्धी देवो दुर्बल घातकः अशी आहे. आणि नीती तर दुर्बलांचे रक्षण करण्यात आहे असे उत्तर देण्यात आले. न देवानां चरितं चरेत् । या उक्तीची आठवण करून देण्यात आली. श्री. सुनील देशमुखांनी- अमेरिकेत येऊन संपन्न झालेला भारतीय दिवसेंदिवस अधिकाधिक देवपूजेला का लागतो; समाजोपयोगी कामाकडे पाठ का फिरवतो? असा प्रश्न उपस्थित करून स्वतःचे असे उत्तर दिले की : येथल्या मुक्त जीवनपद्धतीत वाढलेली मुले स्वतंत्रपणे विचार करतात, तुमचा अधिकार मानत नाहीत. पत्नी आर्थिक स्वातंत्र्याचा अनुभव घेऊन खरोखरीचे स्वातंत्र्य उपभोगू पाहते. घरातला केवळ वयाने मोठा म्हणून भारतातल्या कत्र्या पुरुषाला मिळणारा मान आणि अधिकार येथे आपोआप लाभत नाहीत. त्यामुळे संपन्न पण वैफल्यग्रस्त प्रौढ भारतीय देव देव करायला लागतो. दुर्बल आणि दुर्दैवी मानवाची आठवण त्याला येत नाही. नंतर नॉरवूडचे श्री. शिवाजी सोमण, प्रिन्स्टन जंक्शनचे श्री. श्रीराम गोवंडे, श्री. अशोक विद्वांस यांनी चर्चेत रंग भरला. उत्तरार्ध गाजवला तो हिल्सडेल येथील श्री. दिलीप फडणीस यांनी, आ.सु. हे world class magazine आहे. त्याचा प्रसार सर्वत्र झाला पाहिजे. ते इंटरनेटवर आले पाहिजे. त्याची English आवृत्ती निघाली पाहिजे. वर्गणी वाढवली पाहिजे, जाहिरात. खूप केली पाहिजे, त्यातले निवडक साहित्य एकत्र करून नमुना संच बनवले पाहिजेत अशा अनेकानेक सूचना आल्या. चर्चिल्या गेल्या. परिणामतः तोवर वर्गणीदार जे ६ झाले होते त्यांची संख्या सभा संपेतो २३ वर गेली. ती ८१ पर्यंत कशी पोचली याचा वृत्तान्त पुढील अंकी.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.