एका जुन्या वादाचा शेवट-फलज्योतिष : ग्रहांसहित आणि ग्रहांविरहितही; पण दोन्ही प्रकार भ्रामक!

फलज्योतिषाचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारच्या फलज्योतिषातले ग्रह सुबुद्ध असतात व त्यांना फलज्योतिषाचे नियम ठाऊक असतात. दुसऱ्या प्रकारच्या फलज्योतिषाला आकाशातल्या ग्रहांची गरज नसते. ग्रहांची नावे तेवढी त्यात वापरलेली असतात! माझे हे विधान वाचकांना चमत्कारिक वाटेल, पण ते अक्षरशः खरे आहे हे मी सिद्ध करणार आहे.

वादापुरती मान्य अशी गृहीतके
(१) ग्रहांचे फलज्योतिषीय प्रभाव पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर सतत पडत असतात. ग्रहांचे प्रकाश-किरण मात्र फक्त अर्ध्या भागावरच पडत असतात हे लक्षात ठेवावे. (२) प्रत्येक ग्रहाच्या प्रभावात १२ घटक समाविष्ट असतात. (३) प्रत्येक घटक कुंडलीतल्या एकेका स्थानाशी निगडित असतो, व (४) कुंडलीच्या स्थानाचे फल त्या घटकामुळे मिळते. फलज्योतिषाचा मुख्य सिद्धान्त असे म्हणतो की ग्रह जन्मकुंडलीत कोणत्या स्थानात पडला आहे त्या अनुसार तो आपले फल देतो. ग्रहांना बुद्धी असते या गृहीत कल्पनेवर हा सिद्धान्त आधारलेला आहे. ही वस्तुस्थिती सहजपणे लोकांच्या ध्यानात येत नाही, म्हणून मी ती पुढे मांडणार आहे.

पृथ्वीच्या पाठीवरचे १२ सेक्टर
भारताचा नकाशा पाहावा. त्यात ७० वे रेखावृत्त जामनगरवरून जाते. ८० वे रेखावृत्त जबलपूरवरून जाते, ९० वे डाक्क्यावरून आणि १०० वे बँकॉकवरून जाते. जामनगरपासून बँकॉकपर्यंत पसरलेला ७० ते १०० या रेखावृत्तांच्या दरम्यानचा, ३० रेखावृत्ते समाविष्ट असलेला जो भू-प्रदेश आहे त्याला आपण सेक्टर असे नाव देऊ. पृथ्वीवर ३६० रेखावृत्ते असल्यामुळे असे १२ सेक्टर्स संपूर्ण पृथ्वीच्या पाठीवर कल्पिता येतात. वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक ग्रहाच्या प्रभावाचे १२ प्रकार असतात, आणि अद्भुत गोष्ट ही आहे की त्यापैकी एकेक प्रकार एकेका विशिष्ट सेक्टरवरच पडतो. का आणि कसा हे एक मोठे गूढच आहे. फलज्योतिषाच्या नियमावरून पाहता ही दैवी योजना अशा स्वरूपाची दिसते:-

दैवी योजना
फलज्योतिषात सूर्य हा एक ग्रहच मानलेला आहे म्हणून, आणि इतर ग्रहांपेक्षा तो आपल्या चांगल्या परिचयाचा म्हणून मी सूर्याचे उदाहरण घेतो. आपण असे समजू या की आता दुपारचे १२ वाजून ५० मिनिटे झाली आहेत. या वेळी सूर्य जामनगरला म्हणजे ७० व्या रेखावृत्तावर बरोबर माथ्यावर आलेला आहे. ७० ते १०० या रेखावृत्तांच्यामध्ये असलेला जो सेक्टर आहे त्या सेक्टरवर सूर्य ९ व्या स्थानाला अनुरूप अशा प्रकारचाच प्रभाव टाकतो, म्हणून आपण या सेक्टरला ९ हा क्रमांक देऊ. या सेक्टरच्या पश्चिमेला ७० ते ४० या रेखावृत्ताच्या दरम्यानचा जामनगरपासून मक्केपर्यंतचा जो सेक्टर आहे त्यावर १० व्या स्थानाला अनुरूप असा प्रभाव सूर्य टाकतो म्हणून आपण त्याला १० वा क्रमांक देऊ. इकडे पूर्वेला १०० ते १३० रेखावृत्तांच्या दरम्यान बँकॉक ते सेऊलपर्यंत असलेल्या सेक्टरवर ८ व्या स्थानाचा प्रभाव सूर्य टाकतो म्हणून तो ८ वा सेक्टर असे म्हणू. म्हणजे मक्केपासून सेऊलपर्यंत १०, ९ आणि ८ असे सेक्टर्स ओळीने पश्चिम-पूर्व दिशेत बसलेले आहेत. त्याचप्रमाणे पुढे ७, ६, ५, ४, ३, २, १, १२ आणि ११ या अनुक्रमांचे सेक्टर्स आहेत. ज्या क्रमांकाच्या सेक्टरमधला जन्म, त्याच क्रमांकाच्या स्थानात सूर्य असणार व त्या स्थानाची फले तो देणार हे माझे विधान कुणालाही पडताळून बघता येईल.

उदाहरणार्थ, नागपूर हे जन्मठिकाण, कोणतीही जन्मतारीख फक्त जन्मवेळ दुपारी १२-५० घेऊन कुंडली मांडावी. सूर्य ९ व्या स्थानातच आढळेल. दुसरा एखादा सेक्टर जर घेतला तर तिथली स्थानिक वेळ भारतीय प्रमाण वेळेशी जुळवून घ्यावी लागेल. जसे, ग्रीनिच येथे आता सकाळचे ७-२० झाले असतील, व इंग्लंडमध्ये आता जन्मलेल्या मुलांच्या कुंडलीत सूर्य १२ व्या स्थानातच आढळेल. कारण या वेळी इंग्लंड १२ व्या सेक्टरमध्ये आहे.
यावरून ही गोष्ट उघड दिसते की प्रत्येक ग्रहाचा प्रभाव संपूर्ण पृथ्वीवर अगदी योजनाबद्ध रीतीने १२ सेक्टर्समध्ये वितरित केला जातो. म्हणून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो असा की, प्रभावाच्या पृथक्करणाचे आणि वितरणाचे हे अद्भुत काम करते तरी कोण ? जर फलज्योतिष हे एक खरोखरीचे शास्त्र असेल तर हे वितरण खरोखरीच होते असे समजून ते कोण करते या प्रश्नाचे उत्तर ज्योतिष-समर्थकांनी द्यायला हवे. जर हे शास्त्र बोगस असेल तर वितरणाची कल्पनाही बोगस आहे म्हणून तिचे कारण शोधायची गरज उरत नाही. फलज्योतिषाकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणाचा कसा आहे त्यावर हे अवलंबून आहे.

एक गोष्ट नक्की आहे की ग्रह आणि पृथ्वी यांच्यामध्ये असा कोणताही नैसर्गिक घटक नाही की ज्याच्यामुळे हे पृथक्करण आणि वितरण होऊ शकेल. खुद्द पृथ्वीवरच काही कारण सापडते का पाहू. पृथ्वीचा वक्राकार पृष्ठभाग त्याला कारणीभूत असू शकेल का ? तशी शक्यता नाही याचे कारण असे की, ग्रहांचे प्रभाव पृथ्वीच्या पोटातून आरपार जाऊन पलीकडच्या पृष्ठभागावर पोहोचतात, (नाही तर ते सर्व ठिकाणी कसे पोहोचतील ?) याचा अर्थ असा होतो की त्यांना पृथ्वीच्या वक्राकार पृष्ठाशी काही देणे-घेणे नाही. स्थानिक वेळ हे कारण असेल का ते पाहू. स्थानिक वेळ हे वास्तविकपणे काळाचेच रूप आहे. आत्ता या क्षणी भारतात मध्याह्न, इंग्लंडमध्ये सकाळ, तर अमेरिकेत मध्यरात्र झाली आहे. त्या स्थानिक वेळांचा म्हणजेच सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, यांचा परिणाम ग्रहांच्या प्रभावावर होऊन ते प्रत्येक सेक्टरमध्ये वेगवेगळे होत असतील का ? ते शक्य नाही, याचे पहिले कारण हे की स्थानिक वेळ दरेक रेखावृत्तावर ४ मिनिटांनी बदलत असते. या बदलत्या स्थानिक वेळेचा परिणाम ३० रेखावृत्ते ओलांडीपर्यंत काहीच न होता तिसावे रेखावृत्त ओलांडताच एकदम वेगळा का व्हावा याला काही कारण दिसत नाही. पण याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचे कारण असे की, काळ स्वतः कोणतीही गोष्ट घडवून आणीत नसतो. काळाची व्याख्या ‘कारणाधिकरणः कालः’ अशी वैशेषिक शास्त्रात केलेली आहे. तिचा अर्थ असा आहे की काल हा सर्व कारणांचे आश्रयस्थान असतो, पण तो स्वतः कशाचेही कारण होत नसतो. म्हणून स्थानिक वेळ ही ग्रह-प्रभावांच्या पृथक्करणाचे कारण असू शकत नाही. पृथ्वीच्या गोल आकारामुळे सूर्यकिरणांची तीव्रता एकाच वेळी कुठे कमी तर कुठे जास्त असते, त्याचप्रमाणे एकाच वेळी कुठे भरती तर कुठे ओहोटी होते पण या नैसर्गिक घटना ग्रह-प्रभावांच्या अद्भुत वितरणाचे स्पष्टीकरण करू शकत नाहीत. म्हणून मग निष्कर्ष असा निघतो की या वितरणाचे नैसर्गिक कारण काहीही नाही. त्यामुळे या प्रश्नाचा विचार जरा निराळयाच दृष्टिकोनातून करावा लागतो.

फलज्योतिषाची थोरवी गाताना ज्योतिष-प्रवक्ते त्याचे वर्णन एक दैवी गूढ शास्त्र असे करतात. भौतिक विज्ञानाच्या पलीकडचे शास्त्र, अशी त्याची महती ते सांगतात. खरोखरीच ते तसे असले पाहिजे यात शंका नाही, कारण त्यातले ग्रह त्यांच्या अनेक शुभ-अशुभ दृष्टी कुंडलीतल्या अनेक स्थानांवर ठेवतात. म्हणजे ग्रहांना डोळेही असलेच पाहिजेत! ज्योतिषातले शनि-मंगळासारखे भयप्रद ग्रह शांतिकर्मे केल्याने प्रसन्न होतात. दानधर्म केल्याने राहू-केतू संतुष्ट होतात. सूर्यदेवतेचे स्तवन तर वैदिक कालापासून होत आलेले आहे. अशा परिस्थितीत जर कुणी असे अनुमान काढले की ग्रहांना दैवी बुद्धी असली पाहिजे, तर ते स्वाभाविकच म्हटले पाहिजे. आणि जर हे अनुमान मान्य केले तर वरील यक्ष-प्रश्नाचे उत्तर चुटकीसरशी मिळते :- ग्रह-प्रभावांचे अद्भुत वितरण ग्रह स्वतः आपल्या दैवी बुद्धीच्या सामर्थ्याने करीत असले पाहिजेत, हेच त्या प्रश्नाचे उत्तर ! मी सुरुवातीला जे विधान केले आहे ते अशा रीतीने सिद्ध होते. पण हे उत्तर ज्योतिष-समर्थकांना एका शृंगापत्तीत टाकते. ते उत्तर मान्य करणे म्हणजे अचेतन ग्रह-गोलांना आणि राहू-केतू या काल्पनिक बिंदूंना बुद्धी आहे असे म्हणावे लागते. बरे, ते उत्तर मान्य न करावे तर त्या अद्भुत वितरणाची कल्पनाच खोटी आहे असे म्हणावे लागते. म्हणजे पर्यायाने फलज्योतिष बोगस शास्त्र आहे असे मान्य करावे लागते!

सर्व बाजूंनी अशी कोंडी झाल्यावर ज्योतिष-समर्थक त्यांच्या ठरावीक युक्तिवादाचा आश्रय घेतात. ते म्हणतात की, ज्याअर्थी या शास्त्राचे अनुभव येतात त्याअर्थी हे शास्त्र खरे असलेच पाहिजे ! पण येथेच तर ग्यानबाची मेख आहे. आकाशातल्या प्रत्यक्ष ग्रहांना गुंडाळून ठेवून केवळ त्यांच्या नावांचा वापर करणाऱ्या दशापद्धतीचेसुद्धा त्यांना अनुभव येतात असे जेव्हा ते सांगू लागतात तेव्हा त्यांच्या प्रामाणिकपणाचीच शंका येऊ लागते! या दशापद्धतीचा परिचय मी थोडक्यात करून देतो.

ग्रहांना वगळणारे फलज्योतिष : दशापद्धत
फलज्योतिषात दशापद्धतीचा वापर भविष्य वर्तवण्यासाठी करण्यात येतो. या पद्धतीत आकाशातील तारे, राशी व ग्रह यांची काही आवश्यकता नसते. ग्रह कोणत्या राशीत आहे, कोणत्या स्थानात आहे, या गोष्टीचा इथे काही संबंध नाही. ग्रहांच्या नावांनाच जणू काही ग्रहांचे सामर्थ्य प्राप्त झालेले असते असे इथे मानून चालायचे असते. म्हणून, पुढील मजकूर वाचताना ग्रह म्हणजे ग्रहाचे नाव असे कृपया समजून वाचावे!

प्रत्येक ग्रहाला काही ठरावीक कालखंडात त्याचा प्रभाव माणसाच्या नशिबावर चालवता येतो. त्या कालखंडाला दशाकाल असे नाव आहे. प्रत्येक दशाकालाची वर्षे किती असावीत, आणि ग्रहांची नावे कोणत्या क्रमाने असावीत यासाठी कसलाही नियम किंवा कसोटी न लावता निव्वळ मनमानीपणाने या पद्धतीची रचना कोणीतरी धूर्त लोकांनी आपला चरितार्थ चालवण्यासाठी केलेली आहे. हे कशावरून म्हणायचे तर पहिल्या प्रकारच्या ज्योतिषात ज्या अवघड व किचकट ग्रह-गणिताची गरज असते ती या पद्धतीत नसते. कुणीही ग्रामजोशी वापरू शकेल अशी ही पद्धत आहे. हल्ली कॉम्प्यूटरवर जी पत्रिका बनवून मिळते तिच्यात विंशोत्तरी दशेचा तपशील असतो तो पाहावा. या दशापद्धतीत ग्रहांची जी ओळ लावलेली असते आणि जे दशाकाल धरलेले असतात ते मी पुढे दाखवतो.

१ केतू, २ शुक्र, ३ सूर्य, ४ चंद्र. ५ मंगळ, ६ राहू, ७ गुरू, ८ शनी, व ९ बुध. यांचे दशाकाल याच अनुक्रमाने असे आहेत : वर्षे ७. २०, ६, १०, ७, १८, १६, १९ व १७. यांची एकूण बेरीज होते १२० वर्षे. दुसरी एक अष्टोत्तरी नावाची दशापद्धत आहे तिच्यात ग्रहांची ओळ लावताना केतूला वगळले आहे. का वगळले आहे ते कुणीही सांगू शकत नाही. तिच्यात क्र. २ ते ५ हे ग्रह वरील प्रमाणेच आहेत पण ६ ते ९ हे ग्रह उलट क्रमाने घेतले आहेत, ते तसे का घेतले ते कुणालाही ठाऊक नाही! केतू आणि राहू हे दोघेही चंद्राच्या मार्गावरचे काल्पनिक बिंदू, पण केतूची दशा ७ वर्षांची आणि राहूची मात्र १८ वर्षांची. हा फरक कशासाठी केला आहे ते कुणीच सांगू शकत नाही.

फलज्योतिषाचे कैवारी त्राग्याने म्हणतात की आमचे पूर्वज काही मूर्ख नव्हते, त्यांनी उगाच पोरखेळ म्हणून काही ही दशापद्धत बनवलेली नाही, तिच्यात काहीतरी गूढ तत्त्वे असलीच पाहिजेत. आज आम्हाला ती गूढ तत्त्वे कळत नसली म्हणून काय झाले ? आज नाही तर उद्या ती सापडतील. आमच्या थोर पूर्वजांनी हा अनमोल वारसा आम्हाला दिला आहे, त्याचा चांगला अनुभव आम्हाला येतो ! या त्यांच्या युक्तिवादाचा अर्थ एवढाच की ज्योतिषीलोकांना काय हव्या त्या गोष्टीचे अनुभव येतात. हा त्यांचा भ्रमिष्टपणा म्हणावा की भोंदूगिरी म्हणावी?

वैज्ञानिक दृष्टिकोन
ज्याचा कार्यकारणभाव आज कळलेला नाही अशी एखादी अपूर्व घटना/गोष्ट (फेनॉमेनॉन) उपेक्षणीय समजू नये असे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो. परंतु प्रश्न असा पडतो की फलज्योतिषाच्या बाबतीत ‘फेनॉमेनॉन’ याचा अर्थ काय घ्यावा? काही भाकिते खरी ठरतात आणि काही खोटी ठरतात याला का फेनॉमेनॉन म्हणायचे? फार तर ठोकताळे मानून त्यांचे परीक्षण एंपीरिकल पद्धतीने करावे. पण आता मुळातच फलज्योतिषाचा खोटेपणा सिद्ध झाल्यामुळे सर्व समीकरणे बदलली आहेत. ज्योतिष-समर्थकांनी फलज्योतिष हे खरे शास्त्र आहे असा प्रचार करण्यापूर्वी त्याच्या खरेपणाचा पुरावा दिला पाहिजे, ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे. ती ते टाळणार असतील तर टीकाकार रास्तपणे त्यांच्यावर दांभिकपणाचा आरोप करतील.

झटपट चाचणी परीक्षा
जर जन्मकुंडलीवरून ज्योतिष्यांना भविष्यातल्या घटना सांगता येत असतील तर त्याच कुंडलीवरून त्यांना भूतकाळी घडून गेलेल्या घटनाही तितक्याच अचूकपणे सांगता यायला हव्यात. अशा चाचणीद्वारे फलज्योतिषाचा खरेखोटेपणा झटपट पडताळून पाहता येईल.

ज्याची पन्नाशी उलटून गेली आहे अशा व्यक्तीच्या आयुष्यात निदान तीन-चार तरी ठळक घटना घडलेल्या असतातच. अशा घटनांचे वर्णन आणि त्या व्यक्तीची जन्मकुंडली जर ज्योतिष्याला दिली तर त्या घटना निदान कोणत्या वर्षी घडल्या (महिना सांगितला तर फारच उत्तम) ते त्याला सांगता यायला पाहिजे अर्थात या पद्धतीसाठी कोणीतरी ज्योतिष्याने सहकार्य करावयाला पाहिजे!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.