आजचा सुधारक’ (९:४, १२३-१२४) मध्ये मी मांडलेल्या एका कल्पनेवर अभ्युपगमावर (hypothesis) भरपूर प्रतिकूल प्रतिक्रिया होण्याची मी वाट पाहत होतो. कारण आ.सु.च्या माध्यमातून चर्चा करण्यासाठीच मी तो लेखप्रपंच केला होता. परंतु केवळ श्री. पंकज कुरुळकर यांच्याखेरीज (आ.सु., ९:८ पृष्ठ २५२, २५३) कोणी या विषयावर आपले मत जाहीरपणे व्यक्त केलेले नाही. पुण्याचे प्रा. प्र.वि. सोवनी यांनीही मी मांडलेली कल्पना हास्यास्पद आहे असे खाजगी पत्रातून कळविले आहे. कदाचित खरोखरच माझी कल्पना हास्यास्पद असू शकते. परंतु मी माझ्या अभ्युपगमावर ठाम आहे कारण सर्वच नवीन कल्पनांची प्रारंभी अशीच वाट लावण्यात येते असे इतिहासात अनेक दाखले आहेत. श्री. कुरुळकर व प्रा. सोवनी यांनी माझ्या लेखाची दखल घेतली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
माझ्या मूळ लेखातील काही मुद्दे अस्पष्ट होते, गैरसमज उत्पन्न करणारे होते ते मी स्पष्ट करू इच्छितो.
(१) १५ सप्टेंबर ते १५ जून या कालखंडात भारतात (किमानपक्षी) जन्मलेल्या व्यक्ती जीवनात अधिक यशस्वी होतात असे मी म्हटले होते, त्यामुळे यश कशाला म्हणावे असा प्रश्न निर्माण होतो. वस्तुतः या व्यक्ती अधिक असामान्य (uncommon) अथवा उल्लेखनीय (remarkable) ठरतात असे मी म्हणावयास हवे होते. माझ्या लेखात अशा व्यक्ती म्हणजे ज्यांचे नाव वृत्तपत्रादि प्रसारमाध्यमातून झळकते असे म्हटलेच होते. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये केवळ लौकिक अर्थाने सकारात्मक (positive) यश मिळविणा-या व्यक्तीच विचारात घ्यावयाच्या नसून, कोणत्याही प्रकारे सामान्य जनांच्या जीवनाहून वेगळे जीवन व्यतीत करून सार्वजनिक प्रसिद्धी मिळविणा-या व्यक्ती असा अर्थ घ्यावयास पाहिजे. अर्थात सामाजिक व राजकीय नेते, कलाकार, कुशल प्रशासक, वैज्ञानिक, डॉक्टर्स, अधिवक्ता याचबरोबर चंद्रास्वामी, वीरप्पन, हर्षद मेहता, दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, श्रीप्रकाश शुक्ला अशा नकारात्मक (negative) परंतु उल्लेखनीय जीवन जगणा-या व्यक्तींचाही समावेश होतो.
थोडक्यात सांगावयाचे झाल्यास ज्या व्यक्ती सामान्य जनांसारखे चाकोरीतील (मेंढरांसारखे) जीवन जगत नाहीत, अशांपैकी बहुसंख्य व्यक्ती सप्टेंबर ते जून या दरम्यान जन्मलेल्या असण्याची शक्यता अधिक असते. पूर्वी म्हटल्याप्रमाणे यात ग्रहांचे फल वगैरे भाकड कल्पनांना मुळीच स्थान नाही!
(२) १५ सप्टेंबर ते १५ जून हा कालखंड अतिशय काटेकोरपणे घेणेही योग्य नाही, कारण जीवांच्या (life forms) कार्यपद्धतीत असा गणिती काटेकोरपणा सहसा आढळत नाही. त्यात नेहमीच कमीअधिकपणा (range of values) असतो. म्हणून या कालखंडाविषयी ४-८ दिवस अलीकडेपलीकडे असण्याची शक्यता गृहीत धरावयास हवी. श्री. कुरुळकरांचा जन्म १० सप्टेंबरचा असल्याबद्दल त्यांनी मुळीच विषाद मानण्याचे व आपण आपल्या जीवनात कसे उत्तुंग यश संपादले आहे याचे विवेचन करण्याचे कारण नाही. ते खरोखरच असामान्य यशाचे मानकरी आहेत हे निस्संशय. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदनही करतो. असामान्य व्यक्तींना वाहून नेणारी बस प्रस्तुत लेखकाची सुमारे २० दिवसांनी चुकली! स्वतःला अतिसामान्य, प्रवाहपतित म्हणवून घेण्यास प्रस्तुत लेखकास मुळीच संकोच वाटत नाही.
(३) असामान्य व्यक्तींच्या (गेल्या दोन हजार वर्षांतील) जन्मतारखा व त्यांचे जीवनपट ताळेबंद स्वरूपात (तक्त्यांद्वारे) अशा लेखात मांडणे शक्यही नाही व उचितही नाही. ज्या वाचकांना यात रस आहे त्यांनी स्वतःच असा ताळेबंद मांडून पाहावा.
आमचा अभ्युपगम (hypothesis) काही वैज्ञानिक आधारावर मांडलेला आहे त्याविषयी थोडी चर्चा करणे योग्य ठरावे.
भारतात जून ते सप्टेंबर या कालखंडात जन्मणाच्या बालकांच्या गर्भधारणा ऑक्टोबर मध्य ते जानेवारी मध्य या भारतातील थंडीच्या मोसमातील असतात. या थंडीच्या दिवसांत स्त्रीपुरुष-संयोगाचे आधिक्य असते व अशा संयोगाची वारंवारता (frequency) स्त्रीपुरुषांच्या बौद्धिक विचारीपणापेक्षाही त्यांच्या शारीरिक गरजेवर अधिक अवलंबून असते. याचा अन्वयार्थ असाही लावता येतो की, केवळ शारीरिक गरज म्हणून संयोग पावणाच्या स्त्रीपुरुषांहून, विचारपूर्वक भावनिक आधारावर संयोग पावणाच्या स्त्रीपुरुषांचा बुध्यंक (I.Q.) जास्त असतो व त्यामुळे अशा संयोगातून जन्माला येणा-या बालकांचाही बुध्यंक अधिक असण्याची शक्यता जास्त असते. याचाच अर्थ क्षणिक सुखासाठी केलेल्या संयोगापासून जन्माला येणा-या बालकांची संख्या पावसाळ्यात इतर ऋतूंपेक्षा खूप अधिक असते हे सर्व सूतिकागृहाकडील अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडील जन्माच्या नोंदींवरून स्पष्ट दिसते. शेतीपिकांमध्ये हळवे म्हणजे लवकर पिकणारे व गरवे म्हणजे उशीरा पिकणारे वाण असते. हळव्या वाणामध्ये रोगराई व किडीपासून संरक्षण करण्याची शक्ती कमी असते परंतु गवे वाण अधिक काटक व रोगनिरोधक असते असा अनुभव आहे. असाच काहीसा प्रकार मानवी लोकसंख्येतही आढळतो.
मानवी शरीरक्रियांमध्ये (physiology) गर्भधारणा होण्यावर काळाचे अथवा ऋतूचे बंधन नाही, कारण मानव अति-उत्क्रांत प्राणी आहे. अन्य जीवांमध्ये मात्र गर्भधारणा विशिष्ट ऋतूमध्येच होते. बहुतेक सस्तन प्राणी तसेच असंख्य सपुष्प वनस्पतींमध्येसुद्धा गर्भधारणा / फलधारणा वसंतऋतूत होते. ती पर्यावरणाशी अधिक समन्वित (coordinated, synchronous) असते. अशा गर्भधारणेपासून पर्यावरणाशी अधिक सक्षमपणे तोंड देणारे जीव उत्पन्न होतात. मानवामध्ये जरी अत्यधिक जैविक, सामाजिक, सांस्कृतिक उत्क्रांतीमुळे हे ऋतुचक्र बिघडले असले तरी प्रजोत्पादनासाठी, अर्थात् गर्भधारणेसाठी, पर्यावरणाची विशिष्ट स्थिती अधिक लाभकारक असते. भारतात वातावरणात कमी थंडी असणारा काळ म्हणजे उत्तरायण (Winter solstice) ते दक्षिणायनाचे (Summer solstice) पहिले ३ महिने अर्थात् मकर-संक्रमणापासून (जानेवारी मध्यापासून) दिवाळीपर्यंतचा (ऑक्टोबर मध्यापर्यंतचा) कालखंड गर्भधारणेस अधिक उपयुक्त व पोषक ठरतो व या कालखंडात गर्भधारणा झालेल्या व्यक्तींना अधिक हितकारक असतो. म्हणूनच साधारणतः सप्टेंबर मध्यापासून जून मध्यापर्यंत जन्मणाच्या बालकांचा विकास (मग तो कोणत्याही प्रकारे असामान्यत्वाकडे नेणारा असो) अधिक प्रकर्षानि होतो.
गर्भाची वाढ होणारा पहिल्या ३ महिन्यांचा काळ (first trimester) हा त्या गर्भाच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी पायाभूत असतो, व या कालखंडात मातेच्या शरीरक्रिया सर्वोत्तम (optimum) असणे आवश्यक असते. भारतात जानेवारी मध्यापासून ऑक्टोबर मध्यापर्यंतच्या कालखंडात थंडी नसते त्यामुळे या कालखंडात मातेच्या शरीराचे तपमान योग्य राखण्यासाठी लागणा-या ऊर्जेचे प्रमाण कमी असते व ही ऊर्जा वाढणा-या गर्भाला पुरेशा प्रमाणात उपलब्ध होते. याउलट ऑक्टोबर-मध्यापासून जानेवारी-मध्यापर्यंत भारतातील वातावरण थंड असल्याने या काळात मातेच्या शरीरातील अधिक ऊर्जा मातेच्या शरीराचे तपमान राखण्यासाठी व अन्य शरीरक्रियांसाठी वापरली जाते. त्यामुळे या काळात रुजणाच्या गर्भाला कमी ऊर्जा उपलब्ध होते. त्यामुळे अशा गर्भाचा प्रथम तिमाहीतील अत्यंत महत्त्वाचा विकास काही प्रमाणात खुटतो. असे गर्भ जन्मानंतर या जीवनात काहीसे डावे ठरतात!
या सर्व कारणांमुळे भारतात तरी वातावरणात अधिक थंडी नसणाच्या कालखंडात गर्भधारणा होणे अधिक इष्ट. म्हणून ऑक्टोबर-मध्यापासून जानेवारी-मध्यापर्यंतच्या ३ महिन्यांमध्ये होणा-या गर्भधारणेपेक्षा इतर ९ महिन्यांत झालेल्या गर्भधारणेपासून जन्मणाच्या व्यक्ती भावी जीवनात असामान्य अथवा उल्लेखनीय जीवन जगण्यास अधिक सक्षम असतात असा आमचा अभ्युपगम (hypothesis) आहे. हा अभ्युपगम अंधश्रद्धेला खतपाणी घालतो हा श्री. कुरुळकरांचा आरोप वरील विवेचनावरून खोडला जातो.
हल्ली युरोपीय देशांतही अशा प्रकारचे निष्कर्ष काढले जाऊ लागले आहेत व त्यामुळे आमच्या जुन्या (किमान २०-२५ वर्षांपूर्वीच्या) अभ्युपगमास दुजोरा मिळू लागला आहे ही समाधानाची बाब आहे. जोपर्यंत पाश्चात्त्य संपर्क साधने (media) एखादी गोष्ट प्रसिद्ध करीत नाहीत तोपर्यंत आम्हा मंडळींचा त्यावर विश्वास बसत नाही. तेव्हा आता युरोपातून येणा-या नव्या वार्तामुळे तरी आमचा अभ्युपगम लोकांना हळूहळू पटू लागेल असा विश्वास वाटतो.