एकोणविसाव्या शतकातले एक विलोभनीय अद्भुत: डॉ. आनंदीबाई जोशी

काळ: एकोणिसाव्या शतकाचा तिसरा चरण. १८६५ च्या मार्च महिन्याची ३१ तारीख. त्यादिवशी कल्याण येथे एका मुलीचा जन्म झाला. नऊ वर्षांनी, १८७४ च्या मार्च महिन्याची पुन्हा तीच ३१ तारीख. त्या मुलीचा, नऊ वर्षांच्या घोडनवरीचा विवाह झाला. वर वधूपेक्षा फक्त २० वर्षांनी मोठा. बिजवर. आणखी नऊ वर्षांनी वयाच्या १८ व्या वर्षी ही ‘मुलगी उच्च शिक्षणासाठी, तेही वैद्यकीय, अमेरिकेच्या आगबोटीत बसली. एकटी. सोबतीला आप्त-स्वकीयच काय कोणी मराठी माणूसही नाही. ही घटना इ.स. १८८३ ची. तारीख ७ एप्रिल. त्या काळी नव्याने गुरु बनून बायकोला शिकविणे हा प्रकार दुर्मिळ असला तरी अद्भुत नव्हता. पंडिता रमाबाईंच्या आईला नव-याकडून अशीच विद्या मिळाली होती. किंबहुना डोंगरे-शास्त्र्यांनी तेवढ्यासाठीच हे लग्न केले होते. रमाबाई रानडे यांच्या हाती लग्न होताच न्यायमूर्तीनी अशीच मुळाक्षरांची पाटी दिली होती. गोविंदराव कानिटकरांनी १८६९ साली आपल्या.९ वर्षांच्या बायकोला, काशीबाईंना लग्न झाल्याझाल्या, शिकली नाहीस तर टाकून देईन असे धमकावून हाती लेखणी दिली होती. म्हणून आपल्या कथानायिकेला नव-याने गुरू बनून शिकदिले हे उदाहरण दुर्मिळ असले तरी अद्भुत नव्हते. खरे अद्भुत पुढे आहे. तिचा ज्ञानार्जनाचा प्रवास इथेच, स्वदेशी थांबला नव्हता.
मनुप्रणीत नीतिशास्त्रात विवाहित स्त्रीचा परगृहवास हे पाप होते. येथे तर त्याला परदेशगमनाची जोड होती. समुद्रपर्यटन धर्मबाह्य होते. पुढे विसाव्या शतकात देखील टिळकगांधींना त्या अपराधाबद्दल प्रायश्चित्त घ्यावे लागले होते.
एकोणिसाव्या शतकात स्त्रीच्या पायात किती बेड्या होत्या याचा एक मासला सांगण्यासारखा आहे. ‘वर्तमानदीपिका’ या नावाच्या मुंबईच्या वृत्तपत्रात १५ ऑगस्ट १८५३ रोजी आलेली ही बातमी पाहा.
“आमचे समजण्यांत असें आलें कीं गेले शनिवारी डॉक्टर आत्माराम पांडुरंग, राजश्री रामचंद्र बाळकृष्ण यांची पत्नी व त्यांच्या घरची एक स्त्री व एक मूल….. त्याची बायको ही सर्व मंडळी कोटांत टंकसाळींतील यंत्रे पाहण्याकरितां भर दुपारी गेली होती. बोंबे टैम्स पुत्रांत लिहिणाराने असे लिहिले होते” (पृ. २६, तळटीप)
या घटनेनंतर तीस वर्षांनी १८ वर्षांची विवाहित स्त्री अमेरिकेला डॉक्टर होण्यासाठी एकटी प्रवासाला निघाली होती. हा या अद्भुत कथेचा एक पैलू.
ज्ञानार्जनाच्या ध्यासापायी आपल्या प्राणांची तमा न बाळगता असंभव वाटावे असे एकेक पराक्रम करून शेवटी खेचून आणलेले यश वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी निघृण काळाने झडप घालून तिच्यापासून हिरावून घेतले. ही आनंदीबाईच्या जीवनाची विलक्षण शोकांतिका वाचकाच्या हृदयाला पीळ पाडल्यावाचून राहत नाही. १८८७ च्या २६ फेब्रुवारीला कलिकालाने जेव्हा तिची प्राणज्योत मालवली तेव्हा ही आनंदीबाईची कथा साधी कहाणी राहत नसून ‘ये कहानी है दिये की और तूफान की’ होते. या पोरगेलेश्या तरुणीने तिच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाचे आयुष्य बदलवून टाकले. अमेरिकेत ज्यांच्या घरी ती विद्याभ्यासाकरिता राहिली त्यांची आजची वंशज म्हणते :
“In June that year (1883)… ‘young woman named Anandibai Joshee became a member of the family. This amazing girl changed the lives of all who knew her during her brief stay in the U.S.A. and she changed my life too. Anandibai lived in my grandmother’s heart all her life’. (पृ. १९२)
*१. कंसातील आकडे अंजली कीर्तने यांच्या ‘डॉ. आनंदीबाई जोशी : काळ आणि कर्तृत्व’ प्रथमावृत्ती या ग्रंथातील.
हे म्हणणारी नॅन्सी कॉस्टोन, आणि तिची ग्रँडमदर म्हणजे हेलेना कार्पेटर, आनंदी न्यूजर्सीतल्या त्यांच्या रोझेल येथील घरी गेली तेव्हा ही हेलेना होती ८ वर्षांची. आनंदीहून १० वर्षांनी लहान. तीन वर्षांत या लहानग्या हेलेनाचे आयुष्य तिने असे काही भारून टाकले की तीन पिढ्या उलटल्या तरी तिची नात नॅन्सी म्हणते… and she changed my life to0.
फिलाडेल्फिया येथील ज्या धर्मगुरूंशी आनंदीच्या धर्मचर्चा चालत त्यांना तिच्या अंताची बातमी मिळाली तेव्हा ते उद्गारले, “Alas, her countrymen will never know their loss”. (पृ. ४१९)
डॉ. आनंदीबाई जोशी : काळ आणि कर्तृत्व हा ग्रंथ आहे अशा या विलोभनीय अद्भुताचा. अंजली कीर्तने यांनी सहासात वर्षे खपून हा साडेपाचशे पानांचा प्रबंध सिद्ध केला आहे. आनंदीबाईच्या जीवनावरील हे काही पहिले पुस्तक नाही, आनंदी-गोपाळ हा द्वंद्वसमास महाराष्ट्रात लोकमुखी करण्याचे श्रेय आहे श्री. ज. जोशी यांचे. त्यांची ह्या नावाची कादंबरी तीस वर्षांपूर्वी, १९६८ मध्ये प्रसिद्ध झाली तेव्हाच खूप गाजली. कादंबरी म्हणून तिची योग्यता काहीही असली तरी तिचा विषय, जी आनंदीबाई आणि त्यांचे पती गोपाळराव जोशी यांची साहसकथा, याने वाचकाला चटका लावला. कादंबरीकाराने ती वाचनीय करण्याच्या प्रयत्नात तिच्यात सवंग शृंगारिक प्रसंग कोंबले, काळाला मागेपुढे खेचण्याचा खेळ केला त्याबद्दल म.वा. धोंडांसारख्या मान्यवर समीक्षकांनी त्यांची केलेली कानउघाडणी कितीही रास्त असली तरी या कादंबरीमुळेच सुमारे शंभर वर्षांनी आनंदीबाईच्या करुण-दारुण शोकांतिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले ही ही गोष्ट तितकीच खरी. तेव्हापासून सुबुद्ध मराठी माणसाचे लक्ष या विषयावर खिळून राहिले आहे. गेल्या काही वर्षात तिच्यावर ज्या दूरदर्शन मालिका,लघुपट निघाले ते याचेच द्योतक आहे. परंतु या सर्वांत अत्यंत प्रशंसनीय प्रयत्न म्हणजे अंजली कीर्तने यांचा प्रस्तुत ग्रंथ. आनंदीबाईच्या निधनानंतर एका वर्षात १८८८ साली कॅरोलीन डॉल या ज्येष्ठ अमेरिकन सेवाभावी पत्रकार व लेखिकेने त्यांचे The Life of Dr. Anandibai Joshee या नावाचे चरित्र लिहिले. आणखी एका वर्षानि, १८८९ मध्ये काशीबाई कानिटकर यांनी ‘कै. सौ. डॉ. आनंदीबाई जोशी’ हे त्यांचे दुसरे चरित्र लिहिले.
अंजली कीर्तने त्यांच्याबद्दल म्हणतात, “ही दोन्ही चरित्रे एकमेकांच्या कथनातील रिकाम्या जागा भरून काढतात” (पृ. चाळीस) तरीही अनेक जिज्ञासा राहतात. उदा.
आनंदीने इकडे क्वचितच शाळा पाहिलेली, आता एकदम अमेरिकेतले मेडिकल कॉलेजमधले जीवन तिला कसे पेलले असेल? तिचे प्राध्यापक, मैत्रिणी, पंडिता रमाबाईंशी भावबंध कसे जुळले? यांच्या अनुरोधाने आपल्याला हवी असते. फिलाडेल्फियाच्या मेडिकल कॉलेजच्या डीन बॉडले यांनी आनंदीला खिस्ती होण्याचा आग्रह केला हे खरे का? पुण्याचे प्रतिधन्वन्तरी बापूसाहेब मेहेंदळे यांनी आनंदीबाईंवर उपचार करायचे नाकारले हे खरे काय? का? इत्यादी अनेक प्रश्न घेऊन कीर्तने यांनी संशोधन केले. आजवर प्रसिद्ध झालेले आपल्या विषयाशी संबद्ध असे पाऊणशे मराठी-इंग्रजी ग्रंथ, नियतकालिकांतील नैमित्तिक असे सर्व लिखाण, स्मरणिका, कुलवृत्तान्त इ. सामग्री त्यांनी तपासली. विशेष म्हणजे आनंदीबाईचा शोध घेत घेत त्या फिलाडेल्फियाला पोचल्या. ते मेडिकल कॉलेज, तो परिसर, कॉलेजच्या दप्तरखान्यातील संबद्ध कागदपत्रे त्यांनी अभ्यासली. आनंदीचे अमेरिकास्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कामधेनू झालेल्या थिओडोशिया कार्पेन्टर यांचे रोझेल येथील घर, पोकीप्सी येथील आँट थिओचे माहेर—तिथली आनंदीबाईची रक्षा जिथे पुरली ती वैकुंठभूमी आणि तिच्यावर उभारलेली स्मृतिशिला. या सगळ्या गोष्टी लेखिकेने संशोधकाच्या बाण्याने, सत्यनिष्ठेने स्वतः पाहिल्या, त्यांची छायाचित्रे मिळविली आणि ती वाचकांपुढे ठेवून आपल्या ग्रंथाचे प्रामाण्य वाढविले. या सर्वांपेक्षा आणखी महनीय गोष्ट म्हणजे दुस-या अमेरिकावारीत आनंदीवरील आपला लघुपट घेऊन गेल्या असता कार्पेटर कुटुंबीयांची विद्यमान वंशज, आनंदीच्या थिओ मावशीची पणती, नॅन्सी कॉबस्टोन, यांचा तपास काढून प्रत्यक्ष भेट घेतली आणि आनंदीबाईचा कार्पेटर कुटुंबीयांनी जपून ठेवलेला सुमारे १०० पत्रांचा खजिना त्यांनी संपादन केला. त्यामुळे आजवरच्या चरित्रकारांना आणि संशोधकांना न उलगडलेली वर उल्लेखित अनेक कूटे अंजली कीर्तने यांनी या आपल्या ग्रंथात उकलून दाखविली आहेत ती पुढे पाहू. (अपूर्ण)
२. न्यूयॉर्क येथील एका समाजसेवी महाराष्ट्रीय तरुणीने आनंदीबाईवर पूर्ण लांबीचा चित्रपट काढायचा संकल्प केला आहे ह्याचे वृत्त प्रस्तुत लेखकाला गेल्या ऑगस्टमध्ये बॉस्टन येथे त्या निर्मातीच्या आईनेच खुद्द सांगितले आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.