स्फुट लेख : महागाई नाही – स्वस्ताई!

मागच्या अंकामध्ये महागाईवर एक लेख आम्ही प्रसिद्ध केला आहे. त्या लेखाच्या लेखिकेने प्रगट केलेल्या मतांशी आमचा काही बाबतीत मतभेद आहे. परंतु त्याविषयी आता जास्त न लिहिता एका निराळ्या नजरेने आर्थिक व्यवहारांकडे बघितल्यास वस्तु स्वस्त कश्या होत जातात ते सांगण्याचा इरादा आहे.
कोणतीही वस्तु प्राप्त करण्यासाठी माणसाला काही ना काही श्रम करावे लागतात. मागच्या अंकात सायकलचे उदाहरण दिले आहे. आणि कोणाचे किती उत्पादक श्रम सायकल विकत घेण्यासाठी खर्ची पडतात त्याचे कोष्टक पृ. ३६३ वर दिलेले आहे. पैशाच्या स्वरूपात सायकलची किंमत चुकती करण्यासाठी प्रत्येक माणसाला कमी-अधिक श्रम करावे लागतात हे खरे असले तरी सायकल विकत घेण्यासाठी कोणालाही पूर्वीपेक्षा अधिक श्रम करावे लागत नाहीत, हा मुद्दा आम्हाला आज स्पष्ट करावयाचा आहे. (काही प्रसंगी तर कोणतेही श्रम न
करता म्हणजे पूर्वीपक्षा अधिक किंवा कमी असे नव्हे तर अजिबात श्रम न करता काही व्यक्तींना सायकलीची प्राप्ती होऊ शकते. परन्तु त्या मुद्द्याचा विस्तार सध्या करीत नाही.)
मागच्या अंकातील लेखात ज्यांची उदाहरणे दिली आहेत ते म्हणजे अकुशल मजूर, कुशल कामगार, माध्यमिक शिक्षक वगैरे, त्यांच्या बाबतीत हे कसे घडते ते सांगण्याचा आम्ही यत्न करीत आहोत. अकुशल मजुराने २०० तास काम केल्यानंतर त्याला जी मजुरी मिळते तितकी मजुरी सायकलीच्या किमतीदाखल त्याला द्यावी लागते असे चित्र दिसत असले तरी सर्व समाजाचा एकत्रित विचार केल्यास हे चित्र चुकीचे आहे असे म्हणावे लागेल.
कोणताही माणूस साधारणपणे दिवसाला १०-१२ तासांपेक्षा अधिक वेळ उत्पादक कार्यात नियमितपणे देऊ शकत नाही. अकुशल मजूर असो किंवा सकाळपासून रात्रीपर्यंत शिकविण्या घेणारा माध्यमिक शिक्षक असो, त्याच्या उत्पादक कार्य करण्याच्या शक्तीला मर्यादा आहे. हे जे दिवसाला तो १०-१२ तास काम करतो त्याच्या मोबदल्यात त्याला समाज जेवायला खायला देतो, कपडालत्ता देतो, त्याला राहायला घर देतो. इतकेच नव्हे तर एकूण समाजाची संपन्नता जशी वाढेल त्या संपन्नतेत त्याला सहभागी करून घेतले जाते. पूर्वीइतक्याच श्रमांच्या मोबदल्यात प्रत्येक माणसाचा कमीअधिक प्रमाणात उपभोग वाढत जातो. सुरुवातीला काही जणांच्या घरांमध्ये खेळणारी वीज पुढे सगळ्यांच्या घरांत दिवे पेटविते, पंखे फिरविते आणि आता दूरचित्रवाणी दाखविते. माणसाच्या श्रमांचे परिमाण कमी कमी होत जाऊन उपभोगाचे परिमाण वाढत जाते.
पूर्वी आठवड्यातून सात दिवस काम, तेही १२ तास असे करणारा समाज पुढे आठवड्यातून सहा दिवस काम आणि तेही रोज आठ तासांपेक्षा अधिक नाही असे करू लागतो आणि तरीही त्याच्या उपभोगात भर पडत जाते. पुढे-पुढे आठवड्यातून चार दिवस काम करूनसुद्धा आणि वर्षातून दोन महिने रजा घेऊनसुद्धा त्याच्या उपभोगाची पातळी खाली येत नाही. कामाचे प्रमाण कमी आणि उपभोगाचे जास्त. सवडीचे प्रमाण वाढते आणि प्रवासाचे दिवस आणि प्रवास करणा-यांची संख्या (Leave Travel Concession(LTC) चा फायदा घेणान्यांची संख्या) वाढत जाते. घराघरामध्ये दोनचाकी, चारचाकी वाहने, टेलिफोन आणि अन्य सुविधा सहजपणे आढळू लागतात. थोडक्यात काय तर महागाईचा आभास कायम ठेवून आपण स्वस्ताईची फळे चाखत असतो. महागाई होण्याऐवजी दिवसेंदिवस सर्व वस्तु स्वस्त होत असतात; आणि त्यामुळेच माणसाचे राहणीमान वाढत असते. जगाची लोकसंख्या सतत वाढत आहे पण त्यामुळे हे चित्र बदलले नाही. पूर्वी एखाद्या प्रदेशाची कितीही लूट झालेली असो, पण काय चमत्कार आहे, त्याच्या उपभोगाची पातळी सतत उंचावतच असते. मग वस्तूंची महागाई होते हे आम्ही कोणत्या तोंडाने मान्य करावयाचे?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.