चर्चा

सत्य, विज्ञान आणि अध्यात्म
संपादक, आजचा सुधारक
आजचा सुधारक (फे. ९९) च्या अंकामध्ये डॉ. अनंत महाजन यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावरून खालील विचार सुचले.
‘सत्य’ म्हणजे खरे विधान असा अर्थ घेण्यास हरकत असू नये. अर्थात् ‘सत्य’ एकच नसून अनेक असू शकतात. संत्र्याचा आकार गोल आहे; त्याचा रंग पिवळा आहे, त्याची चव गोड आहे, त्यामध्ये फोडी असतात इ. अनेक ‘सत्ये’ संत्र्याशी निगडित आहेत. परंतु यांमध्ये संत्र्याला साल असते, ते खडबडीत असते इ. सत्याचा अंतर्भाव होत नाही. याच प्रकारे यांत्रिकीमध्ये कोणत्याही वस्तूचे वस्तुमान एका बिंदूत सामावलेले आहे, त्याला बिंदु-वस्तूमान म्हणतो त्यावेळी आपण abstraction करतो. हे त्या वस्तूचे यथार्थ संपूर्ण चित्र नसते. बिंदुवस्तुमान हे त्या वस्तूचे एका विशिष्ट संदर्भात (गतिविषयक) प्रतिमान (model) आहे. त्या वस्तूची घनता माहीत करून घेण्यासाठी हे प्रतिमान उपयुक्त ठरणार नाही. तेव्हा विज्ञानाद्वारे वस्तूविषयीच्या सत्याच्या (त्याला संपूर्ण सत्य म्हणता येईल काय?) विशिष्ट पैलूचे ज्ञान होते. या ज्ञानाची मर्यादा वैज्ञानिकांना मान्य असते.
जसजसे ज्ञान वाढते तसतसे सत्याच्या पैलूचे अधिक व्यापक स्वरूपात दर्शन होते. न्यूटनकडून आइन्स्टाइनकडे गेल्याने सत्याचा जो पैलू पूर्वी समजला होता त्याचा पूर्वी न दिसलेला भाग दिसला. पूर्वीच्या प्रतिमानामध्ये वस्तुमान स्थिर मानले जात होते. परंतु आता ‘वस्तुमान (जडता) वस्तूच्या वेगावर अवलंबून असते’ हे सत्य विधान झाले. तथापि पूर्वीच्या सत्य विधानाचा या नव्या व्यापक ‘सत्या’मध्ये अंतर्भाव झालेला आहेच. ‘फ्लॉजिस्टॉन’ ही संकल्पना प्रत्यक्ष पुराव्याच्या कसोटीवर न उतरल्यामुळे ती टाकून द्यावी लागली. पडताळ्याचा आग्रह ठेवल्यामुळे त्या प्रत्ययाच्या आधारानुसार कल्पना बदलाव्या लागतात. असा आग्रह नसल्यास कल्पना, संकल्पना, विचारपद्धती बदलण्याची आवश्यकता नसते. एवंच सत्याचे स्वरूप बदलते असे म्हणण्याऐवजी त्याविषयीची कल्पना (अथवा विधान) अधिकाधिक व्यापक होत जाते असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. ‘सत्य’ हे अॅसिम्पटोट (asymptote) वर असते. विज्ञानाचा प्रवास हा ज्या वक्राच्या अॅसिम्पटोट वर सत्य स्थित असते त्या वक्राच्या मार्गानि होत असतो. हा वक्र कितीही वाढविला तरी आपल्या अॅसिम्पटोटला जाऊन मिळत नाही. तद्वत सत्याचे संपूर्णपणे आकलन शक्य नाही. तथापि त्याचा शोध घेण्याचा मार्ग आक्रमिणे ही विज्ञानाची पीठिका असते.
इलेक्ट्रॉन कण आणि तरंगस्वरूपाविषयीचा अंतर्विरोध बोहर यांच्या परिपूरकता तत्त्वाने (complementarity principle) सुटतो. इलेक्ट्रॉन ही वस्तू कणही नाही किंवा तरंगही नाही. काही परिस्थितीत इलेक्ट्रॉन कणाप्रमाणे वागतात तर दुसन्या परिस्थितीत त्यांचे तरंगासारखे आचरण होते. इलेक्ट्रॉनसारख्या अतिसूक्ष्म (submicroscopic) वस्तुविषयी ज्ञान मिळविण्यासाठी स्थूल साधनांचा उपयोग केला जातो. त्यामुळे विशिष्ट उपकरणे वापरून मिळालेली माहिती ही दुस-या प्रकारच्या साधनांद्वारे मिळालेल्या माहितीला परिपूरक मानली पाहिजे. म्हणजेच वास्तवतेचे दोन भिन्न पैलू आपल्या दृष्टीला पडतात. ज्या प्रयोगरचनेमध्ये इलेक्ट्रॉन तरंगाप्रमाणे आचरण करतात तो प्रयोग कोणीही केव्हाही आणि कोठेही केला तरी त्याला प्रत्यय घेता येईल. तसेच हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे की इलेक्ट्रॉनची कण आणि तरंग वागणूक एकाच प्रायोगिक परिस्थितीत आढळत नाही.
सापेक्षतासिद्धान्ताविषयी संशोधन करून ज्ञानकक्षा विस्तारावयाची असल्यास त्या विषयाचा सांगोपांग अभ्यास करावा लागेल यात शंका नाही परंतु एके काळी तीनचार व्यक्तींनाच गम्य असलेल्या या सिद्धान्तामध्ये आज शेकडो शास्त्रज्ञ भर टाकीत आहेत. तसेच सापेक्षता सिद्धान्ताच्या आधारे भाकीत करून त्याचा पडताळादेखील घेण्यात आला आहे आणि सतत घेतला जातो. सिद्धान्तापासून मिळालेले निष्कर्ष प्रायोगिक त्रुटीच्या मर्यादित सिद्ध झाले आहेत अशा प्रकारची सुस्पष्ट विधाने केली जातात. त्यांवर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. अशा प्रक्रियांमधून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या सिद्धान्तावरच मान्यतेचे शिक्कामोर्तब होते. ही कार्यप्रणाली विज्ञानाने अंगीकारिली आहे आणि आपले ईप्सित साध्य करण्यासाठी वैज्ञानिकांनी सुस्पष्ट, अर्थवाही शब्द आणि प्रमाणित भाषारचनेची योजना आणि विकास केला आहे. म्हणून चर्चा आणि विचारविनिमयासाठी एक सार्वत्रिक आधार स्थापित झाला आहे. यामुळे केवळ तीन शतकांत विज्ञानाने अपूर्व प्रगती केली आहे.
अध्यात्म:
अशी कोणती सत्ये आहेत की ती थोड्या (आध्यात्मिक) व्यक्तींना दिसू शकतात अथवा आढळू शकतात? आध्यात्मिक अनुभव हे व्यक्तीपरत्वे भिन्न असतात. उदा. तुकोबांना विठ्ठलाशी एकरूपत्वाचा अनुभव येतो तर रामदासांना प्रभुरामचंद्राचे दर्शन होते. हे अनुभव खोटे नाहीत. या अनुभवामागे त्या व्यक्तीच्या मानसिक अनुकूलनाचा (conditioning) प्रभाव असतो. तो स्वसूचनाचा (autosuggestion) एक प्रकारही संभवतो. या अनुभवाला ज्ञान म्हणावे काय?
सामान्य दृष्टीने अध्यात्मामध्ये आत्मा, परमात्मा, ईश्वर, पुनर्जन्म इ. विषयी विचार. त्याचे ध्येय म्हणजे मोक्षप्राप्ती आणि तो मिळविण्यासाठी तपश्चर्या साधना करणे, या मागनि। जाणाच्या साधकांनी, सिद्धांनी आणि विचारवंतांनी आपापल्या धारणांनुसार जे विचार आणि संकल्पना प्रतिपादन केल्या आहेत ते स्थलकालानुरूप आहेत. समाजधारणेसाठी घालून दिलेले नियमदेखील त्याकाळच्या परिस्थितीला अनुसरून पुढे मांडले आहेत. म्हणून त्यांच्यामध्ये परस्परविरोध आढळतो. प्राचीन विचारवंतांना त्रिकालज्ञान होते. यास्तव त्यांचे प्रत्येक विधान हे त्रिकालाबाधित सत्य आहे अशी भूमिका घेणे अयोग्य आहे. पुनर्जन्माची कल्पना आपणांस मान्य असली तरी इस्लाम, ख्रिश्चन यांसारख्या अध्यात्मात ती मान्य नाही. विविध धर्माची बाब बाजूला ठेवली तरी भारतातीलच प्राचीन चार्वाक, बौद्ध, जैन विचारवंतांचा ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास नाही. ह्या सर्वाबाबतींत तात्त्विक विचार ग्रंथ, टीका, परामर्श इ. प्रकारे उपलब्ध आहेत. मतमतांतराची भिन्नता आणि त्यांमध्ये व्याघात दिसल्यास ते विचार चिकित्सक वृत्तीने तपासून त्या संकल्पनांच्या मर्यादा, निश्चित करणे हे योग्यच आहे.
मानवी मनाच्या पलीकडला प्रवास म्हणजे विचारशून्यता की काय? कारण मेंदूच्या विचार करण्याच्या क्रियेला संक्षिप्त रूपाने मन ही संज्ञा दिली जाते. तेव्हा कोणत्याही विचार, संकल्पना ह्यांचे उगमस्थान मनुष्याचा मेंदू हेच आहे. आता विचारसृष्टीच्या पलीकडे कोणती शक्ती आहे ह्याचा उल्लेख प्रा. महाजन यांनी केला नाही. तद्वत् ज्याप्रमाणे आपले विवेचन सुस्पष्ट करण्यासाठी भौतिकीमधील उदाहरणे दिली आहेत त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रामधील सत्यांचा नामनिर्देशही केला नाही. यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी काही कल्पना करून त्या अनुसार हे विचार मांडले आहेत.
– पु. वि. खांडेकर
श्रीधाम, रहाटे कॉलनी पं. नेहरू मार्ग,
नागपूर-४४००२२
स्त्रियांचे समाजातील स्थान पगारावर ठरू नये
पाळणाघरांची वाढ – एक अपप्रवृत्ती या स्फुटाविषयीच्या प्रतिक्रियांमध्ये वास्तविक लेखकाला अनपेक्षित असे काहीच असावयास नको होते. किंबहुना रूढार्थाने स्त्रीस्वातंत्र्याचा, स्त्रीमुक्तीचा पुरस्कार करणा-यांकडून याहून वेगळी अपेक्षा करणे हेच चूक ठरले असते. सामान्य मध्यमवर्गीय स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या हाती येणारे पगाराचे पाकीट खरोखरच त्यांना व्यक्ती म्हणून किती स्वातंत्र्य देत आहे, हा चिकित्सकपणे तपासून पाहण्याचा मुद्दा आहे; आणि इतर पगार न मिळवणाच्या सामान्य मध्यमवर्गीय स्त्रियांना खरोखरच तेवढेही स्वातंत्र्य नाही का?
नोकरी करणा-या स्त्रियांकडून वाढत्या गरजा हा आणखी एक मुद्दा नेहमीच पुढे केला जातो. पण अल्पसंतुष्टता हा जसा व्यक्तिमत्त्वातील दोष आहे तसाच असंतुष्टता हासुद्धा एक प्रकारचा दोषच नाही का? सर्वसामान्य मध्यमवर्गीय स्त्री ज्या स्वरूपाची कारकुनी नोकरी बहुसंख्येने करताना आज दिसते, त्यामुळे ना ती स्वतःची संवेदनाशीलता जपू शकते, ना आत्मगौरवाची भावना तिच्या मनात जागी राहते, ना तिचे आरोग्य तिला जपता येते. हाती उरतो तो फक्त थोडा अतिरिक्त पैसा, जो खरोखरच थोडा म्हणा एवढाच असतो, व तोच साड्या-दागिन्यांवर मनासारखा खर्च करण्यात ती बालसंगोपनाचा हरवलेला आनंद, कुटुंबासमवेत अनुभवण्याच्या निवांत क्षणांचे मूल्य, स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या खुडलेल्या अंकुरांची किंमत अशा कितीतरी गोष्टी शोधताना दिसते.
सामान्य मध्यमवर्गीय समाजाचा सामाजिक दबावच एवढा प्रचंड आहे की साधारण पदवी शिक्षण घेतलेली त्या समाजातील स्त्री आपोआपच पुढे नोकरी करू लागते. नाहीतर तिच्या शिक्षणाचा उपयोग काय? शिक्षणाचा उपयोग नोकरी हे समीकरण आमच्या समाजात आजही पक्के रुजलेले आहे. मग कुटुंबासाठी पैशांची आवश्यकता आहे किंवा नाही हा मुद्दा गौण ठरतो. ह्या दुष्टचक्रामागोमाग आपोआपच अनावश्यक गोष्टींचा हव्यास येतो व मग स्त्रीची नोकरी ही कुटुंबाची गरज बनते. आपल्या कुटुंबाची वाडवडिलार्जित मिळकत, घरात इतर. मिळवत्यांकडून मिळवला जाणारा पैसा ह्यांपैकी कोणताही विचार मग तिला थांबवू शकत नाही. राहता राहतो तो मुद्दा म्हणजे कुटुंबात मिळणाच्या दुय्यम स्थानाचा! पण नोकरी करून कुटुंबासाठी अव्याहत झिजणाच्या स्त्रियांनी जरूर एकदा आत्मपरीक्षण करून पाहावे की त्यांचे स्थान त्यांच्या पगारावर अवलंबून आहे की त्यांच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांवर?
आलेल्या प्रतिक्रियांमधील एकमेव वादातीत मुद्दा म्हणजे स्त्रीने नोकरी करावी की नाही हे तिचे तिलाच ठरवू दे. फक्त समाजाची वाटचाल ह्या दिशेने हवी की नोकरीबाबतचा तिचा निर्णय तिला कोणत्याही दबावाविना घेता येईल. अपत्यसंगोपनाच्या स्वतःच्या ऊर्मी तिला आर्थिक स्वातंत्र्यासाठी दाबून टाकाव्या लागू नयेत, अपत्यसंगोपनाचे काम ज्या त्या कुटुंबातील स्त्री अथवा पुरुष हे आपआपल्या पसंतीनुसार किंवा दोघांतही वाटून घेऊ शकतील!
वैयक्तिक अनुभव नमूद करण्याचा मोह मला येथे आवरत नाही. विवाहानंतर आमच्या कुटुंबाची एकूण आर्थिक स्थिती भोवती नोकरी करणाच्या चार बायकांशी तुलना करता अधिक चांगली असल्याचे माझ्या लक्षात आले होतेच. म्हणजे त्यांच्या राहणीमानाशी जुळते राहणीमान ठेवण्यासाठी माझ्या पगाराची गरज पडणार नाही हे माहीत झाले होते. माझी नोकरीही होती कारकुनी स्वरूपाचीच. म्हणजेच वर म्हटल्याप्रमाणे मानसिक पातळीवरून निराशाजनकच. परंतु सरकारी, कायमची, पेन्शनेबल नोकरी. थोडक्यात जन्मभर काळजी नाही अशी ती नोकरी! ह्या नोकरीमुळे माझ्या कुटुंबाची असलेली सुस्थिती आणखीच चांगली झाली असती. माझीही स्वतःच्या पायावर उभे असल्याची जाणीव पोसली गेली असती. परंतु त्यासाठी मला कोणती किंमत द्यावी लागत होती? रोजची भयानक धावपळ, अत्यंत प्रिय असणान्या छोट्या मुलीची पाळणाघरात रवानगी, माझ्या प्रिय वाचनासाठी रात्री ११.३० पर्यंत मला वेळच व्हायचा नाही. नव-याशी निवांत गप्पा मारण्यासाठी वेळ व मूड यांचे गणित केव्हाच न जुळणे, क्षमता असूनही नोकरीच्या ठिकाणी ती वापरावयाची संधी न मिळणे कारण ‘बाई काम करतात पण पावणेसहा वाजले की चालल्या’ हा असलेला शिक्का! या सर्व समस्यांकडून माझ्या नोकरी सोडण्याच्या निर्णयापर्यंतच्या प्रवासात आणखी सहाय्यभूत ठरला तो माझा लवचीकता जोपासलेला स्वभाव. म्हणजे कुटुंबाची गरज म्हणून किमान राहणीमान ठेवण्यासाठी आवश्यकता असती तर मी जितक्या आनंदाने नोकरी केली असती तितक्याच आनंदाने स्वतःचे मन जपण्यासाठी नोकरीला तिलांजली देऊ शकले आहे. कुटुंब ही संकल्पना एकदा स्वीकारल्यानंतर वास्तविक त्याच्या व्यवस्थेसाठी एक सदस्य व त्याला आवश्यक असणा-या अर्थार्जनासाठी एक सदस्य ही कल्पना समाजाने स्वीकारलीच पाहिजे. म्हणजे आज दिसून येणारा एका सदस्यावरील ताण आपोआपच संपुष्टात येईल. येथे कोणत्या सदस्याने कोणती जबाबदारी घ्यायची हा निर्णय त्या त्या कुटुंबाला, कोणत्याही सामाजिक दबावाविना, घेता आला पाहिजे हीच आपण स्वप्न पाहात असलेल्या आदर्श समाजाची स्थिती अपेक्षित आहे. कुटुंबसंस्था जर टिकवावयाची असली तर घरकामाचा ताण कमी करण्यापेक्षाही त्याला दुय्यम लेखण्याची प्रवृत्ती उखडून टाकण्यावर अधिक भर दिला पाहिजे. कारण कम्प्युटरने कितीही कामे केली तरी त्याला कार्यरत करण्याचे एक काम तर कायम शिल्लक राहणार आहेच. पुन्हा एकदा वैयक्तिक पातळीवर उतरून नमूद करावेसे वाटते की माझा नवरा विचारांनी कितीही पुरोगामी असला तरी प्रत्यक्षात आपल्या घरातील कामाला हातभार नित्यनेमाने, कर्तव्यबुद्धीने लावावा हा त्याचा स्वभावच नसल्याचे माझ्या लवकरच लक्षात आले व माझ्या स्वभावातील लवचीकता येथे माझ्या कामी आली. म्हणजेच नव-याला घरातल्या कामाची सवय लावण्याचे प्रयत्न करणे काय किंवा स्वतःला येत असणान्या घरकामातच स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेणं काय ह्यांत मी पटकन निवड करू शकले. तसेच मी केवळ घरकाम केल्याने त्याच्या मनातील माझ्या स्थानास कोणताही धक्का पोहोचणार नाही, तसेच केवळ घरकाम केल्याने माझ्याच मनातील माझी प्रतिमा काही करत नाही अशी ऐतखाऊ होणार नाही याची खात्री पटल्यानंतरच मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊ शकले.
मूळ विषय ज़री पाळणाघरांचा असला तरी खरा प्रश्न कोठे थांबायचे याचा निर्णय घेऊन भावी पिढीच्या बांधणीचा आहे हे निश्चित. तेव्हा सुविधासंपन्न पाळणाघरे हा प्रश्न सोडवू शकणार नाहीत असे वाटते. तर अर्धवेळ प्रत्येकी अशी दोघांनी अमेरिकेप्रमाणे ही जबाबदारी वाटून घेतली पाहिजे किंवा त्या त्या कुटुंबाने आपसांत विचारविनिमय करून या बाबतचा निर्णय घेतला पाहिजे! त्यासाठी अर्थातच पोषक सामाजिक वातावरण निर्माण करावे लागेल. मात्र कोणत्याही परिस्थितीत मुलीच्या अंगी अर्थार्जनाची क्षमता निर्माण करणे टाळले जाणार नाही ह्याकडे अधिक जागरूकतेने लक्ष ठेवावे लागेल. फक्त तिची किंवा त्याची कोणाची अर्थार्जनक्षमता वापरावयाची हा निर्णय ते दोघे आपसांत विचार करून घेऊ शकतील अशी सामाजिक परिस्थिती निर्माण होण्यासाठी आजपासूनच पुरोगामी विचारवंतांनी प्रयत्न सुरू करावयास हवेत.
– मंजिरी घाटपांडे
कृत्तिका सोसा., कोथरूड पुणे-४११०२९

सत्यदर्शनातला खरा अडथळा कोणता?
संपादक, आजचा सुधारक,
जानेवारी ९९ अंकात उपस्थित केलेला वरील प्रश्न महत्त्वाचा आहे. लेखिकेने आपल्या निवेदनात वापरलेला conditioning हा शब्द जे. कृष्णमूर्तीच्या लिखाणात सर्वत्र दिसतो. त्याचा अर्थ मला समजला नाही. नवजात अर्भक conditioning पासून मुक्त असते काय? निसर्गनियमांच्या अभ्यासातून मिळालेले ज्ञान म्हणजे conditioning असते काय? असे अनेक प्रश्न जाणवतात. माझा कृष्णमूर्तीच्या लिखाणात अभ्यास मर्यादित आहे. परंतु J.K. च्या सान्निध्यात राहिलेले आणि त्यांच्या teaching वर अनेक वर्षे मनन केलेले माझे मित्रदेखील वरील प्रश्नांची (मला) समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत.
हिरण्मय पात्राचा मला योग्य वाटणारा अर्थ खालीलप्रमाणे आहे :
आपल्या भोवतीच्या विश्वाच्या कोणत्याही घटकाचे सूक्ष्म निरीक्षण (अभ्यास) केल्यास अत्यंत विस्मयकारक, गुंतागुंतीचे परंतु प्रथमदर्शनी सोप्या दिसणाच्या नियमांनुसार चालणारे चित्र दिसते. उदाहरणार्थ सजीव सृष्टीत सूक्ष्म जीवाणूपासून महाकाय प्राण्यांची रचना, वनस्पती आणि कीटक यांचे वैपुल्य, त्यांचे परस्परावलंबित्व. निसर्गनियमांचा उपयोग करून जीवनक्षमता वाढवण्याची प्रत्येकाची धडपड सगळेच स्तिमित करून सोडणारे आहे. भौतिक शास्त्रात एवढी प्रगती झाल्यानंतरदेखील अनेक मूलभूत प्रश्न उरतातच. वर आकाशाकडे दृष्टी टाकल्यास दिसणारे या सुवर्णपात्राचे स्वरूप फार देदीप्यमान आहे. कोट्यवधी आकाशगंगा, त्यांच्यातली अंतरे, तान्यांतून निर्माण होणारी ऊर्जा, पृथ्वीवर कधीच न दिसणारी बलक्षेत्रे (fields) हे सर्व बघून संवेदनाशील मनाला भीतीचा स्पर्श होतो.
विश्वरूपाचे निरनिराळे आविष्कार म्हणजेच एक लखलखणारे सुवर्णपात्र आहे असे म्हणता येईल. निसर्गदत्त बुद्धीचा वापर करून या सुवर्णपात्राची रचना काही प्रमाणात समजल्याचा आनंद एवढा उन्मादकारक असू शकतो की त्यामुळे या चकाकणाच्या भांड्यामागे काही प्रेरणाशक्ती असेल काय याचा शोध करण्याची इच्छा होत नाही. एवढेच.
Conditioning हा एक negative attribute आहे. उपनिषदे त्याला सोन्याची उपमा देतील असे वाटत नाही.
– अनंत महाजन
R-1, Yugadharma Complex Ramdaspeth,
Nagpur-440010

सत्य?
संपादक, आजचा सुधारक,
“आ. सु.” मध्ये सत्य, श्रद्धा, विवेक व विज्ञान यावर अखंड चर्चा चालूच आहे. फेब्रुवारी १९९९ च्या अंकात श्री. अनिलकुमार माटे, प्रा. दि.य. देशपांडे, श्री. भ.पां. पाटणकर, श्री. अनंत महाजन आदि विचारवंताची मते प्रसिद्ध झाली असून त्यांत प्रामुख्याने सत्य’ या विषयावर विवेचन आले आहे. या चर्चेत आपलेही काही स्फुट विचार मांडण्याची मला अनुमती द्यावी अशी विनंती आहे.
सत्य’ म्हणजे काय? Truth म्हणजे fact किंवा reality. सत्य म्हणजे Truth काय? सत्य हे एकमेवच असते. त्याला पर्याय नाहीत. असे हे एकमेव सत्य वस्तुनिष्ठ कालाबाधित असावे लागते, पण तसे आके काय? व्यक्तिनिष्ठ अथवा व्यक्तीच्या ज्ञानेंद्रियांद्वारे अनुभवास येणारे सत्य ते व्यक्तिनिष्ठ सत्य (subjective) होय. हात दुखण्याचे ज्ञान किंवा चार आंधळ्यांना हत्तीचे होणारे ज्ञान ही व्यक्तिनिष्ठ सत्याची उदाहरणे झाली. हे सत्य कसे फसवे असते यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही, कारण प्रत्येक व्यक्तीच्या ज्ञानेंद्रियाची क्षमता किंवा मेंदूची निर्णय घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. परंतु व्यक्तिनिष्ठ सत्य जेव्हा मोठ्या संख्येत इतर लोकांनी अनुभवलेले असते व या अनुभवाची वैज्ञानिक प्रयोगाद्वारे किंवा तटस्थपणे केलेला सर्वेक्षणाद्वारे पुनःप्रतीती येते तेव्हा ते सत्य वस्तुनिष्ठ मानण्यात येते. एखाद्या व्यक्तीने (उदाहरणार्थ पाण्यापासून पेट्रोल तयार करण्याचा दावा करणारी व्यक्ती) आपला अनुभव जाहीर केला तरी अनेक वैज्ञानिक, वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करून, अशा अनुभवाचा पडताळा घेत नाहीत तोपर्यंत मूळ व्यक्तिनिष्ठ अनुभव अथवा सत्य हे वस्तुनिष्ठ सत्य म्हणून मान्यता पावत नाही. हात दुखण्याचा अनुभव हे व्यक्तिनिष्ठ सत्यच असते. पण हात दुखण्याच्या कारणाचे इतर स्वस्थ व्यक्तीमध्ये पुनरावृत्ती (repetition) करून अशा स्वस्थ व्यक्तींचा हात दुखू लागला तरच हात दुखणे हे वस्तुनिष्ठ सत्य मानता येईल. वैज्ञानिक प्रयोगशीलतेत सतत प्रगती चालू आहे. मॅग्नेटिक रेझोनन्स, पॉईस्ट्रॉन इमेजिंग ह्यांसारख्या प्रगत तंत्राचा वापर करून दुखणाया हातातून मेंदूकडे जाणा-या संवेदना व न दुखणाच्या हातातून मेंदूकडे जाणा-या संवेदना ह्यांत फरक आढळला तर हात दुखतो हे वस्तुनिष्ठ सत्य मानता येईल.
विज्ञानामध्ये सत्य (truth) हा शब्द जपूनच वापरावा लागतो. न्यूटनची तत्त्वे किंवा सापेक्षतावाद ही विज्ञानात अंतिम सत्ये मुळीच मानत नाहीत तर त्यांना तात्कालिक मान्यता (present dogma) असेच म्हणतात. वेगळ्या शब्दांत त्यांस वैज्ञानिक श्रद्धा असेही म्हणता येईल. Dogma चा अर्थ a point of view put forth as authoritative without absolute proof असाच आहे. त्यामुळे विज्ञानही कशासही अंतिम सत्य मानावयास तयार नाही. न्यूटनचे Classical Physics, आइन्स्टाईनची सापेक्षता अथवा Quantum Mechanics हे सगळे Dogma या प्रकारात बसतात, अंतिम सत्याच्या नव्हे. जीवसृष्टीत, DNA व त्यावरील Genetic Code हे विश्वातील (किमान पृथ्वीतलावरील) सर्व जीवांचा मूळ आधार आहे हा सुद्धा Dogma (वैज्ञानिक श्रद्धा)च आहे, अंतिम सत्य नाही!
श्री. अनंत महाजन म्हणतात की “पूर्वेकडील (म्हणजे कोठले?) अनेक विचारवंतांनी मानवी मनाच्या (?) पलीकडे जाऊन, त्याला प्रेरणा देणाच्या शक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे हे विधान कोणीही प्रामाणिक वैज्ञानिक करणार नाही. हे तथाकथित पौर्वात्य विचारवंत वास्तवाबद्दल अज्ञानी असून खरे ज्ञान (?) प्राप्त करण्यासाठी स्वतःचे conditioning करण्याचीच साधना करतात आणि असे conditioning पूर्ण झाले म्हणजे जगातील प्रत्येक घटनेचा आध्यात्मिक अन्वयार्थ लावतात. सामान्य जनता तो अर्थ न समजताही (कारण बहुदा तो अर्थहीन शब्दच्छलच असतो) अशा आध्यात्मिक प्रचारास बळी पडते व अशा व्यक्तींना आत्मज्ञान, साक्षात्कार झाला अशी प्रसिद्धी करते. “स्वतःचे मनोव्यापार समजण्यासाठी साधना करावी लागते, नियम पाळावे लागतात” हे म्हणणे बुवाबाजीचाच एक भाग असतो. श्री. अनंत महाजनांचा अभ्यासाचा विषय काय आहे, आधुनिक विज्ञानाशी त्यांचा किती संबंध आहे याबद्दल माहिती नाही. परंतु त्यांनी मेंदूविज्ञान (neuroanatomy, neurophysiology, neurology, psychobiology, psychology आणि psychiatry) या विषयांवरील शोध नियतकालिकांचे (Scientific journals) चे ताजे अंक चाळून पाहिल्यास त्यांचे उद्बोधन होईल याची खात्री वाटते.
प्रयोगातून सिद्ध झालेली, असंख्य व्यक्तींनी विवेकीपणे अनुभवलेली स्थलकालाबाधित वस्तुनिष्ठ सत्ये या जगात फारच कमी आहेत. वस्तुनिष्ठ सत्यांची सुद्धा अंतिम सत्ये म्हणून अढळ स्थापना करणे हे महाकठिण कार्य आहे. पृथ्वीला स्वतःभोवती एक आवर्तन पूर्ण करण्यास २४ तास लागतात हेही अंतिम सत्य नाहीच! पृथ्वीचा फिरण्याचा वेग हळूहळू कमी होत आहे हे निदर्शनाला येऊ लागले आहे.
तेव्हा सत्य या कल्पनेचे (१). तात्कालिक सत्य (dogma अथवा वैज्ञानिक श्रद्धा) आणि (२) अंतिम सत्य असे कच्चे मडके आणि पक्के मडके असे दोन प्रकार मानावे लागतात. सत्याची पक्की मडकी दुर्मिळच आहेत. व्यक्तीच्या ज्ञानेंद्रियांद्वारे प्राप्त अनुभव अथवा व्यक्तिनिष्ठ सत्य (subjective truth) हे सत्य नव्हेत. विश्वात १०३ (किंवा जी काय मान्य झाली असतील तेवढी) मूलद्रव्ये (elements) आहेत हे सुद्धा अंतिम सत्य नाहीच. कारण नवनवीन मूलद्रव्ये जन्माला येतच राहतात ना! मग विश्वात अंतिम सत्य काय आहे?
या प्रश्नाचे उत्तर भाबड्या सामान्यजनांना अविवेकीपणे द्यावयाचे झाल्यास ‘‘ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे असेच आध्यात्मिक प्रवृत्तीने द्यावे लागते!
– र. वि. पंडित
१०२, उत्कर्ष – रजनीगंधा
खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर-१०

देशांतर आणि राष्ट्रनिष्ठा
श्री संपादक, आजचा सुधारक,
मार्च १९९९ च्या अंकात ‘धर्मान्तर आणि राष्ट्रनिष्ठा’ नावाचा स्फुट लेख आपण लिहिलेला आहे त्या अनुषंगाने –
१. व्यक्तीच्या दृष्टीने धर्म हा अपघात असतो. ज्या धर्मात त्याचा जन्म होतो तो धर्म त्याला चिकटतो. हा अपघात असतो. असा धर्म जाणीवपूर्वक स्वीकारलेला नसतो.
२. राष्ट्रनिष्ठा किंवा देशनिष्ठा त्या देशातील वास्तव्याने निर्माण होतात. जेथे आपला जन्म झाला तो प्रदेश त्याला आपला वाटू लागतो. देशांतर्गत स्थानबदलाचा (migration) विचार केल्यासही हीच गोष्ट दिसते. मुंबईत राहणारा कोकणातील चाकरमानी सुट्या लागताच कोकणात जातो. उत्तर प्रदेशातील भय्या दरवर्षी काही दिवस आपल्या देशात’ जाऊन येतो. हीच गोष्ट अन्य प्रांतीयांची.
३. नोकरीच्या निमित्ताने किंवा अधिक चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून देशान्तर केले तर त्यात काहीही वावगे नाही. आणि ज्या देशात तुम्ही जाता त्या देशाप्रती आधीपासून सिद्धान्तशिक्षण (indoctrination) करून निष्ठा निर्माण कराव्या लागत नाहीत. त्या आवश्यकही नसतात. अमेरिकेत गेलेले सारेजण अमेरिकानिष्ठ होतात असेही नाही.
४. जन्माने भारतीय पण धर्माने खिस्ती असणा-यांचीही देशनिष्ठा ह्या देशाशी असल्याची उदाहरणे अनेक आहेत. धर्म बदलण्याने देशनिष्ठा बदलत नाहीत.
५. आपल्या देशातील धर्मनिष्ठ संतही अमेरिकेत आश्रम काढून तेथील लोकांना
हिंदुधर्माची दीक्षा देत आहेत. त्यांना जाळल्याची उदाहरणे नाहीत.
६. दैनंदिन जीवनात धर्माचे कितपत महत्त्व आहे? दैनंदिन जीवनाच्या समस्या सोडविण्यात व्यस्त असणा-यांना धर्माचा कितपत उपयोग होतो? धार्मिक संस्कार व्यक्तित्वावर कितपत प्रभाव पाडतात? हिंदुधर्म हा धर्म नसून ती एक जीवनपद्धति (life style) आहे असे आज म्हटले जाते. व्यक्तिगत आयुष्यात धर्माचे स्थान मर्यादित असते. धर्मान्तराने life style बदलत नाही.
७. धार्मिक भावनांचे पुनरुज्जीवन करण्यात, लोकांना कट्टर (fanatic) करण्यात राजकीय स्वार्थ असतो आणि त्यासाठी धर्माच्या अनुयायांनी एक व्हावे, धर्मांतरण करून अनुयायांची संख्या वाढवावी यासाठी प्रयत्न केले जातात.
८. खिस्तीधर्म किंवा मुस्लिम धर्म जगातील अनेक राष्ट्रांत आहे. तेथे हा धर्म राष्ट्रनिष्ठेच्या आड येत नाही. धर्माच्या आधारावर दुसन्या देशातील लोकांना फितूर करता येत नाही.
९. कधीकधी एकाच धर्मातील वेगवेगळ्या पंथाचे लोकही आपला पंथ हा वेगळा धर्म असल्याचे मानतात आणि वेगळ्या प्रदेशाची मागणी करतात. तेव्हा ह्यास स्पष्टीकरण कोणते देणार? धर्माचा वापर राजकारणी आपल्या सोयीने करीत असतात आणि त्याच्या आधारावर स्वकीय कोण आणि परकीय कोण ते ठरवीत असतात. सामान्यांची धर्माची कल्पना आणि राजकारण्यांची धर्मकल्पना ह्या वेगवेगळ्या असतात. एकाच धर्माची दोन राष्ट्रे जेव्हा परस्परांवर आक्रमण करतात तेव्हा कोणती गोष्ट महत्त्वाची असते, धर्मनिष्ठा की देशनिष्ठा?
१०. अमेरिकेत अनेक देशांतले लोक येतात. चीन, कोरिया, आशिया, युरोप, आखाती देश इ. हे सारे अमेरिकेचा इतिहास पाहून येत नाहीत. ते वर्तमान बघतात. आखाती देशांत जाणारे भारतीय त्या देशांचा इतिहास वाचून जात नाहीत. त्यामुळे देशांतरणाने ज्या देशात आपण जातो त्याचे सांस्कृतिक श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही. ज्याला ज्याला संधी मिळते तो परदेशी जातो. त्याचा देशनिष्ठेशी संबंध नाही. धर्म आमि परमेश्वरनिष्ठा ही सुद्धा ज्याची त्याची वैयक्तिक बाब असते. त्यांच्या आधारावर सामान्य विधाने (generalizations) करू नयेत.
११. आपण घेतलेल्या उदाहरणांचा विचार करता स्फुट लेखाचे शीर्षक ‘धर्मान्तर आणि राष्ट्रनिष्ठा’ ह्या ऐवजी ‘देशांतर आणि राष्ट्रनिष्ठा’ हे जास्त समर्पक झाले असते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.