अध्यात्म : एक प्रचंड गोंधळ

‘अध्यात्म’ या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ आहे ‘आत्मानं अधिकृत्य’, म्हणजे आत्म्याविषयी. अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयी विचार.
‘आत्मा’ म्हणजे काय हा प्रश्न लगेच उद्भवतो.
पण ‘आत्मा’ या शब्दाची स्थिती मोठी चमत्कारिक आहे. तो सामान्य, दैनंदिन व्यवहारातील शब्द नाही. तो तत्त्वज्ञानातील शब्द आहे. सामान्य माणसे, विशेषतः खेड्यातील अशिक्षित माणसे आत्म्याविषयी कधी आपसात बोलत असतील असे म्हणता येत नाही. ‘आत्मा’ या शब्दाचा जवळजवळ संपूर्ण अर्थ त्याला अतिभौतिकीने (metaphysics) दिलेला आहे असे दिसते. एका अर्थी आत्मा म्हणजे ज्याला आपण ‘मी’ किंवा ‘अहं म्हणतो तो पदार्थ हे खरे आहे. या अर्थी आत्मा आपल्या परिचयाचा आहे. पण त्या शब्दाचा अर्थ तेवढाच नाही. तो आपल्या शरीराहून भिन्न, स्वतंत्र पदार्थ आहे. अनादि आणि अनंत आहे. त्याची असंख्य जन्मांतरे झाली आहेत, आणि जर तो मुक्त झाला नाही तर असंख्य जन्मांतरे होणार आहेत, पण तो मुक्त होऊ शकतो. त्याकरिता त्याला विशिष्ट साधना करावी लागते. आणि ती सफल झाल्यास तो जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यातून सुटतो. इतका आणि आणखीही बराच अर्थ या शब्दाला अतिभौतिकीने दिला आहे. या सबंध अर्थाचा विचार आणि त्याचे समर्थन हा अध्यात्माचा विषय.
वस्तुतः शरीरापासून स्वतंत्र, अशरीरी आत्मा कोणी कधी पाहिला नाही. आपल्याला जे आत्मे माहीत आहेत, ज्यांच्याशी आपण व्यवहार करतो, ते सर्व शरीरी आत्मे आहेत. सामान्यपणे जेव्हा आपण ‘मी’विषयी बोलतो तेव्हा आपण शरीर आणि आत्मा असा भेद करीत नाही. शरीर आणि मानस दोन्ही प्रकारची विधेये आपण एकाच ‘मी’विषयी वापरतो. उदा. ‘मी ५|| फूट उंच आहे किंवा ‘माझे वजन ६५ किलोग्रॅम आहे’ असे जसे आपण म्हणतो, तसेच ‘मी वाचतो’ किंवा ‘मला दुःख होते, किंवा ‘मी विचारात गढून गेलो होतो’ असेही आपण त्याच ‘मीविषयी म्हणतो. यावरून असे म्हणता येते की आपली आत्म्याविषयीची कल्पना शरीरी मनाची किंवा मनोयुक्त शरीराची आहे.
आपला सामान्य अनुभव जर असा असेल तर आत्मा शरीरापासून स्वतंत्र पदार्थ आहे, आणि मृत्यूनंतर तो अस्तित्वात राहू शकतो असे आपण मानतो हे कसे? त्याचे कारण आपली स्वतःविषयीची अतीव प्रीती. मृत्यूने आपला अंत होतो ही गोष्ट आपल्याला इतकी अप्रिय वाटते की ती मानायला आपण तयार नसतो. आपण कोणत्यातरी स्वरूपात मरणानंतर उरतो या कल्पनेला आपण घट्ट बिलगतो, आणि तिच्या समर्थनाकरिता वेगवेगळी कारणे शोधतो. ती सर्व कारणे फसवी असतात. त्यांनी आपले ईप्सित साध्य होत नाही. पण आपण ती खरी मानतो. या नैसर्गिक हव्यासात धर्मग्रंथांची साथ मिळते. धर्मग्रंथ, श्रुती इ. परमेश्वराचे शब्द आहेत असे मानल्याने आपले ईप्सित साध्य होते. ही सर्व समर्थने म्हणजेच अध्यात्म, त्या समर्थनांपैकी प्रमुख समर्थनांचा आता संक्षेपाने विचार करू,
चार्वाक दर्शन आणि वैशेषिक दर्शन ही दर्शने सोडली तर सर्व भारतीय दर्शनांत अध्यात्म आलेले आहे. त्यातही वेदान्तदर्शनातील अध्यात्म विचार विशेष प्रतिष्ठा पावलेला आहे. सर्व दर्शनांच्या अध्यात्मविचारात काही समस्या समान आहेत, पण विशेषतः वेदान्तात अनेक समर्थने वेगळीही आहेत, त्यांपैकी समान युक्तिवादांचा विचार आधी करून मग । वेदान्ताकडे वळू.
सर्वच दर्शनांनुसार आत्मा अनादि आणि अनंत आहे. पण हे कशावरून? या मताचे साधक पुरावे मुख्यतः दोन आहेत. १) शब्दप्रमाण आणि २) कर्मसिद्धान्त. भारतीय तत्त्वज्ञानात शब्दप्रमाण एक प्रमुख प्रमाण, म्हणजे यथार्थ ज्ञानाचे साधन मानले आहे. श्रुतींमधील शब्द खुद्द परमेश्वराचे शब्द असून त्याच्या स्मरणाने अन्य ज्ञानसाधनांच्या आटोक्यात नसलेल्या इंद्रियातीत सत्याचे ज्ञान होते. उदा. जन्मापूर्वी आत्म्याची स्थिती काय होती, किंवा मृत्यूनंतर ती काय होणार आहे हे इंद्रियानुभवांनी आणि त्यांच्यावर आधारलेल्या अनुमानांनी कदापि कळू शकत नाही. पण त्याचे ज्ञान शब्दप्रमाणाने होते असे प्राचीन तत्त्वांचे म्हणणे आहे. इंद्रिये आणि तर्क यांना अप्राप्य अशा गोष्टींचे ज्ञान शब्दप्रमाणाने होते.
या शब्दप्रमाणाने आत्म्याचे खरे स्वरूप, इंद्रियांना आणि तर्काला अगम्य असणारे स्वरूप, तो अनादि आणि अनंत आहे असे आहे. तो कधी जन्मत नाही आणि कधी मरत नाही. शब्दप्रमाणाने कळणाच्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे कर्मसिद्धान्त. या सिद्धान्ताचे प्रतिपादन असे आहे की मनुष्याला या जन्मात जो अनुभव येतो, तो जी सुखदुःखे भोगतो, ती सर्व त्याच्या स्वतःच्या कर्माची फळे असतात. कर्मांना फळे येणे, अपरिहार्यपणे येणे हा त्यांचा धर्मच आहे. ज्यांना फळे येत नाहीत अशी कर्मे असू शकत नाहीत. असे असल्यामुळे आपल्याला या जन्मात मिळणारे सुखदु:ख आपल्या कृत कर्माची फळे आहेत असे मानावे लागते आणि त्याकरिता पूर्वजन्म मानावा लागतो. आणि त्याचप्रकारे आपण वर्तमान जन्मात जी कर्मे करतो त्यांपैकी अनेकांना फळे येताना दिसत नाहीत. परंतु कर्म फळाशिवाय राहत नाही, म्हणून ती भोगण्याकरिता पुनर्जन्म मानावा लागतो. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांची ही साखळी अनादि असावी लागेल आणि भविष्यातही ती अनन्त असावी लागेल. म्हणजे आत्मा अनादि आणि अनंत मानावा लागतो. येथे असाही युक्तिवाद केला जातो की कर्मसिद्धान्त हा सामान्यपणे स्वीकारला गेलेला जो कार्यकारणाचा नियम आहे त्याचाच एक भाग आहे. कर्माचे फळ हे एका अर्थी कर्म ह्या कारणाचे कार्य आहे. म्हणून जर आपल्याला कार्यकारणाचा नियम मान्य असेल तर कर्मसिद्धान्तही मान्य करायला हरकत नाही. पण हे बरोबर नाही, कारण कार्यकारणाच्या नियमात अभिप्रेत असलेले कार्य आणि कर्मसिद्धान्तात अभिप्रेत असलेले फळ या गोष्टी सर्वथा भिन्न आहेत, कर्मे सत्कर्म किंवा दुष्कर्मे असतात, आणि सत्कर्माना गोड फळे येतात आणि दुष्कर्माना कडू फळे येतात असे म्हणतात. पण प्रत्येक घटनेला कारण असते असे प्रतिपादणाच्या नियमाचा चांगल्या वाइटाशी संबंध नसतो. कारणाचे कार्य सुखद असते की दु:खद हा विचारच त्या नियमात अप्रस्तुत असतो. उलट कर्मसिद्धान्तात कर्माचा विचार केवळ घटना म्हणून न करता ते चांगले आहे की वाईट हा विचार प्राधान्याने केला जातो. कर्माच्या चांगल्या वाईटपणानुसार त्याची फळे सुखद किंवा दुःखद असतात. पण चांगले आणि वाईट हा विचार निसर्ग करू शकत नाही याउप्पर जर कर्मसिद्धान्त निसर्गाचा किंवा सृष्टीचा नियम आहे असे म्हणायचे असेल तर त्याकरिता जगाचे शासन एखाद्या चेतन शक्तीकडून होते असे मानावे लागेल. पण अशी शक्ती कुठे असेल, आणि तिच्या द्वारा जगाचे शासन चालत असेल असे मानायला कोणतेही कारण नाही. कर्मसिद्धान्त कसलेही कारण पुरवीत नाही. या विशाल जगात मनुष्याच्या सुखदुःखाची मातब्बरी इतकी आहे असे मानणे तारतम्याला पूर्ण सोडून आहे.
आता सर्व दर्शनांत स्वतःला श्रेष्ठ मानणाच्या वेदान्ताकडे वळू.
वेदान्तदर्शनाचे कोणीतरी सोयिस्करपणे एका लोकार्धात वर्णन केले आहे. ते असे आहे.
स्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिमिः।
ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः॥
म्हणजे जे कोटि कोटि ग्रंथांनी संगितले आहे ते मी अर्ध्या श्लोकात सांगतो. ते म्हणजे ब्रह्म सत् आहे, जगत् मिथ्या आहे, आणि जीवात्मा ब्रह्मच आहे, अन्य काही नाही.
हे वर्णन आपण मान्य करायला हरकत नाही.
वेदान्ताचे पहिले प्रतिपादन आहे. ब्रह्म सत् आहे. पण हे ब्रह्म काय आहे? तो एक शुद्ध ज्ञानमय, आनंदमय असा पदार्थ आहे. तो अनंत आहे. त्याचे वर्णन सत्, चित् आणि आनंद असे केले जाते. हा एक आणि अद्वितीय पदार्थ आहे. त्याच्याखेरीज आणखी काही सत् नाही.
पण पृथ्वी, आप, तेज इत्यादी पंचमहाभूतांचे विविधांगी आणि नानारूपी जग सत् नाही काय?
वेदान्ताचे म्हणणे आहे, नाही.
पण ते आपण सतत अनुभवतो, असेल; पण तो केवळ भास म्हणजे भ्रम आहे. जसे स्वप्नसृष्टीला अस्तित्व नसते, ती केवळ भास असते, तसे भौतिक जगही केवळ भासमान
आहे. केवळ दिसणारे आहे, वास्तव नाही.
पण एकमेवाद्वितीय ब्रह्मच फक्त आहे असे कसे म्हणता? भौतिक जग भासमान असेल, पण मनाची, आत्म्यांची काय वाट? ते तर आहेत ना, अद्वैत वेदान्ताचे मत आहे की आत्मे (म्हणजे जीवात्मे) हेही सत् नाहीत, भासमान आहेत. वस्तुतः जीवात्मा ब्रह्माहून वेगळा नाही. तो ब्रह्मच आहे.
आता या मताबद्दल काय म्हणावे?
प्रथम जीवात्मे भासमान आहेत या मताचा विचार करू. एखाद्या भासाचे उदाहरण घेऊ या. वेदान्ताचे आवडते उदाहरण आहे दोरीला साप समजून भिण्याचे. आता हा अनुभव येण्याकरिता तीन गोष्टींची गरज आहे. प्रत्यक्ष उपस्थित असलेली वस्तू (दोरी), ती जशी भासते ती वस्तू (साप), आणि ज्याला भास होतो ती व्यक्ती. या तीन वस्तूंपैकी एकही जर नसेल तर भास अशक्य आहे, हे निर्विवाद आहे. आता वेदान्ताचे प्रतिपादन आहे की जीवात्मा हा भास आहे. पण त्याकरिता एकूण तीन गोष्टी आवश्यक असतील आणि अद्वैत वेदान्ताच्या मतानुसार विश्वात फक्त एकच वस्तू आहे, ब्रह्म. ते शुद्ध ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याला भ्रम होऊ शकत नाही. म्हणजे जिला भ्रम होतो ती वस्तू म्हणजे ब्रह्म नव्हे. पण विश्वात ब्रह्माखेरीज आणखी काहीच नसेल तर भास कोणाला होतो? वेदान्त म्हणतो की भास जीवात्म्याला होतो. पण जीवात्मा तर भास आहे, असे वेदान्त म्हणतो. ब्रह्म जीवात्मा म्हणून भासते असे म्हणतात; पण त्याकरिता विश्वात ब्रह्माखेरीज आणखी एखादी वस्तू असावी लागेल, तरच तिला भास होऊ शकेल. म्हणजे तिला ब्रह्म जीवात्मा म्हणून भासेल. ब्रह्माला भास होऊ । शकत नाही. ते अन्य कुणाला तरी भासू शकते. पण ज्याला भासायचे असे काहीच नसल्यामुळे भास शब्द नाही. म्हणजे जीवात्मा भास आहे हे शक्य नाही. याप्रमाणे विश्वात ब्रह्माखेरीज अन्य काही नसल्यामुळे ब्रह्म जीवात्मा म्हणून भासते असे असू शकत नाही. म्हणजे जीवात्म्याचे अस्तित्व सिद्ध होऊ शकत नाही, म्हणून त्याला ब्रह्मज्ञान झाल्याने तो मुक्त होतो हेही शक्य नाही.
एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली. तिचा भासाशी संबंध आहे. ती गोष्ट म्हणजे माया. विश्वात ब्रह्माखेरीज माया नावाची एक शक्ती आहे असे वेदान्त म्हणतो. पण केवळ
अद्वितीय ब्रह्मच अस्तित्वात आहे ना? आहे, मायेला ख-या अर्थाने अस्तित्व नाही ज्याला मिथ्या म्हणतात त्या अर्थाने माया मिथ्या आहे.
मिथ्यात्वाची कल्पना हा वेदान्ताचा मोठा विक्रम मानला जातो. ही कल्पना अशी आहे की एखादी वस्तू मिथ्या आहे याचा अर्थ ती सतही नाही असतही नाही. मिथ्या वस्तू सदसद्विलक्षण आहे म्हणजे सत् आणि असत् दोहोंहून वेगळी आहे. पण हे कसे शक्य आहे? आपण सामान्यपणे समजतो की जे सत् नाही ते असत् आणि जे असत् नाही ते सत्: त्यामुळे जे सत्ही नाही आणि असतही नाही असे काहीही असू शकत नाही. पण वेदान्ताचे प्रतिपादन असे आहे की ते शक्य आहे. त्याकरिता वेदान्ताला भाषेशी दांडगाई करावी लागते. तो सत् आणि असत् या शब्दांच्या नवीन व्याख्या देतो, म्हणजे त्यांच्या रूढ अर्थाहून त्यांना वेगळे अर्थ देतो. सत् म्हणजे जे सदासर्वकाळ अस्तित्वात असते ते, किंवा अन्य शब्दांत जे त्रिकालाबाधित आहे ते. जे काही काळच असते, म्हणजे ज्याला आरंभ आणि अन्त असतो, ते सत् नव्हे, अर्थात सत् हे अनादि आणि अनन्त असले पाहिजे. जे सान्त आहे ते सत् नव्हे. असत्ची व्याख्याही अशीच रूढ अर्थाहून वेगळी अशीच वेदान्त करतो. जे कदापि अनुभवाला येत नाही, जे केव्हाही भासत नाही ते असत्. उदा. सशाचे शिंग ते कुठेही कधीही दृष्टीस पडत नाही. या दोहोंहून भिन्न, म्हणजे जे अनुभवाला येत नाही, पण जे नष्ट ते होते ते मिथ्या. उदा. दोरीच्या ठिकाणी भासणारा सर्प. हा डोळ्यांना दिसतो, पण तिथे दोरी आहे हे कळले की तो नष्ट होतो. जो भासतो पण नष्ट होतो त्याला मिथ्या म्हणतात. मिथ्या वस्तू आहे असे म्हणता येत नाही, कारण ती नष्ट होते, आणि ती नाही असेही म्हणता येत नाही, कारण ती भासते.
माया अशी आहे. ती सत्ही नाही आणि असत्ही नाही. पण म्हणून ती नाही असे नाही. तिच्यामुळे ब्रह्माचे स्वरूप झाकले जाते आणि त्याच्या जागी मिथ्या गोष्टी भासतात.
मिथ्यात्वाच्या या कल्पनेचे परीक्षण करण्यापूर्वी जीवात्म्याचे विवेचन संपवू या. मायेला अस्तित्व आहे हे मान्य करूनही जीवात्मा भास कसा असू शकेल याचा उलगडा होत नाही. कारण आपण वर पाहिल्याप्रमाणे, ब्रह्माखेरीज आणखी एखादी वस्तू असल्याशिवाय भास कोणाला होतो या प्रश्नाला उत्तर मिळत नाही. मायेमध्ये ब्रह्माला झाकण्याची आणि भास निर्माण करण्याची शक्ती असेल, पण भास मायेला होत नाही, आणि विश्वात वस्तुतः ब्रह्म आणि माया या दोहोंखेरीज तिसरी गोष्ट नसल्यामुळे भास कोणाला कसा होऊ शकेल हे कळत नाही. म्हणजे जीवात्म्याची कल्पना अनुपपन्न राहते.
आता मिथ्यात्वाच्या कल्पनेचे परीक्षण करू. ही मुलखावेगळी कल्पना घोटाळ्याची आहे. तिची व्याख्या करण्याकरिता वेदान्ताला ‘सत्’ आणि ‘असत्’ या शब्दांना त्याच्या रूढ अर्थाहून भिन्न अर्थ द्यावे लागले. म्हणजे जे आहे ते किंवा ज्याला अस्तित्व आहे ते असे आपण मानतो. दोरीच्या ठिकाणी भासणारा साप असत्, कारण तो तेथे नसतो. आणि दोरी सत् कारण ती वस्तुतः असते. थोडा वेळ टिकणारी वस्तूही सत् असू शकते असे आपण म्हणतो. पण भासणा-या सर्पाला कदापि अस्तित्व नसते असे आपण म्हणतो. येथे ‘असत्’ शब्दाच्या रूढ अर्थाहून भिन्न अर्थ वेदान्त देतो. तो म्हणतो की रज्जुसर्पाला (म्हणजे दोरीच्या ठिकाणी भासणाच्या सर्पाला) मिथ्या अस्तित्व असते. वस्तुतः त्याला अस्तित्व नसते, पण आपण
चुकीने ते आहे असे समजतो. वेदान्तमतानुसार जे कदापि भासत नाही ते असत्. पण हाही अरूढ अर्थ आहे. रूढ अर्थी जे नाही ते असत्. ते नसते म्हणून भासत नाही, भासत नाही म्हणून नाही असे नाही याप्रमाणे मिथ्यात्वाची कल्पना करण्याकरिता वेदान्ताला भाषेशी दांडगाई करावी लागली. ती कल्पना प्रामाणिक कल्पना नव्हे, तोतया कल्पना आहे.
परंतु मिथ्या हा अस्तित्वाचा एक तिसरा प्रकार आहे हे मान्य करूनही जग मिथ्या आहे असे मानण्याचे कारण काय असा प्रश्न वेदान्तात विचारावासा वाटतो. वेदान्त म्हणतो की भौतिक जग मिथ्या आहे कारण ते भासते. जसे दोरीचे ज्ञान झाल्यावर रज्जुसर्पाचे अस्तित्व बाधित होते, तसेच ब्रह्माचे ज्ञान झाल्यावर जग नाहीसे होते. पण हे कशावरून? ज्यांना ब्रह्मज्ञान झाले आहे त्यांची साक्ष वेदान्ती काढतात. पण स्पष्टच बोलायचे तर एकतर ज्यांना ब्रह्मज्ञान झाले असे म्हणतात ते सर्व भूतकाळात होऊन गेले. आज त्यांच्या साक्षीची उलटतपासणी आपण करू शकत नाही, आणि आज कोणी ब्रह्मज्ञानी सापडत नाही हे सूचक आहे. भौतिक जग अब्जावधी वर्षे अस्तित्वात राहिले आहे, आणि अब्जावधी वर्षे राहणार आहे. ते कदाचित त्रिकालाबाधित नसेल, पण कदाचित असेलही. पण ते मिथ्या मानायचे कारण नाही. एवढेच नव्हे तर ते सत् आहे याविषयी संशय व्यक्त करणेही अर्थशून्य, बाष्कळ बडबड आहे.
सारांश, अध्यात्म एक प्रचंड गोंधळ आहे. ती एक परीकथा आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.