समस्त मराठीभाषाप्रेमींना अनावृत पत्र

सप्रेम नमस्कार,
मुद्रित मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंताग्रस्त होऊन मी हे प्रकट पत्र आपणास लिहीत आहे. आयुष्यभर मुद्रणाचा व्यवसाय केल्यामुळे मराठीची जी अवनती आज झालेली आहे तिचा मी साक्षी आहे; किंवा असे म्हणा की ती अवनती पाहण्याचे दुर्भाग्य मला लाभले आहे. आपल्या लिखित वो मुद्रित मराठी भाषेविषयी आपण नेटाने काही प्रयत्न आताच केले नाहीत तर आपल्या भाषेचे हाल कुत्रा खाणार नाही किंवा ती मरेल अशी भीती मला सध्या वाटत आहे. मराठी मरेल म्हणजे ती पूर्णपणे. नष्ट होईल असे नाही; पण तिचे विदग्ध, अभिजात, परिष्कृत स्वरूप मात्र नष्ट होईल. ती एक ढिसाळ, पसरट आणि अप्रमाण अशी भाषा म्हणून नांदेल.
वर उल्लेखिलेल्या माझ्या भीतीपोटी मी काही मुद्दे आपल्या विचारार्थ थोडक्यात येथे मांडतो :
१. भाषा मरते कशाने? माझ्या मते ती परभाषांच्या आक्रमणामुळे मरत नाही, उलट अनेक भाषा एकमेकींच्या गळ्यांत गळे घालू शकतात. तिच्यात नवनिर्मिती थांबली, (लोक परक्या भाषेत विचार करू लागले) तिचे प्रमाणीभूत स्वरूप नष्ट झाले, हेंगाड्या, ओबडधोबड भाषेला प्रतिष्ठा आली म्हणजे ती मेली असे मला वाटते. म्हणून आपल्या भाषेला मरू द्यावयाचे नसेल तर तिला सतत नवनिर्मितिक्षम ठेवावे लागेल. जिचा आशय कोणत्याही काळात किंवा प्रदेशात सुगम राहील, निःसंदिग्धपणे कळत राहील असे तिचे स्वरूप कायम ठेवावे लागेल.
२. भाषेचे परिष्करण हे मुख्यतः लिखित भाषेचे होत असते. (परिष्करण हा शब्द येथे cleansing, polishing ह्या अर्थी वापरला आहे.) त्या भाषेच्या परिष्कृत रूपामध्ये सातत्य हा गुण असणे अनिवार्य आहे. कोणत्याही शब्दाला अर्थ वा आशय व्यक्त करता येण्यासाठी त्याच्या ठिकाणी अविकृत सातत्य (mutation-रहित सातत्य) राखण्याची आवश्यकता आहे. किंबहुना सातत्यामुळेच शब्दाला श्रोत्याच्या किंवा वाचकाच्या मनात संदर्भ निर्माण करता येतो.
३. जेव्हा भाषेचे लेखन होते तेव्हा ते उच्चार दाखविण्यासाठी होत नाही. ते लेखकाच्या मनातला आशय व्यक्त करण्यासाठी होते. अशा लेखनाचे उच्चारण वाचकाच्या मुखाच्या रचनेप्रमाणे किंवा त्याच्या मुखाला असलेल्या सवयीमुळे होते. उदा. स्कूल-इस्कूल, सकूल, गुळदाळ्या-गुईदाया, पाणी-पानी इ. अशा उच्चारांमध्ये निष्कारण उच्चनीचभाव आणला गेला आहे म्हणून कोणाच्याही उच्चाराला हसण्याचे कारण नाही. प्रमाण लेखनात आलेला उच्चार ( त्यो-थ्यो, थो-तो ह्यांपैकी ‘तो’ हा प्रमाण) विभिन्न प्रदेशांतील उच्चारांचे प्रतिनिधित्व करतो असे मानावे. लेखन हे लेखकाच्या मनातील आशय आणि अभिप्राय अभिव्यक्त करण्यासाठी होत असल्यामुळे ज्यामध्ये तो आशय स्पष्टपणे आणि निसंदिग्धपणे, त्याचप्रमाणे थोड्या अक्षरांमध्ये सांगितला जातो ते लेखन चांगले लेखन मानावे.
४. लिखित संकेत हे डोळ्यांना आशयाचा बोध करून देणारे संकेत आहेत. त्यामुळे, आणि पूर्ण मानवेतिहासाचा विचार करता ते अलिकडे निर्माण झालेले असल्यामुळे, ते शिकावयाला अवघड असल्यामुळे ( नवनवीन लिपी शिकणे, प्रौढांना साक्षर करणे ही अतिशय दुष्कर कार्ये आहेत म्हणून ते संकेत वारंवार बदलून चालत नाही.) त्या संकेतांमध्ये सहेतुक स्थैर्य निर्माण करण्याची आवश्यकता आहे. लेखन शुद्ध वा परिष्कृत करण्याची, राखण्याची गरज कधीच कमी होत नाही. देशकालाप्रमाणे उच्चार बदलत असतात. हे बदल भाषेच्या स्थैर्याला बाधक ठरतात म्हणून हे बदल त्याज्य आहेत. एकदा प्रमाणीकृत झालेल्या लेखनाला (ज्याचे व्याकरण झाले आहे, जे शब्द कोशामध्ये आलेले आहेत) कोणत्याही परिस्थितीत अप्रमाण (destandardise) करता येत नाही. चलनातून नाणी काढून घेता येतात, पण ग्रंथात ज्यांचा वापर झालेला आहे इतकेच नव्हे तर ज्यांना कोशात स्थान मिळाले आहे त्या शब्दांना चलनातून काढून घेता येत नाही. मराठी भाषकांचे हित करावयाच्या हेतूने केलेला शास्त्रपूत लेखनाला दंडार्ह ठरविण्याचा प्रयोग आपल्या भाषेच्या वृद्धीला मारक ठरला आहे. पुन्हा सांगतो की देशकालाच्या मर्यादा ओलांडून जाणारी शब्दांची लिखित रूपे वारंवार बदलणे हा प्रमाण भाषेचा खून होय.
५. प्रत्येक साक्षराला भाषेच्या परिष्कृत रूपाची ओळख पटेल (त्याचे अभिज्ञान recognition होईल) पण प्रत्येकाला ती परिष्कृत रूपात लिहिता येईलच (प्रत्यावाहन recall करता येईल ह्या अर्थी) असे नाही, हे मान्यच आहे. पण त्यावर उपाय भाषेचे प्रमाण रूप बदलून टाकणे हा नाही तर ज्याला शुद्ध लिहिण्याची सवय नाही पण सवय केल्यास जो शुद्ध लिहू शकेल त्याला विशेष प्रशिक्षण देणे हा आहे. ह्या बाबीकडे आम्ही केलेले दुर्लक्ष आमच्या भाषेच्या अवनतीला कारणीभूत झालेले आहे. आम्ही आमच्या अहंमन्यतेमुळे आपल्यापेक्षा वेगळे उच्चार करणा-यांची केलेली हेटाळणी आमच्या अंगाशी आली आहे. आपापल्या उच्चारांविषयीचा अभिमान वाढला आहे इतकेच नाही तर भिन्नभिन्न उच्चारांमध्ये विनाकारण उच्चनीचभाव आणला गेला आहे.
६. भाषेचे व्यवहार एकाच वेळी एकाच प्रदेशातसुद्धा निरनिराळ्या पातळ्यांवर चालतात. बहुतेक लोकांची शब्दांची गरज मोजकी असते. जसजसे शिक्षण वाढते, ज्ञानविज्ञानात आपण प्रगती करतो, आपले क्षितिज विस्तारत जाते तशी आपल्या भाषेतील शब्दांची संख्या वाढत जाते आणि दैनंदिन व्यवहारातील शब्दसंपत्तीची गरज देखील वाढत जाते. ही गरज भागविण्यासाठी शब्दकोशांच्या वापराची सवय विद्यार्थ्यांना मुद्दाम लावावी लागते. ही सवय आम्हा मराठी भाषकांना नाही. बहुतेकांना आपला वर्णानुक्रमसुद्धा माहीत नाही. बहुसंख्य साक्षरांना वर्णानुक्रम न येणे हे भाषा मृत्युपंथाला लागली असल्याचे लक्षण आहे. जोडाक्षरे हे आपल्या लिपीचे वैशिष्ट्य आहे. ती कशी लिहावयाची हे माहीत नसणे हेसुद्धा आपल्या भाषेचे पुनःसंजीवन करण्याची गरजच दाखविते ह्या माझ्या मताशी आपण सहमत व्हाल.
७. आधुनिक भाषावैज्ञानिकांनी उच्चारानुसारी लेखनाला दिलेले महत्त्व आपल्या भाषेच्या हासाला, नव्हे तिचा मृत्यु नजीक आणावयाला, कारणीभूत झालेले आहे. आपल्या प्रमाण भाषेला पुनरुज्जीवित करावयाचे असेल तर उच्चाराप्रमाणे केल्या गेलेल्या लेखनाची प्रतिष्ठा आम्हाला काढून घ्यावी लागेल.
८. लेखन हे डोळ्यांसाठी आहे, कानांसाठी नाही. ज्ञानग्रहण करण्यासाठी डोळ्यांचा वापर उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. दृश्य संकेत हे शिकावयाला कठीण असले तरी एकदा शिकल्यानंतर अर्थबोध शीघ्र करून देतात. वाचनाची गती प्रयत्नाने पुष्कळ वाढविता येते, परंतु श्रवणाची गती कितीही प्रयत्न केला तरी वाढविता येत नाही. कारण डोळ्यांना यादृच्छिक प्रवेश (random access) आहे तर कानांचे काम पांक्तिक (linear) पद्धतीने चालते. डोळ्यांना दिसणारी रूपे सर्वत्र एकसारखी असली तरच त्यांचे शीघ्र वाचन शक्य होते.
९. उच्चारानुसारी लेखन नको असण्याचे, त्याचप्रमाणे मराठीचे रोमनीकरण न करण्याचे कारण असे की तसे लेखन केल्यामुळे शब्दांची घडण कशी झाली आहे हे कळत नाही. वाङ्मय हा शब्द वांग्मय असा, किंवा wa:ngmay असा, आणि जगन्नाथ हा शब्द जगनाथ किंवा Jaganna:th असा लिहिल्यानंतर त्यांचे वाक्+मय, जगत्+नाथ हे दोन अवयव डोळ्यांना दिसेनासे होतात. अपरिचित असलेल्या शब्दाची आपल्याला अवगत असलेल्या व्याकरणाच्या (शब्दसिद्धीच्या नियमांच्या) साह्याने फोड करून नवीन शब्दाचा अर्थ समजून घेण्याचे साधन आपण कायमचे नष्ट करीत असतो. डोळ्यांच्या सवयी बिघडवून शे-दीडशे वर्षांपूर्वी छापलेली पुस्तके आम्ही अमच्यासाठी आणि आमच्या पोरांसाठी कायमची परकी करून टाकतो. भाषेची अविच्छिन्नपणे चालावी अशी परंपरा खंडित करून टाकतो. आमच्या वृत्तपत्रांतल्या मराठी जाहिराती, मराठी दूरदर्शनवरील पाट्या पाहाव्या – त्यांच्यांत पुष्कळदा प्रमाण भाषेचा शब्दागणिक खून असतो. भाषेच्या राज्यातील (domain) सगळ्या प्रजेचा खून झाल्यानंतर भाषाच मेली असे म्हणावे लागते. एका अधिकोषाचे बोधवाक्य ‘एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ असे आहे. ते एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ’ असे छापले म्हणजे त्याचे अर्थनिश्चयनाला साह्य करणारे अभिजात स्वरूप नष्ट होते. म्हणजेच मराठी मरते. प्रत्येक शब्दाचे अर्थनिश्चयन शब्दाच्या दृश्य रूपामुळे झाले पाहिजे. त्यासाठी दरवेळी कोश पाहावयाला नको, तसाच संदर्भही पाहायला नको.
१०. उच्चाराप्रमाणे केलेल्या लेखनाला आक्षेप दोन. पहिला – कोणाचा उच्चार प्रमाण मानावयाचा हा; आणि दुसरा मनामध्ये उच्चार केल्याशिवाय, पुटपुटल्याशिवाय त्या शब्दांचा अर्थ समजत नाही, उच्चार करीत वाचल्यामुळे वाचनाची गती कमी होते हा. लिहिलेल्या किंवा छापलेल्या मजकुरावर झरकन् नजर फिरवून त्याचा आशय समजून घेता आल्याशिवाय ह्या इंटरनेटच्या दिवसांत मराठी भाषकाचा निाव लागणे कठीण आहे.
११. मराठी भाषेच्या अवनतीची, तिच्या मरणोन्मुखतेची काही कारणे आपण आतापर्यंत पाहिली. त्यांच्याशिवाय आणखीही काही कारणे आहेत; पण त्यांचा विस्तार न करता एकदोन सर्वात महत्त्वाची कारणे ह्यानंतर पाहू. ती आहेत :
(१.) इंग्रजी माध्यमाचा हव्यास
(२)विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी भाषा कशीही-ओबडधोबड; हेंगाडी लिहिली तरी चालेल हा समज. आपल्या मातृभाषेचे सर्वांत जास्त नुकसान वरील दोन कारणांमुळे झालेले आहे.
इंग्रजी भाषामाध्यमाला आमच्याकडे भलतीच प्रतिष्ठा आलेली आहे. आमच्या मुलांनी ती भाषा शिकू नये असे आमचे मुळीच म्हणणे नाही. पण त्या माध्यमामुळे आमचे दुहेरी नुकसान होते ते लक्षात घ्यावयाला हवे. पुष्कळ मुलांना नवीन परकी भाषा शिकण्याचे श्रम इतके जास्त असतात की परीक्षेत उत्तम गुण मिळवणे हे ज्यांचे उद्दिष्ट आहे, त्यांना विषय समजून घेण्यापेक्षा मजकूर पाठ करून परीक्षा देणे सोपे वाटते. तेही ज्यांना करता येत नाही ते नक्कल करतात. आमच्या शिक्षणपद्धतीमध्ये विद्यार्थ्यांने विषय समजून घ्यावयाचा असतो ह्याचे भानच नष्ट झालेले आहे; आणि इंग्लिश माध्यमाने त्याला हातभार लावला आहे. दुसरे नुकसान विद्यार्थ्यांच्या मनांचे परकीयीकरण झाल्यामुळे मातृभाषा त्याला कायमची दुरावते, हे. तिची दुय्यम भाषा म्हणून थोडी तोंडओळख होते पण ती आयुष्यभर तोंडओळखच राहते. तिच्यात लिहिण्याचा प्रसंग आलाच तर मुले ‘देऊन’ हा शब्द ‘धून’ व ‘पिऊन’ हा ‘प्यून’ असा लिहितात. मराठी पुस्तके ती कधीच वाचत नाहीत. चुकीच्या वयात परकी भाषा शिकण्याचा ताण पडल्यामुळे त्यांचा पूर्ण भाषाविषयच आणि कायमचा कच्चा राहतो.
व्याकरणाच्या अध्ययनामुळे शब्दांच्या रूपांच्या मागचा कार्यकारणभाव समजतो. एकाच धातूपासून अनेक शब्द कसे तयार होतात व करता येतात ते समजते. व्याकरण सध्या शिकविले जात नाही म्हणून शुद्धाशुद्धविवेक नाही. त्याचमुळे प्रमाणीकरण नाही. शब्दसिद्धी हे शास्त्र आहे ह्याची जाणंच नाही. असो, विषयान्तर झाले!
विज्ञानाचे अध्ययन आणि सृष्टिनियमांच्या मागच्या कार्यकारणाचे अध्ययन ह्यांत फरक नाही. व्याकरणाच्या अध्ययनामुळे म्हणजे शब्दांच्या रूपांच्या आकलनामुळे विज्ञानाचेही आकलन सोपे व्हावयालाच पाहिजे. ती मनाला लागलेली शिस्त आहे. विज्ञानविषयाची सध्याची पुस्तके वाचून मनाला वेदना होतात. चांगल्या लेखकांनी लिहिलेल्या आणि नावाजलेल्या प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांत भाषेची झालेली हेळसांड पाहून (ऊर्जा हा शब्द उर्जा असा छापला जातो, नैर्ऋत्य हा नैऋत्य असा होता,) मनाला अतिशय वेदना होतात.
ही सारी परिस्थिती बदलण्यासाठी, भाषेची घसरगुंडी थांबविण्यासाठी, आपण काही उपाय सुचवावे अशी नम्र विनन्ती करून हे पत्र येथे पुरे करतो.
दिवाकर पुरुषोत्तम मोहनी

अभिप्राय 1

  • मोहनीकाका, तुमची तळमळ मी समजू शकतो. परंतु तुमच्या लेखनातच अनेक शब्द संस्कृत असून त्यांचा अर्थ सर्वसामान्यांना कळावा म्हणून त्यांचे प्रतिशब्द तुम्ही इंग्लिशमध्ये दिलेले दिसतायत. त्यावरून, इंग्लिश शब्द समजायला सोपे म्हणून, सर्वसामान्यांना संस्कृत शब्दांनंतर पुढे कंसात इंग्लिश प्रतिशब्द दिले असल्याचं दिसतं. ह्याचा अर्थच तुम्हीही इंग्लिश हीच ज्ञानभाषा असल्याचं मानता आसं आम्ही म्हणू का?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.