स्फुट लेख

भांडवलाचे वास्तव स्वरूप
एप्रिल ९१ च्या अंकात महागाई नाही – स्वस्ताई! या नावाचा स्फुट लेख लिहिलेला आहे. त्यानंतर आज भांडवलाची व्याख्या करण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. विवेकी नजरेने जगाकडे पाहण्याची ही एक खटपट आहे.
कोणतेही उत्पादन करावयाचे असेल तर त्यासाठी भांडवल, श्रम आणि भूमि आणि कच्चा माल या चार वस्तूंची गरज असते हे आपण सगळेच जाणतो, मात्र भांडवलाच्या विपयीची आपली अगोदरची कल्पना ही शोपणाधिष्ठित असल्या मुळे एका वाजूला उत्पादन वाढत राहिले तरी दुस-या वाजूला विपमता कायम राहते. शोषणाचे पूर्वीचे स्वरूप आता थोडे फार वदलले असले, जो शोषित आहे तो अगदी सर्वहारा, सर्वस्व गमावलेला नसला तरी विषमता आणि शोपण हे शब्द पर्यायवाची वनले आहेत, आजवरच्या भांडवलाच्या व्याख्या खाजगी मालकी गृहीत धरून केलेल्या आहेत असे जाणवते. सर्व संपत्तीची मालकी सार्वजनिक झाल्यावर भांडवलाचे स्वरूप कोणते राहील त्याचा विचार त्यात दिसत नाही. ज्यायोगे आपल्या उत्पादनात भर पडते त्याला भांडवल म्हणावे अशी भांडवलाची एक व्याख्या आपण करू शकतो; पण उत्पादनात वाढ ह्या शब्दांचा विचार केला तर लवकरच असे लक्षात येते की उत्पादनातील वाढ ही सतत वाढ असावयाला पाहिजे. त्या वाढीमध्ये खंड वा खळ पडता कामा नये म्हणजे, थोडक्यात, उत्पादनाच्या वाढीचे स्वरूप हे चक्रवाढव्याजासारखे नित्यवर्धिष्णु असावे लागेल.
आजवर मुख्यतः पैसा आणि यंत्रसामग्री ह्यांना भांडवल म्हणण्याचा प्रघात आहे. (भांडवलात आणखीही काही वस्तु आहेत पण त्या गौण आहेत.) त्यांपैकी पैसा हे खेळते भांडवल आहे. हे सगळे जरी खरे असले तरी पैशाची किंमत क्वचित् चढते तर नेहमी घसरत असते. त्याच्या पुरवठ्यावर प्रत्येकाचा सतत तावा असतोच असे नाही. आणि सर्व पैसा सार्वजनिक मालकीचा झाला तर त्याचे प्रयोजनच संपते. त्यामुळे पैसा हे भांडवलाचे अस्थिर स्वरूप आहे. उत्पादनासाठी उपयोगात आणलेली यंत्रसामग्री हे भांडवलाचे स्थिर स्वरूप आहे असे मानले जाते पण तेही स्थिर नाही असे थोडा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. भांडवलाचे यंत्रसामग्री हे स्वरूप देखील अस्थिर आहे, कारण यंत्र ही जड वस्तु आहे. उत्पादन जर नित्यवर्धिष्णु ठेवावयाचे असेल तर यन्त्रे रोज बदलावी लागतील. कालचे यन्त्र आज उपयोगी पडणार नाही. म्हणून यंत्रसामग्री हे जरी एका परीने स्थिर भांडवल असले तरी त्या
यंत्राच्या बदलत्या स्वरूपामुळे तेही अस्थिरच मानावे लागते. कोणत्याही व्यवसायात एकदा म्हणजे सुरुवातीला भांडवल घातले की कायमची सोय झाली असे होऊ शकत नाही. अशी जर परिस्थिती आहे तर मग भांडवलाचे न वदलणारे स्वरूप कोणते? ते स्वरूप आमच्या मते अधिकाधिक उत्पादनासाठी केलेले माणसाचे वुद्धिपूर्वक प्रयत्न हे आहे.
अधिकाधिक उत्पादनासाठी आवश्यक असणारी भांडवलाची ही वरील व्याख्या आणखी थोडी काटेकोर करता येईल. तिच्यामध्ये सामूहिक हा शब्द जास्तीचा घालावा लागेल. एकट्या माणसाने कितीही प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी जोपर्यंत इतर लोक त्या प्रयत्नांना प्रतिसाद देत नाहीत तोपर्यंत त्या प्रयत्नांना भांडवलाचे स्वरूप येऊ शकत नाही.
एकदा अधिकाधिक लोकांचे एकमेकांना वाढत्या उपभोगाचा लाभ देण्यासाठी केलेले अधिकाधिक उत्पादन आणि त्यासाठी वुद्धिपूर्वक केलेले सामूहिक प्रयत्न हेच भांडवल असे आपण मानू लागलो की भांडवलाच्या वाढीसाठी शोषणाची गरज राहत नाही. आणि शोषणाची गरज एकदा आपण नाहीशी केली की विषमतेचा पायाच ढासळतो. समतेच्या आधारावर उत्पादनवाढ करता येते असे सिद्ध होते.
भांडवलाची उपर्युक्त व्याख्या जर आपण सर्वांनी स्वीकारली तर हे जग बदलण्याचा प्रश्न चुटकीसरशी सुटेल असे आमच्या अल्पमतीला वाटते.

जिज्ञासा
हिरण्मय पात्र कशास म्हणावे?
आजचा सुधारक – जानेवारी ९९ या अंकात –
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् तत् त्वं
पूषन् अपावृणु, सत्यधर्माय दृष्टये ।।
(सुवर्णमय पात्राने सत्याचे मुख झाकलेले आहे. हे विश्वपोषक प्रभो, माझ्या दर्शनासाठी ते तू उघडे कर) – ईशावास्योपनिपदातील या वचनाच्या अनुषंगाने हेमलेखा यांनी ‘सुवर्णमय पात्र’ म्हणजे नक्की काय? ‘सत्य’ म्हणजे काय? या प्रश्नासंबंधीची जिज्ञासा व्यक्त केली आहे. या वचनाचा त्यांना जाणवलेला एक अर्थ त्यांनी नमूद केला. “आपल्या बुद्धीवरील पूर्वसंस्कारांचा पडदा म्हणजे सुवर्णमय पात्र असेल का?… हा संस्कारांचा पडदा दूर सारून आपले मन/बुद्धी आरशासारखे स्वच्छ ठेवता आले पाहिजे. तरच सत्य दर्शन होऊ शकेल.” हा अर्थ लैकिक पातळीवर तार्किक दृष्टीने पटणारा आहे. पण तो पुरेसा समाधानकारक न वाटल्याने त्यांनी जिज्ञासापूर्तीचे आवाहन केले आहे.
साहित्यातील शब्दांना विज्ञानविषयातील शब्दांप्रमाणे निश्चित काटेकोर अर्थ वहुधा नसतात. शब्दशक्तीच्या लपेटीनुसार ते वदलतात. साहित्यातील शब्दांची अर्थशक्ती असीम असते. ही अर्थवहुलता म्हणजे या शब्दांचे वैभव असते. शब्द डोळ्यांना दिसतो पण त्याचा अर्थमात्र मनाला जाणवतो. शब्द आणि अर्थ यांकरता ज्ञानदेवांनी सूर्यविंब व सूर्यप्रकाश अशी उपमाने उपयोजिली आहेत. त्यांद्वारा शब्दाची सर्वव्यापी अर्थवत्ता प्रकाशित केली आहे.
“जैसे विंब तरी बचके एवढे।
परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें।
शब्दाची व्याप्ति तेणें पाडें।
अनुभवावी ।” (ज्ञानेश्वरी ४.२१५)
वाड्मयीन शब्दसूर्याचा अर्थप्रकाश वाचकांच्या मनातल्या अंधा-या कान्याकोप-यांना केव्हा अन् कसा उजळून टाकील ते सांगता येत नाही. व्यक्तिपरत्वे – प्रसंगपरत्वे शब्दाच्या विविध अर्थच्छटा शब्दाच्या व्यंजनाशक्तीमुळे जाणवतात. त्यामुळे कित्येकदा ज्या आशयाच्या अभिव्यक्तीकरता लेखकाची शब्दयोजना असते, त्या आशयाखेरीज अन्य आशयही त्यातून प्रतीत होत राहतो. आणि म्हणूनच साहित्यातील शब्दांचा नेमका अर्थ सांगणे कठीण असते. बालकवींच्या औदुंबर या लहानशा कवितेचे कितीतरी वेगवेगळे अर्थ समीक्षकांनी लावले आहेत.
हिरण्मयेन – – – – या वचनाचा मला जाणवलेला अर्थ सांगण्याचा प्रयत्न करीत आहे :
या वचनात सुवर्णमय ‘पात्र’, सत्याचे मुख’ या प्रतिमा आहेत. त्यामुळे मुळातला अमूर्त आशय मूर्त झाला आहे. डोळे दिपवून टाकणा-या एखाद्या चकचकीत वस्तूने त्यामागील दुसरी वस्तू कशी झाकली जाते ते सगळ्यांना माहीत आहे. या सामान्य अनुभूतीचा आधार घेऊन जो दृष्टीला दिसू शकत नाही असा एक अनुभव येथे दृकुसंवेदनेचा विपय झाला आहे.
सत् म्हणजे असणे. सत्य म्हणजे असणेपणा – अस्तित्व! पण हे जन्मल्यापासून तो मृत्यूपर्यंतचे अस्तित्व नाही. तर त्या विशिष्ट कालिक अस्तित्वामागील शाश्वत अस्तित्व येथे सत्य या शब्दातून सूचित होत आहे.
वैदिक वाङमयात सत् व असत् किंवा सद्वस्तु व असद्वस्तु या संज्ञा वारंवार येतात. सदसद्विवेक हा शब्दही सर्वपरिचित आहे. त्याच आशयाचे सारासारविवेक आणि नीरक्षीरविवेक हे शब्दही रूढ आहेत. असतापासून सत् निवडणे, असारातून सार शोधणे – हा या शब्दांचा सरलार्थ आहे. हंस जसा नीरक्षीरविवेक करतो. पाणी सोडून सारभूत दुग्ध प्राशन करतो त्याप्रमाणे एखादा परमहंस योगी – दृश्य जगातले असार वाजूला सारतो आणि, त्यामागील शाश्वताची आराधना करतो. ते शाश्वत सत्य आपणास साक्षात् दिसावे अशी त्या साधकाची अपेक्षा असते. असताकडून सताकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे आपली वाटचाल असावी अशी तो मनोमन प्रार्थना करीत असतो.
असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मा अमृतं गमय ।”
या परिचित वचनातला आशय आणि हिरण्मयेन — यातला आशय मूळतः एकच असावा असे जाणवते.
आपल्या अवतीभवतीचे सगुण – साकार नामरूपधारी विश्व डोळ्यांना दिसते. परंतु या दृश्य सृष्टीच्या मागे एक शाश्वत सत्तत्त्व आहे. त्या शाश्वताच्या आलंवनामुळेच हा सृष्टीचा गाडा अखंड सुरू आहे. वेदोपनिपदांत या शाश्वत तत्त्वांचे वारंवार स्मरण आहे. “व्रह्म सत्यं जगन्मिथ्या” – या शंकराचार्यांच्या वचनातले सत्य – व्रह्मतत्त्व आणि हिरण्मयेन – • – यातील सत्य एकच आहे. जगाचे आभासमय मिथ्यारूपच आपल्याला आकृष्ट करते. आणि सत्य लपवते. अथर्वशीर्षांतही गणेशाचे हे मूळ सत्य रूप गणेशाच्या लंवोदर – गजमुख – वक्रतुंड या दृश्य रूपाने झाकून टाकले आहे.
आपल्याला प्राणिमात्राचा देह दिसतो. पण तो देह ज्या शक्तीमुळे उभा आहे ते सत्तत्त्व – चैतन्यतत्त्व मात्र देहामुळे झाकले जाते. ते दिसत तर नाहीच. पण जाणवतही नाही. येथे दिसतो तो देह! म्हणून देहसदृश नामरूपधारी दृश्य सृष्टी ही जणू झळझळत्या सुवर्णपात्राप्रमाणे आहे. त्याच्यामागे दडलेले शाश्वत सत्य दिसत नाही. म्हणून हिरण्मयेन – – -, यातील सुवर्णमय पात्र म्हणजे दृश्य सृष्टी आणि सत्य म्हणजे त्या सृप्टीमागील शाश्वत तत्त्व!
विश्वपोपक शक्तीने सुवर्णमय पात्राचे हे झाकण दूर सारावे आणि शाश्वत सत्य दर्शन घडवावे अशी ही प्रार्थना आहे!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.