सत्यदर्शनातील अडथळा

आजचा सुधारक च्या जानेवारी ९९ च्या अंकात सत्यदर्शनातील खरा अडथळा कोणता? ह्या शीर्पकाखाली मी एक जिज्ञासा व्यक्त केली होती. त्या संदर्भात दोन पत्रे आली. पैकी पहिले पत्र श्री. अनन्त महाजन यांचे एप्रिल ९९ च्या अंकात प्रकाशित झाले आहे. त्याचा प्रथम विचार करू . ते म्हणतातः “लेखिकेने आपल्या निवेदनात वापरलेला conditioning हा शब्द जे. कृष्णमूर्ती यांच्या लिखाणात सर्वत्र दिसतो; त्याचा अर्थ मला समजला नाही.” असे म्हणून त्यांनी त्यासंबंधी काही प्रश्न विचारले आहेत. त्यांची उत्तरे मानसशास्त्राच्या जाणकारांनीच द्यावयाला हवीत. याशिवाय “विश्वरूपाचे निरनिराळे आविष्कार म्हणजेच सुवर्णपात्र आहे” असे त्यांनी म्हटले आहे.
Conditioning ह्या शब्दाचा परिचय मला देखील कृष्णमूर्तीच्या साहित्यातूनच झाला आहे. आणि विचारान्ती तो मनाला पटलेला आहे. दैनंदिन जीवनातील अनुभव घेत असताना त्याचा सतत प्रत्यय येत असतो असे मला वाटते. पण हा शब्द कोठून आला हे अर्थातच येथे महत्त्वाचे नाही. त्याचा अर्थ व त्यामागची संकल्पना (concept) हेच महत्त्वाचे आहे. मला समजलेली संकल्पना स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न करते.
माझ्या मते conditioning of mind म्हणजे मनाचा तो गुणविशेष किंवा ती अवस्था की ज्यामुळे मन एकदा घेतलेल्या अनुभवाच्या निष्कर्षांशी (पूर्वग्रहांशी) इतके तद्रूप होऊन जाते की त्याला तशा प्रकारचे दुसरे किंवा त्यानंतर येणारे अनुभव पूर्वी इतक्या खुलेपणाने घेताच येत नाहीत. ही मनाची एक प्रकारची विशिष्ट सवय किंवा जडता (rigidity?) असते. व त्यामुळे नव्याने, नव्या पद्धतीने किंवा स्वतंत्रपणे विचार करण्याची किंवा अनुभव घेण्याची मनाची क्षमता कमी होते. जुन्या अनुभवांच्या निष्कर्षांचे-गुणदोपांचे म्हणजेच पूर्वग्रहांचे जणू एक कठीण कवचच मनावर तयार होते व नव्या अनुभवाचे नवे संकेत त्याला भेदू शकत नाहीत व म्हणून त्या अनुभवाचे नवीनपण मन जाणू शकत नाही. व ते पूर्वीच्या निष्कर्षांना चिकटून बसते. म्हणजेच त्याला यथार्थ सत्यदर्शन होऊ शकत नाही. हिरण्मयेन पात्रेण …. ह्या वचनासंबंधी विचार करीत असताना मला ह्या दोहोंमध्ये साधर्म्य दिसले व म्हणून वरील जिज्ञासा माझ्या मनात निर्माण झाली. आणि ती मी सुधारकमध्ये मांडली. उपनिषद्वचन केवळ निमित्तमात्र झाले. म्हणून कोणाला त्या वचनातील शब्दांचे कोणते अर्थ अभिप्रेत आहेत किंवा त्याकाळी अभिप्रेत होते, हे ह्या ठिकाणी अप्रस्तुत आहे. ही गोष्ट मी माझ्या शेवटच्या परिच्छेदात, आजचा सुधारक जाने. ९९ पृ. ३१८ वर, “उपनिषत्काली त्यांना त्याचा कोणता अर्थ अभिप्रेत होता, याचा विचार न करता आज व्यवहारात वस्तूच्या यथार्थ ज्ञानासाठी पूर्व संस्कारांचा पडदा दूर करणे अत्यावश्यक आहे असे जे मला वाटते, ते तर्कदृष्ट्या बरोवर आहे किंवा काय एवढेच मला हवे आहे.” अशी स्पष्ट पणे मांडली आहे. तथापि ती जर पुरेशी स्पष्ट झाली नसेल तर तो माझ्या लिखाणाचाच दोप आहे हे मला मान्य केले पाहिजे.
दुसरे पत्र डॉ. सुशीला पाटील यांचे. ते सुधारक च्या चालू म्हणजे जून ९९ च्या अंकात इतरत्र प्रकाशित होत आहे. प्रसिद्ध होण्यापूर्वी ते माझ्याकडे पाठविल्याबद्दल मी संपादकांची आभारी आहे.
मी लावलेला अर्थ “लौकिक पातळीवर तार्किक दृष्टीने पटणारा आहे,’ असे त्यांनी सुरुवातीलाच म्हटले आहे व पुढे “साहित्यातील शब्दांना विज्ञानविषयातील शव्दांप्रमाणे निश्चित, काटेकोर अर्थ बहुधा नसतात, साहित्यातील शब्दांची अर्थशक्ती असीम असते व ही अर्थवहुलता म्हणजे ह्या शब्दांचे वैभव असते.” असे म्हणून त्यांनी त्याचा वराच ऊहापोह केला आहे. त्यांच्या ह्या म्हणण्यावद्दल दुमत होण्याचे कारण नाही. पण पुढे त्यांनी वरील वचनांतील शब्दांचा त्यांना जाणवणारा अर्थ “जगाचे आभासमय मिथ्या रूपच आपल्याला आकृष्ट करते आणि सत्य लपविते” तसेच सुवर्णमय पात्र म्हणजे दृश्य सृष्टी आणि सत्य म्हणजे सृष्टीमागील शाश्वत तत्त्व अशा शब्दांत अनेक उदाहरणे देऊन वैदिक वाङमयाच्या आधारे स्पष्ट केला आहे. त्यांचे लिखाण अभ्यासपूर्ण व सुस्पष्ट असून ह्या विषयावरील त्यांचे चिन्तन ओघवत्या भाषेत सहजतेने त्यांनी मांडलेले आहे. तथापि वर सांगितल्याप्रमाणे माझा प्रश्न हा नसून सत्यदर्शनातील खरा अडथळा म्हणजे आपल्या मनाचे झालेले conditioning हा आहे हे माझे म्हणणे तर्कदृष्ट्या बरोबर आहे किंवा नाही हे मला हवे आहे. ही माझी जिज्ञासा आहे. डॉ. सुशीला पाटील ह्यांनी ती यथायोग्य प्रकारे समजून घेऊन त्यांच्या पत्राच्या सुरुवातीला जो उपरिनिर्दिष्ट आभिप्राय दिला आहे, त्यावरून माझ्या मताशी त्या सहमत आहेत असे दिसते.
येथे असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की, त्या वचनाचा अर्थ जर मला नकोच आहे तर मग त्याचा आधार तरी मी कशाला घेतला? हा प्रश्न बरोबर आहे. मला येथे इतकेच सांगावयाचे आहे की आपण विचार करतो ते शब्दांच्या आधारेच करतो. आणि साहजिकच आपल्या परिचयाचे शब्द व प्रतिमा यांचा ते व्यक्त करताना आपण वापर करतो. त्यानुसार मी ही माझी जिज्ञासा व्यक्त करण्यासाठी वरील उपनिषद्वचनाचा आधार घेतला. दुसरे असे की ज्या प्रतिमांविषयी अनेकांना माहिती असते, त्या आधाराला घेऊन त्यावरून नवनवे अर्थ सांगितले तर त्यावर विचार – चर्चा करण्यात अनेकांना भाग घेता येतो व एकदम नवी कल्पना मांडण्यापेक्षा जुन्यांच्या आधारे जर ती मांडली तर समजण्यासही सोपे जाते असे मला वाटते. म्हणून त्या निमित्ताने माझ्या मनात जो नवा अर्थ आला तो बरोबर आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी मी ही जिज्ञासा सुधारक मध्ये मांडली.
माझ्या मनात येणारी आणखीहि एक शंका त्याच प्रतिमांचा उपयोग करून मला येथे मांडावीशी वाटते ती अशी की हिरण्यमय पात्र हाच सत्यदर्शनातील खरा अडथळा आहे काय? तसे असेल तर तो हटविला तर सत्यदर्शन खरेच होईल का? मला वाटते असे म्हणणेच चुकीचे आहे. कारण जे (म्हणजे येथे सत्य) मूर्तरूप नसल्यामुळे मुळातच दृष्टीला अगोचर आहे, ते आपल्या दृष्टीस का पडत नाही?- तर त्यावर दृश्य-दृग्गोचर वस्तूंचे झाकण आहे म्हणून. असे म्हणणे तर्काला धरून होईल का? हे बरोबर वाटते का? मला वाटते ते बरोबर नाही. कारण ते बरोबर असेल तर ज्या दृग्गोचर वस्तू त्याच्या दर्शनात अडथळा निर्माण करतात त्या बाजूला केल्यास सत्यदर्शन व्हावयालाच हवे. पण ते होऊ शकणार नाही कारण सत्य हे मुळातच पंचज्ञानेंद्रियगम्य नाही. म्हणून अदृश्य किंवा अगोचर वस्तूंचे यथार्थ ज्ञान करून घ्यावयाचे असेल तर ते आपल्या पंचज्ञानेंद्रियांव्यतिरिक्त जी ज्ञानेंद्रिये म्हणजे मन आणि बुद्धी आहेत, त्यांच्या मार्फतच होऊ शकेल कारण अगोचर किंवा भावमय असलेल्या वस्तूंचे यथार्थ ज्ञान करून घेण्याचे सामर्थ्य केवळ त्यांच्याच ठिकाणी आहे हे आपणा सर्वांना स्वानुभवाने माहीत आहे. आणि ते जर त्यांच्याकरवी तसे होत नसेल तर हा अडथळा किंवा पडदा सत्य नामक अगोचर अशा ज्ञानविषयावर नसून त्या ज्ञानाचे साधन असलेल्या, त्याचे यथार्थ ज्ञान करून घेण्याची क्षमता असलेल्या, मन नामक ज्ञानेंद्रियावरच म्हणजेच मनश्चक्षूवरच असला पाहिजे हे उघड आहे. आणि मनाचे conditioning म्हणजे पूर्वग्रहदोष हा त्यावरील तो पडदा किंवा ज्ञानग्रहणातील अडथळा आहे असे मला वाटते. ते तर्कदृष्ट्या बरोबर आहे किंवा नाही ही माझी जिज्ञासा अजूनही कायम आहे. मी स्वतः तत्त्वज्ञानाची किंवा मानसशास्त्राची अभ्यासक नाही म्हणून त्या दृष्टीने आजचा सुधारक चे व्यासपीठ मला योग्य वाटल्यामुळे मी तेथे ही जिज्ञासा व्यक्त केली.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.