दि. य. देशपांडे ह्यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ

प्रा. दि. य. देशपांडे यांनी घातलेला प्रचंड वैचारिक गोंधळ व अध्यात्माला ‘गोंधळ’ ठरविण्याच्या अट्टाहासापायी केलेले स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन
प्रा. दि. य. देशपांडे यांनी आ. सु. च्या मे ९९ च्या अंकात लिहिलेला अध्यात्म : एक प्रचंड गोंधळ” हा लेख म्हणजे वैचारिक गोंधळाचा उत्कृष्ट नमुना आहे. हा संपूर्ण लेख अत्यंत तर्कदुष्ट पद्धतीने लिहिलेला असून इतकी तर्कदुष्ट विधाने देशपांड्यांसारखे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक कशी काय लिहू शकतात ही खरोखरच । आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. या लेखात अनेक चुकीच्या विधानांचीही रेलचेल आहे. काही उदाहरणे खाली देत आहे. – .
१. लेखाच्या सुरुवातीला देशपांडे अध्यात्म म्हणजे काय ते सांगतात व म्हणतात की आत्मा या शब्दाचा अर्थ पूर्णपणे metaphysical आहे. परंतु अशरीरी आत्मा कोणी कधी पाहिला नाही असे म्हणून निष्कर्ष काढतात की “आपली आत्म्याविपयीची कल्पना शरीरी मनाची किंवा मनोयुक्त शरीराची आहे.” पण हा निष्कर्ष चूक आहे. ‘पाहिला’ म्हणजे डोळ्यांनी म्हणजे चर्मचक्षुनी असा अर्थ देशपांडे घेतातच कसा? आत्मा हा ज्ञानचक्षूनी पाहावयाचा असतो असे अध्यात्मात सांगितले जाते. याकडे देशपांडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात.
२. सरुवातीलाच देशपांडे लिहितात की “आत्मा. . . . हा सामान्य, दैनंदिन व्यवहारातला शब्द नाही. तो तत्त्वज्ञानातील शब्द आहे. सामान्य माणसे… आत्म्याविपयी कधी आपसात बोलत असतील असे म्हणता येत नाही. पण त्यानंतर म्हणतात की “सामान्यपणे जेव्हा आपण ‘मी’ विषयी बोलतो तेव्हा आपण शरीर आणि आत्मा असा भेद करीत नाही व त्यावरून निष्कर्ष काढतात की “आपली आत्म्याविपयीची कल्पना शरीरी मनाची किंवा मनोयुक्त शरीराची आहे.” इथे दोन आक्षेप घेता येतील.
(अ) इथे ‘सामान्यपणे’ चा संबंध येतोच कुठे? आत्म्यावद्दलचे वोलणे हे दैनंदिन वोली व्यवहारात होत नाही ते तत्त्वज्ञानातच होते असे एकदा म्हटल्यावर देशपांडे आत्म्याविपयी वोलताना उदाहरण मात्र दैनंदिन व्यवहारातले देतात हे कसे? particularity व generality यांची अशी गल्लत का?
(ब) जेव्हा आपण स्वतःबद्दल म्हणजे ‘मी’ बद्दल बोलतो तेव्हा अर्थातच आपण आपल्या शरीर + मन (mind – body complex) बद्दल बोलत असतो. पण त्याचा अर्थ आपली आत्म्याबद्दलची कल्पना शरीरी मनाची किंवा मनोयुक्त शरीराची असते हे कसे? आत्मा हा शरीर व मन या दोहोंपेक्षा (mind – body complex) वेगळा आहे हे तर अध्यात्मात अनेक वेळा अनेक ठिकाणीद्म सांगितले गेले आहे. (देहबुद्धीचा लोप झाल्यावरच आत्मज्ञान होते व विदेही अवस्थेचा अनुभव येतो असे अध्यात्म म्हणते.) आपल्या mind – body complex लाच ‘मी’ समजणे ही देहबुद्धी होय. ती संपूर्णपणे नाहीशी झाल्यावरच जर आत्म्याचे ज्ञान होत असेल, तर आपली आत्म्यावद्दलची कल्पना शरीरी मनाची किंवा मनोयुक्त शरीराची असते असे देशपांडे म्हणू शकतात तरी कसे? खरी गोष्ट अशी आहे की माझा ‘मी’ पणा, माझे अस्तित्व, माझे नाव-गाव, माझ्या ‘मी’ पणाच्या सर्व कल्पना म्हणजे माझ्या mind – body complex ला चिकटवलेली निव्वळ ‘लेवले आहेत. त्यांचा माझ्या आत्म्याशी काहीही संबंध नाही.
३. यानंतर देशपांडे म्हणतात की “आपला सामान्य अनुभव जर असा (म्हणजे वरीलप्रमाणे) असेल तर आत्मा शरीरापासून वेगळा पदार्थ. आहे, आणि मृत्यूनंतर तो अस्तित्वात राहू शकतो असे आपण मानतो हे कसे?” पुन्हा इथे प्रश्न उभा राहतो की असे का नसावे? आपली आत्म्याबद्दलची कल्पना शरीरी मनाची किंवा मनोयुक्त शरीराची असते हे देशपांड्यांचे प्रतिपादन चूक आहे हे आपण वर पाहिले. ते जर चूक आहे, तर त्याचा अर्थ आत्मा शरीरापेक्षा भिन्न व स्वतंत्र आहे हे ओघानेच आले. आणि मग मृत्यूनंतर शरीर नाश पावले तरी आत्मा भिन्न असल्यामुळे शिल्लक राहू शकतो हे निर्विवाद. शिवाय देशपांड्यांच्या वरील विधानात ते दैनंदिन अनुभवाला सामान्य’ हे विशेपण लावतात हे लक्षणीय आहे. दैनंदिन अनुभव जर सामान्य असेल तर दैनंदिन अनुभवापेक्षा वेगळा असा एखादा ‘असामान्य’ अनुभवही असू शकतो हे देशांड्यांना मान्य करणे भाग आहे. अशा ‘असामान्य अनुभवाचा substance किंवा content ‘आत्मा शरीरापेक्षा भिन्न आहे असा असण्याची (निदान) शक्यता असू शकते व ही शक्यता असा असामान्य अनुभव प्रत्यक्ष घेऊन अनुभवणे शक्य आहे ही शक्यताही देशपांड्यांना मान्य करावीच लागेल.
४. यापुढे देशपांडे असे कारण देऊ पाहतात की “याचे कारण आपली स्वतःविपयीची अतीव प्रीती.” देशपांड्यांचे हे विधान तर भयंकरच आहे. (It is a blunder!) मुळातच अध्यात्म हे ‘स्वतःविषयीच्या प्रीती’ चा antithesis आहे असे अध्यात्मात असंख्य वेळा पुन्हापुन्हा निक्षून व ठासून सांगितले गेले आहे. तसेच यापुढे यासंबंधांत देशपांड्यांनी केलेले विवेचनही – “मृत्यूने आपला अंत होतो ही अप्रिय गोष्ट मानायला आपण तयार नसतो …..” वगैरे – हा तर तर्कदुष्टतेचा कळस आहे.
खरे तर अध्यात्माची शिकवण अशी आहे की प्रत्येकाने (म्हणजे प्रत्येक साधकाने) सदैव मृत्यूचा विचार करावा. मृत्यू समोर उभा ठाकला आहे व त्याने आपल्याला फक्त एका केसाने धरून मोकळे सोडले आहे व तो केस तुटला की त्या क्षणीच आपण मृत्यूच्या स्वाधीन होणार अशीच कल्पना सतत मनात ठेवावी. आणि अशी जर अध्यात्माची खरी शिकवण आहे तर तिच्या तुलनेने देशपांड्यांनी केलेली मल्लीनाथी – “आपण कोणत्या तरी स्वरूपात मरणानंतर उरतो या कल्पनेला आपण घट्ट विलगतो, आणि तिच्या समर्थनाकरता वेगवेगळी कारणे शोधतो ….” वगैरे ही भयंकरच म्हणायची नाही तर काय?
५. कर्मसिद्धान्ताच्या संदर्भात देशपांड्यांनी केलेला युक्तिवाद तर अजवच आहे. ते म्हणतात “… पण हे बरोबर नाही, कारण कार्यकारणाच्या नियमात अभिप्रेत असलेले कार्य आणि कर्मसिद्धान्तात अभिप्रेत असलेले फळ या गोष्टी सर्वथा भिन्न आहेत …” वगैरे कमालच झाली. या दोन गोष्टी भिन्न आहेत असे देशपांड्यांना कोणी सांगितले? त्या भिन्न मुळीच नाहीत. देशपांडे पुढे म्हणतात, “पण प्रत्येक घटनेला कारण असते असे प्रतिपादणाच्या नियमाचा चांगल्या-वाइटाशी संबंध नसतो….” वगैरे. पण मग कर्मसिद्धान्ताचा तरी चांगल्या वाइटाशी संबंध कुठे। असतो? देशपांड्यांना कर्मसिद्धान्त कळलेलाच दिसत नाही!
६. देशपांडे पुढे म्हणतात की, “कर्मसिद्धान्त निसर्गाचा किंवा सृष्टीचा नियम आहे असे म्हणायचे असेल तर त्याकरिता जगाचे शासन एखाद्या चेतन शक्तीकडून होते असे मानावे लागेल. पण अशी शक्ती कुठे असेल, आणि तिच्याद्वारा जगाचे शासन चालत असेल असे मानायला कोणतेही कारण नाही …” वगैरे. माझ्या मते कर्मसिद्धान्त हा निर्विवादपणे निसर्गाचा मूलभूत नियम आहे. तसेच जगाचे शासन एखाद्या चेतन शक्तीकडून चालते असे मानण्यात काहीही गैर नाही.
पण इथे खरी गंमत अशी आहे की देशपांड्यांचे वरील विधान कर्मसिद्धान्ताच्या संदर्भात संपूर्णपणे irrelevant आहे. म्हणजे असे की हे विधान खरे मानले काय किंवा खोटे मानले काय, त्या दोन्हीमुळे कर्मसिद्धान्ताला कोणताच वाध येत नाही.
हे कसे त्याचे विवेचन करण्याकरता आपण अध्यात्माचे दोन भाग करू या व त्यांना (अ) हिंदू अध्यात्म व (व) वौद्ध अध्यात्म असे म्हणू या. इथे एक गोष्ट निक्षून सांगायला पाहिजे की प्रत्यक्षात अध्यात्मात असे दोन भाग नसतात व हिंदू अध्यात्म व वौद्ध अध्यात्म यांच्यात मुळीच अंतर्गत परस्परविरोध नाही. परंतु केवळ तात्त्विक विवेचनाकरता (hypothetically) आपण असे दोन भाग कल्पू या.
आता देशपांड्यांचे वरील विधान खोटे मानले तर जगाचे शासन एखाद्या चेतन शक्तीच्या द्वारे होत असते असे मानावे लागेल. हे अर्थातच हिंदु अध्यात्माला (अ) मान्य आहे व त्यात अशा चेतनशक्तीला “शुद्धचैतन्य” किंवा “ईश्वर” असे म्हणतात. इथे कर्मसिद्धान्ताला कोणताच वाध येत नसून कर्मसिद्धान्त पूर्णपणे मान्य केलेला आहे.
उलटपक्षी देशपांड्यांचे वरील विधाने खरे मानले तर असा कुणी ईश्वर नाही असे मानावे लागेल. परंतु येथे देखील कर्मसिद्धान्त खोटा ठरतो असे नव्हे, कारण इथेही कर्मसिद्धान्तातला कार्य-कारण संबंध अवाधित राहून वौद्धअध्यात्म (ब) लागू पडते. यामुळे ईश्वराचे अस्तित्व नच मानले तरी कर्मसिद्धान्त अवधित राहतो.
आता इथे असा प्रश्न विचारता येऊ शकेल की जर वौद्ध अध्यात्मात ईश्वर नाही तर कर्मसिद्धान्ताचे implementation कोणत्या agency मार्फत होते? तर याचे उत्तर अगदी सरळ साधे आहे. ते असे की हे काम आपण स्वतःच करीत असतो. आपण केलेल्या प्रत्येक कृतीचे वा विचाराचे प्रतिबिंव आपल्याच अंतर्मनावर (subconscious mind) पडत असते. अनेक जन्मांमध्ये पडलेल्या अशा असंख्य प्रतिविंवांचा महाप्रचंड साठा आपण सर्वचजण सदैव आपल्याबरोबर वागवीत असतो. आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण आपण हे ओझे घेऊनच जगत असतो. या प्रचंड database मध्ये असलेल्या data ला अनुसरूनच आपले प्रारब्ध (जन्मावेळचे) व क्रियमाण (जन्मांतर्गत होणारे) असे दोन्ही प्रकारचे नशीब घडत असते. वेळोवेळी आपल्या मनात उफाळून येणा-या भावना या database मधला data अधूनमधून release झाल्यामुळेच येतात.
७. यानंतर देशपांडे वेदान्तावर घसरले आहेत. ते म्हणतात, “स्वतःला श्रेष्ठ मानणाच्या वेदान्ताकडे वळू.” आता वेदान्त खरोखरच श्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे यत शंकाच नाही पण वेदान्त “स्वतंःला श्रेष्ठ मानतो” असे देशपांड्यांना कुणी सांगितले? ते पुढे म्हणतात “…. ब्रह्म हा शुद्ध ज्ञानमय, आनंदमय असा पदार्थ आहे….” वगैरे. कमालच आहे. व्रह्म हा ‘पदार्थ’ आहे असे देशपांड्यांना कोणी सांगितले?
आता इथे खरा formalization चा प्रश्न येतो. व्रह्म हा ‘पदार्थ’ नसल्याने त्याचे formal representation करता येत नाही. त्यामुळेच व्रह्म या संकल्पनेवद्दल वोलताना formal logic चे कोणतेही नियम लागू करता येत नाहीत. परंतु देशपांड्यांना याचे काय? ते आपले खुशाल formal logic वर आधारित असलेले युक्तिवाद करून चुकीचे निष्कर्ष काढताहेत. यासंबंधी मी पूर्वी लिहिलेल्या पत्रांत हात दुखण्याचे उदाहरण देऊन formalization बद्दल प्रश्न उपस्थित केला होता. पण देशपांड्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. फक्त “तुम्ही काय म्हणता ते समजले नाही, सोदाहरण स्पष्ट करा” एवढेच त्यांनी लिहिले.
वास्तविक मी विचारलेला प्रश्न काही फार मोठा गहन होता असे नाही. अमेरिकेतल्या सर्वच विद्यापीठांत, प्राध्यापक सोडाच, पण तत्त्वज्ञानाचे विद्यार्थीदेखील या प्रश्नाची भरपूर चर्चा करीत असतात. देशपांड्यांना प्रश्नच कळला नाही म्हणतात म्हणजे त्यांचे लॉजिकचे ज्ञान फारच कच्चे आहे असे म्हणावे लागेल. बी. ए. च्या परीक्षेकरता लावलेल्या लॉजिकच्या टेक्स्टबुकांपलिकडे त्यांचे वाचन गेलेले दिसत नाही. तसेच त्यांचे तत्त्वज्ञानाचे ज्ञानही १९५०-५५ सालापर्यंत जे तत्त्वज्ञान प्रचलित होते त्यापेक्षा फारसे पुढे गेलेले दिसत नाही. नाहीतर त्यांनी ज्या प्रकारचे युक्तिवाद या लेखात केले आहेत तसे केले नसते.
युक्तिवाद अनेक प्रकारचे असू शकतात. प्रत्येक युक्तिवादाला आधारभूत असे पायाभूत असे, लॉजिक असते. लॉजिक बदलले की युक्तिवादाचे स्वरूप बदलते व युक्तिवादातून काढलेले निष्कर्षही वदलू शकतात. याकरिता जे काही विवेचन करावयाचे आहे त्याकरिता कुठल्या प्रकारच्या लॉजिकवर आधारलेला युक्तिवाद योग्य ठरेल ते प्रथम तपासून पाहावे लागते. हे तपासले नाही व खुशाल वाटेल त्या प्रकारच्या युक्तिवाद करीत सुटले तर चुकीचे निष्कर्ष निघू शकतात. म्हणून युक्तिवादाकरता पायाभूत logical model प्रथम verify करावे लागते. देशपांड्यांच्या लेखांत त्यांनी जे विवेचन केले आहे ते सर्व सकृद्दर्शनी तरी – ठराविक quantifiers वापरून वनविलेल्या propositional logic वर आधारलेल्या युक्तिवादासारखे दिसते. परंतु propositional logic हे तर फारच प्राथमिक स्वरूपाचे (elementary) असे लॉजिक आहे. व प्रश्न असा निर्माण होतो की ब्रह्म, जीवात्मा वगैरेसारख्या अत्यंत गहन (complex) अशा संकल्पनांचे विवेचन करण्याकरता इतक्या प्राथमिक स्वरूपाच्या logical model वर आधारलेला युक्तिवाद appropriate आहे किंवा नाही.
याला माझे स्पष्ट उत्तर ‘नाही’ असे आहे. त्यामुळे देशपांड्यांच्या या लेखात त्यांनी केलेले सर्व युक्तिवाद व सर्वच विवेचन माझ्या मते पूर्णपणे गैरलागू (inappropriate) ठरते. हा प्रश्न खरे तर अत्यंत महत्वाचा आहे. कारण उदाहरणार्थ असे म्हणता येईल की जर देशपांड्यांनी इथे modal logic च्या model वर आधारलेला युक्तिवाद वापरला असता तर तो संपूर्ण युक्तिवाद वेगळाच झाला असता व त्यामधून काढलेले निष्कर्पदेखील देशपांड्यांच्या लेखांतल्या निष्कर्षांपेक्षा पूर्णपणे वेगळे झाले असते.
तेव्हा व्रह्म, जीवात्मा वगैरेसंबंधीचे विवेचन करण्याकरता propositional logic च्या logical model वर आधारलेला युक्तिवाद करणे ही मुळातच एक घोडचूक आहे. पण ही घोडचूक देशपांड्यांच्या लक्षातच आलेली नाही कारण त्यांना यातले काहीही कळलेलेच दिसत नाहीये. युक्तिवाद अनेक प्रकारचे असतात व वेगवेगळ्या logical models वर आधारलेले युक्तिवाद वेगवेगळे असू शकतात हे तरी देशपांड्यांना माहीत आहे की नाही कुणास ठाऊक. वास्तविक अमेरिकेतल्या कुठल्याही विद्यापीठांत मास्टर्स डिग्रीचा अभ्यास करणान्या विद्यार्थ्यांना या गोष्टी माहीत असतात. पण भारतातील विद्वान प्राध्यापकांना जर हे समजले नसेल तर आश्चर्यच आहे.
दुसरा प्रश्न असा की “…. जीवात्म्याचे अस्तित्व सिद्ध होऊ शकत नाही. … तो मुक्त होऊ शकत नाही” वगैरे सर्व युक्तिवाद देशपांडे deductive logic चा वापर करून करतात. परंतु प्रश्न असा आहे की जीवात्मा व ब्रह्म हे ‘पदार्थ’ नसल्याने व त्यांचे formalization ही करता येत नसल्याने त्यांच्यासंबधीच्या विवेचनाला deductive logic चे नियम लागू पडतात का? याचे स्पष्ट उत्तर ‘नाही’ असे आहे. पण देशपांड्यांना त्याचे काय?
तिसरी अडचण अशी की formal logic च्या नियमांचा उपयोग करून जे सिद्ध करता येते ते सत्यच फक्त खरे अशी जी देशपांड्यांची धारणा आहे तीच मुळात चुकीची आहे. जगामध्ये अशा असंख्य गोष्टी असतात की ज्या formally सिद्ध करता येत नाहीत. पण म्हणून त्या खोट्या असतात असे नव्हे. formally provable truth हेच फक्त खरे, वाकी सर्व खोटे, या भूमिकेला logical positivism असे म्हणतात. परंतु आजमितीस निदान पाश्चात्त्य जगतात तरी logical positivism सोडून देण्यात आलेला आहे. त्यामध्ये असलेल्या अनेक त्रुटि लोकांच्या लक्षात आल्या त्याला देखील अनेक दशके लोटली. (तरीपण हे ज्ञान अजून नागपूरपर्यंत कसे नाही पोचले बरे?) अमेरिकेतल्या कुठल्याही विद्यापीठातला कुठलाही तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक
आज स्वतःला logical positivist म्हणवून घ्यायला तयार नसतो.
सारांश, सत्ये अनेक असतात. त्यातली काही सत्ये formal logic चा उपयोग करून सिद्ध करता येतात, तर काही करता येत नाहीत इतकेच. परंतु जी सत्ये अशा त-हेने सिद्ध केली जाऊ शकत नाहीत ती देखील ‘सत्ये’च असतात व ती खरी असू शकतात, खोटी असतात असे नाही. अशा सत्यांमध्ये व्याघातही असू शकतो. म्हणजेच दोन unformalizable सत्ये संपूर्णपणे परस्परविरोधी असली तरीसुद्धा एकसमयावच्छेदेकरून खरी असू शकतात. जरा गंमतीचे उदाहरण द्यायचे झाले तर असे म्हणता येईल की ‘प्रेम’ या संकल्पनेचे formalization करता येत नाही. त्यामुळे जेव्हा एखादा नवरा बायकोला म्हणतो की “माझे तुझ्यावर प्रेम आहे,” तेव्हा तो नवरा एकाचवेळी खरे वोलत असणे व खोटेही बोलत असणे हे दोन्ही शक्य आहे. म्हणजेच ‘खरे’ व ‘खोटे’ अशा दोन्ही अवस्था (states) एकाचवेळी, एकाच ठिकाणी अस्तित्वात असू शकतात.
आता हे वाचून देशपांडे म्हणतील की हे कसे शक्य आहे? पण हे जाणून घेण्याकरता त्यांना post-modermism व decoustruction इत्यादि तत्त्वज्ञानामधील नव्या क्षेत्रांच्या अभ्यास करावा लागेल. .
८. यापुढे देशपांडे वेदान्तातील ‘मिथ्या’ या संकल्पनेचा ऊहापेह करतात. पण तिथेही हीच अडचण आहे. देशपांडे लिहितात की, “आपण सामान्यपणे समजतो की जे सत् नाही ते असत् आणि जे असत् नाही ते सत्; त्यामुळे जे सतही नाही आणि असत्ही नाही असे काहीही असू शकत नाही. पण वेदान्ताचे प्रतिपादन असे आहे की ते शक्य आहे. त्याकरिता वेदान्ताला भाषेशी दांडगाई करावी लागते.” वगैरे. पण देशपांड्यांचे हे विधान म्हणजे पुन्हा निव्वळ logical positivism झाला, जो आज फारसा मानला जात नाही. अत्याधुनिक तत्त्वज्ञानानुसार सत्ही नाही व असतही नाही अशा गोष्टी खरोखरच असू शकतात व त्यामुळे वेदान्ताचेच प्रतिपादन वरोवर आहे व देशपांड्यांचा आक्षेप चूक आहे. तसेच “वेदान्ताला भाषेशी दांडगाई करावी लागते” हा देशपांड्याचा आरोपही निराधार व चुकीचा आहे. देशपांडे म्हणतात की “मिथ्यात्वाची व्याख्या करण्याकरता वेदान्ताला ‘सत्’ आणि ‘असत्’ या शब्दांना त्यांच्या रूढ अर्थाहून भिन्न अर्थ द्यावे लागले. इथे प्रश्न असा की ‘रूढ’ अर्थ म्हणजे नेमके कोणते? जे अर्थ देशपांड्यांच्या मनात आहेत तेच अर्थ रूढ कशावरून?
मला इथे सुचवावेसे वाटते की ‘सत्’ व ‘असत्’ या शब्दांचे देशपांड्यांच्या मते जे रूढ अर्थ आहेत त्यांवर त्यांनी एक निबंध लिहावा व तो आ. सु. मध्ये न छापता तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांतल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एखाद्या जर्नलकडे पाढवावा. म्हणजे या शब्दांचे त्यांना अभिप्रेत असलेले अर्थ हेच खरे ‘रूढ’ अर्थ आहेत की नाहीत ते त्यांना कळू शकेल.
९. सरतेशेवटी देशपांडे म्हणतात की “अध्यात्म हा एक प्रचंड गोंधळ आहे, ती एक परीकथा आहे.” खरेतर गोंधळ देशपांड्यांच्याच मनात आहे. इतरांच्या असेल असे नव्हे. ज्यांना अध्यात्म कळलेच नाही त्यांना तो गोंधळच वाटणार! पण अध्यात्माला परीकथा म्हणायला मात्र माझी मुळीच हरकत नाही. परीकथा ही फारच उच्च दर्जाची चीज आहे. आपले आयुष्य म्हणजे सुद्धा एक परीकथाच नसते का? आणि प्रत्येक परीकथा आनंद-पर्यवसायीच असली पाहिजे असा तरी कुठे नियम आहे? नीतीच्या क्षेत्रातल्या एखाद्या उत्कृष्ट पुस्तकाचे नाव सांगा असे मला कुणी विचारले तर मी म्हणेन ‘इसापनीती’ आणि लॉजिकच्या क्षेत्रातले जगाच्या इतिहासात आजवर लिहिले गेलेले सर्वोत्कृष्ट पुस्तक कोणते असे विचारले तर लॉजिकचा प्रोफेसर या नात्याने मी ग्वाही देईन की असे पुस्तक म्हणजे Alice in wonderland!
ही दोन्ही पुस्तके म्हणजे परीकथाच आहेत. परंतु निदान पाश्चात्त्य जगात तरी सर्वत्र त्यांचा आदर केला जातो. यांत धार्मिक माणसे अर्थात आलीच, पण देव-धर्म न मानणारे अधार्मिक व नास्तिक लोकही आहेत. या allegories वर श्रद्धा ठेवायची की नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण त्या निरर्थक आहेत, त्या केवळ अर्थशून्य वडवड आहेत असे कुणीही म्हणत नाही.
१०. आता इथे थोडेसे विषयांतर करून देशपांड्यांच्या एकंदर भूमिकेबद्दल व त्यांच्या एकंदर लेखनावद्दल दोन शब्द लिहिणे अवाजवी होणार नाही असे वाटते. ५/६ महिन्यांपूर्वी मी आ. सु. चा आजीव वर्गणीदार झालो तेव्हापासून आतापर्यंत आ. सु. चे चालू घडीचे काही व काही जुने असे डझनभर अंक माझ्या वाचनात आले आहेत. त्यांतील देशपांड्यांचे सर्वच लेखन, विशेपतः विवेकवादावरचे त्यांचे लेख मला अगदीच निकृष्ट दर्जाचे वाटतात. त्यांचे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातले ज्ञान फारच तोकडे व तुटपुंजे आहे हे लक्षात येतं. डेव्हिड ह्युम, कांट , जॉन स्टुअर्ट मिल इत्यादिकांच्या तत्त्वज्ञानापलीकडे त्यांची मजल गेल्याचे दिसत नाही. (कदाचित वी. ए. व एम्. ए. च्या परीक्षांकरता एवढेच शिकवले जात असावे असे पूर्वी लॉजिक बद्दल म्हटले तेच तत्त्वज्ञानाच्या वावतीतही दिसते.) उदाहरणार्थ, ‘विवेकाचे अधिकार या त्यांच्या लेखात त्यांनी ‘दोन राशी जर तिस-या एका राशीवरोवर असतील, तर त्या परस्परांवरोवर असतात’ हे विधान स्वयंसिद्ध आहे असे ओळखणे हा विवेकाचा (reason) अधिकार आहे असे म्हटले. आता इथे देशपांडे विवेकावद्दल बोलत असले तरी मुळात वरील विधान स्वयांसिद्ध नाही हे त्यांच्या लक्षात यायला हरकत नव्हती पण ते त्यांच्या लक्षात आले नाही. गणितातील मूलभूत संकल्पनांचे ज्ञान कसे होते हे ज्यां पियाजे या जगप्रसिद्ध सायकॉलॉजिस्टाने लहान मुलांवर केलेल्या प्रयोगांतून दाखवून दिले आहे व ज्याने ते वाचले आहे असा कोणीही मनुष्य वरील विधान करणार नाही. पण देशपांड्यांना यांतले काहीच माहीत नसावेसे दिसते. तसेच तत्त्वज्ञानामध्ये Continental European तत्त्वज्ञानाचा प्रचंड मोठा विभाग आहे त्यात हेगेल, हुसेर्ल, हायडेगर, ज्यां पॉल सार्व, मेल पाँर्ट वगैरे मोठमोठ्या तत्त्वज्ञांचा समावेश होतो पण देशपांड्यांना त्यांतले काही ठाऊक नाही असे ते स्वतःच कबूल करतात. तसेच १९६० च्या आसपास असलेले तत्त्वज्ञान (जॉर्ज सांतायना, मार्टिन वुवर, पीगेलवर्ग वगैरेंचे), ज्यांत मार्टिन वुवरने अध्यात्मातील काही संकल्पनांचा आधुनिक पद्धतीने विचार करून त्याचे सुप्रसिद्ध I-THOU चे तत्वज्ञान मांडले, तसेच १९७० च्या सुमारास प्रचलित झालेले तत्त्वज्ञान (पॉल रिकर, डेरिडा वगैरेंचे), यांपैकी कशाचाही देशपांड्यांना पत्तासुद्धा लागलेला दिसत नाही. तरीसुद्धा हे तत्त्वज्ञानाच्या नावाखाली अध्यात्माला ‘गोंधळ’ म्हणायला तयार. यांना तत्त्वज्ञानातले काय कळते? असाच प्रश्न खरे तर विचारायला पाहिजे.
वरील प्रकारच्या तत्त्वज्ञानाशी जवळीक असलेला gestalt psychology नावाचाही एक प्रांत आहे हे देशपांड्यांना ठाऊक आहे का? Gestalt या संकल्पनेचा दूरान्वयाने का होईना, अध्यात्माशी संबंध पोचतो याची त्यांना कल्पना आहे का? The whole is bigger than the sum of its parts. असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा अध्यात्माच्या संदर्भात देशपांड्यांनी जे युक्तिवाद वापरले तसेच युक्तिवाद वापरून ते हे विधान सिद्ध करू शकतील का? आणि सिद्ध करू शकले नाहीत तर हे विधान खोटे आहे असे म्हणायचे का? ते गोंधळ, परीकथा आहे अशी हेटाळणी करायची का?
११. शेवटी राहता राहिला प्रश्न प्रयोजनाचा. देशपांड्यांना असा लेख लिहिण्याचे प्रयोजनच काय? भारतातील समाजापुढे उभे असलेले खरे प्रश्न अध्यात्माचे नसून आर्थिक आहेत. त्यावद्दल व समाजप्रबोधनाविषयी काही लिहिण्याऐवजी ते अध्यात्मावर झोड कशाला उठवतात? की अध्यात्माला नावे ठेवून समाजप्रबोधन होते अशी त्यांची कल्पना आहे? अंधश्रद्धानिर्मूलन व्हायला पाहिजे हे खरे, धर्मवेडेपणाला (तो हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्युइश, कुठल्याही प्रकारचा fundamentalism असो) विरोध व्हायला पाहिजे हे खरे, पण त्याकरिता संपूर्ण अध्यात्माचे क्षेत्रच खोटे आहे असे म्हणायची गरज आहे का? की अध्यात्मावावत आदर बाळगणारे सर्वच लोक धर्मवेड आहेत असे देशपांड्यांना म्हणायचे आहे?
ते काहीही असो. पण निखळ सत्य पुष्कळदा परीकथेच्या द्वारेच सांगितले जाते हे व्यावहारिक सत्य फिलॉसॉफीचे प्रोफेसर असलेल्या देशपांड्यांना अजूनपर्यंत कसे ‘भावले’ नाही याचे मात्र मला राहून राहून आश्चर्य वाटते.
* * * * * * * * * * *
प्रा. देशपांड्यांचे अज्ञान उघडकीला आणणे आवश्यक
प्रा. देशपांडे यांच्या अध्यात्म : प्रचंड गोंधळ’ या लेखावर प्रतिवाद म्हणून मी लिहिलेला लेख peer review करता अमेरिकेतील काही मराठी मित्रांना दाखवला होता. तेव्हा एक अभिप्राय असा आला की माझ्या लेखातील analysis उत्तम आहे पण ‘देशपांड्यांना कळले नाही, त्यांचे लिखाण निकृष्ट दर्जाचे आहे’ वगैरे वैयक्तिक स्वरूपाचे remarks नसावेत. आ. सु. च्या वाचकांनाही कदाचित असे वाटण्याची शक्यता आहे म्हणून खालील स्पष्टीकरण देत आहे.
तात्त्विक लेखनामध्ये वैयक्तिक स्वरूपाचे remarks :नसावेत हे म्हणणे अगदी बरोबर आहे व त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. तत्त्वज्ञानविषयक लेखन मी पुष्कळ करतो व माझे निवंध तत्त्वज्ञानावरच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नलांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत तेव्हा तात्त्विक लेखन कसे करावे हे मला नक्कीच चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. परंतु – (१) वरील लेख आ. सु. करता लिहिला आहे व आ. सु. मध्ये वैयक्तिक स्वरूपाचे लेख प्रसिद्ध होतात. उदा. प्रा. प्र. व. कुलकर्णी यांच अमेरिकेत आ. सु.’, तसेच प्रा. देशपांडे यांची ‘आता माझे मत वदलले आहे’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली टीप याखेरीज इतरही वैयक्तिक स्वरूपाचे लेखन दाखवता येईल.
(२) मुख्य मुद्दा असा की प्रा. देशपांडे सातत्याने त्यांच्या चुकीच्या तत्त्वज्ञानावर आधारलेले लेख लिहून आ. सु. मध्ये प्रसिद्ध करीत आहेत व त्यामुळे वाचकांच्या हातांत सातत्याने (जवळजवळ दरमहा) असे दिशाभूल करणारे लेखन पडत आहे. ही प्रक्रिया कुठेतरी थांववायला हवी. खरे तर देशपांड्यांचे सर्वच लेख घेऊन एकेका लेखाची चीरफाड करून प्रत्येकी एक नवा लेख लिहायला हवा. पण हे काम फारच कंटाळवाणे व वेळखाऊ आहे व त्याकरता वेळ व शक्ती खर्च करावी का हाही विवाद्य प्रश्न आहे. म्हणून ही प्रक्रिया थांबवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे देशपांड्यांचे अज्ञान उघड करणे. हाच होय व हेच करण्याचा प्रयत्न मी वरील लेखात केला आहे.
वरील लेख लिहून झाल्यावर मला कळले की देशपांड्यांचे विवेकवादावरचे सर्व लेखन एकत्रितपणे पुस्तकरूपाने ग्रंथालीतर्फे प्रकाशित होणार आहे. तेव्हा आता मी या पुस्तकाची वाट पाहात आहे म्हणजे देशपांड्यांच्या एकंदर भूमिकेचाच मला एकदम समाचार घेता येईल.
देशपांड्यांचे लेखन हे rationalist स्वरूपाचे आहे असे मला सांगण्यात आले आहे. पण मी जेवढे त्यांचे लेखन वाचले त्यावरून मला हे मत अगदीच चुकीचे वाटते. माझ्या मते त्यांची भूमिका rationalism ची नसून nominalism ची आहे. अध्यात्माचे वावडे nominalism ला असते, rationalism ला नाही. खरा rationalism अध्यात्म मान्य करू शकतो. (आणखीही मुद्दे दाखवता येतील पण येथे सर्व देत नाही.)
या सर्व वावतीत आणखी एक पूर्वपीठिका आहे ती मात्र इथे नमूद करतो. देशपांड्यांच्या ‘विवेकाचे अधिकार’ या लेखाच्या संदर्भात माझी प्रा. प्र. व. कुलकर्णी यांच्याशी चर्चा झाली होती. तेव्हा त्यांनी देशपांड्यांचे समर्थन केले. तेव्हा मी तो लेख परीक्षेचा पेपर तपासावा तसा तपासला व अनेक आक्षेप घेऊन लाल शाईने चिताडला व प्रा. कुलकर्णीना दाखवून स्पष्ट सांगितले की असा लेख जर माझ्या एखाद्या विद्यार्थ्याने term paper म्हणून लिहिला तर मी त्याला नापास करीन. परंतु हे सांगत असताना माझा आवाज जरासा चढलेला होता. त्यावरून कुलकर्णीनी सोयीस्कर गैरसमज करून घेतला की मी रागावलो आहे व म्हणून असे वोलत आहे. माझ्या आक्षेपांना उत्तरे देण्याचे त्यांनी सोयीस्करपणे टाळले. या गोष्टीला चार महिने होऊन गेले तरीही माझे सर्व आक्षेप अद्याप अनुत्तरितच राहिले आहेत.
देशपांड्यांचे चुकीच्या तत्त्वज्ञानावर आधारलेले लेख मात्र अविरोधपणे आ. सु. मध्ये प्रकाशित होत आहेत व वाचकांच्या हातांत पडत आहेत. तेव्हा आता देशपांड्यांचे अज्ञान उघडकीला आणण्यावाचून मला गत्यंतर उरलेले नाही.
आ. सु. हे मासिक मला नास्तिकवादातील एका विशिष्ट भूमिकेचा प्रसार करण्याच्या हेतूने प्रेरित झालेले दिसते. निदान मला तरी ते शुद्ध वैचारिक असे मुक्त व्यासपीठ वाटत नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.