चर्चा

भांडवलाचे वास्तव स्वरूप
(आजचा सुधारक – जून १९९९)
– श्री. वि. खांदेवाले
आपण वरील स्फुटात भांडवलाची नवी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. त्यासंबंधी माझी प्रतिक्रिया नोंदवीत आहे. ज्या ओघात आपण विचार मांडले त्यांना क्रमांक देऊन टिप्पणी करीत आहे.
१. उत्पादनासाठी भांडवल, श्रम, भूमी आणि कच्चा माल लागतो असे आपण म्हटले. परंतु कच्चा माल हा कृषि-उत्पादनांच्या (अन्नधान्ये, तेलविया, ज्यूट, ऊस, कापूस इत्यादी आणि खनिज पदार्थ, जंगलांपासून मिळणारी उत्पादने इत्यादींच्या) स्वरूपात निसर्गापासून (मूलतः) विनामूल्य मिळतो म्हणून त्याचा समावेश भूमी ह्या घटकात केला जातो. त्यामुळे भूमी व कच्चा माल हे आपण समजता त्याप्रमाणे वेगळे घटक मानले जात नाहीत.
२. भांडवल ह्या घटकाचे उत्पादनप्रक्रियेतील स्वरूप मुळात शोषणाचे मानलेले नव्हते. तो उत्पादनप्रक्रिया सिद्ध करण्यासाठी आवश्यक घटक आहे असे मानले गेले होते. उत्पादनक्रियेला लागणारा कच्चा माल खरेदी करणे, यंत्रे-औजारे उपकरणे खरेदी करणे व पक्क्या मालाची किंमत हाती पडेपर्यंत श्रमिकांना त्यांच्या . जीवनोपयोगी वस्तू किंवा त्या वस्तू खरेदी करण्याइतका पैसा आगाऊ (advance) देणे ही भांडवलाची कार्ये समजली जात होती. औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या (इ.स. १७५० च्या पूर्वीच्या) काळात उत्पादनाची प्रक्रिया संथ व नित्यक्रमाने (routinely) वालणारी असल्यामुळे जरी भांडवलाच्या उपयोगातून वरकड अतिरिक्त मूल्य (surplus value) निर्माण होते, त्यातून नफा निर्माण होत होता व हे वरकड मूल्य काही अंशी लोकांचे शोषण करीत होते तरी शोपणाचा अंश कमी होता व पूर्ण अर्थव्यवस्था शोपणप्रधान झालेली नव्हती.
इ.स. १७५० नंतर (औद्योगिक क्रांती सुरू झाल्यापासून) यंत्रांचा उपयोग उत्पादनाच्या सर्वच क्षेत्रांत सुरू झाला. सातत्याने यंत्रांचे आकार व वेग वाढत गेले. ब्रिटनमधील यंत्रांपासूनचे उत्पादन इतर देशांतील हातांनी केलेल्या उत्पादनांपेक्षा दिसण्यात, रूप-रचनेमध्ये (design), टिकाऊपणात अधिक चांगले वाटत असल्यामुळे (व काही प्रमाणात इतर देशांतील हस्तोत्पादन नष्ट केले गेल्यामुळे) यांत्रिकी उत्पादनाला जगभरातून मागणी होती व पुरवठा करणारे व्रिटन हे सुरुवातीला एकमेव राष्ट्र होते. त्यामुळे ब्रिटनच्या उत्पादकांचे काम तुलनेने सोपे होते. ते असे की मागणी भरपूर आहे, करिता पैसा गोळा करा, यंत्रे मोठ्या प्रणाणावर विकत घेऊन कारखाने उभारा, त्यांच्या जोडीला आवश्यक तेवढे श्रमिक लावा, (श्रमिकांच्या संरक्षणाचे कायदे नसल्यामुळे) वाटेल तेवढा वेळ काम करून घ्या, शक्य तेवढी कमी मजुरी द्या आणि आपला नफा वाढवून घ्या. ह्या प्रक्रियेत मजूर ब्रिटनच्या ग्रामीण क्षेत्रातून आणला जात होता, कच्चा माल ब्रिटनमधून किंवा इतर देशांमधूनही आणला जात होता परंतु कारखाने उभारण्यासाठी
आवश्यक असलेले पैशाच्या रूपाने भांडवल हे भागभांडवलाच्या स्वरूपात इंग्लंडमध्येच उभारणे शक्य होते. त्यामुळे भांडवल-संचयाची प्रक्रिया प्रचंड प्रमाणावर सुरू झाली. त्या प्रक्रियेत ढिलाई पडली तर सगळ्या जगातून संकलित केला जाणारा नफा कमी होईल म्हणून भांडवल-संचयाच्या प्रक्रियेने ब्रिटिश समाजाच्या मानसिकतेला झपाटून टाकले. वाढत्या नफारूपी उत्पन्नाची शक्यता ही वास्तविक परिस्थितीत दिसून येत असल्यामुळे भांडवलाचे शोषक स्वरूप अधिक स्पष्टपणे समाजापुढे आले. मार्क्सच्या मांडणीत त्याचे विदारक स्वरूप स्वच्छपणे दिसून येते.
३. आपण म्हटले आहे की “आजवरच्या भांडवलाच्या व्याख्या खाजगी मालकी गृहीत धरून केल्या आहेत असे जाणवते. सर्व संपत्तीची मालकी सार्वजनिक झाल्यावर भांडवलाचे स्वरूप कोणते राहील त्याचा विचार त्यांत दिसत नाही.”
हे म्हणणे अगदी खरे आहे. पण आपल्या ह्या दोन वाक्यांमध्ये कल्पनेची आजपर्यंत प्रत्यक्षात उतरू न शकलेली झेप आहे हे नमूद करावे लागेल. सर्व संपत्तीची मालकी सार्वजनिक करण्यासाठीच फ्रेंच राज्यक्रांती झाली व ती रक्तात बुडविली गेली. सोव्हियत क्रांती त्याच उद्देशाने झाली व काही अंशी स्वतःच्या चुकांमुळे व १९ ऑक्टोवर १९९८ रोजी वी.वी.सी. दूरचित्रवाणीवर Rivals for Paradise (म्हणजे ‘स्वर्ग आणून देणारे स्पर्धक’) ह्या कार्यक्रमात दाखविल्याप्रमाणे वयाच अंशी पोप व अमेरिकेचे अध्यक्ष रेगन (एक धर्माचे प्रवक्ते तर दुसरे भांडवलशाहीचे आक्रमक प्रतिनिधी) ह्यांनी संयुक्तपणे कार्यवाही करून तोडली. त्यामुळे भांडवलाची सार्वजनिक मालकी निर्माण होण्याचा एक प्रयोग संपला.
आता साम्यवादाचे आव्हान संपले आहे असे मानून भांडवलशाही जागतिक अधिकोप, आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी व इतर वित्तीय संस्थांच्या द्वारा आर्थिक मदत देताना देशी व विदेशी भांडवलाच्या खाजगी मालकीचे तत्त्व मान्य करा अशी प्रमुख अट टाकते. त्यामुळे सध्याच्या भांडवलशाही व्यवस्थेचा पाडाव झाल्याशिवाय आपल्या कल्पनेतील भांडवलाची सार्वजनिक मालकी निर्माण होणे अशक्य आहे.
४. सर्व पैसा सार्वजनिक मालकीचा झाला म्हणजे पैशाचे प्रयोजनच संपते असे जे आपण म्हटले आहे ते अंशतःच खरे आहे. कारण जो सतत संघर्ष चालू असतो तो सार्वजनिक संपत्ती वाढविण्याचा व त्यातून प्रत्येकाने स्वतःच्या मालकीसाठी तिचा अधिक हिस्सा ओढून घेण्याचा म्हणून किंमत घटण्या-वाढण्याचा प्रश्न थोडा वाजूला ठेवला तर प्रमुख प्रश्न निर्माण होणा-या संपत्तीच्या वाटपाचा आहे. बुद्ध, मार्क्स, गांधी व इतर विचारवंतसुद्धा विचारप्रक्रियेत शेवटी खाजगी मालकी व लालसा (greed) ह्याच मुद्द्यावर येऊन पोचतात व त्यावर उपाय सांगण्याचा प्रयत्न करतात. आपण मात्र उपाय न सांगता सरळ पुढच्या स्थितीकडे जाऊ पाहता.
५. स्थिर आणि अस्थिर भांडवल हे जे वर्गीकरण आहे ते प्रामुख्याने उत्पादनाचा खर्च मोजावा कसा, तो अल्प व दीर्घकाळात प्रत्येक उत्पादित नगावर किती व कसा लावावा आणि त्या उत्पादनखर्चानुसार किंमत किती आकारावी, यासाठी आहे. यंत्रे जरी बदलली जातात तरी उत्पादनाच्या प्रक्रियेत प्रत्येक तासाला प्रत्येक यंत्र बदलले जात नाही. उपयोगात असलेल्या यंत्राचे तांत्रिक आयुष्य संपल्यानंतर किंवा नवे यंत्र एकदमच श्रेष्ठ असेल तरच जुने यंत्र त्वरेने बदलले जाते. यंत्र, कापूस, तेल, श्रम इत्यादी वस्तूंचा टिकाऊपणा उत्पादनप्रक्रियेच्या संदर्भात जोपर्यंत भिन्न आहे तोपर्यंत गणन (accounting) नीट होण्यासाठी स्थिर व अस्थिर संकल्पना आवश्यक भासतातच. माझ्या मते समाजवादी साम्यवादी पद्धतीत व भांडवलावर सार्वजनिक मालकी प्रस्थापित करण्याच्या आड स्थिर-अस्थिर हे वर्गीकरण येत नाही.
६. आपण भांडवलाची नवी व्याख्या “अधिकाधिक उत्पादन करण्यासाठी बुद्धिपूर्वक केलेले सामूहिक प्रयत्न” अशी सुचविली आहे. ह्यालाच भांडवल म्हटले म्हणजे भांडवलाच्या वाढीसाठी शोषणाची गरज राहणार नाही असे आपण सुचविले. चर्चेला सुरुवात करण्यासाठी प्रयत्न म्हणून ते ठीक आहे. परंतु भांडवलावरील सध्याच्या खाजगी मालकीच्या काळातही उत्पादन अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रयत्न बुद्धिपूर्वकच असतात आणि कारखाने, विद्यापीठे, सरकारी राष्ट्रीय संशोधन संस्था व त्यांच्या प्रयोगांची आपसात जुळवणी / समायोजन (Networking) करून एका अर्थाने सामूहिकच असतात. फक्त त्या प्रयत्नांची मालकी प्रामुख्याने खाजगी असते. येत्या काळात पेटंटप्रणाली वाढणार असल्याने आपणाला अभिप्रेत असलेले असमायोजित (unco-ordinated) व कोणाची मालकी प्रस्थापित न होऊ देणारे सामूहिक प्रयत्न
होऊ दिले जाणार नाहीत. तसेच होणा-या प्रयत्नांवर पेटंटद्वारा खाजगी मालकी प्रस्थापित करण्याची पद्धती वाढीस लागण्याची अधिक शक्यता आहे.
७. आपण समजता की आपण सुचविलेली भांडवलाची व्याख्या सर्वांनी स्वीकारली तर भांडवलवाढीसाठी शोषणाची गरज राहत नाही, विषमतेचा पाया ढासळतो ….. वगैरे. परंतु सर्वांना अशी व्याख्या स्वीकार्य नसते हीच मेख आहे. त्यातून विविध मान्यतांचे वर्ग तयार होतात. ज्यांना तुमची व्याख्या मान्य नाही ते स्वतःच्या मान्य व्याख्येकरिता (म्हणजे खाजगी मालकी वाढविण्याकरिता) हिंसा करावयास तयार आहेत व करीत आले आहेत. म्हणूनच मार्क्सला भांडवलं हा ग्रंथ लिहून पूर्ण करी- पर्यंत वर्गसंघर्षाद्वारा सशस्त्र क्रांती करूनच भांडवलाच्या खाजगी मालकीचे ओझे शोषितांच्या डोक्यावरून फेकण्याचा मार्ग अनिवार्य म्हणून स्वीकारावा व सांगावा लागला.
८. आपण जग बदलविण्याचा जो चुटकीसरसा मार्ग सांगितला तो मार्क्सच्या रक्तरंजित मार्गाशी निश्चित तुलना करून पाहण्यासारखा आहे. परंतु लाखो लोकांना किमान वेतन दिले जात नाही, त्यांचे भविष्य निर्वाह निधी भरले जात नाहीत, त्यांना मिळणाच्या आरोग्य-शिक्षणाच्या सुविधा स्पर्धेच्या समाजव्यवस्थेच्या नावाखाली कमी केल्या जातात (भारतातच नव्हे तर सर्वच भांडवलशाही देशांत) अशावेळी आपली भांडवलाची नवी व्याख्या अल्पमतीची वाटत नाही पण सुलभमतीची जरूर वाटते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.