विवेकवाद म्हणजेच आप्तवाक्यप्रामाण्यनिषेध?

संपादक, आजचा सुधारक यांस,
मी आपले सर्व अंक पुरेसे काळजीपूर्वक वाचतो. प्रतिक्रियाही निर्माण होतात. त्यांची तपशीलवार मांडणी करण्यापेक्षा काही निष्कर्प फक्त नोदवीत आहे.
१. आपल्या वहुताश लेखकांचा त्यांच्या मनावद्दलचा शागही आत्मावश्वास अजव वाटतो. विश्वातील संपूर्ण व अंतिम सत्य आपणास समजले आहे असा अविर्भाव त्यात मला दिसतो.
२. जुलै ९९ च्या संपादकीयांतील पान १०० परिच्छेद – २ चा शेवट व पान १०१ परिच्छेद १ चा शेवट यांत ‘अन्याय दूर करण्याचा’ व ‘वास्तव बदलण्याचा तुमचा संकल्प हा फारच महत्त्वाकांक्षी वाटतो. आपले ग्राहक / वाचक यांची संख्या २५०० ते ३००० च्या पुढे नसावी. ती पाहता तुमची महत्त्वाकांक्षा वास्तवापासून खूप दूर आहे असे म्हणावेसे वाटते.
३. ‘सर्वच त्या वातावरणाचे कैदी’ जुलै ९९ मुखपृष्ठ या मजकुराचा व आतील मजकुराचा संबंध शोधणे तसे कठीणच. “मग वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी …. प्रत्यायास येते” याचा कदाचित संबंध असू शकेल. आप्तवाक्य पुराव्याशिवाय स्वीकारावयाचे नाही हा आपला निर्धार असावा असे वाटते. मुखपृष्ठावर नेहमीच अशी वाक्ये । मजकूर असतो. याचा अर्थ ती तुम्हास पूर्ण मान्य असतात असा घ्यावयाचा का? तर तसे का, याचा छोटा खुलासा सर्व अंकांत छापावा ही विनंती.
४. श्री. केशवराव जोशी यांचे मे ९९ मधील पत्र श्रीमती सोनिया गांधी यांच्या संदर्भात असावे, त्या पत्रातील सिस्टर निवेदिता, दादाभाई नवरोजींचा ब्रिटिश पार्लमेंटमधील प्रवेश इत्यादि मुद्दे श्री. गांधींच्या संदर्भात गैरलागू आहेत. वरील कोणी पंतप्रधानपदावर हक्क सांगितला नव्हता, हे येथे लक्षात घ्यावयास हवे. तसेच तो काळही वेगळा होता. शिवाय तुम्हास कदाचित मान्य नसेल. पण राष्ट्रीय अस्थिता, अभिमान अशा संकल्पना बहुसंख्य लोकांच्या मनांत असतात.
५. आजपर्यंत, कुठल्याही विचारसणीशी जुळणारा “आदर्श” समाज कधी तरी अस्तित्वात होता की नाही, अशी सार्थ शंका घेण्यास जागा आहे. आदर्शाच्या जवळ तो किती होता हे फार तर पाहता येईल.
६. तर्क हे दुधारी शस्त्र आहे. तो कोठल्याही बाजूने देता येतो, हे अनेक उदाहरणाने दाखाविता येईल. शिवाय मानवी व्यवहार हे तर्कावर चालतात हा समज भ्रामक होय.
प्रभाकर गोखले
“पद्मावती’, २०, शिरगावकर सोसायटी,
कोल्हापूर – ४१६ ००८

“आ. सु.” च्या कंबरेखाली वार करू नका
माझा संपूर्ण जुलै महिना बौद्धस्थळांच्या भेटीखातर बिहार आणि नेपाळमध्ये गेला. अकाली पुरांमुळे प्रवास रखडला. त्यामुळे जुलैचा अंक ऑगस्टमध्ये पाहता आला व तो वाचून खेद वाटला. या अंकात (१०-४) सुधारका वर अमेरिकेतील प्रा. भाटे व नागपूरच्या श्री. नाना ढाकुलकर यांनी घणाघाती आघात कंबरेखाली केले आहेत त्याचे फार दुःख झाले.
प्रा. भाटे आ. सु. च्या भूमिकेविषयी फार गैरसमज करून घेत आहेत. विवेकीपणाने सामाजिक सुधारणा कशा करता येतील यासाठी सामान्य शिक्षित महाराष्ट्रातील जनतेचे प्रबोधन करणारे हे मासिक आहे, हे प्रा. भाट्यांना उमगलेले दिसत नाही. केवळ विवेकवादाची (rationalism) कास धरूनच समाजातील आस्तिकपणा, अध्यात्म व धार्मिक कर्मकाडांचा पगडा दूर करून समाजाला वास्तवाचे आणि सहिष्णुतेचे भान ठेवण्यास साहाय्य करावे एवढ्याचे मर्यादित उपयोजित उद्देशाने तत्त्वज्ञानाची चर्चा आ. सु. मध्ये असते. अगदी प्रा. दि. य. देशपांडे हेसुद्धा तेवढाच संदर्भ दृष्टीसमोर ठेवून तत्त्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर भ्रामक सामाजिक मान्यता व विसंगतीयांवर लेख लिहितात. त्यात तत्त्वज्ञान या विषयातील विविध मतप्रवाह, पक्ष व प्रत्यक्ष (per se) तत्त्वज्ञान या विषयातील अत्याधुनिक ग्रंथ व संशोधननिबंध यांचा ऊहापोह अर्थातच प्रा. देशपांडे करीत नाहीत. त्यासाठी त्यांनी अन्य स्वतंत्र ग्रंथ व निबंध प्रकाशित केले आहेत, ते अर्थातच प्रा. भाटे यांना माहीत नसणारच.
प्रा. दि. य. देशपांडे निवृत्त होऊन खूप वर्षे लोटली आहेत. अमरावतीच्या शासकीय महाविद्यालयात ते माझे शिक्षक होते. त्या महाविद्यालयात जी काही मोजकीच सज्जन, ज्ञानी, अभ्यासू व विनयशील प्रोफेसर मंडळी होती त्यांत प्रा. देशपांडे प्रमुख होते. अशा अजातशत्रु व सौम्य व्यक्तीवर अशिष्टपणे व दर्पोक्तीने कंबरेखाली झालेले
आघात पाहून अती दुःख होते.
आता श्री. नाना ढाकुलकर यांचे लेखाविषयी. त्यांचे म्हणणे सर्वच विवेकवादी सुधारकांना मान्य असण्यास काहीच हरकत नाही. भारतात पार मनूपासून सर्वच पुरोहित, भटजी, पंडे, बडवे व कथापुराणांचे लेखक यांनी ईश्वराचे अधिष्ठान, कर्मकांडे व दक्षिणावृत्ती जोपासूम पोटार्थी ब्राह्मणांचे वर्चस्व समाजाच्या तळाच्या स्तरांवर लादून त्यांचे शोषण केले व या दलित, शोषित बहुजन समाजांची अपरिमित हानी केली हे निर्विवाद आहे व त्याचे परिमार्जन झालेच पाहिजे. पण आता हाच राग आम्ही किती दशके व शतके आळविणार? पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या कुबड्या दलित व बहुजन समाजाला दिल्या पण या कुबड्यांच्या आधारानेच दलित, बहुजन समाज किती शतके चालणार? या समाजांमध्ये कुप्रथा, अंधश्रद्धा व विसंगती काय कमी आहेत? बौद्धसमाजातही आता भिख्खु मंडळी भटजी/पुरोहितांच्याच वळणावर जात आहेत. कर्मकांडे वाढत आहेत. या बाबतीत समाजाचे प्रबोधन कोण करणार?
आजचा सुधारक या नियतकालिकातून आपणही सर्वांचे प्रबोधन करावे असे टीकाकारांना का वाटत नाही? या मासिकाकडून कोणत्याही समाजातील लेखकांचे स्वागत असताना ते ब्राह्मणवादी मासिक आहे अशी हाकाटी पिटल्याने आत्मवंचनेखेरीज इतर काहीही साधणार नाही. त्यापेक्षा या मासिकाचे व्यासपीठ वापरून समाजातील अंधश्रद्धा, त्याज्यवर्तन, व्यसनाधीनता, आळस यांसारखे दोष व न्यूनगंडावर प्रहार करण्याचे कार्य या मंडळींनी आता नव्या सहस्राब्दात तरी सुरू करावे अशी विनंती करावीशी वाटते. ब्राह्मणांना शिव्याशाप देऊन समाजाची प्रगती होणार नाही. पूजनीय बाबासाहेबांनी मिळवून दिलेल्या आरक्षणाहून अधिक लाभ केवळ शिव्याशाप व हिंसक आदोलनांनी होणार नाही याचे भान दलित व बहुजन नेत्यांनी ठेवले पाहिजे. त्यासाठी समस्त समाजाची सुधारणा हाच एकमेव मार्ग आहे.
रजनी विठ्ठलराव पगारे
घर नं. १७१, ब्लॉक नं. ३,
बॅचलर रोड, वर्धा – ४४२ ००१

काहीतरी कृतिशील कार्यक्रम ठरवू या!
संपादक आजचा सुधारक यांस,
आपले पत्र व जूनच्या अंकातील संपादकीय वाचले. संपादकीयाच्या शेवटच्या परिच्छेदाशी पूर्णपणे सहमत आहे. विवेक/अविवेकातील सीमाप्रदेशाबद्दल नेहमीच वाद राहणारच. ‘प्रमाणमन्तःकरणप्रवृत्तयः’ एवढे प्रत्येकाला फार तर आपल्यापुरते समाधान. असो.
काही अधिक नेमका कृतिशील कार्यक्रम आपल्याला, आपल्या सहका-यांना, अन्य कोणाला सुचत असल्यास मला त्यात रस आहे. मला सुचतात, परंतु त्याविषयी वरील प्रतिसादाच्या मर्यादा कळल्यानंतर. माझा सहभाग (आर्थिक सहभागासह) गृहीत धरावा.
* * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * *
जुलैच्या अंकातील संपादकीयात अस्वस्थता जाणवली. सामाजिक कार्यकर्तापरस्पर संवादात तर ती आहेच आहे. कमी अधिक प्रमाणात प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनात ही अगतिक अस्वस्थता आज अस्तित्वात आहे.
अस्वस्थता वेगवेगळ्या कारणासाठी असू शकतील. … काही जणांच्या परस्परांना छेद देणाच्याही असतील. परंतु त्या स्वार्थासाठी नसून परार्थासाठी (परमार्थासाठी, असे म्हणत नाही) असतील तर सारख्याच मोलाच्या मला वाटतात. या अस्वस्थतांना आकार देणे ही आपली जबाबदारी आहे असे कोणताच राजकीय पक्ष वा अन्य संघटनाही आज मानताना आढळत नाहीत. अनेकदा अस्वस्थतेत भर घालण्याचे मार्गच ते शोधत आहेत असे वाटते.
ही भूमिका मान्य असणान्यांनी परस्परसंपर्क वाढवावा असे ज्यांना वाटत • असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. नंतर अधिक संपर्क मी त्यांच्याशी साधेन. या प्रयत्नाचे देखील शेवटी काय झाले याचा प्रकट अहवाल ११ जून २००० (साने गुरुजी परिनिर्वाणदिन) ला सादर करीन.
* * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * *
जुलै चा अंक मिळाला. कधी नव्हे ते वाचला व संपूर्ण वाचला. संपादकीयाच्या शेवटच्या वाक्याप्रमाणे :
(i) अनुचित भाग अवश्य वगळावा. परंतु अशी भूमिका एरवी घेता येणार नाही. नाहीतर प्रयासाचे स्वरूप ‘converting the converted’ असेच सदैव राहणार.
(ii) ‘परदेशी’ प्राध्यापक विरुद्ध ‘स्वदेशी’ प्राध्यापक यातील भास आभासाचा निकाल लागलाच पाहिजे. नाहीतर आम्ही सामान्यजन आणखीच गोंधळात पडतो आपण प्रा. रेगे यांचे ज्ञानसंतुलनविषयक मत घेतले तर ते माझ्या दृष्टीने पुरेसे आहे. आपल्या बहुतेक वाचकांच्या दृष्टीनेही होईल.
(iii) मला खरे महत्त्व सामाजिक कार्यकर्ता-परस्पर संवादाचे वाटते (पृ. १०४-१११). समस्या ख-याच आहेत व त्या गंभीर आहेत. उत्तरे पत्र मात्र जुजुबी व मोघम वाटली. त्याला इलाजही नाही. परंतु काही मार्ग काढण्याच्या प्रयत्नात मलाही रस आहे. संथ पाण्यात खळखळाट होत आहे हे चांगले लक्षण आहे.
* * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * *
ऑगस्ट अंक पाहिला. भाटे-देशपांडे गुंत्यात आपण अकारणच स्वतःला अडकवून घेतले आहे. विद्वत्तेच्या कसाविषयी (peer group assessment) हाच त्यातल्या त्यात सुरक्षित मार्ग असतो. एरवी सारे धूलिवंदनच असते. त्यातून बाहेर पडावे.
देवदत्त दाभोलकर
४३, गुरुकृपा हौ. सो., शाहूनगर,
गोडोली सातारा शहर – ४१५ ००१

विवेकवाद्यांचा कडवा गट होऊ नये
….ज्या विवेकवादाची शिफारस तुम्ही करीत आहात, वा त्याची ज्या प्रकारे मांडणी करीत आहात, ती पाहता लौकरच एक अंध, कडवा (fanatic) गट वगळता कोणी स्वतःला विवेकवादी म्हणवून घेणार नाही अशी वेळ येईल, हा धोका मला दिसतो. भाटे यांची नानांवरील दि. यं. टीका, ललिता गंडभीर यांचे तुमच्या संपादकीयावरचे पत्र, यांमध्ये मला रास्त मुद्दे उपस्थित केले आहेत असे वाटले.
जुलै अंकातील संपादकीयही मला असमाधानकारक वाटले. तुमची भूमिका वा मते पटण्या न पटण्यापलीकडचे ते असमाधान आहे. हे कळविण्यासाठी पत्र लिहिणे कितपत उचित हाही प्रश्न मनात आला. पण तुमचे माझे घनिष्ठ विरादरीसंबंध लक्षात घेता लिहावे वाटले.
वसंत पळशीकर
१५० गंगापुरी वाई – ४१२ ८०३

‘असे’ लेखन नको
जुलै ९९ च्या अंकात श्री. अनिलकुमार भाटे यांचा ‘दि. य. देशपांडे यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ’ हा लेख छापून आला. ऑगस्ट महिन्यातल्या आ. सु. मध्ये वयाच लेखकांनी श्री. भाटे ह्यांच्याशी आपले मतभेद व्यक्त केले. “श्री. भाटे ह्यांनी जो काय तर्कशास्त्राचा अभ्यास केला असेल किंवा हेगेल, हुसेर्ल, हायडेगर या हकाराच्या वाराखडीतील युरोपी विद्वानांच्या नावाची जंत्री पाठ केली असेल ते सारे निरर्थक ठरतात.” दुसरे उदाहरण, “युरोपीय नैयायिकांच्या कुबड्या घेऊन आपल्या मूलभूत अभ्यासाचे पंगुत्व लपविले नसते तर बरे झाले असते. तसेच आणखी एक उदाहरण,
“…. श्री. भाटे यांच्या असभ्य अहंगडाचीच तीव्र जाणीव झाली” त्याशिवाय “श्री. देशपांडे यांच्या विचारांचे मूल्यमापन स्वतंत्र व वास्तववादी भूमिकेतून – American mania च्या भूमिकेवरून नव्हे – करू शकतील.” तिसरे उदाहरण “दुर्दैवाने असंबद्धता हा श्री. भाटे यांच्या आक्षेपांचा सामान्य व प्रभावी गुणधर्म दिसतो.”
वरती जी उदाहरणे दिली आहेत अशा प्रकारचे लेखन करणे व ते छापणे हे दोन्ही पटत नाही.
जुलै ९९ च्या अंकातल्या संपादकीयामध्ये संपादक असे सांगतात, “आम्हाला विचारांशी भांडावयाचे आहे, व्यक्तीशी नाही, कारण व्यक्तीचे विचार बदलू शकतात ह्यावर आमचा ठाम विश्वास आहे. तरी लेखकांवर निर्बुद्धपणाचे, अज्ञतेचे अथवा हेतूचे आरोप करू नयेत अशी त्यांना मनापासून प्रार्थना आहे.
संपादकाने कुठल्याही दबावाखाली न येता आपले विचार मांडावेत.
आशा ब्रह्म
८, वेस्ट पार्क रोड,
धंतोली, नागपूर.

निःसंकोच, पारदर्शक खुलेपणा हवा
अनिलकुमार भाटे यांच्या लेखाच्या निमित्ताने जो काही धमाका उडाला तो अपेक्षित होता, परंतु संपादकांपासून ते नंदा खरे, मधुकर देशपांड्यांपर्यंत (व आपणास मालेले काही दूरध्वनी वा अप्रकाशित पत्रांपर्यंत; अंदाजाने) सदभिरुचिसंपन्न नसलेले खि छापलेच पाहिजेत असे नाही;’ ‘छापू नयेत;’ ‘केराची टोपली नाही का?’ अशा प्रतिक्रिया आलेल्या दिसतात. आ. सु. च्या मुळावरच तो घाव ठरेल याचे भान राहिलेले दिसत नाही.
आ. सु. मधील एखाद्या लेखाविरुद्ध कडवट प्रतिक्रिया जर उमटणार असेल व लेखक स्वतःच्या नावे ती छापू देण्यास तयार असेल तर कडवटपणा, सदभिरुचीचा अभाव, शिवराळपणा, व्यक्तिगत टीका या कारणास्तव अशी पत्रे छापणे कधीच टाळू नये; उलट, काही जणांमध्ये किती तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते हे कळण्यासाठी अशी पत्रे जरूर छापावीत, संस्करण तर कधीच करू नये.
भाट्यांचा लेख वाचल्यावर मला प्रथम राग आला. नंतर शांत झाल्यावर मी जेव्हा भाट्यांच्या बुटात पाय घालून तो लेख वाचला तेव्हा मला जाणवले की त्यांनी खूप मेहनत घेऊन, खूप विचार करून व वयाच संतापाने का असेना, परंतु त्यांची वाजू प्रभावीपणे मांडली आहे व आ. सु. च्या वाचकांना विचारप्रवर्तक करणारी मांडणी केली आहे.
दि. यं. चा मूळ लेख व भाट्यांचे त्यावरील पत्र हे दोन्ही लेख वाचण्यापूर्वी मी जेथे होतो तेथून बराच पुढे सरकलो, सुस्तावलेल्या मनाला खूप सुंदर व्यायाम झाला. वाजू समजून घेताना, प्रतिपक्ष समजून घेताना स्वतःची उंची वाढवावी लागली. हे करीत असताना भाट्यांच्या शैलीमुळे ब-याच वेळा रसभंग झाला हे खरे, परंतु तरीही Whole is larger than the sum of its parts हे तत्त्व त्यांच्याच लिखाणातील पार्टसना लावले व ‘होल’ कडे बघितले.
दि. यं. ना मी थोडासा ओळखून आहे. व्यक्तिगत माहितीतून नव्हे तर त्यांच्याच लिखाणातून! दि. यं. ची नालस्ती करणे अशक्य आहे, करणारे दमतील, दमणान्यांना त्यांच्या कष्टाने दमू द्या. सदभिरुचीचे बंधन वा संपादकीय संस्करण हे
आ. सु. ला कमालीचे हानिकारक ठरेल हे लक्षात घ्यावे.
अमुक पद्धतीचे लिखाण छापूच नये किंवा संस्करण केल्याशिवाय छापू नये अशा अर्थाची जी पत्रे येत राहतील तीसुद्धा तशीच छापावीत. जागेअभावी वा अप्रस्तुततेमुळे ज्यांचे लिखाण छापता येणार नाही त्यांना तशा कारणाचे पत्र जरूर पाठवावे ही विनंती.
संपादकांना रुचले नाही म्हणून पत्र/लेख छापला जात नाही अशा अर्थाचा प्रवाददेखील कधी निर्माण होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे.
श्री. रिसबूड, श्री. घोंगे, श्री. चिंचोळकर यांनी भाट्यांच्या लिखाणाचे उत्तम खंडन केले आहे. विवेकाचा धर्म, श्रद्धा, अध्यात्म यांशी संबंध नसला तरी नीतीशी मात्र नक्कीच आहे. वैचारिक नियतकालिकाकरिता संपूर्ण आरस्पानी खुलेपणा व शून्य संस्करण हीच नीती होय.
सुरेंद्र देशपांडे
श्री जुगाई, अखिल ब्राह्मण संस्थेसमोर,
बॉईज टाऊन रोड, नासिक – ४२२ ००२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.