सर्वांना शुद्धलेखनाचे प्रशिक्षण हवे

संपादक, आजचा सुधारक यांस,
आपल्या अनावृत पत्रात आपण उपस्थित केलेले सर्वच मुद्दे महत्त्वाचे व विचारांना चालना देणारे आहेत. त्या सर्वांचा समग्र विचार करून ऐकमत्य साधणे नितांत आवश्यक झाले आहे. ही प्रक्रिया लवकर व्हावयास हवी. उशीर झाल्यास मराठीची अवस्था आणखी दयनीय होईल आणि मग तिच्यात चैतन्य आणणे आणखी कठीण होईल, असे आपल्याप्रमाणे मलाही वाटत आले आहे. आपल्या अनेक वर्षांच्या व्यावसायिक अनुभवामुळे आपण लिखित मराठीचे दुखणे बरोबर हेरले आहे. समग्र महाराष्ट्रात आणि अन्यत्र प्रमाण मराठीची जाण वाढणे याची आज नितान्त
आवश्यकता आहे.
मराठीच्या अनेक प्रादेशिक बोलीही महाराप्ट्रात विखुरल्या आहेत. ह्या बोली-भाषांचा चांगला अभ्यास होणे इष्ट आहे. ह्या बोलींतूनही प्रमाण मराठी भाषेला पोषक असा जीवनरस मिळत असतो आणि ती परिपुष्ट होत असते. म्हणून बोलीभाषांकडे उपेक्षेने न पाहता, त्या प्रमाण मराठी भाषेची बलस्थाने आहेत या भावनेनेच पाहावयास हवे. ललित साहित्यात काही समर्थ साहित्यकांनी बोलींचा वापर करून प्रमाण मराठीचे तेज वाढवले आहे. परंतु सरसकट वोलींचा लिखित मराठीत वापर केला तर मराठीच्या प्रामाण्याला वाधा पोहोचू शकेल. शब्दा-अर्थाचे अविकृत सातत्य, त्यांचे कोशगत प्रमाणीकरण यांचा भाषेच्या निरंतर व निर्वाध अस्तित्वाशी घनिष्ठ संबंध आहे, ही वाव सर्वच मराठीभाषाप्रेमींनी ध्यानात ठेवावयास हवी.
गेल्या पन्नास वर्षांत आपण मराठी शुद्धलेखनातील अराजक संपवू शकलो नाही. त्यामुळे आज ही कठिण परिस्थिती निर्माण झाली आहे. शुद्धलेखनाबद्दल शालेय स्तरावर पुरेसे लक्ष दिले जात नाही. परिणामी शब्दांची अशुद्ध रूपे, चुकीचे वाक्यप्रयोग यांचा शालेय स्तरावर खोल संस्कार झाला की पुढे तो मिटवणे कठिण जाते. या बाबतीत प्रशिक्षणाचा आपण मांडलेला मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटतो. शाळेतील मराठीच्या अध्यापकाला शुद्धलेखनाचे विशेष प्रशिक्षण देणे ही आज घटकेला तातडीची गरज झाली आहे. हेच प्रशिक्षण अन्य विषयांच्या अध्यापकांनाही देणे नितान्त आवश्यक आहे. कारण तेही आपापले विषय मराठीतूनच शिकवत असतात. विद्यार्थ्यांनाही परीक्षा मराठीतूनच द्यावयाची असते. शालेय स्तरावर हा कार्यक्रम तातडीने हाती घेतला तर दहा वर्षांत त्याची दृश्य फळे आपल्याला दिसून येतील. मग सध्या, मराठी भाषेच्या पदव्युत्तर परीक्षार्थीच्या लिखित मराठीच्या स्वरूपाने आपण आज जसे व्यथित होतो तसे होणार नाही. परंतु यासाठी आपल्याला अगोदर शुद्धलेखनाच्या नियमावलीत सुसूत्रता आणावी लागेल. आपण अक्षर-जोडाक्षर लेखनांची चाळीस
वर्षांपूर्वी स्वीकारलेली पद्धती ही आपल्याला मनोमन पटलेली नव्हती. परंतु ती स्वीकारण्यामागे आपली यंत्रशरणता होती. मुद्रणयंत्रांची, टंकलेखनयंत्राची सोय, याला आपण प्राधान्य दिले. त्यामुळे आपली वर्णमाला आणि आपली जोडाक्षरपद्धती आपण विकृत करून बसलो. आज परिस्थितीत बराच बदल झाला आहे. आजही आपण यंत्रशरण असलो, तरी यंत्राच्या क्षमतेत आमूलाग्र फरक झाला आहे. आता आपण आपली लिपी अविकृत स्वरूपात वापरू शकतो आणि मुद्रणयंत्रे याला साहाय्यभूत ठरतात. शुद्धलेखनाच्या बाबतीत विविध तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. हे मतभेद प्रमाणीकरणाच्या आड येतात. त्यामुळे सामान्य जनतेचा बुद्धिभेद होतो. हा वुद्धिभेद दूर करण्याचा प्रयत्न श्रीमती सत्त्वशीला सामंत यांनी व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली’ या आपल्या पुस्तकाद्वारे केला आहे. (गोकुळ मासिक प्रकाशन, १९९४ सदाशिव, पुणे – ३०) परंतु एकांडा प्रयत्न असल्यामुळे समग्र समाजावर त्याचा परिणाम नगण्य ठरतो. हा बुद्धिभेद दूर करण्याच्या दृष्टीने तज्ज्ञांनी एकत्र येऊन एकरूप शुद्धलेखननियमावली तयार करावयास हवी. हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत प्रमाण मराठी लुळीपांगळीच राहील. तिच्यात जोम येणार नाही.
या संबंधात मराठी महामंडळाने पुढाकार घेऊन वर्णमाला, जोडाक्षरे, शुद्धलेखन, यासंबंधीची सर्वमान्य नियमावली निश्चित करावी. शासनानेही या नियमावलीवर शिक्कामोर्तब करावे. राजमान्यता आणि समाजमान्यता या दोन्हीही अंगांनी मराठीचे प्रामाण्य दृढ करावे.
याबरोबरच प्रसारमाध्यमे (वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन) आपल्या दैनंदिन कामकाजात प्रमाण मराठीच्या वापराबाबत सतर्क राहतील, हेही पाहणे नितान्त आवश्यक आहे. जागरूक नागरिक या बाबतीत बरेच काही करू शकतात. प्रातिनिधिक संस्थाही अशा माध्यमांकडे प्रमाण मराठीच्या सुयोग्य वापराचा आग्रह धरू शकतात.
आपल्या अनावृत पत्रातील उच्चारानुसारी लेखनाच्या मर्यादा आणि व्याकरणाच्या अध्ययनाची आवश्यकता याबद्दलची आपली मते सर्वमान्य होण्यासारखीच आहेत.
डॉ. न. ब. पाटील
अ-३७, कमलपुष्प, वांद्रे रेक्लमेशन (पश्चिम),
मुंबई – ४०० ०५०

प्रमाणभाषा अभिजनसंमुख नको
संपादक, आजचा सुधारक यांस
आपले अनावृत पत्र वाचले. मुखपृष्ठावरील विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा मजकूरही आपल्या पत्रात व्यक्त होणा-या वृत्तीशी जुळतो : म्हणजे परकीयांचे भूत दाखवत दाखवत मराठी समाजाच्या पायाभूत घटकांच्या भाषेला कधीच प्रतिष्ठा मिळू नये, असे हे दुधारी शस्त्र मराठीला कधीच अभिजातत्व मिळू देत नाही. या वृत्तीची ही आता आवर्तने होऊ लागल्याचे आपल्या लेखातून स्पष्ट झाले.
मराठीची लिखित परंपरा पूर्वीपासून अप्रमाणित, खंडित, अभिजनसंमुख आणि संकुचित सामाजिक जाणिवांचे प्रतिनिधित्व करणारी प्रायः राहिली आहे. पद्य/ काव्य परंपरेने नेमके ह्याच्या विरुद्ध कार्य केले आहे कारण ती प्रायः मौखिक होती, त्यामुळे ती प्रमाणित, अखंड, बहुजनसंमुख आणि उदारवृत्तीची आजही आहे.
“अविकृत सातत्य राखणे म्हणजे भाषिक बंधुभाव विरळ होईल इतके लिखित प्रमाणकांचे महत्त्व मानणे होऊ नये, मराठी लेखनप्रमाणकांचा इतिहास १९ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून प्रायः पक्का होत गेला. व्हिक्टोरियन आदर्शबाजीच्या अंमलाखाली ही प्रमाणके सर्व मराठी जातीजमातींवर लादली गेली. संस्कृतमध्येच केवळ मराठीची मुळे आहेत असे मानणा-या आणि उच्चारात कधीही येऊ शकणार नाहीत अशा अनुनासिक टिंबांनी गिचमीड करून टाकलेल्या मराठी “शुद्धलेखना” ने मराठीचा गळा सुरुवातीपासूनच घोटला आहे. ह्रस्वदीर्घ स्वरांच्या खुणांना प्रत्यक्षात काहीही अर्थ नसलेल्या पहिल्या-दुस-या वेलांट्याउकारांनी मराठीचे लेखन कधीच तर्कशुद्ध होऊ नये याचीही व्यवस्था करून ठेवली आहे. सुदैवाने १९६३ साली भाऊसाहेब कोलत्यांसारख्या विदर्भातल्या विद्वानांनी करोडो मराठी मुलांची सतत वाया जाणारी शक्ती वाचवून मराठी बरीच समाजसंमुख केली. मराठीची उच्चाराशी पूर्ण फारकत घेणारी परंपरा तुटेल तितकी मराठी सशक्त होईल.
इंग्रजी माध्यमासंबंधी आपल्या मतांशी मी पूर्ण सहमत आहे. परंतु अशा गोष्टी बौद्धिक चर्चेने सुटणार नाहीत, असे माझे मत झाले आहे. त्यासाठी कडक नियोजन करावे लागेल. मराठी माध्यमात जे शिकले नाहीत त्यांना त्यासाठी काही नुकसान सोसायला लावणे हाच त्याला एक मार्ग आहे. हा लोकशाहीविरोधी एकतंत्री मार्ग आहे (जो सर्व तथाकथित लोकशाहीवादी राष्ट्रे उघडपणे आचरीत असतातआपला देश सोडून) आणि मराठीला दुय्यम मानण्याचे तोटे अशा इंग्रजीमाध्यमी मराठी लोकांना सहन करावे लागतील, असे कडक नियोजन अमलात आणल्याशिवाय ह्या चर्चेला अर्थ राहिलेला नाही.
डॉ. भालचंद्र नेमाडे
बी ४०१ निलेश सहनिवास
मोतीराम म्हात्रे मार्ग, कांदरपाडा, दहिसर पश्चिम, मुंबई – ४०० ०६८

सामाजिक परिवर्तने पचवणारी भाषा समृद्ध होते
‘आजचा सुधारक’ अनेक वर्षांनी पुन्हा पहायला मिळाला. आत्मपरीक्षण लेख, वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणारे आहेत म्हणून रुचले. मराठी बद्दल चे पत्र वाचले. त्यातील मुद्दे पटतात. सामाजिक परिवर्तने पचवणारी भाषा समृद्ध होते – इतर मागे पडतात. मला वाटते मराठी बोलणा-यां बरोबर लिहिणा-यांनीही याची दखल घ्यावी. संगणकीय जमान्यात मराठीला त्या माध्यमाशी ही जुळवून घ्यावे लागेल.
जयंत नारळीकर
Inter-University Centre for
Astronomy and Astrophysics
Post Bag 4, Ganeshkhind, Pune : 411 007

चिन्ताकुल होण्याचे कारण नाही
मराठीच्या भवितव्याने मी चिंतेत नाही. चिंतेला त्याहून निकडीचे आणि अधिक गंभीर विषय आहेत असे मला वाटते.
आपण चिंता (आणि तिचे लेखन) करून काही उपयोग होतो असा माझा अनुभव नाही. हाताने होईल ते करीत रहावे ते मी करीत राहिलो आहे. (त्याच्याही उपयोग?)
कालांतराने सगळेच नष्ट (किंवा नष्ट-प्राय) होते. मराठीही होईल. माणसे जोवर कोणत्या तरी भाषेत एकमेकांशी बोलतात तोवर ती कोणत्या भाषेत बोलतात (यात साहित्यही आले) याने चिंताकुल होऊ नये असे मला वाटते.
विजय तेंडुलकर
बद्रीधाम, संतजनाबाई पथ,
विलेपार्ले (पू.) मुंबई – ४०० ०५७

अशुद्ध लेखनाने मायबोलीची विटंबना होते
‘आजचा सुधारक’ समाजाच्या प्रबोधनाचे जे कार्य करीत आहे ते फार मोलाचे आहे. राजकीय आकांक्षा न ठेवता आपण जे लोकजागरण करीत आहात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
आपणाप्रमाणेच मलाही मराठी भाषा शुद्ध लिहिली जाणे आवश्यक आहे असे वाटते. आपल्या आईचा कोणी अपमान केला तर आपण संतापतो. परंतु अशुद्ध लेखन करून अनेकांनी मायबोलीची विटंबना केली तरी ती आपण सहन करतो ही खेदाची गोष्ट आहे. मी हायस्कूलमध्ये शिकत असताना संस्कृत शिकविणा-या माझ्या गुरुजींनी पुढील गोष्ट सांगितली होती. खूप थंडी पडली होती, त्यावेळी एकाने आपल्या मित्रास विचारले, “अपि त्वां बाधति शीतम्।“ यावर भाषा शुद्ध असावी याबद्दल जागरूक असलेल्या त्या मित्राने उत्तर दिले, ‘न तथा बाधते शीतम् यथा बाधति वाधते।’ ‘वाधते’ या आत्मनेपदी रूपाऐवजी ‘बाधति’ हे परस्मैपदी रूप वापरल्याने त्या विद्वानास वेदना झाली. आता वाधति कोणालाच बाधत नाही अशी स्थिती आहे.
मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी नाही. तरीदेखील भांडवलाची नवीन व्याख्या वाचून माझ्या विचारांना चालना मिळाली. याबाबत तज्ज्ञांचे मतच ग्राह्य धरावे लागेल.
ग. प्र. प्रधान
९२६ सदाशिव पेठ, पुणे – ४११ ०३०

भाषाभिवृद्धीसाठी केवळ शुद्ध लेखन पुरेसे नाही
संपादक, आजचा सुधारक यांना,
आपले जूनच्या आ. सु. मधील भाषेसंबंधी पत्र वाचले. मीही गेली २९ वर्षे एका नियतकालिकाच्या संपादनात भाग घेत आहे, तसेच महाविद्यालयाच्या आवारातील निवास आणि विद्याथ्र्यांच्या संस्थेतील काम यामुळे ब-याच वेळा धेडगुजरी मराठी
कानावर पडत आहे. त्यातून काही निरीक्षणे –
१. तरुणांची शब्दसंपत्ती (vocabulary) फार कमी. ठराविक गटात उठबस, त्यामुळे तेचतेच शब्द वापरले जातात. परक्या व्यक्तीशी बोलताना त्याने समजून घ्यावे ही अपेक्षा. (उपाय-लहानपणीच पालकांनी व शिक्षकांनी भाषेचा उच्चार व व्याकरण यांवर जोर दिला पाहिजे. सतत नवे शब्द वापरात आणून ते त्यांच्या कानावर पडले पाहिजेत.)
२. T. V. चे आक्रमण ही सबब नको. इतर वेळी शब्दांचे खेळ, एका शब्दास अनेक पर्यायी अन्वर्थक शब्द, पाठांतर–कवितेचे वा एखाद्या उता-याचेउपयुक्त होते. याशिवाय उच्चार सुधारत नाहीत. ग्रामीण मुलामुलींच्या बाबतीत अशुद्ध भाषा कदाचित क्षम्य समजू. पण पांढरपेशा मुलांना भाषेचा वापर वेगवेगळ्या वयाच्या, दर्जाच्या व्यक्तींशी बोलताना कसा करावा; उदा.-सौजन्ययुक्त, आदरार्थी—याचा वस्तुपाठ मिळाला पाहिजेच.
३. आजकाल शहरात मातृभाषेशिवाय एकदोन परकी भाषा शिकणे गरजेचे झाले आहे. पण यासाठी मातृभाषा पूर्णपणे आत्मसात् करता आली पाहिजे. भाषा येणे म्हणजे शब्दसंख्या वाढणे नसून त्या भाषेची लकब, योग्य उपयोग, ती भाषा बोलणान्यांची संस्कृती अशा अनेक गोष्टी समजल्या पाहिजेत. भाषेने आपले सारे जीवनच व्यापले आहे.
४. जरूर तर परभाषेतील शब्द घेऊन आपली भाषा समृद्ध करावी. पण आपणच कंजूष माणसाप्रमाणे ठराविक शब्द–अनेक भाव व्यक्त करण्यास वापरू ल्मगलो तर आपली भाषा हळूहळू नामशेष व्हायला वेळ लागणार नाही.
५. अजुनी मराठी माध्यम असलेल्या शाळा-कॉलेजात मराठीतून क्रमिक पुस्तके निघाली नाहीत. आणि आमच्या प्राध्यापकांना यासाठी लागणारा वेळ घालवणे जमत नाही. पुण्यात यासाठी अनेक प्रयोग केले, पण प्राध्यापकांना अशी पुस्तके लिहिण्यात रस नाही. असो! वाचनाची सवय लावणे ही पहिली गरज आहे. मग भाषेवर प्रेम बसेल.
शांता मालेगांवकर
१३, संगमनगर, बिबवेवाडी, पुणे – ४११ ०३७

मराठीचे शब्दभांडार वाढविणेच अधिक महत्त्वाचे
संपादक, आजचा सुधारक यांस,
जून ९९ च्या अंकात श्री दिवाकर मोहनी यांनी मराठीप्रेमी लोकांना मराठी भाषेची घसरगुंडी थांबवण्यासाठी उपाय सुचवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्वतः भाषेच्या परिष्कृत रूपावर आणि त्याच्या सातत्यावर भर दिला आहे.
मराठी भाषेची जी पिछेहाट होत आहे तिचे कारण शुद्धलेखनाविषयीचे अज्ञान हे नव्हे. पिछेहाटीचे कारण हे आहे की निरनिराळ्या विषयांवरील आधुनिक विचार व्यक्त करण्याची क्षमता असलेले शब्दभांडार जसे इंग्रजीत निर्माण झाले आहे. तसे ते मराठीत निर्माण झालेले नाही.
लेखन हे आशय व्यक्त करण्यासाठी असते हा मुद्दा बरोबर आहे. पण त्यावरून असाही तर्क निर्माण होतो की ऐकणा-याला किंवा वाचणा-याला आशय समजला की झाले. बाकीच्या वावतीत सोवळेपणा कशाला हवा? उच्चाराबाबतच्या अहंकाराला श्री मोहनी यांनी त्याज्य ठरवले आहे. शब्दरूपाबद्दल तरी शुचितेचा अहंकार कशाला हवा? “भीति” या संस्कृत रूपाऐवजी “भिती” असे मराठी उच्चारानुसारी, रूप वापरले तर बिघडले कुठे? आशय समजायला कुठे अडचण पडते?
उच्चारानुसार लेखन ठेवल्याने बहुजनांसाठी शिकण्याचा भार कमी होतो. इंग्रजीतील spelling उच्चारानुसार नसल्यामुळे मुलांचे एक वर्ष वाया जाते असे Bernard Shaw यांचे म्हणणे होते व इंग्रजीचे spelling सुधारण्यासाठी त्यांनी एक पुरस्कार पण जाहीर केला होता. इंग्रजीत कदाचित आणखी मुळाक्षरेही लागली असती. कोणी या खटाटोपात यशस्वी झालेला नाही हा भाग वेगळा पण उच्चारानुसार शब्दरूप असावे असा विचार इंग्रजीच्या लेखकांमध्येही आहे. त्यानुसार अमेरिकन इंग्रजीमध्ये बदलही झाले आहेत. इंग्रजांच्या इंग्रजीमध्येही शब्दरूपाचे सातत्य राहिलेले नाही. दोनशे वर्षांपूर्वीचे इंग्रजी दस्तावेज वाचले तर त्यांतले निराळे spelling सहज लक्षात येते.
आशय वेगळे असतील तर मात्र शब्दरूपे वेगळी असणे आवश्यक आहे. मागे एका इंग्रजी लेखकाने आपल्या ग्रंथाच्या पूर्वीच्या संस्करणात autarchy ऐवजी autarky असा शब्दप्रयोग केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. संस्कृतात एक श्लोक आहे ज्यात एक बाप आपल्या मुलाला म्हणतो की बाबारे, तू फार शिकला नाहीस तरी ‘सकल’ ऐवजी ‘शकल’ लिहू नये, ‘स्वजन’ ऐवजी “श्वजन” (कुत्रे) लिहू नये एवढे कळण्यापुरते तरी व्याकरण शीक.
परंपरेने चालत आलेल्या शब्दरूपात एक इतिहास किंवा पूर्वीच्या अर्थ च्छटा दडलेल्या असतात हे खरे. पण तो भाग समजायला आणि त्याचा आनंद घ्यायला बिद्वत्ता लागते. ती सामान्यांजवळ नसते. मातृ-Mother, सर्प-Herpetology या शब्दांच्या नात्यांतून विद्वानांना एक इतिहास गवसतो हे खरे. पण भाषा समृद्ध होण्याकडे त्याचा उपयोग होत नाही.
भाषा समृद्ध होण्याकरता नवीन शब्दरूपांची गरज आहे. जुनी शब्दरूपे शुद्ध ठेवण्याची नव्हे. ही नवीन शब्दरूपे संस्कृतातून निर्माण करावीत की रूढ झालेले परकीय शब्दही आपल्या भाषेत सामावून घ्यावेत असा एक जुनाच वाद आहे. Classes करता चांगले काय आणि masses ‘करता चांगले काय असा एक संलग्न प्रश्न आहे. संस्कृतच्या आधाराने नवे शब्द बनवणे हे classes ना चांगले वाटत असेल पण इतर भाषातील सरावाचे झालेले शब्द स्वीकारणे हे masses च्या दृष्टीने चांगले आहे. दोन्ही मार्गानी शब्दभांडार वाढवणे योग्य होईल.
परभाषेतील शब्द स्वीकारले तर त्या शब्दांच्या जुन्या इतिहासाला काही महत्त्व राहणार नाही. उदा. आपण होटेल आणि होस्टेल हे शब्द स्वीकारले तर त्या शब्दांचे मूळ एकच आहे हे खरे, पण ती गंमत फक्त खास अभ्यासकासाठी. आम जनतेसाठी ते दोन शब्द आणि त्यांचे दोन निराळे अर्थ पुरे आहेत.
श्री मोहनी यांनी शब्दांच्या शुद्ध रूपावर आणि सातत्यावर भर दिला आहे तो योग्यच आहे. कारण भाषेला स्थैर्य आवश्यकच असते. शुद्धतेच्या कल्पनेत थोडा अहंकारही दडलेला आहे, उच्चाराच्या बाबतीत मोहनींना जो अहंकार दिसतो तसा. तो अहंकारही काही वाईट नाही. त्या अहंकारामुळेच classes मध्ये शिरकाव घेऊ पाहणा-या masses ना शुद्धता आवडायला लागते व भाषेचे अभिजात रूप टिकवण्यास मदत होते.
पण भाषेचे परंपरागत रूप टिकवण्यापेक्षा भाषेत नवीन शब्दसंपत्ती आणणे जास्त महत्त्वाचे आहे. हे कार्य विदग्ध लेखकांचे आहे. त्यांनी जर हे काम अंगावर घेतले तरच ते होण्यासारखे आहे. त्यांनी शब्दनिर्मिती केली की प्रसार हळूहळू होईल.
भ. पां. पाटणकर
३-४-२०८ काचीगुडा
हैदराबाद – ५०० ०२७

आजची सुधारकने कर्ता सुधारक व्हावे
संपादक, आजचा सुधारक यांस,
आपला जून १९९९ चा अंक व त्यासोबतचे आवाहनपत्र मिळाले. त्यातील श्री. दिवाकर मोहनी यांचा भाषाविषयक लेखहि वाचला. त्यात मांडलेल्या विचारांच्या अनुषंगानेच मी आपणांस एक आवाहन करू इच्छित आहे. नुकतेच माझे स्वतःचे ‘व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली’ नांवाचे पुस्तक प्रसिद्ध झाले असून, त्याची एक प्रत मी आपणांकडे परीक्षणार्थ पाठवली आहे. या पुस्तकातील विचारसरणी बहुतांशाने आपल्या विचारांशीच जुळती आहे. म्हणून आपण या पुस्तकाचे परीक्षण आपल्या नियतकालिकात प्रसिद्ध करावे ही विनंती.
या संदर्भात ‘दै. लोकसत्ता’ चे संपादक श्री. अरुण टिकेकर यांचे दोन मूलगामी विचार उद्धृत करीत आहे :
१. “आज बहुतांश समाज भाषा-व्यवहारासंबंधी उदासीन आहे”. असे औदासीन्य सांस्कृतिक अपकर्ष अनुभवणा-या समाजाकडूनच दाखवले जाऊ शकते. एखाद्या अमराठी भाषिकाच्या दृष्टीला हॉटेलमधील फलकावर ‘येथे दुध आणि दहि मीळत नाही’ असे अशुद्ध मराठी दिसले तरी त्याच्या नजरेला त्रास होत नसेल तर?. “मेसेज मिळाला ना, व्याकरणाला किती महत्त्व द्यावयाचे? असा प्रश्न त्याने स्वतःला विचारला तर सांस्कृतिक अपकर्षाचा तोहि भागधारक असल्याचे मानावे लागेल”. [लोकसत्ता – रवि. दि. १६ मे. १९९९ – लोकरंग पुरवणी – पान २ – सारांश : संस्कृतीचा अपकर्ष : ९] (डॉ. टिकेकरांच्या वरील विचारांना एक पुस्ती वा दुरुस्ती जोडणे आवश्यक आहे. सध्या मराठी अशुद्धलेखन मराठीभाषकाच्याच नजरेला खटकत नसल्यामुळे तोच खरा सांस्कृतिक अपकर्षाचा धनी ठरतो.
२. “आपल्याला व आपल्या कुटुंबाला अशा प्रकारची कोणतीहि झळ पोहोचू नये म्हणून प्रत्येकजण आज प्रवाहपतित होणेच स्वीकारत आहे”. प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे नैतिक धैर्य जेव्हा अधिकाधिक व्यक्तींमध्ये येईल तेव्हाच समाजबदल होऊ शकेल.” [लोकसत्ता – रवि. दि. ११ जुलै १९९९ – लोकरंग पुरवणी – पान २ – सारांश : समाजमनाचे अस्वास्थ्य – २]
उपर्युक्त विचारांच्या अनुषंगाने ‘आजचा सुधारक’ च्या संपादक – मंडळाला माझे असे आवाहन आणि आह्वानहि आहे की, माझ्या ‘व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली’ या पुस्तकातील विचार आपणांस पटले तर, प्रचलित प्रवाहाविरुद्ध जाऊन त्या लेखनसरणीचा अवलंब करण्याचे धाडस त्यांनी दाखवावे आणि ‘आजचा सुधारक’ हा नुसता बोलका, वाचिवीर सुधारक नसून ‘कर्ता सुधारक’ आहे आणि आगरकरांचा तो खराखुरा वारसदार आहे हे त्यांनी जगाला दाखवून द्यावे. आजचा सुधारक’ ला आज महाराष्ट्रातील व विदेशांतील महाराष्ट्रीय बुद्धिवंतांच्या वर्तुळात प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. म्हणून आपण स्वतः लेखनपद्धतीत सुधारणा केली तर इतरांनाहि आपले अनुकरण करण्याचे धाडस होईल. ‘महाजनो येन गतः स पन्थाः’।
सत्त्वशीला वि. सामंत
१६, यशोदाकुंज, तेजस् नगर, कोथरूड, पुणे – ४११ ०२९

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.