मराठी भाषेचे चिंताजनक भवितव्य

आजचा सुधारकच्या जून ९९ (१०.३) ह्या अंकामध्ये माझे ‘मराठी भाषाप्रेमींना अनावृत पत्र’ प्रकाशित झाले. त्यावर बरीच उत्तरे आली. त्यांपैकी काही सप्टेंबर ९९ अंकामध्ये प्रसिद्ध झाली. काहींनी ऑगस्टअखेरपर्यंत उत्तर लिहून पाठवितो असे आश्वासन दिले होते पण ती उत्तरे सप्टेंबरअखेरपर्यंत, अजून, आलेली नाहीत, आणि आता येण्याची शक्यताही नाही, म्हणून ह्या चर्चेचा समारोप करण्याची वेळ आलेली आहे. शिवाय आता संपादक बदलले असल्यामुळे हा विषय लवकर आटोपता घेतलेला बरा.
हस्ताक्षर चांगले काढावे हा विवादाचा विषय नाही – पण शुद्धलेखन हा विवादाचा विषय झालेला आहे ह्याची कारणे पुष्कळ आहेत. पहिले कारण असे की प्रमाणभाषा आणि बोलीभाषा ह्यांच्या परस्परसंबंधाविषयी आणि त्यांच्या सापेक्ष किंवा तौलनिक स्थानांविषयी मराठी भाषकांमध्ये नुसता मतभेदच नव्हे तर गोंधळ आहे, आणि दुसरे कारण असे की भाषेचे लेखन उच्चाराप्रमाणे असावे असे काही पाश्चात्त्य पंडितांनी सांगितले ते आमचे लोक योग्य धरून चालले आहेत. आणखी एक लहानसे कारण आहे ते संस्कृतपासून भ्रष्ट होऊन आजच्या बोली निघाल्या ह्या समजावर आधारलेले म्हणजे भाषा नित्य सोपी होत जाते असे मानणारे आहे. भाषेचे सतत सुलभीकरण केले गेले पाहिजे असे म्हणून, नवशिक्या लेखकाला फार नियम लक्षात ठेवावे लागू नयेत म्हणून, एकच ईकार’ आणि एकच उकार वापरणे योग्य होईल ह्या समजावर आधारलेले आहे. कसेही आणि काहीही लिहा. वाचकाला, जो पूर्वीपासून मराठी चांगली जाणतो त्याला, कसाबसा अर्थ समजला म्हणजे झाले असे मानणा यांचे आहे.
ह्या विवादामधून बाहेर पडण्यासाठी काही उपाय माझ्या मनात येतात ते मांडतो आणि नंतर आलेल्या पत्रांचा परामर्श घेतो.
पहिला उपाय मला सुचतो तो असा की प्रमाणभाषेला प्रत्येकाने परकी भाषा मानून आपले दैनंदिन व्यवहार स्थानिक बोलीभाषेत करावे. प्रमाणभाषेचे शिक्षण मातृभाषेचे म्हणून न देता एक वेगळी भाषा म्हणून द्यावे. ही संपर्कभाषा आहे-हा संपर्क, भूतकाळात लिहिल्या गेलेल्या वाङ्मयाशी आणि निरनिराळ्या बोली जेथे बोलल्या जातात त्या त्या प्रदेशाशी, आम्हाला साधावयाचा आहे असा विचार आपण सर्वांनी करावा. प्रमाण–लिखित-भाषेला मातृभाषा (घरगुती, दैनंदिन व्यवहाराची बोली) करण्याचा प्रमाद गेल्या शतकामध्ये मुख्यतः ब्राह्मणांनी केला ती त्यांची फार मोठी चूक झालेली आहे. ती ताबडतोब दुरुस्त व्हावयाला पाहिजे असे मला येथे प्रतिपादन करावयाचे आहे.
प्रमाणभाषा ही कृत्रिम भाषा असते. ती बहुजनसंमुख नसते तर ती इतिहासाभिमुख असते. दैनंदिन वापरामध्ये कधीच न येणा-या वेगवेगळ्या विषयांसाठी ती वापरावी लागत असल्यामुळे तिच्यामध्ये आपोआप घडलेले सिद्ध शब्द कमी आणि मुद्दाम घडविलेले साधित शब्दच फार जास्त असतात. ती भावभावना शब्दांत व्यक्त करण्यासाठी मुद्दाम घडविलेली, थोडक्यात बनावट, भाषा असते. प्रत्यक्षात कोणी ‘मला असीम आनंद झाला, किंवा मला अपार दुःख झाले’ असे सांगत नसतो. आपले भाव तो शरीराने व्यक्त करतो. तो हसतो, टाळ्या पिटतो, नाचतो, बागडतो, त्याचा चेहरा उजळतो किंवा काळवंडतो, रडतो, मटकन खाली बसतो. अशा प्रसंगावर लिहिण्याची गरज जे प्रत्यक्ष हजर नाहीत त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी असते. बोलीमध्ये वृत्तान्तलेखनाची गरज निर्माण झालेली नसते. एवढ्याच कारणामुळे बोली भाषेतले शब्द आणि लिखित-प्रमाण-भाषेतले शब्द ह्यांच्या संख्येमध्ये प्रचंड अंतर असते. प्रमाण-भाषा नित्य वर्धिष्णु असते. बोलीचीही वाढ होत असते, पण ती प्रमाणभाषेमधून घेतलेल्या आयत्या शब्दांच्या साहाय्याने होते. प्रमाणभाषेत जसे बोलीभाषेमधले सिद्ध (तयार, आयते) शब्द येतात तसेच, तिचे व्याकरण झालेले असल्यामुळे, त्या नियमांनुसार घडविलेल्या, प्रत्यय लावलेल्या, धातुसाधित, नामसाधित, उपसर्गघटित, सामासिक अशा शब्दांची तेथे टाकसाळच सुरू होते. बोली वापरणा-यांना साधित शब्द कसे घडतात हे माहीत नसल्यामुळे जे प्रमाणभाषेमधले साधित शब्द तेथे येतात ते सिद्ध शब्दांसारखे वापरले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे यशश्री, निस्पृह, इतकेच नाही तर जगमित्र, मुक्तछंद असे शब्द लिहिले जातात. (हे साधित शब्द असून ते यशःश्री, निःस्पृह, जगन्मित्र, मुक्तच्छंद असे लिहावयास पाहिजेत.) असे शब्द वापरताना त्या त्या शब्दाचे मूळ अवयव कोणते त्याकडे दुर्लक्ष होते, उच्चाराप्रमाणे लेखन होते. प्रमाण-भाषेत किंवा प्रमाणीकृत भाषेमध्ये प्रत्येक शब्द कसा घडला ते डोळ्यांना दाखविण्याची सोय असते कारण प्रमाण किंवा प्रमाणीकृत भाषाच मुळी त्या समाजाला लेखनविद्या अवगत झाल्यानंतर अस्तित्वात येते. शब्दकोश आणि व्याकरण लिहून झाल्यानंतरच प्रमाणीकरणाला प्रारंभ होत असतो. ती-प्रमाण भाषा- निरनिराळ्या बोलींमधून साधारणतया सामान्य (common) शब्द आधी स्वीकारते आणि नंतर जसजशी ती स्थिरावते तसतशी ती समृद्ध होत जाऊन एका बोलीतले शब्द दुस-या प्रदेशात, म्हणजेच दुस-या बोलींत, पोचविते.
भाषेचे व्याकरण लिहून झाले की तिच्यामध्ये नवीन शब्दांची टाकसाळ सुरू होते हे आपण वर पाहिले. ह्या टाकसाळीमधले शब्द साहजिकच पहिल्याने विद्वत्जनांच्या लेखनात येतात किंवा शिष्टजनांच्या सभांमधून-जेथे श्रोतेसुद्धा व्याकरण शिकलेले असतात अशा ठिकाणी वापरले जातात. ते व्याकरणसिद्ध असल्यामुळे त्यांच्या ठिकाणीं सार्वकालिक निश्चितार्थता येत असते. तेवढ्यासाठीच ते उच्चाराप्रमाणे कधीही लिहावयाचे नसतात.
ह्या उलट देश्य शब्द, सिद्ध शब्द. त्यांमध्ये अनुकरणात्मक, किंवा नादानुकारी शब्दसुद्धा असतात. ते उच्चाराप्रमाणे लिहिले जातात; किंवा ते उच्चाराप्रमाणेच लिहिले जातात. काही फार थोडे परक्या भाषेमधले शब्द त्यांना प्रतिष्ठा असल्यामुळे बोलीमध्ये आधी रुळतात आणि ते तसे रुळल्यानंतर लेखनात वापरले जातात. असे शब्द जेव्हा उच्चाराप्रमाणे लिहिले जातात तेव्हा त्यांना (म्हणजे मुळापासून उच्चाराने दुरावलेल्यांना) तद्भव म्हणतात. अशा तद्भव शब्दांना विकार होण्यापूर्वी पुन्हा पूर्वीच्या म्हणजे तत्सम रूपास आणावे लागते.
ही प्रमाणीकरणाची प्रक्रिया न समजून घेता जेव्हा लेखन बहुजनसंमुख असावे असा आग्रह धरला जातो तेव्हा प्रमाणभाषेच्या ह्रासाची सुरुवात होते; इतकेच मला माझ्या अनावृत पत्रामधून (जून ९९) वाचकांच्या नजरेला आणून द्यावयाचे होते. आणि आता, प्रमाणभाषा ही कोणत्याही परिस्थितीत बोलीभाषा व्हावयाला नको असे, ह्या लेखात प्रतिपादन करावयाचे आहे.
शुद्धलेखनाच्या विवादातून बाहेर पडण्याचा दुसरा उपाय आता पाहू. तो आहे पुष्कळ समांतर प्रमाण-भाषा एकाच वेळी वापरण्याचा. सध्या मराठी भाषेमधली जुनी नवी पुस्तके पाहिली तर ती तीन प्रकारच्या नियमांनुसार छापलेली आढळतात. त्यांमध्ये मी आणखी एका प्रकाराची भर घालावी असे म्हणत आहे. हे लेखनाचे नियम बहुजनसंमुख असतील. त्यात नवापूरपासून सिरोंचा किंवा भामरागड; आणि आमगांवपासून गोव्यापर्यंत जे विविध स्थानिक उच्चार आहेत त्यांचा समन्वय साधून किंवा कोणत्या तरी एका बोलीला इतर बोलींपेक्षा अधिक प्रतिष्ठा देऊन तिच्यातील उच्चारांप्रमाणे जुन्या, ग्रन्थनिविष्ट, व्याकरणपूत (अथवा शास्त्रपूत), शब्दांचे लेखन कसे करावे ह्याविषयी मार्गदर्शन असेल. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर हा शब्द. तो उच्चाराप्रमाणे लिहावयाचे ठरल्यास त्याला ग्यानेश्वर म्हणावयाचे की यानेश्वर म्हणावयाचे की न्यानेश्वर करावयाचे की न्यानेस्वर किंवा न्यानेसर ते ठरवून टाकलेले बरे. आम्ही, मराठी बोलणारे, ळ चा उच्चार कोठे ड करतो, य करतो, तर आणखी कोठे र असा करतो. त्यामुळे पेळू पेरू होतो. इतकेच नव्हे तर पेरू हे नाम आणि पेरू हे क्रियापद आणि पेळू हे नाम ह्यांत पूर्वी असलेले वैधर्म्य वा त्यातली विषमता नष्ट होऊन सर्वत्र साधर्म्य वा समानता येईल. पण ते असो. नवीन पुस्तके छापली जातील त्यांच्या प्रारंभी ते पुस्तक कोणत्या नियमांप्रमाणे छापले आहे त्याचा उल्लेख करावा आणि एका पुस्तकात तरी निरनिराळ्या नियमांची गल्लत करू नये. पूर्वी जोडाक्षरे छापताना छापखान्यांवर फार बंधने असत. रक्तस्राव हा शब्द एखाद्या पुस्तकात पुन्हापुन्हा येऊ लागला तर क्त संपून जाई. मग रक्तस्राव असा प्रकार सुरू होई. दोन पानांनतर स्र संपला की स्त्र वापरीत. तो संपला की शेवटी रक्तस्राव किंवा रक्तस्राव असे काहीतरी छापावे लागे. ज्यांच्याकडे स्वतःची टाइप पाडण्याची व्यवस्था आहे असे छापखाने हाताच्या बोटांवर मोजण्यासारखे असत. त्यामुळे जोडाक्षरांच्या रूपांत एकवाक्यता नसे.
त्याचप्रमाणे इंग्रजीच्या प्रभावामुळे सामासिक शब्द म्हणजे काय हे आम्हा मराठीभाषकांना समजेनासे झाले आहे. गेल्या दोन पिढ्यांपासून त्या बाबतीत सर्वत्र आनंदी-आनंद आहे. पाठ्यपुस्तकनिर्मितिमंडळ, महाराष्ट्रराज्यविद्युन्मंडळ असे शब्द आपण लिहावयास पाहिजेत-पण ते तर असोच, उद्घाटनसमारंभासारखे साधे शब्दसुद्धा आम्ही तोडून लिहितो. तेव्हा हे असे शब्द तोडून का लिहावयाचे ह्याविषयी समर्पक कारणे देऊन त्याविषयी सर्वत्र एकवाक्यता यावी इतकीच माझी इच्छा आहे. लिखित भाषेमध्ये एकाच शब्दाची अनेक पर्यायी रूपे होऊ शकतात. उदा. पेळू, पेरू, पळतो, पडतो, परतो, ज्ञानेश्वर, न्यानेस्वर, दन्यानेश्वर, दन्यानेश्वर, द्रयानेश्वर, अईतीहासीक, एतीहासीक, अइतिहासिक, उद्ध्वस्त, अद्ध्वस्त, अस्वस्त, उद्ध्वस्त, जगन्नाथ, जगन्नाथ, जगन्नाथ, जगंनाथ, वगैरे (मला प्रत्येक शब्दांचे पाचपंधरा प्रकार करता येतात.) हे शब्द असे वेगवेगळ्या पद्धतीने का लिहावयाचे? त्याऐवजी एकाच प्रकाराने का लिहावयाचे नाही ते नीट पटवून द्यावे. सर्वांत जुने ते ‘रूढ’, त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गोवे संमेलनात संमत झालेले, तत्पश्चात् महाराष्ट्र साहित्य महामंडळाचे किंवा आता ‘बहुजनसंमत’ किंवा मध्यन्तरी श्री. वसन्त दावतर ह्यांनी आणि अलिकडे श्रीमती सत्त्वशीला सामन्त ह्यांनी सुचविलेले लेखनविषयक नियम-ह्या सहांशिवाय पूज्य विनोबांनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचविलेले आणि स्वतः वापरलेले, ह्याशिवाय आणखी पर्याय दरवर्षी निघाले किंवा प्रत्येक लेखकाने वेगळेच नियम पाळले तर वाचकाला त्रासदायक होतात. कोणता तरी एक पर्याय जर सर्वांनी मान्य करावयाचा तर मग तो जुनाच का करू नये असे विचार माझ्या मनात आल्यामुळे मी ते पत्र मुद्दाम काही मंडळींकडे पाठविले होते.
माझी ते पत्र लिहिण्यामागची भूमिका बहुतेक पूर्ण मांडून झाली. ह्या माझ्या भूमिकेमुळे कोणा एका गटावर मी अन्याय करीत आहे असे मला वाटत नाही. तसे असल्यास अजून माझ्या ध्यानात आणून द्यावे. मी माझी भूमिका बदलीन. प्रकाशित झालेल्या पत्रांतील आक्षेपांचे उत्तर वरच्या भागात येऊन गेले असावे. महाराष्ट्रसाहित्य-परिषदेचे अध्यक्ष डॉ. गं. ना. जोगळेकर ह्यांना, त्याचप्रमाणे विदर्भसाहित्यसंघाच्या कार्यकारी मंडळाच्या सभासद असलेल्या डॉ. आशा सावदेकर ह्यांना प्रत्यक्ष भेटून मी माझ्या अनावृत पत्राचे उत्तर द्यावयाची विनंती केली होती, पण काही कारणामुळे तोंडी मान्य करून त्यांची उत्तरे आलीच नाहीत. तेव्हा त्यांच्याजवळ मला उत्तर देण्याजोगा युक्तिवाद नाही आणि त्यांनी शास्त्रपूत लेखन मान्य केले आहे, असा निष्कर्ष काढावा काय?
प्रमाणभाषेविषयी हे सर्व लिहीत असताना माझ्या डोळ्यांपुढे संस्कृत-भाषेचे उदाहरण आहे. उपलब्ध इतिहासात संस्कृतभाषा कोणालाही स्वभाषा वा मातृभाषा म्हणून शिकवली गेली असे आढळत नाही. इंग्लिश माध्यमाच्या शाळा फोफावण्याच्या अगोदर ती भाषासुद्धा परकी भाषा म्हणूनच शिकवली गेली आहे. इतकेच नव्हे तर खुद्द इंग्लंडमध्ये King’s English पासून वेगळ्या बोली आजही अस्तित्वात आहेत. आम्ही जिला हिंदी म्हणतो ती (खडी बोली) गेल्या एकदीड शतकामध्ये निर्माण झालेली नवी कोरी भाषा आहे, अशी माझी माहिती आहे. त्यापूर्वी ती कोणाचीच मातृभाषा नव्हती. त्यामुळे तीदेखील आरंभी परकीय भाषा म्हणूनच शिकवली गेली आहे. तेव्हा मराठीचाही प्रमाणीकृत पाठ (version), सगळ्यांच्याच मुलांना परकी भाषा म्हणून शिकविला जाण्यास हरकत नसावी.
कोणत्याही परक्या भाषेचे उच्चार सर्वांना करता येत नाहीत. म्हणून प्रत्येकाला प्रमाण–लिखित-भाषेचे तंतोतंत उच्चार करता आले पाहिजेत हा आग्रह आम्ही सोडून दिला पाहिजे. पहिल्या चारपाचच नव्हेत तर आठव्या वर्गापर्यंत म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंतचे शिक्षण बोलीभाषेमधून क्रमाक्रमाने प्रमाणभाषेकडे नेणारे असावे; म्हणजे पाठ्यपुस्तके प्रमाण-भाषेत असावीत, पण वर्गात वापरली जाणारी (संवादाची) भाषा उत्तरोत्तर स्थानिक बोलीकडून प्रमाणभाषेकडे जाणारी असावी. साहजिकच तोपर्यंत प्रमाणभाषेचे श्रवणकौशल्य आणि वाचनकौशल्य वाढविण्यावर भर देणारे शिक्षण असावे.
आता माझ्याकडे आलेल्या आणि प्रकाशित होऊ न शकलेल्या पत्रांविषयी आलेल्या पत्रांमध्ये वा लेखांमध्ये ज्यांनी माझ्या मताला प्रतिकुल मते मांडली आहेत त्यांचाच परामर्श घेता येणार आहे.
प्रा. म. ना.. लोही ह्यांनी डॉ. वि. भि. कोलत्यांच्या भाषणाचा हवाला देऊन सुक्षिक्षितांच्या तोंडी रुळलेली भाषा ती प्रमाणभाषा झाली असे म्हटले आहे. परंतु माझे त्याविषयीचे मत मी सुरुवातीला मांडले आहे. माझी स्वतःची आजी—दोन्हीकडची–आईची आई आणि वडिलांची आई-प्रमाण बोली बोलत नसत. एक नाशिक जिल्ह्यातली होती, दुसरी अकोल्यातली. असो. त्याचप्रमाणे बोलीमधले शब्द प्रमाणभाषेत घेणे म्हणजे तत्सम शब्द बोलीच्या उच्चाराप्रमाणे लिहिणे नव्हे. अमेरिकन भाषेमध्ये Psychology सारखे ग्रीक शब्द उच्चाराप्रमाणे लिहीत नाहीत. जुन्या सगळ्या मराठी पोथ्यांच्या नकला व्याकरणशुद्ध भाषेत लिहिलेल्या नाहीत. त्यामुळे त्या दुर्बोध होतात. सुबोध होत नाहीत. लिखित भाषा ही परभाषीयांनी शिकावी असे वाटत असेल, ती दीर्घकाळपर्यंत सर्वांसाठी सुबोध राहावी अशी आपली इच्छा असेल तर तिच्या ठिकाणी प्रामाण्य (एकरूपता) राखलेच पाहिजे. प्रत्येक शब्द सर्वत्र एकाच प्रकारे लिहिलेला वाचावयाला मिळणे हा वाचकाचा अधिकार आहे आणि तितके कष्टम्हणजे त्या शब्दाचे प्रमाणरूप कोणते ते शिकण्याचे कष्ट प्रत्येक लेखकाने घेतलेच पाहिजेत. ‘साक्षरता वाढवावयाची असेल तर प्रमाणरूपाचा आग्रह सोडणे भाग आहे’, असे ते म्हणतात. इंग्लिश मातृभाषा असणान्यांमध्ये साक्षर लोक कमी आहेत काय? ते blue आणि blew, soul आणि sole, write आणि right हे शब्द एकाच्या ऐवजी दुसरा लिहा असे कधीतरी म्हणतील का? Shorthand मध्ये तसे लिहितात पण म्हणूनच त्यांचे लिप्यन्तर करावे लागते. Shorthand ने काम भागले असते तर सर्वांसाठी त्याच लिपीत त्यांनी पुस्तके छापली असती.
अमृत मासिकाचे संपादक मनोहर शहाणे म्हणतात, ‘आशयाबरोबर अभिव्यक्तीच्या संदर्भात शुद्ध आणि परिष्कृत लिखित रूपे ह्या बाबत ग्रामीण आणि दलित साहित्यप्रकार मुक्त आहेत.’ मला असे वाटत नाही. बोलीभाषेत लिहूच नये असे मी कोठे म्हटल्याचे मला स्मरत नाही. बोलीतून प्रमाणभाषेत शब्द घेऊ नयेत असे मी म्हटले नाही. लिखित भाषा एकसारखी ठेवल्याने ती दीर्घकाळपर्यंत सुबोध राहते म्हणून ती तशी ठेवावी हा माझा आग्रह आहे. माझ्या उतारवयात मी उर्दू वाचावयाला शिकू शकलो, कारण तिच्यातले शब्द कधी एका प्रकारे तर कधी दुस-या प्रकारे लिहिलेले नसतात म्हणून. प्रत्येक देशातले इंग्रजी वेगळे आहे असे ते म्हणतात. ह्याचा अर्थ असा की Married to ऐवजी आम्ही Married with असे लिहू लागलो. आणि अशांसारखे बदल आमच्या मातृभाषेच्या घडणीशी सुसंगत असल्यामुळे आम्हाला खुपेनासे झाले. (पण ते ब्रिटिशांना खुपतात!). पण आम्ही their ऐवजी there किंवा zer लिहिले तर ते चालेल का? लेखन बदलणे म्हणजे कोशगत शब्दांचे लेखन आपल्या आपल्या उच्चारांप्रमाणे करणे. ते का नको त्याची कारणे पूर्वी सांगून झाली आहेत. आपसांत, एकमेकांना समजत असेल तर, लोकांनी काय वाटेल ते लिहावे. छापताना ते शब्द पूर्वीसारखेच छापले तर वाचकांची सोय होईल आणि ती निरंतर होईल असे मला वाटते.’
श्री. श्यामकान्त कुळकर्णी ह्यांचे पत्र माझ्या मतांशी बहुशः जुळणारे आहे. त्यामुळे त्यांना सविस्तर उत्तर देण्याची गरज नाही. श्री. म. ना. गोगटे ह्यांचे रोमन लिपीचे प्रेम सर्वविश्रुत आहे. त्यांना त्यांचा मुद्दा आजचा सुधारकमधून मांडण्याची संधी हवी आहे. पण त्यांना मी वेळोवेळी खाजगी पत्रे लिहून त्यांचे मत कसे गैर आहे ते पूर्वीच सांगितले आहे. त्यांनी कोणताही नवीन मुद्दा ह्या पत्रात मांडलेला नसल्यामुळे ज्यांना रोमन वापरावयाची आहे ते ती वापरतील किंवा असे म्हणू या की ती त्यांनी वापरावी. पण मराठीचे देवनागरीमधील लेखन कसे असावे एवढाच चर्चेचा विषय असल्यामुळे त्यांचा लेख छापण्याचे आणि त्यावर उत्तर देण्याचे कारण मला दिसत नाही.
औरंगाबादचे डॉ. चन्द्रकान्त धांडे हे व्याकरणशुद्ध लेखनाच्या पक्षाचे आहेत. त्यामुळे त्यांचा आणि आमचा मतभेद नाही. श्रीमती शकुन्तला फडणीस लेखनाचे नियम लवचीक असावे अशा मताच्या आहेत, पण त्यांना अगदी लवचीक नियमांच्या इंग्रजी भाषेत लिहिलेले पत्र नायजेरियामधून किंवा टांझानिया-हरारेमधून किंवा व्हेनेझुएलामधून आले, तर त्याचा निश्चितार्थ दूर पण भावार्थ तरी कळेल काय ह्याचा त्यांनी विचार करावा. आमची मराठी जर देशांतरी जावयाची असेल तर तिला कडक नियमांत बांधावे लागेल आणि कोशामध्ये सापडतील अशी शब्दांची रूपेच तिच्यांत वापरली जावी असे आम्हाला का वाटते ते त्यांना कळेल.
श्री. कौस्तुभ ताम्हनकर आणि वाचस्पति गोपाळ श्रीनिवास बनहट्टी, त्याचप्रमाणे श्री भ. पां. पाटणकर ह्यांचीही मोठी पत्रे आली आहेत; त्यामुळेच त्यांना उत्तर देणे फार कठीण झाले आहे. त्यांच्या पत्रांचा परामर्श ह्या लेखात स्वतंत्रपणे घेणे अशक्य आहे. फादर दिब्रिटो ह्यांचे पत्र स्वतंत्र छापत आहोत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.