सर्वधर्मसमभाव म्हणजे घाबरगुंडी!

सर्वसाधारणपणे “धर्मनिरपेक्षता” म्हणजे राज्यसत्ता व धर्मसत्ता यांचा काडी-मोड. तसेच वैयक्तिक पातळीवर धर्मनिरपेक्षता म्हणजे नोकरी, धंदा, शैक्षणिक प्रवेश, प्रवास, इ. ‘न-धार्मिक’ क्रियांत धर्म विचारात न घेता वागणूक देणे वा घेणे.
“सर्वधर्मसमभाव” हे मात्र मोठेच गौडबंगाल आहे. धार्मिक बाबतींत सर्व धर्म समानच असतात, त्यामुळे एकाने दुस-याला शिकवण्याचा शहाणपणा करू नये, असे काहीसे त्याचे रूप आहे. “आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्”, हे हिंदूंना तसे नवीन नाही. त्यामुळे विविध देवदेवतांची पूजा करण्यातील विरोधाभास दूर होतो. मात्र इतर धर्मांत नमस्कारच नसल्याने तो केशवास कसा पोचतो, किंवा पोचतो का, हे अस्पष्टच राहते.
आधुनिक काळात रामकृष्ण परमहंसांनी यावर अभ्यास केला असता त्यांना याचा पुरावा मिळाला. त्यांनी मुसलमानी व ख्रिश्चन पद्धतीने आराधना केल्यावरही त्यांना समाधी प्राप्त होऊन नेहमीप्रमाणे कालीमातेचे दर्शन घडले, अशी गोष्ट आहे. गांधींनी बायबल व कुराण वाचून असेच मत मांडले होते. अद्वैती परंपरेप्रमाणे या सर्वच उपासनापद्धतींना मिथ्या मानले जाते तोही एक प्रकारचा समभावच! हल्ली एका मुसलमान नेत्याचे मत माझ्या वाचनात आले. त्यांनीही समभावच सांगितला पण तन्हा थोडी वेगळी. असे सांगितले जाते, की इस्लाममध्ये महंमद पैगंबरापूर्वी होऊन गेलेल्या हजारो प्रेषितांचा उल्लेख आहे. तर इस्लामधर्मीय रामकृष्णादि नानावतारांना त्यात सहज स्थान देऊ शकतात. मग वाद तो कोठला! फक्त महंमद हा शेवटचा प्रेषित हे मान्य करा!
या सर्वांचे म्हणणे काय, तर सर्वधर्मसमभावामुळे धर्मांतर निरर्थक ठरते. त्यामुळे त्यात पैसा वा वेळ वाया घालवू नये. त्यासाठी सोपा उपाय म्हणजे धर्मांतरावर कायद्याने बंदी असावी. पैसा, शिक्षण, सामाजिक स्थान यांसारख्या उपासनाभिन्न हत्यारांनी धर्मातर केल्यास तो गुन्हा समजावा. एकमेकांनी एकमेकांची उणीदुणी काढू नयेत. प्रत्येकाने आपला व आपल्या धर्मपंथाचा विकास साधावा.
इतिहासकाळात विविध धर्मप्रचारक लोकांच्या उद्धारासाठी एकमेकांत शाब्दिक व शारीरिक वाद घालत असत. त्या ओघात एकमेकांची उणीदुणी काढीत असत. अशा प्रक्रियेतून आपल्याकडे संकर होऊन नवीन धर्मपंथ (उदा. सूफी, प्रार्थनासमाज, ब्राह्मसमाज, आर्यसमाज) उदयास येत असत. काही जण (उदा. रेव्हरंड टिळक) दुस-याचे म्हणणे मान्य करून त्यांच्या धर्मात प्रवेश घेत असत. या वादांमुळे धर्म-चिकित्सा होत असे. या उलट सर्वधर्मसमभाव म्हणजे दुस-याने आपल्या धर्माची चिकित्सा करण्यावर बंदी. ओघानेच, चिकित्सेतून जे विवेकी विचार प्रसृत होतात त्यावरही बंदी.
सांगायचा मुद्दा, सर्वधर्मसमभाव विविध धर्मामध्ये एक प्रकारची ‘युद्धबंदी’ आणू पाहत आहे. याचा उद्देश मुख्यतः आपल्या अवगुणांची प्रसिद्धी थांबविणे, हा आहे. चिकित्सेमुळे उघडे पडण्याची भीती आहे व ती घाबरगुंडी झाकण्याचाच हा एक प्रयत्न आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.