कामशास्त्री कर्वे (नव्या चरित्राच्या निमित्ताने)

माणूस मृत्यूनंतर मोठा होतो. कर्त्यांच्या बाबतीत हे विशेषच खरे आहे. येत्या १४ ऑक्टोबरला त्यांच्या मृत्यूला ४६ वर्षे होतील. या काळात त्यांची दोन चरित्रे प्रसिद्ध झाली. ‘उपेक्षित द्रष्टा’ हे दिवाकर बापटांचे १९७१ साली आणि य. दि. फडक्यांचे ‘र. धों. कर्वे’ १९८१ साली. सध्या उपेक्षित योगी या नावाचे त्यांचे एक नवे चरित्र आमच्याकडे अभिप्रायार्थ आले आहे, ‘पूर्वीची चरित्रे अपुरी व अनभिज्ञ वाटल्याने हा नवा ग्रंथप्रपंच’ (पृ १८)’ असा दावा प्रस्तुत लेखकाने केला आहे. लेखक बेळगावचे श्री मधुसूदन गोखले यांनी आपण ४० वर्षे कुटुंबनियोजन क्षेत्रात काम केले आणि १२ वर्षे एका पदव्युत्तर संस्थेत प्राध्यापकी केली, असे सांगितल्यामुळे पुस्तकाबद्दल अपेक्षा उंचावतात. पण फार वेळ त्या तेथे राहत नाहीत.
कर्व्यांचे असामान्यत्व अनेक प्रकारे सांगता येते. त्यांचे पहिले चरित्रकार श्री. दिवाकर बापट त्यांना ‘उपेक्षित द्रष्टा’ म्हणतात. ते वर्णन म्हणून समर्पक आणि मूल्यमापन म्हणून ‘मार्मिक’ आहे. स्वतः कर्वे आपण ‘आगरकरांचे एकटे वारस
आहोत असे म्हणत अर्थात् ते कठोर बुद्धिवादी या अर्थाने. आज याच विचारसणीस आपण ‘विवेकवाद’ म्हणतो. विवेकवादाची खोली, व्याप्ती आणि त्याची तर्कशुद्ध परिणती याचे कर्त्यांनी रेखाटलेले चित्र थक्क करणारे आहे. कर्वे यांची मांडणी विलक्षण काटेकोर. शब्दयोजना अचूक आणि मोजकी. शैली सडेतोड असे.
*(१) कंसातील आकडे चरित्रातील पानांचे.
१. आगरकरप्रणीत बुद्धिवादाचा पहिला विशेष असा की, मनुष्याची एकंदर प्रगती होत. आहे. ज्ञानात वाढ होत आहे. त्यामुळे पूर्वजांचे शहाणपण आणि त्यांची शास्त्रे यांना आपोआप मर्यादा पडतात. उघडच आप्तवचन हे सत्याचे प्रमाण होऊ शकत नाही. (आणि पुराणात कोणी म्हटले म्हणून पुनर्जन्म आहे हे सिद्ध होत नाही.).
२. बुद्धिवादाला इहवादाची सीमा आहे. जीवन म्हणजे इहलोकीचे जीवन. ते सुखी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. सर्वांना सारखा.
सर्वेऽपि सुखिनः सन्तु। सर्वे सन्तु निरामयाः।।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दःखमाप्नुयात्।।
या सर्वांत स्त्रियाही आल्या. धर्माने आजवर त्यांच्यावर फार अन्याय केला आहे. जगातल्या सर्व धर्मानी. वस्तूवर असते तशी त्यांच्यावर पुरुषांची मालकी मानली आहे.
३. बुद्धिवादाला व्यक्तिस्वातंत्र्य हा मूलाधार वाटतो. दुस-याच्या न्याय्य हक्कांचे नुकसान न करता जे जे सुख भोगता येईल ते ते भोगण्याची प्रत्येकाला मुभा आहे
आणि ‘यातच कामसुखाचा समावेश होतो.’
ही कर्वे यांच्या बुद्धिवादाची रूपरेषा.
संततिनियमनाचा पुरस्कार हे स्त्रीदास्य-विमोचनाचे कार्य आहे असे आगरकर समजत. ते म्हणतात-
आम्हांस असे वाटते की, कालांतराने फाजील संतत्युत्पत्ति होऊ न देता स्त्री पुरुषांचा संयोग होऊ देण्याची युक्ति काढता येईल. स्त्रियांच्या आरोग्यरक्षणाला आवश्यक म्हणून जी काय दोन तीन मुले ठरतील तेवढी तरुण वयांत करून घेतली म्हणजे पुढे टांकसाळ बंद ठेवण्याचा उपाय शोधून काढण्याकडे वैद्यकशास्त्राचे मन लागले आहे व या कामांत लवकरच यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. असे झाले तर आतांप्रमाणे डझन किंवा दीड डझन अल्पायुषी मनुष्यप्राणी जगांत आणण्यापेक्षा आईबापांच्या जागी खुटास खंट उभा करण्यापुरती दोन सुदृढ पोरे झाली तर बस्स आहेत.’ (पृ ३७) १८८२ साली केसरीच्या अग्रलेखातील आगरकरांचा हा विचारउपेक्षित योगी या चरित्रग्रंथाच्या आरंभी लेखकाने दिला खरा पण त्याचे मर्म त्याच्या लक्षात आलेले दिसत नाही. त्याला दिसतो फक्त एक योगायोग. त्याच वर्षी, १८८२ मध्ये रघुनाथ धोंडो कर्वे या संततिनियमन-पुरस्कर्त्यांचा झालेला जन्म.
संततिनियमन केले नाही तर लोकसंख्येचा सर्वभक्षक बकासुर आपल्या प्रगतीचा आणि सुखाचा संहारक बनेल हे ओळखण्यात आणि उच्चारवाने सांगण्यात कर्त्यांचे द्रष्टेपण आणि सुधारकी बाणा तर दिसतोच. पण त्याहीपेक्षा मर्यादित संतती स्त्रीला सुखकारक होते हे सांगण्यावर त्यांचा भर आहे. हे स्त्रीदास्यविमोचनाचे काम आहे. व्यक्ति-स्वातंत्र्याच्या मूल आधारातून त्यांचे स्त्रीच्या कामस्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान उद्भवले आहे. ‘तुझ्या शरीराची मालकीण तूच’ हा कर्त्यांचा स्त्रियांसाठी बुद्धिवाद आहे. नको असेल तर विवाहित स्त्रीलाही पतिसमागम नाकारण्याचा अधिकार त्यात येतो. हा अधिकार कबूल करण्यात नीती आहे. कारण त्यात व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर आहे, किमान मान्यता आहे. उलट पत्नी पतीची मालमत्ता आहे हे द्रौपदीच्या काळापासून चालत आलेले धर्मशास्त्र अन्याय्य आहे. हा धर्म स्त्रीचे दास्य पुरस्कारणारा म्हणजे अनीतीस वाव देणारा आहे. कर्वे आणखी पुढचा तर्क मांडतात. विवाहित स्त्रीपेक्षा, पैशासाठी समागम सोसणारी स्त्री-वेश्या-बरी. तिला नको असलेला संयोग नाकारण्याचा अधिकार तरी आहे.
आमच्या धर्मशास्त्राने विवाहित स्त्रीचा स्वतःच्या शरीरावरील हक्क नाकारला आहे, हे फुलमणि-हरिमोहन खटल्यात (इ.स. १८९०) किंवा डॉ. रखमाबाई-दादाजी खटल्यात (इ.स. १८८४-८७) सिद्ध झाले आहे.
संततिनियमन सामाजिक हितासाठी आवश्यक खरेच, पण माणसाला समाजाच्या हितापेक्षा स्वतःच्या हिताची भाषा जास्त समजते. म्हणून तुमच्या सुखासाठी संततिनियमन करा असा त्यांचा स्त्रीपुरुषांना हितोपदेश आहे.
कर्व्यांनी व्यक्तीचे आणि समाजाचे’ आरोग्य हे आपल्या मासिकाचे ब्रीद मानले. आणि आरोग्य’ म्हणजे शारीरिक आरोग्य अशी त्याची व्याप्ती वाढविली. आणि त्यात केवळ तत्त्वज्ञानाचा खलच न करता व्यवहारोपयोगी माहितीही दिली जाईल’ असा खुलासा केला आहे. पुढेही ते सांगत असतात की, ‘ह्या मासिकाच्या नांवावरूनच हे समजण्यासारखे आहे की लैंगिक विषयांना वाहून घेणे हा आमचा उद्देशच नव्हता.’
असे जर आहे तर समाजस्वास्थ्य म्हणजे लैंगिक नीतीची चिकित्सा असे समीकरण का झाले या प्रश्नाचे उत्तर ते असे देतात की, ‘स्वतःला बुद्धिवादी म्हणविणारे लोकदेखील या एक विषयांत मात्र बुद्धिवादाचा उपयोग करावयास तयार नसतात. याबाबतींत मनुष्याने जुन्या चाकोरीतूनच चालले पाहिजे, अशी त्यांची नीतीची कल्पना असते, कारण अनीतीची व्याख्याच अशी झाली आहे की, स्त्रीपुरुष संबंधांतील चालू निर्बध न पाळणे म्हणजे अनीति.’
समाजस्वास्थ्य मासिकात शिष्टसंमत न मानलेल्या निकोप लैंगिक जीवनाबद्दल वाचकाचे उद्बोधन तर असेच, पण कितीतरी नवीन विषयांचा अंतर्भाव त्यात कर्वे करीत. मात्र, त्यांत हे असावें ते असावे’ अशा आग्रही सूचनाकर्त्यांना ते ‘आमच्या मासिकाचे धोरण काय असावे हे आपण ठरविणार की आम्ही?’ असा प्रतिप्रश्न करून निरुत्तर करीत. त्वचेचे आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे दाखवून त्यासाठी नग्नता हा विषय त्यांनी अनेक लेखांतून चर्चेला घेतला. पाणी किती प्यावे, कॉलरा, मलेरिया-प्रतिबंध, जीवनसत्त्वे व आहार, तोतरेपणा घालवण्याचा उपाय, हातांची जोपासना असे आरोग्यविषयक लेख तर त्यात असतच पण साहित्य हा विषयही त्यांना प्रिय होता. कथा, कादंब-या, नाटके यांचे परिचय-परीक्षण ते आवडीने करीत. विविध वृत्तपत्रांतून आलेल्या निवडक बातम्यांवर ते खुसखुशीत भाष्य करीत. आहारासंबंधी त्यांनी केलेले प्रयोग व कच्च्या आहाराचे ज्ञान व अनुभवलेले फायदे यावर त्यांनी लेखन केले. कडबोळ्यासारख्या रुचकर पदार्थांच्या पाकक्रिया इतकेच काय दाढी कशी करावी? असे विषयही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. कारण ते सुखकारक होते.
कर्वे यांच्या कार्याचे य. दि. फडक्यांनी केलेले विवेचन संशोधन-प्रबंधासारखे रूक्ष (एका प्रकरणात त्यांनी ७१ अवतरणे आणि शेवटी संदर्भ नामावली दिली खरी!) आहे. त्यांचे वाचनीय स्वरूपात चरित्र लिहून त्याला न्याय द्यावा असा प्रसिद्ध कामशास्त्रपंडित डॉ. विठ्ठल प्रभू यांचा सल्ला ऐकून लेखकाने प्रेरणा घेतली. एखाद्या सविस्तर ग्रंथातच त्यांच्या जीवितकार्याचे खरे मूल्यमापन करता येईल. (पृ १०) असा संकल्प करून गोखल्यांनी प्रस्तुत चरित्र लिहिले आहे. बेळगावच्या ‘नवसाहित्य बुक स्टॉल’ने ते दिमाखदार स्वरूपात प्रकाशित केले आहे. शुभ्र कागद, नयनसुख देणारा टाईप, कल्पक नि चित्ताकर्षक सजावट आणि पुठ्याची मजबूत बांधणी करून प्रकाशकाने आपले काम देखणे केले आहे. पण ते चोख केले असे म्हणवत नाही. मुद्रणदोष डोळ्यात खुपावेत इतके झाले. ही चूक कदाचित लेखकाची नसेल पण लेखन गबाळग्रंथी झाले आहे ही कोणाची चूक? याची किती उदाहरणे द्यावीत?
१. रँग्लर परांजपे यांच्या आत्मवृत्ताचे नाव ‘नाबाद’ असे दिले आहे. ते मुळात ‘नाबाद ८९’ असे आहे. उघडच मूळ मुस्तक त्यांनी पाहिले नाही नि जिथून हे नाव उचलले तिथून नीट उतरवून घेतले नाही.
२. कर्त्यांनी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक २६ वर्षे ४ महिने चालवले. (जुलै १९२७ ते ऑक्टो १९५३) ही कालगणना लेखक वारंवार २७ वर्षे ४ महिने अशी करतात. (पृ. १२ व पृ. ९८).
३. आकाशवाणीवर आपण दिलेल्या व्याख्यानांचा कालावधी सांगण्यात देखील ते सुसंगती राखत नाहीत. (पृ.१६ वर २५ मि., पृ.९० वर २० मि., आणि मलपृष्ठावर .. १५ मि.) ४. आपण नवे पुस्तक का लिहितो याची एकाखाली एक ४ कारणे नोंदवून ते म्हणतात, ‘या पाचही बाबतींत पूर्वीची चरित्रे अपुरी व अनभिज्ञ वाटल्याने हा नवा ग्रंथप्रपंच’ (पृ.१८).
५. अॅनी बेझंटना पृ. ८२ वर ते खुशाल १८ व्या शतकात टाकतात. मात्र बँडलॉ आणि बेझंटबाईंवर १८७७ साली खटला झाल्याचे ते त्याच पानावर लिहितात.
६. मलपृष्ठ ४ वरील प्रकाशकाच्या ‘ब्लर्ब’ मध्ये अशीच निष्काळजीपणाची भाषा आहे. कर्त्यांनी पॅरिसमध्ये गणितातील उच्च डिप्लोमा घेतला होता तो लेखकाने ‘उत्युच’ (अत्युच्च) केला आहे. कर्त्यांनी स्वतः समाजस्वास्थ्यात सांगितले आहे की हा एम. ए. च्या पुढचा पण पीएच.डी.पेक्षा कमी असा डिप्लोमा आहे. य. दि. फडके यांनी समाजस्वास्थ्याचे सर्व अंक पाहिले नि आपण य. दिं. चे पुस्तक पाहिले अर्थात आपण समाजस्वास्थ्य पूर्ण पाहिले अशा जातीचा गोखल्यांचा तर्क असल्यावर वेगळे काय होणार? पुस्तकाची विश्वसनीयता कमी होते याची त्यांना पर्वा नाही.
७. लेखकाला अचूक लेखनाचे सोयरसुतक नसल्याचे जागोजाग दिसते. ‘नामूलं लिख्यते किंचित्’ हे वाक्य ते खुशाल ‘ना मूलं लिख्यते किंचित्’ (पृ.१९, २०) असे लिहितात.
८. संस्कृतविषयक अडचणी आल्या तिथे मी प्रा. स. वा. दीक्षित यांचेकडे धाव घेतली’ (पृ.२३) असे ते म्हणतात. कर्त्यांची पत्नी मालतीबाई किती विविध भूमिकापार पाडीत हे सांगताना त्यांनी ‘गृहिणी सचिवः सखी मिथः, प्रियशिष्या ललितेकलाविधौ हा कालिदासाचा’ प्रसिद्ध चरण घेतला. तो भारवीचा म्हणून ते सांगतात. आता भारवी कोठून आला? याचे उत्तर आद्यचरित्रकार दिवाकर बापटांच्या ग्रंथात मिळते. बापटांनी मूळ चूक केली. तिथून आपले विवेचन उतरवताना यांनी ती मुळाबरहुकूम उचलली आहे.
९. तीन वर्षांच्या बेकारीने त्रस्त कर्त्यांना ‘शेवटी नाईलाजाने रोझेन्थाल कडे द. म. ५०० रु. पगाराची नोकरी पत्करावी लागली’ असे ते लिहितात. (पृ.१०६) मात्र पान ८९ वर ते लिहितात ‘(रोझेथॉल कंपनीत) या सर्व कामाबद्दल त्यांना दरमहा केवळ २०० रु. पगार मिळत असे.’ हा काळ १९२४ ते २७ चा. त्याकाळी दोनशे रुपयेही पुष्कळ मोठी रक्कम असता नाइलाजाने ५०० रु. ची नोकरी पत्करली हे. कसे?
१०. समाजस्वास्थ्यकारांवर अश्लीलतेचे तीन खटले झाले. प्रस्तावनेत तीनचे चार केले आहेत. याची लेखकास शुद्ध नाही. खरी गोष्ट अशी आहे की, तीन काय चार काय, पाच काय किंवा २५, २०, १५ काय, अन् २०० म्हणा की ५०० सगळे त्यांना सारखेच. हे एक सख्यांचे झाले; पण कालिदास काय अन् भारवी काय, कशाचा कशाला ताळमेळ नाही. आणि सर्वात हद्द झाली ती पुढेच आहे.
या सुमारे दोनशे पानी चरित्रात पहिली ३३ पृष्ठे या चरित्रग्रंथासाठी आपण कसे उद्युक्त झालो नि त्याची साधनसामग्री कसकशी गोळा केली याची कहाणी आहे. शेवटची १४४ ते १८८ ही ४५ पाने पूर्वचरित्रकार व लेखक, समीक्षक दिवाकर बापट, य. दि. फडके, म. वा. धोंड यांच्या लिखाणातील मजकूर शब्दशः उतरवला आहे. ती चोरी नाही. कारण मूळ स्रोत दिला आहे. पण उसनवारी नक्कीच आहे. ही ७८ पाने गेल्यावर सुमारे १२५ पाने चरित्र आहे. त्यात भरपूर पुनरुक्ती आहे. लेखकाचे स्वतःचे म्हणून जे लेखन आहे ते वाचनीय करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या अभिरुचीवर आणि मगदुरावर चांगलाच प्रकाश टाकतो. ते लिहितात; समाजस्वास्थ्य हे मासिक र. धों. व मालतीबाईंचे अपत्य, अयोनिसंभव होते. २७ वर्षे ४ म. आयुष्य मिळालेल्या या बालकाचे र. धों. नी मृत्यूपर्यंत लाडच केले. बाळाची आई (मालतीबाई) त्याच्या ऐन तारुण्यात त्याला पोरका करून देवाघरी गेली. फ्रेंच संस्कृती अंगी मुरलेल्या रघुनाथरावांनी जणू काही फ्रेंच वातावरणातच वाढविला. “वयाच्या दीड वर्षापासून अर्धनग्न मादक तरुणींच्या अंगाखांद्यांवर लोळण्यात त्याचे आयुष्य गेले. पुष्ट देहाच्या सुंदर केशकलापाच्या, नखरेल अशा या बायकांचे सान्निध्य त्यास आजन्म मिळाले. या त्याच्या मैत्रिणी कुणी यहुदी, कुणी अमेरिकन तर कुणी इंग्लिश होत्या. अशा स्त्रियांचे शरीरगंध त्याला ज्ञात झाले. अधूनमधून चिनी व जपानी सौंदर्याचे नमुने त्याने जवळून पाहिले. हा त्यांच्या अंगवेष्टणातच वाढला. बापाने धरलेला नग्नतेचा आग्रह आणि समागमस्वातंत्र्याचा मंत्र मुलाने पुरेपूर अनुभवला असेल. वयाच्या केवळ २७ व्या वर्षी अकाली मृत्यू पावलेल्या या बालकाबाबत त्याच्या कौतुकाकडे अनिमिष नजरेने पाहणाया प्रेक्षकांना त्याच्या मृत्यूपेक्षा त्यांच्याबरोबर ‘दरवेळी बदलणा-या सुंदरी आता दिसणार नाहीत याचीच हळहळ अधिक वाटली
असेल.” (पृ. ९९)
सुप्रसिद्ध समीक्षक म. वा. धोंड आणि चोखंदळ प्रकाशक श्री. पु. भागवत यांनी त्यांना शुभेच्छा देताना तर दिल्या पण प्रकाशित पुस्तक पाहिल्यावर कपाळावर हात मारून घेतला असणार! श्रीमती शकुंतलाबाई परांजपे यांनी हे सर्वांगपरिपूर्ण चरित्र वाचून मी कृतकृत्य झाले आहे’ (पान ३१) असे आपल्या पत्रात म्हटले आहे. श्री. ज. जोशींच्या बखर रघुनाथाची या कादंबरीला ‘गाढव आहे ती कादंबरी’ असा शेरा देणा-या शकुंतलाबाई हे पत्र लिहितेवेळी (८-९-९८) ९२ वर्षांच्या होत्या. त्यांनी ते न वाचताच लेखकाला हे प्रमाणपत्र दिले असावे हे उघड आहे. आपल्या हाती लागलेली अमोल सामग्री घेऊन लेखक अमोल पालेकरांना भेटले. ते म्हणाले, ‘जे जे तुम्ही शोधून काढलेत ते ते लिहिलेच पाहिजे असे कुठे आहे?’ लेखक म्हणतात, ‘मी चमकलो. नवी काही विपरीत माहिती कशी लिहावी या विचारात असलेला मी पालेकरांच्या बुद्धिचापल्याने वाचवला गेलो.’ (पृ.२९) काय होती ही विपरीत माहिती?
कर्व्यांच्या पत्नी मालतीबाईंनी संततिप्रतिबंधक शस्त्रक्रिया करून घेतली. कर्त्यांचे चरित्रकार दिवाकर बापट लिहितात, ‘ह्या शस्त्रक्रियेच्या संबंधात लिहिताना श्रीमती शकुंतलाबाई परांजपे ह्यांनी एक मर्मस्पर्शी वाक्य आपल्या लेखात लिहिले आहे. त्या म्हणतातः ‘Thus his noble heredity died with him’ (उपेक्षित द्रष्टा पान २१) पुढे १९२६ साली कर्वे आफ्रिकेत आपल्या भावाकडे, डॉ. शंकर धोंडो कर्वे यांच्याकडे गेले असता त्यांनी स्वतःवर नसबंदी-शस्त्रक्रिया करून घेतली. (फडकेकृत चरित्र पान ५६). कर्वे समागमस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. त्यांचे स्वतःचे वर्तन ह्या प्रकारचे होते अशी नवी माहिती लेखकाला मिळाली असणे संभवते. तसे असेल तर तीमुळे चरित्राचे काय नुकसान होणार होते? ते जन्मभर ज्या मताचा हिरिरीने पुरस्कार करत होते तसे स्वतः वागले हे सांगणे गैर कसे? श्री.ज.जोश्यांच्या कादंबरीत, (बखर रघुनाथाची) त्यांची अन्तेवासी सहकारी महिला त्यांना शय्यासोबत करायला बोलावते असा एक प्रसंग आहे. श्री. जं. नी तिच्या वयाची अशी गफलत केली आहे की ती स्त्री ७३ वर्षांची आहे असे दिसते. प्रत्यक्ष श्री. जं. च्या डोळ्यांसमोर असणारी ती प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ती तेव्हा ४५ वर्षांची असणे शक्य असते. ह्या सर्व लिखाणात श्री. जं. चे कसे तारतम्य सुटले आहे हे म. वा. धोंडांनी मार्मिकपणे दाखवले आहे. ती महिला, तिचे संबंध याबद्दल काही आधार, समजा लेखकाला सापडले असतील. तरी संबंधित व्यक्तींची बदनामी होणार नाही अशी खबरदारी घेऊन लेखकाने तोही भाग प्रकाशात आणायला हवा होता. त्यासाठी अमोल पालेकरांच्या बुद्धिचापल्याचा आधार घ्यायची काय जरुरी होती?
य.दि.कृत कर्वेचरित्रात, त्यांच्या कार्याची ओळख करून घेताना अनेक गोष्टी खटकत राहतात. कर्त्यांनी ज्या सुखवादाचा पुरस्कार केला तो नुसताच इहवादी नसून स्वार्थसुख-वाद आहे. त्याचे मूळ सूत्र आहे की, मनुष्य सर्वदा स्वसमाधानासाठी काम करतो. अगदी दुसन्यासाठी स्वतःचा जीव देणारा मनुष्यही त्या कृतीने आपले समाधान होते म्हणून ती कृती करतो. तेच कर्वे परोपकार म्हणजे नीती, सर्वांच्या सुखासाठी झटणे म्हणजे सुखवादी नीती असे म्हणतात. मनुष्य जर स्वभावतः केवळ स्वार्थी असेल तर त्याने परोपकार करावा हे म्हणणे कसे सयुक्तिक होईल? या प्रश्नाचा ऊहापोह त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करताना करावा लागेल.
य.दि.म्हणतात, स्त्रीस्वातंत्र्याचे कैवारी कर्वे स्त्रियांनी उगीचच समतेचा ध्यास घेऊ नये असे म्हणतात. हट्टाने, पुरुष करतील ती ती कामे आम्ही करणार असा त्यांनी हेका धरू नये. त्यांना रंगमहाल हवा असतो. पुरुषाच्या मानाने त्यांना न्यायाची चाड कमी असते. अखेर सुखासाठी किंवा प्रजननासाठी समागम हेच स्त्रियांचे जीवितकार्य असते असे कर्वे समजतात (समाजस्वास्थ्य १९५१ ऑगस्ट ते नोव्हेंबर). कर्त्यांच्या या मतांची शहानिशा होणे, त्यांची चिकित्सा करणे हे त्यांच्या जीवितकार्याचे म्हणा की बुद्धिवादाचे म्हणा खरे मूल्यमापन होईल. ते करायला लेखक मधुसूदन गोखल्यांपेक्षा जास्त ताकदीचा लागेल. पूर्वीची चरित्रे अपुरी व अनभिज्ञ वाटल्याने आपला ग्रंथप्रपंच हा त्यांचा दावा पोकळ आहे. तसेच या सविस्तर चरित्रग्रंथात कर्त्यांच्या जीवितकार्याचे खरे मूल्यमापन करता येईल (पृ. १०) हाही समज त्यांचा भ्रम होता हे दिसून येते. कर्त्यांची आठवण ताजी करून द्यायला गोखल्याच्या चरित्रग्रंथाने हातभार लावला आहे एवढे मात्र खरे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.