पुनर्जन्म, धम्म आणि आरक्षण

आजचा सुधारक अप्रत्यक्षरीत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार उचलून धरीत आहे. त्यामुळे दलितोद्धाराच्या कामास हातभार लागत आहे. डॉ. आंबेडकरांना देव व आत्मा यांचे अस्तित्व मान्य नव्हते. आजचा सुधारकला हा विचार आपल्या विवेकवादातून मांडावयाचा आहे.

आपल्या जुलै १९९९ च्या अंकात श्री. अनिलकुमार भाटे लिहितात, बौद्धधर्माचा कर्मसिद्धान्त व हिंदुधर्माचा कर्मसिद्धान्त एकच आहे. बौद्धधर्मात ईश्वराचे अस्तित्व मानले नाही तरी हा कर्मसिद्धान्त अबाधित राहतो. अनेक जन्मांमध्ये पडलेल्या (संचिताच्या) असंख्य प्रतिबिंबाचा प्रचंड साठा आपण सदैव वागवीत असतो.”

याउलट डॉ. चिंचोळकरांनी सप्टेंबरच्या अंकात तर्कशुद्ध बाजू मांडली. कर्मसिद्धान्त सृष्टिनियम आहे असे मानल्यास एखाद्या चेतनशक्तीद्वारे कर्मफल उत्पन्न होते व कर्मसिद्धान्त चालतो, असे मानावे लागेल. पण त्यासाठी कोणताही आधार नाही.” भगवान बुद्धदेखील या विश्वाच्या पलिकडे काही बुद्धीला अगम्य शक्ती आहे असे मानत नव्हते. १९३५ साली धर्मांतराची घोषणा करून १९५६ पर्यंत २० वर्षे अभ्यास करून त्यांनी ‘The Buddha and his Dhamma’ हे पुस्तक लिहिले. ते आमचे बौद्धधर्माचे बायबल आहे. त्यात बाबासाहेबांनी असे दाखवून दिले आहे की, बुद्धाचा कर्मसिद्धान्त हा कर्मे व त्याचे चालू आयुष्यात होणारे परिणाम यांनाच लागू होतो. बौद्ध कर्मवाद आणि हिंदूना मान्य असलेला ब्राह्मणी कर्मवाद यांच्यात लोक गफलत करतात कारण महत्त्वाच्या संज्ञा दोहोंतही सारख्याच आहेत. पुनर्जन्माची परिभाषा तीच असली तरी भावार्थ भिन्न आहेत. बुद्धाच्या वेळी लिहिण्याची कला नव्हती. म्हणून बौद्ध भिख्खू व विशेषतः भानक यांनी ऐकलेला उपदेश स्मरणात साठवून ठेवण्याचे काम केले. त्यातून दोहीकडच्या कल्पनांची सरमिसळ झाली. डॉ. बाबासाहेब म्हणतात, “हिंदूचा कर्मवाद आत्म्याच्या अविनाशी अस्तित्वावर आधारलेला आहे. हिंदू धर्माच्या समजुतीप्रमाणे माणूस मरतो तेव्हा आत्मा त्या जन्मात केलेल्या कर्माचे प्रतिबिंब घेऊन उडतो व पुढील जन्मात तदनुसार त्याची जात, कुटुंब, प्रतिष्ठा, सुख, दुःखे निश्चित होतात. … हिंदूंची ही कर्मसिद्धान्ताची व्याख्या बौद्धांच्या व्याख्येशी जुळणारी नाही. कारण बौद्धधर्मात अविनाशी आत्म्याची कल्पनाच नाही. बौद्धधर्मात देव आणि आत्मा नाहीतच.” (द बुद्ध ॲन्ड हिज धम्म) (पृष्ठ २४३).

प्रसिद्ध लेखिका नलिनी पंडित आपल्या ‘आंबेडकर’ या ग्रंथात म्हणतात, कर्मवादाची ही संकल्पना अन्यायाधिष्ठित आहे. माणसाच्या वाट्याला आलेला नीच जातीतील जन्म, त्याचे दैन्य आणि दारिद्र्य हे गेल्या जन्मातील त्याच्याच पापपुण्याचे परिणाम आहेत असे त्यात गृहीत धरले आहे. दरिद्री लोकांच्या परिस्थितीला अशा तऱ्हेने हेच कारणीभूत आहेत हे मानले तर याच्यामध्ये बदल घडवून आणण्याची जबाबदारी वरिष्ठ वर्गावर किंवा शासनावर राहत नाही. वरिष्ठ वर्णांनी या कर्मवादाला मान्यता देण्याचे हेच मुख्य कारण असावे. गौतम बुद्ध महाकारुणिक असल्याने तो हा सिद्धान्त मान्य करील हे कदापि शक्य नव्हते असे आंबेडकरांनी आपले मत नोंदविले आहे.” (नलिनी पंडित-आंबेडकर’ पृष्ठ १६४)

बाबासाहेबांनी आत्म्याशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे याचे स्पष्टीकरण याच ग्रंथात बौद्ध भिख्खू नागसेन व राजा मिलिंद यांच्या संवादातून दिले आहे. (पान २५२) नागसेन म्हणतात, “हे राजा! जेव्हा एका दिव्याने आपण दुसरा दिवा लावतो तेव्हा काय पहिल्या दिव्याच्या आत्म्याचा: दुसऱ्यामध्ये पुनर्जन्म होतो? (transmigration) तेव्हा हे राजा, आत्मा नावाची कोणती वस्तूच नाही.”

गौतम बुद्ध अध्यात्मवादी नव्हते व उच्छेदवादीही नव्हते. मानवी शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू, या द्रव्यांचे बनलेले आहे. मृत्यूनंतर शरीरातील ही द्रव्ये त्यांच्या मूलद्रव्यात विलीन होतात. याप्रमाणे जड़ाला जड जाऊन मिळते. म्हणून बुद्ध जडाच्या बाबतीत उच्छेदवादी नाही. विज्ञानात ऊर्जेच्या चिरंतनत्वाचा (conservation of energy) सिद्धान्त आहे. त्याच्याशी बुद्धाचा हा सिद्धान्त जुळतो असे बाबासाहेबांचे प्रतिपादन आहे. आणि ते पूर्णपणे विवेकाला धरून आहे.

सप्टेंबरच्या अंकात रजनी विठ्ठलराव पगारे यांचे ‘कमरेखाली वार करू नका’ या नावाचे पत्र आहे. पगारे लिहितात, “भारतात मनूपासून सर्वच पुरोहित, भटजी, पंडे यांनी … दलित समाजाची हानी केली हे निर्विवाद. पण आता हा राग आम्ही किती दशके व शतके आळविणार? पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाच्या कुबड्या घेऊन दलित बहुजन समाज किती शतके चालणार?”

दलित समाजावर आपल्या पूर्वजांनी अन्याय केला असे आजचा सुधारक सारखे सुधारक सोडून किती हिंदूंना वाटते? आणि तसे वाटून त्यांचा हृदयपालट होऊन अशा किती उच्चवर्णीय हिंदूनी दलितांना आपले (जवळ) केले आहे? माझ्या ३२ वर्षांच्या अमेरिकेच्या वास्तव्यात हिंदू लोकांना असा पश्चाताप होतो असा अनुभव मला आला नाही. येथे अमेरिकेत तर ब्राह्मणवाद जोर पकडत आहे. अनेक शहरांतील भव्य हिंदु मंदिरांत चातुर्वण्याच्या स्तुतीचे, रीतिरिवाजांचे पुनर्निर्माण होत आहे. त्यामुळे इथल्या हिंदूमधील बेटी-व्यवहार त्यांच्याच जातींत मुख्यतः होतात. न्यूयॉर्कवरून निघणाऱ्या ‘INDIA ABROAD’ च्या Matrimonial भागात ब्राह्मण मुलास ब्राह्मण बायको, कायस्थास कायस्थ मागणा-या कित्येक जाहिराती सापडतील. डॉक्टर झालेल्या व येथे जन्मलेल्या डॉ. भामरे यांच्या मुलाने Caste no bar अशा जाहिरातीस उत्तर दिले. पण नंतर मुलीकडून फोनवर तुमची जात काय, असा प्रश्न आला. डॉक्टरांनी ‘चांभार’ असे सांगताच मुलीकडील फोन बंद होतो असे आम्ही ऐकतो. मी Wisconsin युनिव्हर्सिटीत १९६७ साली शिकत असताना आरक्षण बंद करा, फार झाले असा आवाज उठविणारे बरेच हिंदु व लोक भेटले आणि तोपर्यंत म्हणजे १९६७ पर्यंत आरक्षणाचा फायदा आजच्या मानाने फारच कमी दलितांना झाला होता.

आरक्षणाचा गेल्या ४० वर्षांचा इतिहास पाहा. या ना त्या कारणाने Class I & II Reaserved Seats हिंदु अधिकाऱ्यांनी योग्य उमेदवार मिळत नाहीत असा बहाणा करून पूर्ण भरल्याच नाहीत. परिणामी या वरच्या जागी दलितांची व बौद्धांची संख्या फारच कमी राहिली.

आता तर privatization ची सवव सांगून दलितांची भरती आपोआपच कमी होणार. याच मुद्द्यावर मागील वर्षी श्री. शरद पवार न्यूयॉर्कला आले असताना महाराष्ट्र फाऊण्डेशनतर्फे झालेल्या त्यांच्या स्वागतसमारंभात त्यांना मी एक निवेदन (Appeal) दिले होते. तेव्हाच माझी आजचा सुधारकच्या श्री. प्र. व. कुळकर्णी यांची भेट झाली. माझा युक्तिवाद असा होता, भारतात आता शेकडो खाजगी मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजेस निघत आहेत. प्रवेशासाठी हे लोक लाखो रुपये कॅपिटेशन फी मागतात. दलितांकडे एवढे पैसे नसल्यामुळे त्यांचा शिरकाव होणे अशक्य झाले आहे. उदाहरणाकरिता आपण असे म्हणू या की महाराष्ट्रात ४ शासकीय आणि २० खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे. त्यांतील शासकीय विद्यालयांत आमची दलित मुले १२% तर खाजगी विद्यालयांत समजा ती २% आहेत. या हिशोबाने आमचे फक्त ३/४%च विद्यार्थी इंजिनिअर किंवा डॉक्टर होणार!

आता तर नागपूर विद्यापीठात गुणपत्रिका आणि पदव्या पैशाने विकल्या जात होत्या असे मी इंटरनेटवर वाचतो. आणि हा काळाबाजार नागपूरपुरताच सीमित असेल असे नाही. पैशाच्या जोरावर अशा पदव्या मिळविण्याची ताकद असणारे किती दलित पगाण्यांना माहीत आहेत?

आरक्षण या कुबड्या नव्हेत. समाजात equality आणण्याचे ते एक साधन आहे. या कुवंड्या दलित स्वतःच फेकून देतील. पण अशी वेळ भारतात सांप्रत येऊन पलेली नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.