धर्मांतर-ग्रॅहॅम स्टीन्सची हत्या

सांप्रत धर्मांतर हा आपल्या देशांत, कधी नव्हे तो अतिशय वादग्रस्त विषय बनलेला आहे. ओरिसामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या करण्यात आलेल्या हत्या, गुजरातमध्ये अल्पसंख्यक ख्रिस्ती समाजावर आदिवासींकडून झालेले तथाकथित हल्ले, या सर्वांचे मूळ धर्मांतर आहे असे म्हटले जाते. त्यांचे जगभरांत पडसाद उमटले. निरनिराळ्या देशांतील वृत्तपत्रांनी या प्रकरणाला अशी काही प्रसिद्धी दिली की हिंदूधर्माचा सहिष्णुतेचा दावा पोकळ वाटावा. एवढा गदारोळ माजल्यानंतर विरोधी पक्षनेत्या श्रीमती सोनिया गांधी आणि पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनी डांग जिल्ह्याला भेट दिली. डांगमधील ख्रिश्चन आणि आदिवासी यांच्यातील संघर्ष किरकोळ असून त्याची विदेशी वृत्तपत्रांनी अतिशयोक्त आणि अतिरंजित वर्णने दिली आहेत असा पंतप्रधानांनी खुलासा केला. संविधानात दुरुस्ती करून धर्मातरावर बंदी घालावी अशा अर्थाची निवेदने आदिवासी आणि हिंदु संघटनांमार्फत पंतप्रधानांना देण्यात आली. पण अशा तऱ्हेची वंदी घालता येत नाही म्हणून पंतप्रधानांनी ती निवेदने फेटाळून लावली. एकदा धर्मांतर केल्यानंतर त्या धर्मात परत जाण्यावर म्हणजेच शुद्धीकरणावर बंदी घालावी अशी सूचना ख्रिश्चनांकडून करण्यात आली. परंतु, ज्याअर्थी धर्मान्तरावर बंदी आणता येत नाही, त्या प्रमाणेच प्रतिधर्मान्तरावर (शुद्धीकरण करून मूळ धर्मात परत जाणे) बंदी घालता येत नाही असा युक्तिवाद करून पंतप्रधानांनी ख्रिस्ती लोकांची विनंती अमान्य केली. परंतु या विषयावर राष्ट्रव्यापी चर्चा करण्यात यावी अशी सूचना पंतप्रधानांनी केली. परंतु ती ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि सरकारविरोधी पक्षांना मान्य झाली नाही. त्यामुळे आजही हा प्रश्न अनुत्तरित आहे.

धर्मातराच्या प्रश्नाने देशाला आणखी एक जबरदस्त धक्का दिला तो ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहॅम स्टीन्स आणि त्यांच्या मुलांच्या हत्यांनी. ओरिसामधील मयूरभंज जिल्ह्यांतील मनोहरपुर या गावी स्टीन्स हे आदिवासींचे बळजबरीने धर्मांतर करतात म्हणून त्यांची त्यांच्या दोन मुलांसहित हत्या करण्यात आली. या हत्यांचा संबंध ओरिसा राज्यशासनातर्फे सरळ बजरंग दलाशी जोडण्यात आला. बजरंग दल हे केंद्र सरकारातील भारतीय जनता पक्षाचे सहयोगी दल असल्याने, केंद्र सरकारला आपल्यावर येणारे किटाळ टाळण्यासाठी त्वरित पाउले उचलावी लागली. परिणामी सर्वोच्च न्यायालयांतील न्यायालयातील न्यायमूर्ती वधवा यांच्या अध्यक्षतेखाली वरील घटनेच्या चौकशीसाठी एक-सदस्य आयोगाची नियुक्ती करण्यात आली. न्या, वधवा यांनी चौकशी करून आपला अहवाल केंद्र शासनाला सादर केला.

तसे पाहिले तर धर्मांतरे आपल्या देशाला नवीन नाहीत. अगदी प्रागैतिहासिक काळापासून धर्मांतरे चालू आहेत. एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म दीक्षापूर्वक स्वीकारणे’, अशी धर्मातराची व्याख्या केली जाते. धर्मांतराचे भिन्नभिन्न प्रकार आहेत. बुद्धिपूर्वक परधर्म स्वीकारणे, धनादिकांच्या लोभाने तसे करणे किंवा स्वतःच्या इच्छेविरुद्ध बाटविले जाणे.

आपल्या देशांत धर्मांतर सुरू झाले ते ख्रिस्ती धर्माच्या स्थापनेनंतर इ. स. च्या पहिल्या शतकातच. सेंट थॉमस भारतात येऊन त्या धर्माचा प्रसार करू लागला. इ. स. च्या पहिल्या शतकापासून तो १५ व्या शतकापर्यंत प्रसार धीम्या गतीने चालू होता. त्यानंतर पोर्तुगीज आले आणि त्यांनी भारताच्या पश्चिम किना-यावरील हिंदूंना जुलमाने बाटविले.

भारतात मुस्लिम धर्मप्रसार ८ व्या शतकापासून चालू आहे. त्या शतकात महंमद कासीमने राजा दाहीरचा पराभव करून हजारो हिंदू स्त्री-पुरुषांना बाटवून आपल्या देशात गुलाम म्हणून नेले. त्यानंतर महंमद गझनी आणि महंमद घोरी आणि त्यांच्यानंतरच्या बहुतेक मुसलमान राज्यकर्त्यांनी लक्षावधी हिंदूंना आपल्या धर्मात ओढून घेतले.

धर्मांतरे जरी होत होती, तरी शुद्धी करून स्वधर्मात घेण्याची प्रक्रिया पण सुरू होती. बुद्धिपूर्वक असो अथवा अनिच्छेने असो, परधर्मात केलेला प्रवेश हे घातक मानण्यात येत असे. परंतु प्रायश्चित्त घेतल्यानंतर त्याला स्वधर्मात प्रवेश करता येत असे व स्वजातीतील आपले स्थान ग्रहण करता येत असे. प्रायश्चित्त घेतल्यानंतर वाटलेला मनुष्य शुद्ध होऊन परत आपले वर्णाश्रम-धर्मातले स्थान ग्रहण करू शकतो याविषयी मनूचे वचन आहे;

अकामतः कृतं पापं वेदाभ्यासेन शुद्ध्यति।
कामतस्तु कृतं मोहात् प्रायश्चितैः पृथग्विधैः ।।
(कोणत्याही लोभा-मोहावाचून केलेले पाप वेदाभ्यासाने नष्ट होते व लोभामोहाने केलेले पाप विविध प्रायश्चितांनी नष्ट होते व तो मनुष्य शुद्ध होतो.)
धर्मांतर हे उपपातक मानून याज्ञवल्क्याने त्यासाठी प्रायश्चित्त सांगितले आहे,
उपपातकशुद्धिः स्यादेवं चान्द्रायणेन वा
पयसा वापि मासेन पराकेणाथवा पुनः ।।
उपपातकाची शुद्धी एक महिनाभर चांद्रायण केल्याने, महिनाभर दुधावर राहिल्याने, अथवा पराक-प्रायश्चित्त केल्याने होते.

इ. स. १००० पर्यंत धर्मभ्रष्टांना स्वधर्मात घेण्याचे काम सहजपणे चालू होते. अल्बेरुनीने लिहून ठेवले आहे की बाटलेल्या असंख्य हिंदूना परत स्वधर्मात घेतले जाई. गोमय, गोमूत्र वापरून शुद्धी करीत. पुढे मुसलमानांच्या स्वाध्या वारंवार होऊ लागल्या. त्यांचे धर्मप्रसाराचे वेडही वाढले. त्यामुळे ते स्वधर्मात परत घेण्याच्या शुद्धीकरणाला विरोध करू लागले. अशा शुद्धीकरण करणाऱ्यांवर त्यांनी अवन्वित अत्याचार केले. असे अत्याचार झाले, विरोध झाला तरी अल्प प्रमाणात का होईना शुद्धीकरणाचे कार्य चालू होते. इतकेच काय शहाजहान, औरंगजेब या कर्मठ, धर्मनिष्ठ वादशहांच्या कार्यकाळांतसुद्धा काही मुसलमानांना हिंदूधर्मात परत घेतल्याची उदाहरणे मुसलमान इतिहासकारांच्या ग्रंथांत सापडतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील नेताजी पालकर याला व जिजाबाईने बजाजी निंबाळकर याला शुद्ध करून स्वधर्मात घेतल्याची हकीगत इतिहासप्रसिद्ध आहे.

धर्मभ्रष्ट होऊन ख्रिस्त धर्म स्वीकारलेल्या हिंदूचे पण असेच शुद्धीकरण करण्यात येई. वसईच्या आसपास गोकुळाष्टमीच्या किंवा इतर सणांच्या दिवशी अनेक जणांचे शुद्धीकरण करण्यात येई. पण पोर्तुगीजांना ही वार्ता लागताच त्यांच्या अधिका-यांनी अशा शुद्धीकरण करणाऱ्यांना हुसकावून लावले. पुढे ब्रिटिश राजवटीत बाळशास्त्री जांभेकर, गजानन भास्कर वैद्य आदि अनेक समाजसुधारकांनी शुद्धीकरणाचे काम चालविले होते. डॉ. कुर्तकोटी (शंकराचार्य), डॉ. मुंजे, स्वामी श्रद्धानंद, मसुरकर महाराज या अनेकांनी धर्मभ्रष्टांना शुद्ध करून स्वधर्मात परत घेतले.

आपल्या देशाच्या घटनेप्रमाणे प्रत्येकाला आपला व्यक्तिगत धर्म आचरण्याचा आणि त्याचा (to propogate) प्रसार करण्याचा मूलभूत हक्क (Fundamental Right) आहे. प्रसार करण्याचा हक्क मूलभूत असला तरी धर्मांतर करविणे हा मूलभूत हक्क होऊ शकत नाही. कोणी कोणाचे जुलूम-जबरदस्तीने अथवा प्रलोभने दाखवून धर्मांतर घडवून आणू शकत नाही. सध्या ख्रिश्चनांविरुद्ध जो प्रक्षोभ निर्माण झालेला आहे. तो त्यांच्या भोळ्याभाबड्या आदिवासींचे प्रलोभन दाखवून अथवा दहशत निर्माण करून धर्मांतरे घडवून आणण्यामुळे निर्माण झाला आहे असे म्हटले जाते. धर्मांतर करण्यास समाजाचा विरोध नाही. परंतु ते स्वखुशीने केलेले असावे. त्यांत बळजबरीचा अथवा प्रलोभनाचा भाग नसावा. बळजोरीने अथवा प्रलोभने दाखवून धर्मांतरे होऊ नयेत म्हणून ओरिसा आणि मध्यप्रदेशच्या राज्यसरकारांनी १९६० च्या दशकांत freedom of religion act, म्हणून कायदा पास केला. या कायद्याच्या वैधतेला आणि राज्यसरकारांच्या असा कायदा करण्याच्या अधिकाराला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. ए. एन्. राय यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्य असलेल्या घटनापीठाने निर्णय दिला की, “एका धर्मातून दुसऱ्या धर्मात धर्मांतर घडवून आणणे हा मूलभूत हक्क होऊ शकत नाही. राज्य सरकारांना सार्वजनिक कायदा व व्यवस्था (Public Order) राखण्यासाठी अशा तऱ्हेचा कायदा करण्याचा पूर्ण अधिकार आहे,” घटनापीठाने पुढे असेही म्हटले, “घटनेच्या कलम २५ (१) प्रमाणे धर्माची मूलतत्त्वे समजावून धर्माचा प्रसार करण्याचा मूलभूत हक्क घटनेने प्रदान केला असला तरी धर्मांतर घडवून आणणे हा मूलभूत हक्क होऊ शकत नाही.”

न्या. वाधवांना ओरिसातील स्टीन्स हत्या कांडाची चौकशी करीत असताना वरील कायद्याच्या पालनासंबंधी गंभीर त्रुटी आढळून आल्या. हा कायदा जरी ओरिसा विधिमंडळाने १९६७ साली पारित केला तरी त्या खालील नियम, जे अनिवार्य आहेत ते १९८९ साली म्हणजे तब्बल २२ वर्षानंतर पारित करण्यात आले. इतकेच काय, पुष्कळशा जिल्हा मॅजिस्ट्रेट्स् (Dist. Magistrates) नी या कायद्यातील पायाभूत तत्त्वांबद्दल आणि कायद्याखालील नियमांबद्दल अज्ञान प्रकट केले. ह्या कायद्यातील पायाभूत तत्त्व असे आहे,
“No person shall convert or attempt to convert either directly or otherwise, any person from one religious faith to another by use of force or by inducement or by any fraudulent means, nor shall any person abet such conversion.”
या कायद्याखाली पारित केलेले प्रमुख नियम असे आहेत,
3. (i) The Dist. Magistrate shall maintain a list of religious institutions or organisations propogating religious faith and that of persons directly or indirectly engaged in propogation of the religious faith in the District concerned.
(ii) The Dist. Magistrate if he thinks fit, may call a list of persons with the religious faith receiving benefits either in cash or in kind from the religious organisations or institutions or from any persons connected therewith.
4. Any person intending to convert his religion shall give a declaration before a Magistrate 1st class, having a jurisdiction, prior to such conversion that be intends to convert his religion on his own will.
5. (i) The religious priest concerned shall intimate the date, time, place of the ceremony in which conversion shall be made along with the names and addresses of the persons to be converted to the Dist. Magistrate before 15 days of the said ceremony.
(ii) The intimation shall be in Form A and shall be delivered either personally by the priest to the Dist. Magistrate Concerned or sent to him by Regd. Post with Ack. due.
6. The Dist. Magistrate on receiving the intimation from the priest shall sign thereon stating the date on which and the hour at which the intimation has been delivered to him or received by him and shall forthwith acknowledge the receipt thereof in Form B.
7. The Dist. Magistrate shall maintain a register of conversions in Form C and shall cover therein the particulars of the intimation received by him.
8. Any person who contravenes the provisions of rules 5 and 6 shall be liable to a fine of Rs. One Thousand.
9. The Dist. Magistrate shall by the 10th of each month send to the State Govt. a report of intimations received by him during the preceding month in Form D.

वरील नियमांतील तरतुदी या अधार्थ (Mandatory) असून त्यांचे काटेकोर पालन अनिवार्य आहे. या तरतुदी थोड्या फार महाराष्ट्राच्या कुळकायद्यातील कुळाने हक्क सोडण्याचा (surrender)च्या तरतुदिसारख्या आहेत. कुळकायद्याच्या तरतुदी प्रमाणे कुळाला स्वखुषीने (voluntary) कुळाचा हक्क सोडता येतो. असा हक्क सोडल्याच्या लेखावर, कुळाने राजीखुषीने हक्क सोडला असून त्यावर कोणतेही दडपण आणले गेले नाही अथवा प्रलोभन दाखविले गेले नाही, हे तहसीलदाराने प्रणाणित केल्याशिवाय त्यावर अमल होत नसे. त्यामुळे या तरतुदींचे वर उधृत केलेल्या नियमांशी काहीसे साम्य आहे असे म्हणता येते.

वरील तरतुदी या वळजबरीने अथवा प्रलोभनाने धर्मांतरे होऊ नयेत या करिता ओरिसा शासनाने पारित केल्या असताना संबंधित लोक आणि बहुतांश जिल्हा मॅजिस्ट्रेट्स् या तरतुदीबद्दल अनभिज्ञ असावेत याबद्दल न्या. वाधवांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांच्या मताप्रमाणे या नियमांचे काटेकोर पालन झाले असते तर लबाडी आणि अप्रामाणिकपणे होणाऱ्या धर्मांतराला आळा बसला असता आणि मिशनरी डॉ. स्टीन्स् आणि त्यांच्या मुलांची हत्या पण टळू शकली असती.

लोकांच्या मनात आज एक विचार पक्का घर करून बसला आहे की मिशनरी हे चर्चने दिलेले लक्ष्य पुरे करण्याकरिता लबाडी आणि अप्रामाणिक मार्गाचा अवलंब करून धर्मांतरे घडवून आणतात. त्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होतात. त्यातून संघर्ष झडतात. या सर्वांना वेळीच आळा घालण्याकरिता आणि धर्मांतरे नियमित करण्याकरिता ओरिसा आणि मध्यप्रदेश राज्यांनी जसे कायदे केले तसे देशांतील सर्व राज्यांनी केले तरच बळजोरीने, लबाडीने आणि प्रलोभनाने घडवून आणलेल्या धर्मातरांना आळा बसेल आणि सामाजिक तणावही नाहीसे होतील.

धर्मांतराला आज जो तीव्र विरोध होत आहे त्याचे आणखी दुसरेही कारण आहे. आज जरी ते संदर्भहीन वाटत असले तरी भविष्यातील फुटीरतावादाची, विघटनवादाची बीजे त्यात सुप्तावस्थेत आहेत. ते कारण म्हणजे ख्रिश्चन आणि मुस्लिमांची मानसिकता. असे म्हटले जाते की ख्रिश्चन किंवा मुसलमान एखाद्या भागांत बहुसंख्यक झाले की स्वतःचे राष्ट्र निर्माण करण्याच्या मागे लागतात. सशस्त्र लढा उभारतात. इतर देशभागांशी वा बहुसंख्यकांशी एक राष्ट्रीय व एकदेशीय म्हणून राहू इच्छित नाहीत. हे एक कठोर वास्तव आहे. काश्मीर हे जुने व इंडोनेशियातील पूर्व-तिमोर हे याचे अगदी ताजे उदाहरण आहे. पूर्व-तिमोर मध्ये ख्रिश्चन बहुसंख्यक आहेत. नुकतेच तेथे जे सार्वमत झाले, त्याच्या परिणामी पूर्व-तिमोर हे इंडोनेशियातून वेगळे होऊ इच्छिते. फुटीरतावादाची लागण कमीअधिक प्रमाणात जगातील ब-याच राष्ट्रांना होत चालली आहे. चीनमध्ये सध्या सुप्त चळवळ सुरू आहे. रशियामध्ये दागेस्तानचा संघर्ष सुरू झाला आहे. युगोस्लाव्हियातील कोसोव्हो आणि सर्बिया हा वाद अजूनही पूर्णपणे मिटलेला नाही. आपल्या देशातसुद्धा काश्मीरप्रश्न हा एक ज्वलंत प्रश्न दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करीत चाललेला आहे. आपल्या देशातील ईशान्येकडील राज्यदेखील याच वाटेने जात आहेत.

आपला देश जरी (secular) धर्मनिरपेक्ष असला तरी धर्मांतराचा प्रश्न वेळीच नियमित केला नाही तर भविष्यात काय होईल हे आज सांगणे कठीण आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.