थॉमस जेफर्सनचे वंशज

क्रोमोसोमवरच्या डि.एन.ए.ची चाचणी करून वंशावळ ठरवता येते हे सिद्ध झाले तेव्हा काही वादग्रस्त, रहस्यमय व सामाजिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न सुटतील असा संभव निर्माण झाला.

अश्या चाचणीने, “थॉमस जेफर्सन व सॅली हेमिंग्स ही त्यांची गुलाम स्त्री (स्लेव्ह) यांना मूल झाले होते काय” ह्या वादग्रस्त प्रश्नाला आता उत्तर मिळाले.
जेफर्सन हे जिवंत होते तेव्हाच त्यांच्या लैंगिक संबंधांबद्दल टीकेला सुरवात झाली होती. जेम्स् कॅलेंडर या बातमीदाराने, “थॉमस जेफर्सन ह्यांचे स्वतःच्या स्लेव्हशी संबंध आहेत” अशी वार्ता प्रसिद्ध केली होती.

अनेक इतिहासकारांनी त्यानंतर या विषयावर उलटसुलट मत नोंदविणारी पुस्तके लिहिली. मर्चट आयव्हरीने सिनेमादेखील काढला. अमेरिकेतील काळी जनता असे संबंध होते” असे म्हणतच होती. पण बहुजनांच्या दृष्टीने तो प्रश्न अनुत्तरित राहिला.

जेफर्सनच्या गोऱ्या वंशजांचे उत्तर ह्या टीकेला वेगळेच होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, “सॅलीची मुले ही थॉमस जेफर्सनचा भाचा, (थॉमस जेफर्सनच्या वहिणीचा मुलगा) पिटर कार ह्याची होती. ते तसे असणे सहज शक्य होते. कारण सॅली जेफर्सन यांच्यापेक्षा ३० वर्षांनी लहान होती.”

सँली हेमिंग्स् ही जेफर्सन् ह्यांची पत्नी, मार्था, हिच्या वडिलांना (जॉन वेल्स्) एलिझावेथ हेमिंग्स् या गुलाम स्त्रीपासून झालेली मुलगी होती. थोडक्यात ती जेफर्सन यांची मेहुणी होती व त्यांच्या पत्नीची सावत्र वहीण होती. ही नाती मी कागदावर मांडते आहे. पण प्रत्यक्षात व कायद्याच्या दृष्टीने ती नाती अमान्यच होती.

त्या काळी गोरे मालक आपल्या पदरी असलेल्या गुलाम स्त्रियांना सर्रास भोगदासीप्रमाणे वापरीत असत. “स्लेव्ह” हे गाईवैलांप्रमाणे मालमत्तेसारखेच होते. मालकांनी त्यांचे हाल करावे, त्यांना शारीरिक शिक्षा द्याव्यात किंवा त्यांना विकावे यांपैकी कशावरही बंधने नव्हती. मग थॉमस जेफर्सन व सँली ह्यांच्या संबंधांबद्दल येवढा वाद का?

थॉमस जेफर्सन, अब्राहम लिंकन व जॉर्ज वॉशिंग्टन हे तिघेजण अमेरिकेच्या इतिहासात जवळजवळ देवस्थानीच आहेत. यांच्यापैकी जॉर्ज वॉशिंग्टन व थॉमस जेफर्सनकडे गुलाम होते. जॉर्ज वॉशिंग्टनने आपल्या मृत्यूनंतर आपल्या गुलामांना मुक्त केले. पण जेफर्सनने आपल्या गुलामांना मुक्ती दिली नाही हे अनेक जणांना खटकते.

एवढेच नव्हे तर त्यांचे आयुष्य अनेक विरोधाभासांनी व्यापलेले आहे. अमेरिकेचे Declaration of Independence हे जेफर्सन यांनी लिहिले. “All men are created equal is a sacred & undeniable truth.” हे त्यांचे जगप्रसिद्ध वाक्य आहे. त्यांनी लिहिलेले डिक्लेरेशन जॉर्ज वॉशिंग्टन यांनी आपल्या सैनिकांना वाचून दाखवले. अमेरिकेची राज्यघटना अथवा कॉन्स्टिट्यूशन जेफर्सन यांनीच इतरांच्या मदतीने लिहिली.

माणसांच्या स्वातंत्र्याचा व समतेचा पुरस्कार करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला गुलामगिरीच्या बंधनात कशी ठेवू शकत असेल? अर्थात् जेफर्सन यांनी फक्त स्वातंत्र्याची नांदीच लिहिली नाही. इतरही काही विधाने केली. उदा., “काळ्या वंशाची (निग्रो) माणसे गोव्यांपेक्षा शारीरिक व मानसिक गुणांत कमी प्रतीची असतात. त्यांच्या अंगाला दुर्गंध येतो.” एवढेच नव्हे तर ते पुढे म्हणाले, “गोव्या-काळ्यांच्या मिश्रणाने degradation निर्माण होते.” पण आता डि. एन्. ए. च्या चाचणीने त्यांची गुलाम स्त्री असलेल्या सॅली हेमिंग्स्च्या वंशजाशी थॉमस जेफर्सनचे रक्ताचे नाते लागते हे सिद्ध झाले आहे.

थॉमस जेफर्सन ह्या थोर पुढाऱ्याच्या शब्दांचा व ह्या नात्याचा मेळ कसा घालायचा? थॉमस जेफर्सन यांचा जन्म ज्या समाजात झाला त्या समाजात गुलामगिरीची प्रथा प्रस्थापित झालेली होती. त्या समाजात काळ्या स्त्रिया जनावरांप्रमाणे मानल्या जात होत्या. तरीही गोया मालकांची मुले ह्या स्त्रिया अंगावरचे दूध पाजून वाढवत होत्या. मालकाने त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणे (समाजमान्य असो वा नसो) सर्रास चालत होते. काळे पुरुष लहान मुलांसारखे म्हणजे मुलांएवढी कमी प्रतीची विचारशक्ती असलेले, वालवत् (infantile) मानले जात होते पण त्यांच्या गुलामांना त्या काळी थॉमस जेफर्सन ह्यांनी कुशल कारागिरीचे काम शिकवले होते.

“काळी माणसे ही आपल्यासारखीच मनुष्यजातीची आहेत” हे त्या समाजाला दिसत होते. पण समाजाच्या सोयीसाठी, आर्थिक प्राप्तीसाठी त्यांना कमी प्रतीची मानण्याचा दुटप्पीपणा करणाऱ्या समाजात जेफर्सनचा जन्म झाला.

परिणामी त्यांनी समाजाचा दुटप्पीपणा लहानपणीच आत्मसात् केला असेल यात शंकाच नाही. (आपल्याकडे मुले जातीयता अशीच आत्मसात् करतात.)
मोठे झाल्यावर “सर्व पुरुष समान आहेत” असे लिहिणाऱ्या जेफर्सनना काळ्या जमातीचे मनुष्यत्व समजलेच असेल. तरी पण त्यांनी सोयिस्करपणे आपल्या गुलामांना मुक्ति दिली नाही व काळ्या स्त्रीशी लैंगिक संबध ठेवले. ते असे का वागले?

आपण फक्त कल्पना करू शकतो. माझ्या कल्पनांची यादी पुढे मांडते.
१. गुलामांना आर्थिक मोल होते. शेती करण्यासाठी त्यांची गरज होती. आर्थिक नुकसान होईल म्हणून जेफर्सन यांनी गुलामांना मुक्ती दिली नाही का?
२. जेफर्सनची पत्नी जेफर्सन ४० वर्षांचे असताना गेली. नंतर त्यांनी लग्न केले नाही. म्हणून लैंगिक सुखासाठी ते सॅलीकडे वळले का?
३. सॅली त्यांच्या पत्नीची बहीण होती. ती सुंदर होती. (असे म्हणतात) म्हणून ते तिच्याकडे आकर्षित झाले का?
४. सॅलीचे वडील गोरे होते म्हणून “तिच्याशी संबंध ठेवणे अयोग्य नाही.” असा युक्तिवाद त्यांनी केला का?
५. “काळी माणसे ही माणसेच असतात” हे समजल्यावर गुलाम स्त्रीशी’ संबध ठेवण्यास ते तयार झाले का?
६. का थॉमस जेफर्सन इतर राजकीय पुढाऱ्यांप्रमाणे दुतोंडी, दुटप्पी होते?

सर्वांत महत्त्वाचा प्रश्न हा की त्यांच्या लिखाणात व कृतीत दुही होती म्हणून थॉमस जेफर्सन्चे नाव व त्यांचे इतिहासातले स्थान ह्याला कलंक लागला का?
ह्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार नाही. थॉमस जेफर्सन यांच्यासारख्या थोर पुढाऱ्याच्या योग्यायोग्यतेचा न्यायनिवाडा मला करायचा नाही.
या चाचणीने अमेरिकन (गोरे दिसले तरी) मिश्र रक्ताचे असण्याचा संभव आहे हे सिद्ध झाले. गुलामगिरी होती त्या काळात व नंतरही वंशमिश्रणाचा निषेध करणारेच थॉमस जेफर्सनसारखे पुढारीही वंशमिश्रणाला हातभार लावतच होते.

सॅली १४ वर्षांची असताना थॉमस जेफर्सनच्या मुलीला संभाळायला पॅरिसला गेली. अगदी तेव्हापासून ३८ वर्षे तिचे व जेफर्सनचे प्रेमप्रकरण किंवा affair होते असे काही इतिहासकार म्हणतात. ते मात्र मला मान्य नाही.

गुलाम व मालक यांच्यात प्रेम, रोमान्स वगैरे निर्माण कसा होऊ शकेल? खरे प्रेम, मैत्री इ. इ. निर्माण होण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये समानता हवी. मी पाहिलेल्या अनेक पतिपत्नींच्या नात्यांत खरे प्रेम मला आढळले नाही. याला कारण मी “पत्नीचे दुय्यम स्थान व पतीची मालकी हक्काची भावना आहे” असे मानते. म्हणून थॉमस जेफर्सनचे सॅलीशी प्रेमप्रकरण होते हे मला पटत नाही. शिवाय खरे प्रेम असते तर थॉमस जेफर्सन्ने निदान तिला गुलामीतून मुक्त केले असते. तेही त्यांनी केले नाही. म्हणून सॅली ही त्यांची भोगदासीच होती असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.

सॅलीच्या बाबतीत आणखीही एक धडा शिकण्यासारखा आहे. ती थॉमस जेफर्सनच्या सासऱ्याची मुलगी होती. “स्वतःच्या मुलीलाही गुलामगिरीमधून मुक्त करावे” असे सॅलीच्या वडिलांना वाटले नाही. ती विकली गेली असती, तिच्यावर बलात्कार झाले असते ही सर्व शक्यता त्यांना माहीतच असणार.
गुलामगिरीच्या व “वांशिक उच्चनीचतेच्या कल्पनांचा घोर दुष्परिणाम वडीलमुलांच्या नात्यावरही कसा होत असे” हे दर्शवणारी ही घटना आहे.
सॅली व जेफर्सन ह्यांच्या वयांत तीस वर्षांचा फरक होता” हा मुद्दाही कुणाला, अगदी इतिहासकारांनासुद्धा महत्त्वाचा वाटलेला दिसत नाही. अर्थात त्याच्यातही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.