विवेकाची गोठी

संपादक, आजचा सुधारक, यांस
स. न. वि. वि. मी मूळचा पुण्याचा आहे. त्या काळात अनेक विद्वानांची भाषणे सहजगत्या ऐकावयास मिळाली. त्या वेळेचे विद्वान अटीतटीने वाद करीत.
आपल्याला कोणी मारील” अशी भीती त्यांना वाटत नसे. माझा पिंड अशा वातावरणांत तयार झाला.
आज विद्वान एकमेकांना खूप संभाळून घेतात. त्यामुळे सामान्य वाचकांना संभ्रम पडतो नक्की काय? निर्जीव वस्तूला नमस्कार करणे कितपत योग्यं आहे? आगरकर व टिळक ह्यांत कोणाची भूमिका जास्त योग्य? गोडसेवद्दलचे नाटक दाखवावे का? अरुण गवळी व वाळ ठाकरे ह्यांत फरक कोणता?
पूर्वीचे विद्वान खाजगी प्रश्नांना उत्तरे देत. काकासाहेब गाडगीळ, वि. म. दांडेकर, पु. ग. सहस्रबुद्धे ह्यांची पत्रे माझ्याकडे आहेत. न्या. चंद्रचूड, वसंत कानेटकर, आनंद साधले, य. दि. फडके ह्यांचीपण आहेत. हल्लीचे विद्वान पोचपण देत नाहीत.
सर्वसाधारणपणे कोणत्याही विद्वानाला आपली शिष्यपरंपरा तयार करता आली नाही की तो वृद्धापकाळी देव किंवा अध्यात्म याचे मागे लागतो. लोकहितवादी देशमुख किंवा डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे असेच झाले. त्याबद्दलच डॉ. पु. गं. ना मी पत्र लिहिले होते की, “ते आता पूर्वीइतके बुद्धिप्रामाण्यवादी राहिले नाहीत.” त्याला त्यांनी ३-१२-७८ ला उत्तर दिले की, “प्रकृति-अस्वास्थ्यामुळे त्यांना जास्त चर्चा करता येत नाही इ.”
आगरकरांच्यावर “जाति-भेदाबाबत त्यांनी चर्चा केली नाही” अशी टीका करताना ते दरिद्री होते, त्यांना दमा होता आणि ते पुण्याच्या पश्चिम भागात वाढले इ. गोष्टी ध्यानात घ्याव्यात. पुण्याच्या पश्चिम भागात जाति-भेदाचा प्रश्न जाणवत नव्हता.
म. फुले पुण्याच्या पूर्व भागात होते. ते कॉन्ट्रैक्टर होते, सधन होते, त्यांना तो प्रश्न जाणवण्यासारखा होता हे लक्षात ठेवले पाहिजे. मार्क्सने इंग्लंडमध्ये दारिद्रय पाहिले होते. मार्क्सनेच म्हटले आहे की, “माणूस परिस्थितीच्या अनुभवातून घडतो.”
आजच्या संस्थाचालकांना पैसा आणि टाळ्या मारणारे अनुयायी हवेत. चर्चा नको असते. ह्या संस्था संघीय नसल्या तरी त्यांची वृत्ती संघीय आहे. साम्यवादीसुद्धा चर्चा करीत नाहीत. पूर्वी चर्चामंडळे होती.
सॉफ्टवेअरमधील तरुणांना सहज वीस-तीस हजार द. म. पगार असतो. कार-राहण्याची जागा तर असतेच. ह्या पैशाच्या सुबत्तेमुळे धर्मभेद-जातिभेद कमी होत असला, तरी धार्मिक सणांत वाढ होत आहे. श्राद्धाच्या आमंत्रणपत्रिका छापतात. डामडौल करतात. ७० ते १०० रु. ताट असा खर्च केला जातो.
आगरकर, नेहरूसारख्यांना आदर म्हणून नमस्कार केला, तरी त्यांची प्रार्थना करीत नाहीत. कोणत्याही मूर्तीची प्रार्थना करणे वेडेपणाचे आहे. अशी प्रार्थना करणारी व्यक्ती ख-या अर्थाने शहाणी म्हणता येणार नाही. सुंता’ प्रकार अमानुष आहे. वैद्यकशास्त्राची त्याला मान्यता नाही.
पगडींनी उर्दू कागदपत्रे अभ्यासून इतिहास लिहिला; तरी आजही जुन्याच हकिगती लोकांच्या स्मरणात असतात. आपल्या पिढीला माहीत असलेल्या अनेक गोष्टी चुकीच्या आहेत.
माफ करा, पण जिज्ञासू वाचक विविध प्रकारचे वाचन करतो व त्याची नोंद ठेवतो. इंदूरच्या होळकरांनी टिळकांना सातशे रुपये देऊन त्यातले तीनशे रुपये आगरकरांना द्यावयास सांगितले. त्यावर टिळकांनी सातशे रुपये आदल्याच दिवशी वाटल्याचे म्हटले इ. (विश्रब्य शारदा पान २१०).
पं. नेहरू व सुभाषचंद्र बोस पद्मजा नायडूंवरील प्रेमसंबंधात एकमेकांचे स्पर्धक होते (नेहरू- ले. एम्. जे. अकबर) जिना हे फिरोजशहा मेहतांचे सुपुत्र होत. (करंजिया-ऑझव्र्हर १०-६-८४) इकबाल सपूंपैकी होय ह्या गोष्टींचा परिणाम होतच असतो.
वास्तविक बॅ. आंबेडकरांनी पं. नेहरू आणि लेडी माऊंटबॅटन यांच्या प्रेमप्रकरणाची वर्णने १९४९ साली कै. माटे यांना सांगितली. त्यांना पं. नेहरू आणि एडविना यांचे पोहण्याच्या पोशाखातील फोटो दाखविले; त्यावर विसंबून प्रा. माटे यांनी ‘प्रभात’मध्ये लेख लिहिला. तेव्हा माटे यांच्याविरुद्ध काहूर झाले. आणि प्रा. माटे यांना माफी मागावी लागली. (भीमराव कुलकर्णी, म. टा. ३१/३/८५) त्यावेळी बँ.आंबेडकरांनी जबाबदारी स्वीकारली असती तर बरे झाले असते.
मला वाटते, हे सर्व तुम्ही छापलेत, तर वाचकांना बरीच माहिती मिळेल.
केशवराव जोशी
तत्त्वबोध, चेकनाक्याजवळ नेरळ – ४१० १०१

काही पत्रे – काही उत्तरे
(१) श्री. विद्याधर गो. गोरे, गव्हे रोड, जळगाव दापोली. जि. रत्नागिरी.
१. अध्यात्म एक प्रायोगिक अनुभूतीचे शास्त्र आहे. … रानडे, आगरकर, कर्वे, आणि संत यांमध्ये महत्त्वाचा फरक आहे आणि तो आत्मज्ञानविषय असल्यामुळे लक्षणीय आहे.
२. भारताची प्रगती न होण्याशी संतांच्या शिकवणीचा काहीही संबंध नाही. भारतीय संस्कृती, अनेक प्राचीन संस्कृतींप्रमाणे नष्ट न होता, आज हजारो वर्षे टिकून आहे.
३. निरीश्वरवाद मान्य केलेला समाज व्यभिचारी बनू लागतो. पतिपत्नींमधील निष्ठा न्हास पावल्याने पाश्चात्त्य देशात कुटुंबव्यवस्था मोडकळीस आलेली दिसते.
४. आपल्या समाजामध्ये अनंत दुर्गुण आहेत. उदाहरणार्थ, आळशीपणा, व्यसनाधीनता, दुटप्पी वागणूक, तत्त्वनिष्ठ जीवनाची उपेक्षा व हेटाळणी इत्यादी. ह्या गोष्टींविषयी कसलीच चर्चा आपल्या मासिकात न होता आध्यात्मिक विचारांवर मात्र सतत झोड आपण उठवीत आहात. हे कितपत इष्ट आहे?
उत्तरे
१. प्रायोगिक अनुभूतीबद्दलचे आपले मत वेगळेच दिसते. एखाद्याच्या व्यक्तिगत ध्यानधारणेला आणि साधनेला त्या व्यक्तीच्या मानसिक शांतीपुरती, मानसोपचार म्हणून किंमत असेल; परंतु तिला सार्वजनिक मूल्य नाही.
२. देहभिन्न स्वतंत्र अशा आत्म्याचे अस्तित्वच आम्हाला मान्य नाही. त्यामुळे संतांच्या शिकवणुकीचा आपण म्हणता तसा फायदा आम्हाला पटलेला नाही. भारतीय संस्कृती जी हजारो वर्षे टिकली आहे तिचे नेमके स्वरूप काय आहे ते आम्हाला समजलेले नाही.
३. इंडियन पीनल कोडप्रमाणे व्यभिचार हा एकप्रकारचा चोरीचा गुन्हा आहे. दुस-याच्या मालकीची वस्तू त्याच्या परवानगीशिवाय घेणे ही गोष्ट चोरी आणि व्यभिचार यांमध्ये समान आहे. विवाहित स्त्रीवर तिच्या पतीची मालकी असते हे या कायद्यात गृहीत धरले आहे, त्यामुळे विधवेशी विवाहबाह्य संबंध किंवा कुमारिकेशी असे संबंध कायद्याप्रमाणे व्यभिचार ठरत नाहीत. आम्हाला पत्नीवर पतीचा मालकी हक्क ही कल्पना मान्य नाही. त्यामुळे निरीश्वरवादाची तुम्हाला वाटते तशी भीती आम्हाला वाटत नाही. स्त्रियांची गुलाम-अवस्था नाहीशी झाल्याने वर्तमान कुटुंबव्यवस्था बदलेल परंतु कुटुंबसंस्था नाहीशी होईल असे आम्हाला वाटत नाही.
४. तुम्ही सांगितलेले दोष आम्हालाही दिसतात. परंतु व्यक्तिस्वातंत्र्य, समता आणि न्याय या तत्त्वांसाठी साधन म्हणून ऐहिक विचारसरणीला आम्ही महत्त्व देत असल्यामुळे आध्यात्मिक विचारांवर आम्हाला प्राधान्याने टीका करावी लागते.

(२) मधुसूदन रा. मराठे, ६४ आशीर्वाद, रामबाग लेआऊट, नागपूर – ३.
१. सत्य हे बहुआयामी आहे असे दिसते. ‘सत्यमेव जयते’ हे भारताचे ब्रीदवाक्य आणि ‘सत्यं ब्रूयात्, प्रियं ब्रूयात्, न ब्रूयात् सत्यमप्रियम्’ इत्यादि विविध ठिकाणी सत्य शब्द वेगवेगळ्या अर्थी आला आहे. विज्ञानालादेखील स्थलकालनिरपेक्ष सत्याची व्याख्या करता येणार नाही. त्यामुळे आगरकरांचे जे म्हणणे ‘सत्य असेल ते बोलणार’ याचा नेमका अर्थ काय? तज्ज्ञांनी प्रबोधन करावे.
२. अंक कंटाळवाणा होऊ नये यासाठी काही हलकेफुलके (सवंग नव्हे) साहित्यही प्रकाशित करावे.
उत्तरे
१. सत्यासंबंधी विवेचन पूर्वी आले आहे. सत्याच्या एक अर्थ असा की ज्या विधानाचा इंद्रियानुभवांनी पडताळा घेता येतो ते विधान सत्य.
२. सूचनेचे स्वागत आहे. चालू अंकाबद्दल मत कळवावे.

मागील अंकातील चुकीची दुरुस्ती पुढीलप्रमाणे :
ऑक्टोबर ९९ च्या अंकात पुढील दुरुस्ती वाचावी : * पृष्ठ क्र. १९७ वर दुस-या परिच्छेदामध्ये सहाव्या ओळीत ज्या गोष्टीत अनुभव विषय नाहीत किंवा तर्कगम्य नाही त्या गोष्टींमध्ये ।
* पृष्ठ क्र. २१५ वर दुसया परिच्छेदामध्ये दुस-या ओळीत शारीरिक व मानसिक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.