सुखाचा दर्जा केवळ मानीव (?)

‘कांही विशिष्ट प्रकारच्या शरीरसुखांना लोक उच्च कां मानतात आणि इतर प्रकारांना नीच कां मानतात . . . . संगीताने होणारा आनंद उच्च प्रकारचा मानण्याची पद्धत आहे, पण एखादा आवडीचा पदार्थ खातांना होणारा आनंद कमी दर्जाचा मानतात. असे कां? सुख शरीराच्या एका विशिष्ट भागाला होते असे मानले, किंवा सर्व प्रकारच्या संवेदनांचे स्थान मेंदूतच आहे असे मानले, तरी या दोन प्रकारांत किंवा इतर प्रकारांत उच्चनीच भाव कां असावा? शरीरसुखासंबंधी आणखी विचार केला तर त्यांत पुष्कळच गंमती दिसतात. वेळीं अवेळीं उपास करणे हा धर्मबाजीत एक विशेष सद्गुण समजतात आणि गांधींनी तर जरा कोठे खुट झाले की उपास करायची फॅशनच पाडली आहे. पण कोणत्याहि प्रकारचे संगीत कधीहि ऐकायचे नाही असा नियम करणाराला कदाचित् गांधीदेखील महामूर्ख म्हणतील. स्पर्शसुखाचा आळ येऊ नये म्हणून अंगाला बोचणारे कपडे घालण्याची चाल युरोपांतील धर्मबाजांत होतीच. ब्रह्मचर्याला तर नीतिबाजांनी भयंकर मोठा सद्गुण बनवला आहे. एकंदरीत कोणत्या सुखाचे बाबतींत आत्मसंयमन हा सद्गुण समजायचा आणि कोणत्या नाही, आणि ते का, हे नीतिबाजींत तरी कोठे सांगितले आहे की काय, याची मला बरीच शंका आहे. वास्तविक पाहिले तर कोणत्याहि प्रकारचा अतिरेक झाला तरी त्याने नुकसानच होणार . . . . प्रमाणशीर रीतीने कोणत्याहि प्रकारचा उपभोग घेण्यास हरकत काय? आणि उच्चनीच दर्जा केवळ मानीवच नाही का? …. आणि अतिरेक कोठे होतो हे ज्याचे त्यानेच ठरवावें.’

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.