मालकी हक्क आणि गुलामगिरी

व्यक्तिस्वातंत्र्यामुळे दुस-याला इजा होतां नये, हे जर सगळेच कबूत करतात, तर मतभेद कां व्हावा? मतभेद येथेच होतो की दुसरयाचे हक्क काय आणि त्यांचे नुकसान झाले असे केव्हा म्हणायचे? सनातनी आपल्या भावना दुखावल्याचं ढोंग करतात, पण त्यांच्या भावना कोणी दुखावतां नये असा हक्क त्यांना कोठून आला? त्यांच्या वागणुकीने आमच्या भावना दुखावतात, म्हणून काय आम्ही त्यांना शिक्षा करावी असे थोडेच म्हणतों? ते आपल्या समजुतीप्रमाणे वागतात, त्यांना विचार करता येत नाही, वागोत बिचारे. प्रत्येक व्यक्तीचे हक्क काय हे एकदा ठरलें म्हणजे स्वातंत्र्याच्या मर्यादा समंजस लोकांच्या दृष्टीने आपोआपच ठरल्या. व्यभिचाराला .. पुष्कळ समंजस लोक देखील हरकत घेतात, कारण स्त्रीच्या व्यभिचारामुळे पतीचे नुकसान होते अशी त्यांची कल्पना आहे. हे नुकसान पुष्कळसे काल्पनिक असले तरी पतीचे पत्नीवर प्रेम असल्यास त्याला दुःख होईल हे कबूल करणे भाग आहे. प्रश्न इतकाच आहे की एका मनुष्याचा दुस-याच्या शरीरावर न्याय्य हक्क असू शकतो कीं काय? तो जर नसेल तर त्याने दुःख सोसले पाहिजे, किंवा पत्नीचे मन वळवलें पाहिजे. शरीरावर दुस-याचा हक्क असणे यालाच गुलामगिरी म्हणतात आणि आजकालची सुधारलेली राष्ट्रे या स्त्रियांच्या गुलामगिरीशिवाय इतर सर्व प्रकारची गुलामगिरी बंद करू पहात आहेत. स्त्रियांचे बाबतींत मात्र हा शारीरिक मालकीहक्क नसावा म्हणणेदेखील गुन्हा आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.