आम्ही आणि ‘ते’! (भाग १)

खिलारे नानावटींनी निर्माण केलेला वाद संपुष्टात आला असे वाटत असतानाच मिलिंद देशमुख ह्यांचे पत्र आले. (पत्र पुढे येत आहे.) त्या पत्राच्या निमित्ताने आजचा सुधारकची जातिवादासंबंधीची भूमिका अधिक स्पष्ट होईल असे वाटले आणि जातिवाद म्हणजे फक्त ब्राह्मणब्राह्मणेतर वाद नाही हेही एकदा निःसंदिग्धपणे सांगता येईल असे मनात आले. त्याशिवाय संपत्ती कशी निर्माण होते, तिचा लाभ काही गटांनाच का होतो, तिचे सर्वत्र सारखे वाटप आजपर्यंत का होऊ शकलेले नाही, भविष्यात तसे व्हावे म्हणून काय करावे लागेल, ह्या प्रश्नांची चर्चा त्या पत्राच्या प्रकाशनातून सुरू करता येईल असे वाटले.| मिलिंद देशमुख ह्यांचे पत्र लहान असले तरी उत्तर मात्र त्यातल्या विवाद्य विधानांमुळे मोठे होणार आहे आणि पत्र मुख्यतः रिसबुडांना उद्देशून असले तरी मला समजलेल्या विवेकवादाच्या नजरेतून त्याकडे पाहण्याचा यत्न मी करणार आहे.
श्री मिलिंद देशमुखांचे पत्र
संपादक आजचा सुधारक ह्यांस
मा. श्री. रिसबूड यांची ढाकुलकरांच्या लेखावरची प्रतिक्रिया वाचली. मला ती खिलारे नानावटी यांच्या लेखावरचीच प्रतिक्रिया वाटली. रिसबुडांनी काही गोष्टींचा खोलात जाऊन विचार केलेला दिसत नाही म्हणून त्यांच्या काही विधानांबद्दल माझा आक्षेप आहे.
‘पूर्वजांनी केलेल्या पापाचा पाढा कितीही वेळा वाचला तरी त्यामुळे आजच्या ब्राह्मण समाजाने नेमके काय करायला हवे याचा बोध होत नाही,’ ‘पुरोहित शाहीचे जोखड तो समाज (ब्राह्मणेतर) फेकून का देत नाही,’ अशी विधाने रिसबुडांनी केली आहेत.
पुरोहितशाहीचे जोखड तो समाज फेकून देत नाही याचे कारण ते जोखड आहे हे तर त्याला कोणीतरी लक्षात आणून द्यावयास हवे. कारण समाजाची चिकित्सक वृत्ती हजारो वर्षे पुरोहितांनी कर्मकांडात अडकवून ठेवल्याने कुंठित झाली आहे. पूर्वजांनी केलेल्या पापाचा पाढा वाचल्याने इतरांची अस्मिता व चिकित्सक वृत्ती जागृत होऊन आज त्याच्यावर होणारा अन्याय, शोषण निदान त्याच्या लक्षात तरी येईल व तो आणखी या गोष्टीस बळी पडणार नाही याची काळजी घेईल.
शिक्षणात व नोकरीमध्ये ठेवण्यात आलेल्या राखीव जागांच्या संदर्भात सामाजिक न्यायाची भूमिका आजचा सवर्ण समजून घेताना दिसत नाही. आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापाचा पाढा जर त्याच्यासमोर ठेवला तर तो राखीव जागांच्या संदर्भातली भूमिका समजून घेण्याचा विचार तरी सुरू करेल. सवर्ण तरुण मुले व त्यांचे पालक आपल्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या दलित तरुणास अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळाल्यास चवताळून उठतात. आमच्या पूर्वजांनी केलेल्या पापाबद्दल आम्हाला शिक्षा का? असा त्यांचा सवाल असतो. परंतु सवर्ण मुलांना चांगले गुण मिळण्यात त्यांच्या घरच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा तसेच ते राहात असलेल्या भोवतालच्या परिस्थितीचा वाटा आहे हे ते विसरतात. सवर्णांची आजची आर्थिक व सामाजिक स्थिती दलितांपेक्षा उच्च प्रतीची का आहे याचा विचार ते करीत नाहीत. हा विचार त्याने करावा म्हणूनही त्याच्या पूर्वजांच्या पापांचा पाढा त्यांच्यासमोर मांडणे गरजेचे आहे.
जातिभेद व अस्पृश्यता यांची चर्चा मासिकात होईल असे पहिल्या संपादकीयात दि. य. देशपांडे यांनी म्हटले आहे याची आठवण रिसबुडांनी आम्हाला करून दिली आहे. संपादकांच्या ह्या दृष्टीबद्दल आम्हाला आनंद वाटतो, परंतु ८-९ वर्षांचे अंक पाहिल्यानंतर तसे घडले नाही याबद्दल खेदही वाटतो. ब्राह्मण समाज वैचारिकदृष्ट्या प्रगत आहे म्हणून आजचा सुधारकचा बहुसंख्य वाचकवर्ग ब्राह्मण आहे असे रिसबुडांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. खरे म्हणजे आर्थिकदृष्ट्या प्रगत झाले की वैचारिकदृष्ट्याही प्रगत वनण्यात काही अडचण येत नाही. ही वैचारिक ‘प्रगतीसुद्धा इतर देशांतील प्रगत समाजाच्या तुलनेने अगदी निकृष्ट प्रतीची आहे, हे लक्षात घेतले तर बरे होईल, म्हणून आम्ही म्हणतो की ब्राह्मण समाज आर्थिक दृष्ट्या प्रगत कसा झाला याचा शोध पहिल्यांदा घ्यावयास हवा.
मिलिंद देशमुख
दाभाडेचाळ, रेल्वे स्टेशनजवळ,
पो. देहरोड, । जि. पुणे – ४१२ १०१

हे पत्र वाचून मनात आले की खिलारे-नानावटी आणि ढाकुलकर-देशमुखादि मंडळींचे लक्ष जातींमधला उच्चनीच भाव नष्ट व्हावा ह्याकडे असले तरी त्याचबरोबर जातींविषयी जो आपपर भाव सगळ्यांच्या मनात असतो तो घालविण्याकडे नाही. त्यांना काही जाती ‘आपल्या’ वाटत असाव्यात तर काही तश्या वाटत नसाव्यात. पुढे देशमुखांचे एकेक वाक्य घेऊन त्यावर माझे म्हणणे मांडणार आहे.
‘पुरोहितशाहीचे जोखड तो (व्राह्मणेतर) समाज फेकून देत नाही कारण ते जोखड आहे हे त्याला कोणीतरी लक्षात आणून द्यावयाला हवे.’ असे देशमुखांचे म्हणणे आहे.
देशमुखांच्या लक्षात मात्र ती गोष्ट आलेली आहे आणि ब्राह्मणांनी दुस-या जातींवर जो अन्याय केला त्याचा कोळसा पुन्हा पुन्हा उगाळून ती गोष्ट उभय ब्राह्मणव्राह्मणेतर समाजांच्या ध्यानात आणून द्यावयाची आहे. आणि ते तेवढ्यावर थांवताना दिसत नाहीत. जुन्या ब्राह्मणांच्या आजच्या मुलानातवंडांना त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या पापाचे प्रायश्चित भोगावे लागले तरी त्यांची हरकत नाही. सगळा अन्याय पुरोहितांनी (ब्राह्मणांनी) केला आणि वक-याला हलाल करावे तसे शतकानुशतके सर्व ब्राह्मणेतर निमूटपणे आपल्या गळ्यावर सुरी चालवून घेत राहिले; कोणी हूँ की चू केले नाही असे त्यांच्या लिखाणावरून वाटते. पण परिस्थिती तशी नाही, नव्हती. (विस्तारभयास्तव येथे उदाहरणे देत नाही.)
नंतरचे देशमुखांचे वाक्य ‘समाजाची चिकित्सक वृत्ती हजारो वर्षे पुरोहितांनी कर्मकांडांत अडकवून ठेवल्यामुळे कुंठित झाली आहे’ असे आहे.
येथे मला त्यांच्या असे लक्षात आणून द्यावयाचे आहे की, त्यांचा घोडा कोणता आणि गाडी कोणती ह्यांत घोटाळा झालेला आहे. मुळात चिकित्सक वृत्ती नव्हती म्हणून लोक कर्मकांडात गुंतून राहिले. कर्मकांडे केल्यामुळे चिकित्सक वृत्ती सीमित होत नसते. मुळातच ती नसल्यामुळे सगळे जण ती वांझोटी कर्मकांडे करीत वसतात. ही कर्मकांडे केल्यामुळे देव आपल्यावर प्रसन्न होत नाही, समाजस्थितीत कसलाही फरक पडत नाही, हे समजण्याची अक्कल ब्राह्मणांना होती असा पुरावा कोठेही नाही. आम्ही सगळेच मूर्ख; परंपरेने जे चालत आले ते हजारो वर्षे आंधळेपणाने चालवीत राहिलो! जे काय इतिहासात घडले त्याचे खापर कोणत्याही एकट्या जातीच्या माथ्यावर फोडणे अयोग्य होईल.
अंदाजे तेराशे वर्षांपूर्वीपासून आमच्या देशावर परदेशस्थ परधर्मीयांनी हल्ले केले, येथे राज्ये स्थापन केली आणि पारतंत्र्यात आमच्या अनेक पिढ्या गेल्या, त्यामुळे आमच्या समाजाची स्वयंप्रज्ञा, विवेचक किंवा चिकित्सक बुद्धी नष्ट झाली अशीही आमची समजूत आहे. पण हा आमचा निव्वळ भ्रम आहे. (त्या समजुतीत आणि ब्राह्मणांनी वाकीच्यांची चिकित्सक वृत्ती वाढू दिली नाही ह्या देशमुखांच्या विधानात अतिशय साम्य आहे, म्हणून येथे पारतंत्र्याचा उल्लेख केला आहे.) आमच्यामध्ये चिकित्सक वृत्तीचा आधीपासून अभाव आहे. आमच्या रक्ताच्या नातेवाइकांपलीकडे पाहण्याची अक्कल आम्हाला नव्हती. हे रक्ताचे नातेवाईक म्हणजे प्रत्यक्ष कुटुंबीय आणि होऊ शकणारे (म्हणजे ज्यांच्याशी वेटीव्यवहार होऊ शकतो ते जातवाले) ह्यांच्या पलीकडे आम्हा कोणाला पाहताच आलेले नाही. आपसांत एकी करून परक्या लोकांशी सामना देण्याचे सामर्थ्य गेल्या हजार वर्षांत तरी आम्ही कमावले असे मला दिसत नाही. आजही आमचे राजकीय पक्ष आणि त्यांचे उपपक्ष ह्यांची आपसातली लाथाळी सुरूच आहे. आमचा देश परकीय आक्रमकांनी विकल केला असे नसून आमच्या अंगभूत वैकल्यामुळे परकीयांनी आमचा वेळोवेळी पराभव केला हे सत्य आहे. तेव्हा आमच्यांतील दोषांचे जनकत्व ब्राह्मणांना किंवा परकीय राज्यकत्र्यांना देऊन स्वतःची फसवणूक आता पुरे करण्याची आता वेळ आली आहे. समाजाची चिकित्सक वृत्ती कोणाही एका माणसाकडून किंवा एका जातीकडून कुंठित होत नसते.
आमच्यासारखेच आफ्रिका खंडामधले देश परकीयांचे गुलाम होते. आमच्या देशांतून दक्षिण अफ्रिकेत, मॉरिशसमध्ये, फिजीत किंवा त्रिनिदादमध्ये मजूर म्हणून नेलेल्या लोकांची स्थिती आफ्रिकेतून अमेरिकेत गुलाम म्हणून नेलेल्या लोकांपेक्षा फारशी चांगली नव्हती. आमच्या लोकांच्या वाट्याला तेथे गेल्यावर दुय्यमतिय्यम दर्जाचे नागरिकत्वच येत होते. ही भारतातल्या आणि अफ्रिकेतल्या लोकांची जी समान स्थिती होती ती त्यांना पुरोहितांनी कर्मकांडात अडकवून ठेवल्यामुळे झाली की आणखी कशाने हे आम्ही सर्वांनीच तपासून पाहण्याची गरज आहे. सर्व जगात ज्यांनी आपली साम्राज्ये स्थापिली त्या युरोपीय देशांत भिन्न विचाराच्या जनतेवर तेथल्या पुरोहितांनी inquisition च्या नावाने अत्याचार केलेले आहेत तेही समजून घेण्याजोगे आहे. आपल्या चिकित्सक वृत्तीमुळे जे इंग्लंडमधील पुरोहितांना अप्रिय झाले आणि त्यामुळे ज्यांचा पुरोहितांनी छळ केला त्यांची चिकित्सक वृत्ती नष्ट झाली नाही – उलट त्यांनी अमेरिका वसवली! आज ते सर्व जगात वरचढ होऊन बसले आहेत.
अल्पसंख्यकांना बहुसंख्यकांवर सत्ता गाजविता येते ह्याचे कारण अशा वेळी ते बहुसंख्य लोक मूलतःच मनाने दुबळे असतात. त्यांच्यामध्ये कोणत्याही समस्येकडे साकल्याने पाहण्याची क्षमता नसते.
‘पूर्वजांनी केलेल्या पापांचा पाढा वाचल्याने इतरांची अस्मिता आणि चिकित्सक वृत्ती जागृत होईल’, असा देशमुखांचा समज आहे.
वर उल्लेखिलेले समज फक्त देशमुखांचेच नाहीत तर पुष्कळांचे आहेत. देशमुख त्यांचे प्रतिनिधी आहेत म्हणून माझे म्हणणे मिलिंद देशमुखांनी व्यक्तिशः मनावर घेऊ नये. पूर्वजांनी केलेल्या पापांचा पाढा वाचल्याने सूडबुद्धी जागृत होत असते, चिकित्सक बुद्धी नाही. चिकित्सक बुद्धी (स्वतःची आणि इतरांची) जागृत करण्यासाठी पूर्वीचे गैरसमज, मनावर पूर्वीपासून घडलेले संस्कार आम्हाला झुगारून द्यावे लागतात. प्रत्येक घटनेचा साकल्याने विचार करावा लागतो. सकल विश्वाच्या संदर्भात प्रत्येक घटना तपासावी लागते. अपूर्ण विचार केल्यास सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे जसे वाटत राहते, तसेच सामाजिक घटनांबद्दलचा कार्यकारणसंबंधही आपण चुकीचा लावतो. जोपर्यंत आपले मन कलुषित (गढूळ) असेल तोपर्यंत आपल्याला कोणतीही घटना स्पष्ट दिसू शकत नाही. ईश्वरावर आपला विश्वास असेपर्यंत सगळ्या चमत्कारांमागचे रहस्य आपल्याला कळत नाही तसेच हे. चमत्कारांच्या मागे ईश्वरी सत्ता आहे असे आपण मानून चालतो तोपर्यंत चमत्कारांची कारणमीमांसा आम्हाला करता येत नाही आणि पीडितशोषितांच्या मागे ब्राह्मण आहेत आणि आजच्या पिढीच्या अनर्थाचे मूळ परकीयांचे राज्य हे आहे असे आपण जोपर्यंत समजत राहू तोपर्यंत दलितांच्या आणि शोषितांच्या दुर्दशेमागची खरी कारणे आम्हाला शोधता येणार नाहीत. ती समजणार नाहीत. तशी इच्छाच आम्हाला होणार नाही. आम्ही फक्त एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत राहू.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.