कच्च्या आहाराचा अनुभव

मनुष्य संवयीचा गुलाम असतो आणि संवयीच्या बाहेरचे काही करायचे झाले की ते जिवावर येते. आम्हीं सुमारे एक वर्षांपूर्वी ‘आधुनिक आहारशास्त्र नांवाचे पुस्तक लिहिले. अर्थात् ते अनेक वर्षांच्या अभ्यासावर आधारलेले आहे आणि कच्च्या आहाराचे महत्त्व आम्हास तात्त्विक दृष्ट्या पटल्यामुळेच त्या पुस्तकांत कच्च्या आहारावर विशेष भर दिलेला आहे. वास्तविक व्हिटॅमीनसंबंधी आधुनिक शोधांनंतर अशा आहाराचे महत्त्व सर्वांसच पटावे, कारण कच्च्या आहारांत व्हिटॅमीन पूर्णत्वाने सांपडतात आणि शिजवलेल्या अन्नांत त्यांचे प्रमाण वरेच कमी होते हे निर्विवाद आहे. ही गोष्ट अनेक प्रकारच्या प्रयोगांनी सिद्धही झालेली आहे. उदाहरणार्थ उंदरांच्या पिल्लांना अंड्यातील पिवळा भाग कच्चा खाऊ घातल्याने त्यांचे वजन ६० दिवसांत शेंकडा १४० नी वाढले, व त्याच वयाच्या इतर कांही पिल्लांस तोच पिवळा भाग शिजवून घातला, तेव्हा त्यांचे वजन फक्त शेकडा ७६ नी वाढले असे आढळले. तसेच शेळीच्या पोरांना शेळीचेच दूध तापवून जंतुरहित करून घातल्यास त्या नेहमींइतक्या जलद वाढत नाहीत असेही प्रयोगांती दिसते.
तरी देखील मनुष्य संवयीचा गुलाम असल्यामुळे कच्चा आहार ही कोणाच्या तरी डोक्यांतून निघालेली विक्षिप्त क्लृप्ति आहे असेच पुष्कळांस वाटते. ही केवळ वाटण्याची गोष्ट झाली, मग कच्च्या आहाराचा प्रत्यक्ष प्रयोग करण्यास फारसे लोक धजत नाहीत यांत नवल नाही. असे असतांही आम्हास असा प्रयोग करण्याचा प्रसंग आला आणि यासंबंधी आमचा स्वतःचा अनुभव आम्ही वाचकांस सादर करीत आहोत.
हा प्रयोग करण्याचे कारण असे झाले की आमची प्रकृति वयाच दिवसांपासून पुष्कळच विघडली होती. प्रोफेसर असतांना वर्षांतून सहा महिने रजा आणि बाकीच्या सहा महिन्यांत देखील दररोज फार तर दोन तास काम असायचे, आणि गणितासारखा विषय असल्यामुळे नवीन फारसे वाचण्याचीही जरूरी नाही, अशी स्थिति सरकारी नोकरीत होती, आणि ती सोडल्यावर मधे एक वर्ष जरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत गांवभर हिंडून शिकवण्या करून पोट भरावे लागले, तरी नंतर पुनः विल्सन कॉलेजांत प्रोफेसरीच मिळल्यामुळे आणखी तीन वर्षे तशीच गेली. नंतर तीही नोकरी सोडल्यावर, सवा वर्ष बेकार राहिल्यावर एका व्यापारी कचेरीतील साहेबाच्या सेक्रेटरीचे काम मिळाले, पण तेथे वर्षांतून सहासात महिने, म्हणजे साहेव मुंवईंत असेल तेव्हा, रविवारी देखील सुटी नाही, सकाळी नऊ वाजतां आफिसांत गेले की संध्याकाळीं, साहेबाची लहर लागेल तेथपर्यंत काम करायचे, आणि बाकीचे महिने मात्र इतर कारकुनांप्रमाणे सुट्या असायच्या; कधीं इराणच्या आखातांतील घाणेरड्या हवेत साहेवावरोवर जावे लागायचे, अशा त-हेने काम करावे लागल्यामुळे, आणि नंतर सर्वच व्यापार वसल्यामुळे बरेच कारकून कमी होऊन त्यांचेही काम करावे लागल्यामुळे, कामाला कांही सीमा राहिली नाही आणि कधीकधी रात्री नऊ वाजेपर्यंत देखील महत्त्वाची पत्रे यंत्रावर लिहीत बसावे लागले. अशा रीतीने काम फार दिवस निभणे शक्य नव्हते आणि त्याचा प्रकृतीवर परिणाम होऊन नंतर दोन तास काम केल्यानेही थकवा येऊ लागला. प्रकृतीत दृश्य फरक कांहीच नव्हता, तेव्हा एका तुज्ञ समजलेल्या डाक्तराकडून तपासून घेतलें, व त्याने यंत्राने रक्तदाब पाहतां तो बराच वाढला असल्याचे आढळले. हेच एकंदर थकव्याचे कारण ठरले आणि त्याने काम कमी करण्याचा उपदेश आणि कांही शक्तिवर्धक औषधांची यादी दिली. तेव्हा रात्री काम करणे बंद केले, आणि साडेनऊ वाजतां निजू लागलो. यामुळे आणि औषधांमुळे रक्तदाब बराच उतरला, परंतु ही स्थिति फार दिवस टिकली नाही. काम करू नका, हवेच्या ठिकाणी जा, मुंबईतून शक्य तितक्या वेळां बाहेर जात जा, वगैरे गोष्टी डाक्तरांना बोलायला सोप्या असतात, पण लठ्ठ पगाराशिवाय आचरणे कठिण असते. होती तीही नोकरी सोडावी लागली, तेव्हां आतां लेखनावर आणि संततिनियमनाचीं साधने विकून चरितार्थ चालवण्याची वेळ आली. अशा स्थितीत हे जमावे कसे? संततिनियमनाची साधने विकण्यांत भरपूर फायदा असल्यामुळेच आम्हीं प्रोफेसरची जागा सोडली असे आमचे शत्रु म्हणतात, परंतु हे त्यांचे अज्ञान आहे किंवा दुष्टपणा आहे. सारांश, प्रकृति अधिकाधिक बिघडत चालली. सर्व लक्षणे येथे देत बसण्याचे कारण नाही, परंतु थोडे उन्हांतून चालल्यानेही त्रास होऊ लागला, आणि एके दिवशीं रस्त्यांत बेशुद्ध झालो. परंतु अगोदरच थोडेसे चमत्कारिक वाटल्यामुळे कांदेवाडीच्या कोप-यावरील तांबे यांचे दुकानाचे फळीवर चढून बसण्याची बुद्धि झाली व दुकानांतील लोकांच्या ते लक्षात आल्यामुळे त्यांनी कांदा आणून नाकाला लावला. शुद्धीवर आलों तो प्रेक्षकांचा थवा दुकानापुढे जमलेला दिसला.
अशा स्थितींतच वरील पुस्तक लिहावयास घेतले. हा प्रकार मेचे १० तारखेला घडला आणि पुस्तकाचे हस्तलिखित मेअखेर दिले पाहिजे होते. तेव्हा आमचे मतेंही ते समाधानकारक झाले नाही, आणि ते सर्व पुनः लिहून काढून मग ते छापले. पुस्तक लिहीत असतांना अर्थातच स्वतःच्या प्रकृतीसंबंधी काय करावे हा विचार डोक्यांत होताच. डाक्तरांना त्यांत फारसे काही करता येत नाही हे उघड होते, तेव्हां आपणच कांहीतरी मूलगामी उपाय शोधून काढला पाहिजे, एरवी आपण फार दिवस जगत नाही अशी खात्री झाली. अर्थात् आहार हे आरोग्याचे एक मुख्य अंग आहे, तेव्हा त्यांतूनच कांहीतरी उपाय निघाला पाहिजे हे स्पष्ट दिसत होते, आणि कच्च्या आहारासंबंधी आपण जे लिहिले ते पडताळून पहावे असे ठरवले.
एकदां सुरवात केली म्हणजे कठिण गोष्टही सोपी होते, तसेच येथेही झाले. आमचेच शेजारी आमचेपेक्षाहि रक्तदाब जास्त असलेले एक डाक्तर राहतात आणि त्यांचे मत असे होते की उपोषण करून वजन कमी करावे व त्याप्रमाणे त्यांनी केले होते. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नव्हता, आणि उपोषणासंबंधी आमचा स्वतःचा अनुभव असा होता की कधी चुकून उपोषण घडल्यास फार अशक्तता वाटे, तेव्हा हा उपाय आपल्या हातून होणे नाही असे ठरवले, आणि कच्चा आहार भरपूर खायचा असा बेत केला. असा नैसर्गिक आहार असल्यावर, त्यांत कोणते पदार्थ खायचे हे ठरवतांना आपणास आवडतील असेच पदार्थ खाल्ल्याने अधिक फायदा होईल असे ठरवून, नंतर ते काय प्रमाणांत खाल्ले असता शरीराला दररोज•जरूर तितक्या ‘कॅलोरी’ मिळतील याचा हिशोव करण्याची सर्व सामग्री जवळ होतीच, तेव्हा ते हिशोव करून ठरवले.
हा आहार घेऊ लागल्याला आता सात महिने होऊन गेले. इतक्या अवधीत प्रकृतींत जमीनअस्मानाचा फरक दिसू लागला. अशक्तता साफ नाहीशी झाली, इतकी की आतां टेनिसचे सिंगलचे तीन सेट खेळतां येतात. पूर्वी पायांनी चालणे शक्य तितकें टाळण्याची प्रवृत्ति होती, तेथे आता थोडेबहुत कमीअधिक चालावे लागले तरी कांही वाटत नाही. केवळ व्यायामाकरतां चालण्याचा कंटाळा पूर्वी होता तसाच अजूनही आहे, परंतु जरूर पडल्यास चालतां येते. वजन आणि विशेषतः पोट, फाजील वाढले होते, ते उपोषण केल्याशिवाय ताबडतोव कमी झाले आणि त्याबद्दल पुस्तकांत लिहिल्यासारखाच अनुभव आला. म्हणजे मेद वाढतांना पोटापासून सुरवात होते, त्याचप्रमाणे कर्मी होतांना पोट सर्वात शेवटी कमी होते. यामुळे इतर शरीर कदाचित् कोणी फाजील कृश म्हणेल इतके झाले, तरी पोट व्हावे तितकें कमी झाले नाहीं. तथापि आजारीपणाची कोणतीही चिन्हें शिल्लक राहिली नाहीत. पूर्वी रक्तदाबामुळे झोप नीट येत नसे, आणि रात्रींतून दोनतीन वेळां उठण्याची सवय होती, त्याऐवजी आतां रात्री एखाद्याच वेळीं उठावे लागते, व किंचित् थकलों तर मुळीच उठत नाही. कांही दिवस अंगावर एक्झेमा होता, तोही आतां नाहीसा झाला. आणखी एक आजाराचे चिन्ह म्हणजे दोन्ही बाजूच्या मूत्रवाहक नलिकांमध्ये मुतखडे असल्याचे एकदां ‘क्ष’ किरणांचे साह्याने दिसले होते. त्यांचे काय झाले हे माहीत नाही. ते खर्चाचे काम असल्यामुळे पुनः तपासलें नाही.
हे सात महिने कच्च्या आहाराचा नियम कडक रीतीने पाळला असेही म्हणता येणार नाही. दूध कच्चे घेण्यांत धोका आहे, तेव्हा ते तापवणे भाग असते. त्याचप्रमाणे इतर अन्न पुरेसे न वाटल्यास बटाटे भाजून किंवा उकडूनही खाल्ले आहेत, कारण ते कच्चे खाणे बरे नव्हे. पूर्वी मधूनमधून मांसाहाराची संवय होती तीही सोडली नाही, आणि अर्थातच मांस कच्चे खाल्ले नाही, परंतु अंडीं कच्चींच खात होतो, व बाकी सर्व पदार्थ कच्चे खात होतो. येथपर्यंत नियम तरी कडकपणाने असा पहिले तीनच महिने पाळला, व नंतर प्रकृति सुधारल्यावर मधूनमधून कोणी भोजनास बोलावल्यास किंवा क्वचित् घरींही अपवाद करू लागलों व अजूनही करतो. कच्चे खाण्याचे मुख्य पदार्थ म्हणजे भुईमुगाचे दाणे, पाण्यांत २४ तास भिजवलेले (असे केल्याने त्यांतला तेलकटपणा नाहीसा होतो), केळी, नारळ, हंगामाप्रमाणे मिळतील तीं इतर ताजी व वाळलेली फळे, अंजीर, द्राक्षे, सफरचंद, बदाम, अक्रोड, काजू, खारीक, खजूर, वगैरे, व गाजर, रताळे वगैरे मुळे, लेट्यूस (सॅलड) वगैरे पाने. दुधाऐवजी पचनाला ताक चांगले, व ताक आणि केळीं भरपूर खाल्ली असतां तोच संपूर्ण आहार होतो. लोणी वेगळे काढले नसेल तर अधिक चरबीचीही जरूर नाही, व तेल खाणे असेल तर तेही हिरवें. कच्चा आहार सुरू करतांना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे पदार्थ उत्तम रीतीने चावावे लागतात, व संवय असल्याशिवाय ते चावून होत नाहीत, व यामुळे प्रथम अतिसार होतो. तसा आम्हासही झाला, परंतु त्यामुळे बिलकुल थकवा न वाटल्यामुळे आहार तसाच चालू ठेवला.
भाज्या वगैरे कच्च्या खाण्यांत एक धोका असतो की त्यांत रोगजंतु असण्याचा संभव असतो. याकरतां कच्चे पदार्थ प्रथम मिठाच्या पाण्यांत कांही वेळ बुडवून ठेवावे व नंतर खावे.
हा आमचा स्वतःचा अनुभव आहे, पुस्तकी विद्या नाहीं. हा अनुभव कोणालाही घेता येईल, मात्र चांगलें चावण्याइतके दांत शाबूत नसल्यास हे सर्व पदार्थ बारीक करून व भाज्यांचा व फळांचा रस काढून घेतला पाहिजे. नपेक्षा ते पचणार नाहीत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.