प्रिय वाचक

प्रिय वाचक,
१. ‘ब्राह्मणांचे गोमांस-भक्षण’ हा लेख छापून तुम्ही काय साधले? ब्राह्मण आता बदलले आहेत. बैदिक हिंदू आता पूर्वी होते तसे हिंसक राहिले नाहीत. समाजसुधारणा म्हणजे ऊठसूठ हिंदुधर्माला आणि ब्राह्मणांना झोडपणे असे तुम्ही समजता काय? ही एक प्रतिक्रिया.
२. पोपप्रणीत धर्मविस्तार ह्या लेखाचे प्रयोजन काय? उगाच धर्मा-धर्मात द्वेषबुद्धी जागृत करायची ही कुठली सुधारणा? ही दुसरी प्रतिक्रिया.
उत्तर इतकेच की, धर्माच्या नावावर मनुष्य किती वेडाचार करू शकतो हे दाखवावे. तो पूर्वी करत होता अन् आता नाही असेही नाही. अंधश्रद्धा निर्मूलनवार्तापत्राचा दिवाळी अंक (१९९९)पाहा. धर्मश्रद्धेच्या नावाखाली विचारशक्तीची गळचेपी आजही चालूच आहे.
३. ‘ब्राह्मण-गोमांस खात, गोहत्या करीत’ हे तुम्हाला धर्मग्रंथांतूनच कळले ना? मग तुम्ही ‘शब्द-प्रमाण’ कसे नाकारता? आप्तवचन हे प्रमाण मानणारे तुम्ही कुठले विवेकवादी? अशी अधिक संतप्त कान उघाडणी फोनवर करणारे आमचे मित्र तर्कशास्त्र-तत्त्वज्ञानाचे नावाजलेले विद्वान प्राध्यापक होते. त्यांच्या हेतूबद्दल आम्हाला शंका नाही. पण एक लहानसा बारकावा त्यांच्या लक्षात आणून देतो. त्यांना निमित्त करून तसा विचार करणा-या दुस-यांनाही ते उत्तर उपयोगी व्हावे.
ज्ञान मिळण्यासाठी इंद्रियांना मिळणारे ‘प्रत्यक्ष’ हे पहिले आणि त्याच्यावर आधारलेले ‘अनुमान’ हे दुसरे ही दोनच प्रमाणे आम्ही मानतो. विज्ञाने तसेच मानतात. त्यात एक खुलासा असा की, खुद्द भाषा शिकताना आणि शब्दांनी, वाक्यांनी, भाषेतून चालून आलेले-अभिव्यक्त झालेले ‘ज्ञान’ही ग्राह्य म्हणून नेहमीच स्वीकारावे लागते. आप्तवचन-किंवा शास्त्र-प्रामाण्य आणि हे ज्ञान यात फरक आहे. इतिहासभूगोल किंवा इतर माहिती प्रत्यक्ष आणि तर्क यांच्या कवेत नेहमीच मावेल असे नसते. व्यवहारात साधी वाट पुसण्यापासून तर कितातरी माहितीसाठी आपण इतरांवर विसंबत असतो. ते सत्य सांगत आहेत या विश्वासावर. शब्दाद्वारे-म्हणजे भाषेच्या उपयोगातून मिळणा-या या ज्ञानाला न्यायदर्शनात ‘शाब्दबोध’ असे नाव आहे. शिलालेख, ताम्रपट यांच्याप्रमाणेच प्राचीन साहित्य-यांद्वारे तत्तत्कालीन माहिती मिळते. ती प्रत्यंतरप्रमाणाने बळकट झाली तर ‘ज्ञान’ म्हणून स्वीकारली जाते. तिचे खरेपण भाषाधीन असते पण ते ब-याच अटी पाळून. आपण ते पडताळून घेतो, तरी तो शाब्दबोध असतो हे मान्य. हे भाषेचे सामर्थ्य मान्य करावे लागते. आप्तवचनाचे तसे नसते. अमुक आप्त-म्हणतो म्हणूनच ते खरे समजणे हे आप्तवचन. आप्त म्हणजे तेथे नातेवाईक असा अर्थ नाही. आप्त म्हणजे खरे बोलणारा. मग ती व्यक्ती असेल किंवा ग्रंथ. धर्मग्रंथ आणि धर्मगुरू ही त्याची उत्तम उदाहरणे. हे आप्तवचन-त्याचे प्रामाण्य आम्हाला मान्य नाही. आप्तांचे खरे बोलणेही तपासून घ्यावे हे आमचे म्हणणे. धर्माभिमान्यांना ते अमान्य आहे. त्यांच्या त्यांच्या काळी जे ज्ञान उपलब्ध होते, ज्या ज्या समजुती प्रचलित होत्या त्यानुसार तथाकथित आप्तवचन तयार झाले. आप्तांचा हेतू शुद्ध असेल पण समज चूक असेल म्हणून ‘आप्तवाक्यं प्रमाणम्’ असे म्हणता येत नाही. ख्रिस्तीधर्मात आल्याशिवाय माणसाला पापमुक्ती नाही. असे हजारो धर्मगुरूंना खरोखरी मनापासून वाटत असेल. पोपला वाटत असेल! मनुष्य जन्मतः पापी आहे कारण मनुष्यजात ईश्वराची आज्ञा मोडल्यामुळे उत्पन्न झाली असे ख्रिस्ती संतांना वाटत असते. त्यांना त्यांचे आप्तवचनच तसे सांगते. येशू हा ईश्वराचा एकुलता पुत्र. तो वळी देऊन ईश्वराने त्याच्या मार्फत आलेल्यांच्या पापमुक्तीची सोय केली आहे हे सगळे आप्तवाक्य सांगणारे सद्हेतूने सांगत असले तरी आम्हाला धडधडीत खोटे वाटते. त्याला प्रत्यतर प्रमाण काय?
यज्ञीय हिंसा ही अहिंसाच असते असे वैदिक धर्मग्रंथ सांगत असले तरी आम्हाला ते पटत नाही. आम्ही आपली बुद्धी वापरावी. एवढेच आमचे म्हणणे.
वेदकालीन ब्राह्मण यज्ञात गोहत्या करीत हे ज्ञान शाब्दबोधाने मिळते. ‘यज्ञीय हिंसा हिंसाच नव्हे’ हे आप्तवाक्य आहे. ‘यज्ञात पशू बळी दिल्याने पशू आणि यज्ञ करणारा यजमान स्वर्गाला जातात’ हे आप्त-वाक्य आहे. पहिले आप्तवाक्य प्रत्यक्ष-विरोधी. आणि दुसरे प्रत्यंतर-प्रमाण-रहित म्हणून-कुचकामाचे!
एका विद्वान प्राध्यापकांनी हा आक्षेप सच्चेपणाने, तळमळीतून घेतलेला असल्यामुळे एवढे विवेचन करावे लागले. त्यांचे समाधान होईलच असे नाही. पण इथल्या चर्चेला मर्यादा आहे.
४. सआदत हसन मंटोला पाकिस्तानी लेखक म्हणावे का? अमृतसरला जन्मलेला, अलिगढला शिकलेला, उमेदीची ८ वर्षे मुंबईत राहून जन्मभर त्या आठवणी कुरवाळणारा आणि शेवटची ७ वर्षे पाकिस्तानात त्रस्त समंधाचे जिणे जगलेला मंटो, त्याला उर्दूचा श्रेष्ठ कथाकार म्हणावे हेच ठीक. “थोडे विवेकी व्हा’ हे तार्किक युक्तिवादाने सांगण्याऐवजी कथेच्या-कलेच्या माध्यमातून तो सांगतो. त्याचे दोन नमुने पेश केले आहेत.
५. दिवाळी अंकांच्या परामर्शाचा एक अंश सादर केला आहे-‘वाचा.’ ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ आणि ‘मिळून सा-याजणी’च्या दिवाळी अंकांचा हवाला देऊन ‘आजचा सुधारक’ बद्दल विचारणा-पत्रे आली तेव्हा लक्षात आले की आमचे हितचिंतक पुण्याचे श्री ताहिरभाई पूनावाला यांनी ती जाहिरात दिली. ताहिरभाईंच्या मूक साहाय्याबद्दल आभार.
६. इ.स. २००० सालच्या जानेवारीच्या ६ तारखेला पुण्याला वाचक मेळावा योजला आहे. पुण्याचे आणि आसमंतातले वाचक भेटावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी, आजचा सुधारकाच्या कामाला अधिक गती मिळावी यासाठी हा प्रयत्न. वाचकांनी साथ द्यावी.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.