प्राचीन आर्यसंस्कृति – १

समाजस्वास्थ्याच्या नोवेंबरच्या अंकात ‘चमत्कारिक खटला’ या मथळ्याखाली फ्रायबुर्ग (जर्मनी) येथील ओटो व त्याची बहीण एलीझ यांवर निषिद्ध समागमाबद्दल १९२८ साली झालेल्या खटल्याची हकीकत आली आहे. सदर खटल्यांतील पुरावा बनावट होता असे पुढे दिसून आले तरी लोकहिताच्या दृष्टीने शिक्षा ताबडतोब पुरी। होणे इष्ट असल्यामुळे अपील अर्जाचा निकाल होईपर्यंत ती तहकूब करता येत नाही असा जबाब आरोपीच्या वकिलास देण्यांत आला.
निषिद्ध-समागमाचे योगाने इतर कोणाचे नुकसान होत नसल्याने असले खटलेच गैर आहेत. पण प्रजेच्या पापाचा हिस्सा यमाच्या दरबारांत राजाच्या खात्यावर चढवला जातो अशी राजकत्र्यांची समजूत असल्यास व निषिद्ध समागम हे पातक मानल्यास बहीणभावाच्या निषिद्ध संबंधाबद्दल राज्यकर्त्यांनी खुनशी वृत्ति दाखवणे क्षम्य होईल.
आदम व हव्वा यांच्या मुलापासून माणसांची उत्पत्ति झाली असे इस्रायल, ख्रिस्ती व मुसलमान लोक मानतात. या मुलांत बहीणभावांच्या समागमापासूनच संतति झाली असली पाहिजे. त्या वेळी असा समागम निषिद्ध नव्हता. पुढे असले समागम कोणीतरी केव्हातरी निषिद्ध ठरवले व तोच समज आतापर्यंत चालू आहे. या संबंधाचा जर्मनीचा कायदा अगदी अविचारी आहे. इंडियन पीनल कोडाप्रमाणे असे समागम शिक्षेस पात्र नाहींत. तो फार तर साधा व्यभिचार* गणला जाईल. या बाबतींत हिंदुस्थान जर्मनीच्या पुढे आहे असे म्हणता येईल.
विविधवृत्ताच्या आक्टोबर महिन्यांतील एका अंकात एका बहीणभावाच्या लग्नाची हकीकत आली आहे. आसामातील मणगंज गांवीं नाग नांवाचे एक बंगाली कुटुंव होते. पैकी आई आणि बाप वारल्यावर पांच वर्षांची मुलगी मागे राहिली. मुलास तेजपूर येथील ख्रिस्ती अनाथालयांत आश्रय मिळाला, मुलीचे पालन तिच्या चुलत्याने केले. मुलाची वास्तपुस्तु कोणी केली नाही. आपणास एक भाऊ आहे याची जाणीव मुलीस नव्हती व बहीण असल्याची जाणीव भावास नव्हती. भाऊ डाक्टरी शिकून धंदा करण्यासाठी मणगंज येथे आला. तेथे एके दिवशी त्याला सुशीलेला पाहण्याचा प्रसंग आला. सुशीला सुंदर होती. त्या दोघांचे तत्काल एकमेकांवर प्रेम बसलें व लवकरच ती शास्त्ररूढिमान्य विधींनी विवाहबद्ध झाली. काही महिने त्यांनी सुखांत काढले. पण सुशीलेची मावशी एकदा तिच्या घरी रहावयास आली व बोलतांबोलतां नाग हा सुशीलेचाच भाऊ आहे असे तिला कळून आले. बहीणभावांचा समागम म्हणजे मोठे पाप अशी तिची समजूत असल्याने हे पाप यापुढे तरी होऊ नये या तिच्या मताप्रमाणे सद्धेतूने तिने खरी गोष्ट आपल्या भाचाभाचीच्या कानावर घातली, आणि त्या क्षणापासून ते दोघे निष्पाप जीव सुख, समाधान आणि मनःशांति यांना कायमचे आंचवले. यावेळी सुशीला काही महिने गेले असल्याने घोटाळा जास्तच झाला आहे. समाजाच्या आजच्या मनःस्थितीमुळे विचारी सुशीला व तिचे निरपराधी मूल यांचे आयुष्य कष्टदायी होणार व तेंहि त्यांचा यत्किंचितहि अपराध नसतांना.
भगिनीप्रेम व पत्नीप्रेम हीं अगदी भिन्न आहेत अशी समजूत आहे, पण या उदाहरणावरून ती चुकीची आहे असे दिसते. बहीण ही उपभोग्य नसल्याने तिच्यावरचे प्रेम सहज जन्मापासून उत्पन्न झाले असले तरी त्याची वाढ खुटते. खया पत्नीप्रेमाची तीव्रता त्याला नाही. प्रेम हे एकच, कस मात्र निरनिराळ्या नात्याचा. संबंध माहीत असल्यामुळे अमुक स्त्री वहीण आहे असे समजलें म्हणजे प्रेम लवकर बसते, पण ते अत्युच्च कोटीला जात नाही. नात्याचा संबंध कोणी सांगितल्याशिवाय आपोआप स्वाभाविकपणे कळत नाहीं. परस्पराकर्षण असेल तर दोन स्त्रीपुरुषांत पतिपत्नीप्रेम हळूहळू वाढत जाते, मग त्यांचे जन्मतः नाते असो किंवा नसो.
सध्याच्या समाजाच्या समजुतीप्रमाणे कांही विशेष नात्याची स्त्री समागमास निषिद्ध ठरवली आहे. धर्मभिन्नत्वाने या नात्यांत फरक पडतो. मुसलमान धर्मात रक्तमांसाची नाती फारशीं नाहीत, पण दुधवहिणीशी म्हणजे दूध पाजणा-या दाईच्या मुलीशी लग्न निषिद्ध आहे. ख्रिस्ती धर्मांत कांही देशांत मेहुणीशी लग्न मना आहे. आमच्या हिंदुधर्मात निषिद्ध स्त्रियांची संख्या फार मोठी आहे, विशेषतः ब्राह्मणवर्गात फार मोठी आहे. तरी सर्व ब्राह्मणांत एकच नियम आहे असेंहि नाही. सगोत्र व सप्रवर विवाह तर निषिद्ध आहेतच. यांतील सप्रवराच्या अडचणीकडे दुर्लक्ष केले जाते. सपिंडाचा विवाह मुलीच्या बाजूने पांच व मुलाच्या बाजूने सात पिढ्यापर्यंत पाळला जातो. पण येथेहि ऋग्वेदी देशस्थांसारख्या काही जातींत मामाच्या मुलीबरोबर व आतेच्या मुलीबरोबर लग्न चालते. भाऊ व बहीण यांच्या मुलांत परस्पर विवाह ब्राह्मणेतर जातींत विशेष प्रमाणावर होतात. पण दोन भाऊ किंवा दोन बहिणी यांच्या मुलांत विवाह निषिद्ध मानला आहे. तथापि मुलगी दत्तक देण्याचा फार्स करून मावसबहीणभावांत लग्न झाल्याचे ब्राह्मण जातींतील एक उदाहरण आमच्या माहितीचे आहे.
*टीप : इडियन पीनल कोडप्रमाणे कुमारिकेशी किंवा विधवा स्त्रीशीही व्यभिचार होऊ शकत नाही. विवाहितेच्या पतीची हरकत नसेल तरी देखील हा संबध व्यभिचाराच्या कक्षेत येत नाही.
– संपादक
कोल्हापूर व त्याचे दक्षिणेकडील रामेश्वरपर्यंतच्या प्रदेशांत कोणाही पुरुषाचे बहिणीच्या मुलीशी लग्न होते,* पण इतर भागांत हा संबंध निषिद्ध आहे. ब्राह्मण व त्यांचे अनुकरण करणा-या सुशिक्षित जातींत सगोत्र विवाह वर्ण्य आहेत. माध्यंदिन शाखेचे ब्राह्मण यापलीकडे जातात. मुलाच्या बापाच्या गोत्राची वधू त्यांस चालत नाहीच, पण मामाच्या गोत्राचीहि चालत नाही.
दोन गोत्रे पाळणारे शुक्लयजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण एकच गोत्र पाळणा-या इतर ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ आहेत असे नाही. मामाभाचीचे लग्न करणा-यांची संतति कमी दर्जाची होते असाही अनुभव नाही. यावरून गोत्राचे वगैरे नियम विनाकारण अडचण उत्पन्न करणारे आहेत, त्यांचा मुळीच उपयोग नाही असे दिसते.
या बाबतीत ‘ब्रिटिश युजेनिक सोसायटी’ पुढे लंडन येथे मि. ए. एम्. लुडोविची यांनी दिलेल्या व्याख्यानांतील कांही मुद्दे महत्त्वाचे आहेत. हे आपणास स्वतंत्र वृत्तीचे शास्त्रज्ञ म्हणवतात. एकाच रक्ताच्या माणसांत शरीरसंबंध होणे हे आरोग्य व बुद्धिमत्तेची वाढ या दृष्टीने इष्ट आहे असे त्यांनी प्रतिपादिले. ते म्हणाले, जवळच्या नात्याच्या माणसांतील समागमास जे अडथळे घालण्यात आले आहेत ते काढून टाकले पाहिजेत, कारण माणसाच्या जादूटोण्यावरील भोळ्या विश्वासामुळेच हे अडथळे अस्तित्वात आले. जादूटोणा किंवा धर्मभोळेपणा, यांचा पगडा शरीरसंबंधाचे बाबतींत चालू देणे इंग्रज राष्ट्रास योग्य नाही. मुख्य प्रश्न इंग्रज लोकांस आरोग्य व बुद्धिमत्ता पाहिजे की नको हा आहे. ती पाहिजे असल्यास जवळच्या नात्यांत शरीरसंबंध होणे हाच मार्ग आहे. ते पुढे म्हणाले, “समाजाच्या बाल्यावस्थेत माणसाचे क्षेत्र संकुचित असल्याने जवळच्या नात्यांतच संबंध होत. त्या काळी राजे लोक आपल्या बहिणीशी लग्न लावीत. इजिप्तची राणी क्लिओपात्रा ही बहीणभावांची मुलगी होती, व तशाच जोडप्याची ती नात होती. नातीगोतीं टाळून लग्न केल्यास रोगबीजें कांही काळ छपली जातात, पण याउलट जवळच्या आप्तांत संबंध झाल्यास ते दोष स्पष्ट बाहेर येतात व ते काढून टाकतां येतात.
क्लिओपात्राचे उदाहरण देऊन जुना संप्रदाय या शास्त्रज्ञाने सिद्ध केला आहे त्याचा विचार करणे जरूर आहे. आपल्या आर्यसंस्कृतींत या मिसरदेशाच्या संप्रदायास दुजोरा मिळतो काय हे पाहणे योग्य होईल.
*टीप : कोल्हापूरचे प्रा. म. द. हातकगलेकर यांच्या बहिणीचे लग्न त्यांच्या सख्ख्या मामाशी झाले होते. पाहा-मौज (दिवाळी ‘९९) पृष्ठ क्र. ८२.
– संपादक
आर्यसंस्कृतीचे दोन मुख्य प्रवाह. एक पूर्वेकडील म्हणजे इराण व आर्यावर्त आणि दुसरा यूरोपीय. प्रस्तुत प्रसंगी आर्यावर्तीतील व तेथून बाहेरदेशी गेलेल्या आर्यसंस्कृतीचाच विचार करू. या संस्कृतीची नोंद दोन भाषेतील ग्रंथांत आढळते. एक संस्कृत व दुसरी पाली. हिला बुद्धइतिहास असेंहि म्हणतात. संस्कृत भाषेतील ग्रंथांचेहि दोन भाग आहेत. एक वैदिक व दुसरा पौराणिक, बुद्धाची संस्कृति आर्यसंस्कृतीच आहे म्हणजे हिंदुसंस्कृति आहे. बुद्धाने आपला उपदेश लोकांच्या चालू भाषेतच केला व त्याच्या अनुयायांनी आपले ग्रंथ चालू म्हणजे पाली भाषेत लिहिले म्हणून हे ग्रंथ परकी वाटतात.
यापुढील विवेचनास मुख्य आधार डाक्टर एस. सी. सरकार, पाटणा कालेजांतील ‘इंडियन हिस्टरी’चे प्रोफेसर, यांच्या ‘सम् आस्पेक्ट्स् ऑफ़ दी अर्लिएस्ट् सोशल हिस्टरी ऑफ़ इंडिया (प्रीबुद्धिस्टिक् पीरिअड्)’ या ग्रंथाचा आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटींत अभ्यास करीत असतां ‘डॉक्टर ऑफ फिलॉसफी’ ही पदवी मिळवण्यासाठी संशोधनात्मक असा हा ग्रंथ त्यांनी १९२३ सालीं लिहिला. पुढे तो १९२८ सालीं ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ मार्फत प्रसिद्ध केला. हा ग्रंथ फार वाचनीय आहे. यांत पूर्वकालचीं घरें, घरांतील सामान, पोषाख, केशरचनेचे प्रकार, स्त्रीपुरुषसंबंध, बहुपत्नीत्व, बहुपतित्व, नियोग, विधवाविवाह, सती जाणे वगैरे अनेक विषयांवर विचारपूर्वक शोध करून विवेचन केले आहे.
ग्रथमतः वैदिक भागांतील उल्लेखांचा विचार करू. विवाह ही संस्था पूर्वी मुळीच नव्हती. सर्व स्त्रिया ‘अनावृता’ होत्या म्हणजे परतंत्र नव्हत्या, विवाहसंस्था श्वेतकेतूने प्रथम स्थापिली असा स्पष्ट उल्लेख महाभारतांत पंडुकुंतीच्या संवादांत आहे. तसा स्पष्ट उल्लेख वेदांत कोठेहि आढळत नाही. पण विवाहाच्या पाय-या अनेक आहेत, म्हणजे स्त्रीपुरुषसंबंध निरनिराळ्या परिस्थितींत भिन्नभिन्न प्रकारचे असतात व त्यांपासून सध्याची विवाहसंस्था उत्क्रांत झाली असे अनुमान काढण्यास आधार देणारे उल्लेख बरेच ठिकाणी आढळतात.
ऋग्वेद मं. १० सूक्त १० यांत यम व यमी यांचा संवाद आहे. ही जुळीं भावंडे होती. यमीची इच्छा यमाशीं समागम करण्याची होती. तिने ‘गर्भ च नौ जनिता दंपती कः’ म्हणजे सृष्टिकर्याने आम्हांस गर्भातच दंपती उत्पन्न केले आहे, असा आधार पुढे केला. यमाला हा संबंध पसंत नव्हता. तो म्हणतो भाऊ व बहीण यांचा शरीरसंबंध होईल असा काल येईल. यावरून असे कांहीं संबंध सूत्रकारास माहीत असावे. ऋग्वेद मं. १० सूक्त १६२, व मं. ६ सूक्त ५५; अथर्ववेद ८, सूक्त ६,७, वगैरेंतील उल्लेखांवरून बहीणभावांचे संबंध हे ब्राह्मण वर्गात तरी प्रचारांत होते. स्त्रीच्या उपभोक्त्यांमधे पति, उपपतीबरोबरच भावाचाहि उल्लेख आढळतो. मुलगा व वारस उत्पन्न करण्याच्या उद्देशाने बहिणीशीं समागम करावा असाहि उल्लेख आहे. अथर्व १४, सु. २, ३३ विवाहसुक्तांत पितरांमध्ये बसलेली, अलंकार घातलेली जामी (बहीण) इच्याशी लग्न करणे हा विश्वावसूचा जन्मसिद्ध हक्क आहे असे आहे. बहिणीबरोबर लग्न होत असे असे या मंत्रावरून ध्वनित होते.
बाप व मुलगी यांचे संबंधाविषयी इतका स्पष्ट उल्लेख वेदांत आढळत नाही. परंतु तेथेहि कांही ठिकाणी दृष्टांतांत किंवा उत्प्रेक्षेच्या रूपांत या संबंधाचा ध्वनि निघतो. प्रजापति व त्याची कन्या, पूषन् व त्याची आई आणि त्याची बहीण यांचे समागमाचा उल्लेख आहे. वेदद्रष्ट्या ऋषीचे हे देव होते. यावरून अशा संबंधामुळे देवांस कमीपणा येत नव्हता, तेव्हा त्या कालीं तरी हे संबंध प्रतिष्ठितपणाचे समजले गेले असले पाहिजेत. बापाच्या मुलीशी झालेल्या समागमाचा अथर्ववेदांत एके ठिकाणी दाखला दिला आहे. ऐतरेय ब्राह्मणांत राज्याभिषेकसंबंधात व शुनःशेप प्रकरणांत एक फार जुनी गाथा दिली आहे, तिचा आशय असा आहे की पुत्राकरता आई, बहीण व पत्नी यांशीं पुरुषाने समागम करावा.
पुराण इराणांतहि ही चाल जारी होती व इराणी आर्य म्हणजे हिंदी आर्याचीच शाखा होय. त्यांतीलच मद्र, वाहटेक वगैरेंतहि हा प्रकार होता, याचा उल्लेख महाभारताच्या कर्णपर्वांत आहे. पुराण ऐरिश लोकांतहि असाच संप्रदाय असे, असें स्ट्राबोच्या ग्रंथांत आहे. हे पश्चिमेकडील आर्य. बहीणभाऊ, बापमुलगी किंवा मुलगा व आई असे समागम झाले असल्याचा पुरावा आर्य ग्रंथांत जसा मिळतो, तसा इराण, ईजिप्ट, पेरू, आयर्लंद वगैरे देशांतहि सांपडतो. याचे कारण शोधू गेल्यास कुळाची शुद्धता राखणे व त्या योगाने प्रतापी प्रजा निर्माण करणे हा मूळ हेतु असावा असे वाटते. बहीणभावंडांच्या समागमापासून झालेली संतति एक रक्ताची असणार. हे रक्त कायम ठेवायचे असेल तर त्यांत दुस-या घराण्यांतील भेसळ होऊ देता कामा नये. पुत्राकरता आई, बहीण वगैरेशी संबंध करावा या अर्थाची गाथा सांगितली आहे त्याचा अर्थ शुद्ध रक्ताच्या पुत्रासाठी असा घेणे योग्य होईल. या वेळी बीज श्रेष्ठ की क्षेत्र श्रेष्ठ हा वाद उत्पन्नच झाला नव्हता, कारण बीज व क्षेत्र एकाच रक्ताचे होते. राजे किंवा धर्मगुरू यांचेमधे या रक्तशुद्धीचे महत्त्व फार. राज्यावर मुलाचा तसा मुलीचाही वारसा, ही दोघेहि शुद्ध बीजाची असतील तेव्हा. यामुळे बहीणच महिषी होऊन राज्याची मालकीण होई. राजास इतर बायका असल्यास त्यांचा दर्जा खालचा. बहीणराणीस मुलगा असल्यास तो राज्याधिकारी. रामभरताच्या कथेत हा प्रकार स्पष्ट दिसतो असे पुढील विवेचनावरून दिसेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.