महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषा कोप-यात

एक वृत्तान्त :
मराठी भाषेची सद्यःस्थिति आणि भवितव्य या विषयावर कोकण मराठी साहित्य परिषदेत (को.म.सा.प.) परिसंवाद झाला. प्रत्यक्षात ‘महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषा कोप-यात’ अशा शब्दात विषय मांडला तरी आशय तोच.
न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे हे परिसंवादांचे अध्यक्ष होते. आणि मुंबईसकाळचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर, महाराष्ट्राचे सेवानिवृत्त भाषासंचालक डॉ. न. ब. पाटील आणि सुरेश नाडकर्णी हे वक्ते होते. मराठीची आणि मराठी माणसाची महाराष्ट्राच्या राजधानीतून हकालपट्टी होत आहे, द्रव्यबळ आणि स्नायुबळ हेच प्रभावी ठरत आहेत, असा मुद्दा अध्यक्षीय भाषणात मांडला गेला. नार्वेकरांनी वृत्तपत्रसृष्टीतील मराठीची गळचेपी निदर्शनास आणली. मुंबईत मराठी माणसाचे प्रमाण २३% वर आलेले आहे, असे सांगून ते म्हणाले, बॉम्बेचे ‘मुंबई’ झाले पण ती बाहेर ढकलली जात आहे. गिरगाव आणि गिरणगाव सोडून वाशी, उरण, बेलापूर, नालासोपारा, विरार, पनवेल असा दूरवर मिळेल तिथे मुंबईचा मराठी माणूस आश्रय शोधत गेला. मुंबईत अहोरात्र लोकसंख्येत भर पडत आहे ती परप्रांतीयांची. तरी वाशी, उरणला विक्रेत्यांच्या दुकानात मराठी पत्रे अपवादानेच आढळतात. याउलट तामीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, हिन्दी इतकेच नव्हे तर उर्दू वृत्तपत्रे सहज उपलब्ध असतात. कारण त्यांना ग्राहक आणि वाचक असतात. मराठी माणूस वर्तमानपत्र वाचतो पण शेजा-याचे; तो सकाळी उठायच्या आत. पोटासाठी मुंबईत आलेल्या परप्रांतीयांना आपण मराठी शिकले पाहिजे, येथील सामाजिक जीवनाशी एकरूप झाले पाहिजे असे काही वाटत नाही. मराठीचा योग्य तो मान मराठी माषिकच राखत नाहीत तर इतरांकडून ती अपेक्षा आम्ही का बाळगावी. १ कोटी लोकसंख्येच्या मुंबईत नामांकित मराठी पत्रांचा खप १ लाखाच्या वर जात नाही. आमची पत्रे अजूनही इंग्रजी भाषांतरावरच जगतात. मग ते गचाळ आणि गलथान का असेना!
प्रस्तुत लेखक (डॉ. न. ब. पाटील) यांनी अध्यक्षीय भाषणातील एक विचारसूत्र पुढे नेले. भाषा सामुदायिक जीवनाचा रेशमी भावबंद आहे. मात्र मानवी उत्क्रांतीच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर तो निर्माण झाला. माणसांचे सांस्कृतिक जीवन भाषेमुळे शक्य झाले असे त्यांचे म्हणणे. भाषा नसती तर, चांगले आणि वाईट, सत्य आणि असत्य याबद्दल कोणाला काहीच अभिव्यक्ती करता आली नसती. उपनिषदातील विचाराचा आधार घेऊन डॉ. पाटील म्हणाले, ऋषींनी वाचेची उपासना करण्याचा मंत्र आपल्याला दिला आहे. असे सांगून त्यांनी राजभाषा मराठीचा यादवकालीन आणि शिवकालीन उपयोग या विषयाचा संक्षेपाने आढावा घेतला. राज्य पुर्नरचना झाल्यानंतर राजभाषा म्हणून मराठीची पायाभरणी करावी लागली. जुन्या शब्दांना नवी झिलई देऊन आधुनिक संकल्पनांच्या मांडणीसाठी त्यांचा उपयोग करावा लागला. कधी व्यावहारिक, वैज्ञानिक, आणि तांत्रिक गरजांसाठी टाकसाळीत नाणी पाडावीत तसे नवे शब्द घालावे लागले. याप्रमाणे आजवर निदान १ लाख नवे शब्द बनवून भाषेत प्रविष्ट करण्यात आले आहेत. मात्र अभ्याक्रमानुसार पुरेशी पाठ्यपुस्तके निर्माण झाली नाहीत. जी काय निर्मिती विद्यापीठ ग्रंथ निर्मितिमंडळाने केली किंवा साहित्य सांस्कृतिक मंडळाने त्यात भर घातली तीही प्रभावी वितरणव्यवस्था नसल्यामुळे ज्यांच्यापर्यंत पोहोचावी तिथवर पोहोचली नाही अशी कबुली देऊन ते म्हणाले. मुंबईत मराठी माध्यमाच्या शाळा हळूहळू बंद पडत आहेत आणि ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळांची मागणी वाढत आहे, हे कठोर वास्तव आहे. डॉ. पाटील यांच्या मते मराठीच्या अध्ययन-अध्यापनाच्या दर्जात फार मोठी सुधारणा करणे आवश्यक आहे. त्या शिवाय आणि सहज, सोप्या मराठीत सर्व विषयांचे अध्यापन मराठीतून झाल्याशिवाय लोकांचे इंग्रजी माध्यमाचे वेड जाणार नाही.
डॉ. पाटील यांनी राजभाषेचा प्रश्न भाषेच्या कौशल्यपूर्ण आणि तंत्रशुद्ध शिक्षणाशी जोडला इतकेच नाही तर लोकशिक्षण व लोकशाहीचे यशापयश, मातृभाषा, राजभाषा या संबंधावर अवलंबून आहे हे दाखविले. परिस्थिती अगदीच निराशाजनक नाही असे सांगून त्यांनी माहिती दिली की १९७८ पर्यंत राज्यव्यवहारात मराठीचा वापर जो २५ ते ३०% होता तो आज २० वर्षांत ८० ते ८५% झाला आहे. मात्र कायद्याच्या किंवा न्यायदानाच्या क्षेत्रात वापरण्यासाठी आवश्यक ती पारिभाषिक तरतूद करूनदेखील तेथे मराठीचा वापर अजून सुरू झाला नाही.
तिसरे वक्ते डॉ. सुरेश नाडकर्णी यांनी वैद्यकीय क्षेत्रात मराठीचा वापर होत नसल्यामुळे सामान्य माणसाची कशी कुचंबणा होते या मुद्द्यावर बोट ठेवले. औषधाचे नाव इंग्रजी, कोणते औषध केव्हा घ्यावे याच्या सूचनाही बाटलीवर इंग्रजीत अशी स्थिती आहे. औषधांच्या जाहिराती, माहितीपत्रके मराठीत असली पाहिजेत असे बंधन महाराष्ट्रात नाही. त्यामुळे बहुसंख्य कंपन्यांची माहितीपत्रके मराठीतर भाषांत असतात. मराठी जनता वर्षानुवर्षे हा अन्याय सहन करीत आली आहे. वैद्यक व्यावसायिकांनी अधिक लोकाभिमुख व्हावे म्हणजे आम जनतेच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्यास हातभार लागेल. राज्य मराठी संस्थेने घेतलेल्या पुढाकारात या व्यावसायिकांचे मराठी पुस्तकलेखनात सहकार्य मिळत आहे याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.