एका आमंत्रणपत्रिकेचा पंचनामा

ही आमंत्रणपत्रिका एका मखमलीसारख्या कापडाच्या वीतभर लांब लिफाफ्यात होती. लिफाफा बंद राहण्यासाठी ‘व्हेल्क्रो’चे तुकडे लावले होते, व लिफाफा गोंडे लावलेल्या सोनेरी गोफाने बांधलेला होता. आतमध्ये एका सात इंच लाव नक्षीदार लाकडी दांडीला पाच इंच रुंद व पंधरा इंच लांब सॅटिन-रेशीम जातीचा कापडी पट जोडलेला होता. त्याची गुंडाळी करून तिला एका सोनेरी गोफाने बांधले होते. या गोफात एक कार्ड ओवले होते, ज्याच्या एका बाजूवर पत्रिका पाठवणाच्या कुटुंबाचे नाव व पत्ता छापलेला होता. दुस-या बाजूला आमंत्रितांची नावे लिहिण्यासाठी जागा होती.
पटाच्या वरच्या भागात गणपतीचे चित्र व दोहो बाजूस ‘प्रसन्न झालेल्या कुलदैवतांची नावे होती. पटावरील मजकूर असा –
वर्धानिवासी वरदहस्त प्राप्तवर्ति, श्रीमान अस्थिशल्य विशारद राम गणेश रानडे आणि सकल सौभाग्य संपन्न बालरोग विशारद सीता राम रानडे या उभयतांचा यथोचित नमस्कार, विनंती उपरी विशेष.
आमची द्वितीय कन्या चिरंजीविनी सौभाग्य कांक्षिणी ‘बेला’ हिचा विवाह सोहळा नेमस्त केला आहे. सोयरीक अकोला गावीचे सकल सौभाग्य संपन्न अन्नपूर्णाबाई साहेब व भूतपूर्व लेखापाल श्री दामोदरसाहेब देशपांडे ह्यांचे चिरंजीव विजयीभव श्रीमान ‘अंगद’ ह्यांचेशी साधली आहे. ह्या विवाहसोहळ्याच्या निमित्त आयोजित स्वागत समारंभास श्री कुलस्वामिनीचा आशीर्वाद लाभला आहेच. तरीही आपले येण्याने सोहळ्यास खचितच बहुत शोभा येणार आहे. स्वकीय कार्य समजून अगत्याने येण्याचे करावे. बहुत काय लिहिणे.
वडिलांचे निमंत्रण माझेही समजून भगिनीचे लग्नास अगत्याने द्यावे. डॉ. अशोक रानडे. स्वागत समारोह : गुरुवार, फिरंगी तारीख १६ डिसेंबर सायंकाळी ७ ते १० सम्राट हिरवळ, सिव्हील लाईन्स, प्रतिभा निवास, रामनगर, वर्धा, दुरध्वनी – १२३४५
(नावे, गावे व पेशे बदलले आहेत, पण ‘शुद्धलेखन’, शब्द तोडणे, परिच्छेद पाडणे वगैरे मुळाबरहुकूम आहे.)
या पत्रिकेची किंमत अंदाजे दोनशे रुपये असावी, असे कळते. समारंभास तेराचौदाशे (तरी) माणसे हजर होती म्हणे. आमंत्रणांची संख्या पाचेकशे तरी असणार. लाखभर रुपये पत्रिकांवर खर्च झाल्यावर एकूण सोहळा दहा-बारा लाखांना पडला असावा. या ‘नेत्रदीपक’ उपभोगा बद्दल, Conspicuous Consumption बद्दल प्राप्तकत्र्यांची मते आजमावली ती अशी
क) हो, बुवा! करतात आजकाल, आमच्या दिनूच्या वेळी रुखवतातच …..
ख) रानडे आडनाव असूनही हौसेनं करतात, सगळं!
ग) छान मुलगी आहे, बेला!
घ) अरे खूप कमावतात दोघेही. मग करायचं काय त्या पैशांचं? आणि दोनशे नसेल किंमत, फारतर एकशे ऐंशी ……..
काही मते ऐकू आली नाहीत, जी ‘प्रायोगिक’ भूमिकेतून आम्ही मांडली.
च) भारतातील सध्याचे दरडोई वार्षिक उत्पन्न पाहता या लग्नात सरासरी भारतीय माणसाचे एक ‘शतक’ खर्ची पडले. यालाच आपण ‘एकविसाव्या शतकात (व त्याही पलिकडे) जावे’ म्हणतो का? दोन पूर्ण आयुष्ये ‘कामी आली.
छ) या पत्रिकेच्या कर्त्यांना भ्रष्टाचाराबद्दल पोटतिडकीने बोलताना ऐकले आहे. ते व त्यांच्यासारखे पेशेवर, मध्यमवर्गीय लोक आयकर-व्यवसाय कराबद्दल मारलेल्या धाडींचे बळीही ठरतात. राजकारण्या-उद्योजकांचा तो भ्रष्टाचार, आणि मध्यमवर्गीयांचा तो ‘कर-बचाव’ (Tax avoidance, evasion नव्हे!) असे नीतिशास्त्र आहे का?
ज) गरीब देशांमध्ये उधळपट्टी नेहेमीच गर्हणीय मानायला हवी. पण ओरिसा तील चक्रीवादळाच्या महिन्याभरातील ही घटना ‘बीभत्स असंवेदनशीलता’, या वर्गात जाते.
झ) पूर्वी मोठ्या घरांमध्ये आश्रितही हमखास असत. एकाच कापडाच्या ठाणातून घरच्या व आश्रितांच्या मुलांचे कपडे केले जात. घरच्या मुलांच्या लग्नमुंजीसोबत आश्रितांकडचीही कार्ये होत. आज नाते किंवा स्नेहसंबंधातील मुलाकुटुंबांना आश्रय देणे प्रतिष्ठेचे राहिलेले नाही. दुबल्यांना मदत करून आपल्या संधी कमी का करा, अशी वृत्ती दिसते. हे वंशवादाचे मूळ असलेल्या ‘सामाजिक डार्विनवादा’चे पुनरागमन आहे का?
ट) आज पेशवाई बुडून दोनेक शतके झाली. तो काळ कोणत्याही अर्थी ‘सुवर्णयुग’ नव्हता. मग आज मध्यमवर्गीय मराठी ब्राह्मणांना तो का मोहवतो? आणि जर परतपरत ब्राह्मण माणसे ‘त्या’ बरयाच अन्यायकारी काळाबद्दल उसासे टाकतात, तर त्यांना इतर लोकांनी जातिवाचक शिव्या घातल्यावर दुःख का होते?
ठ) असे सांगतात की वेदकाळात घरातील कर्त्या स्त्रीपुरुषांनी जेवायला बसताना हाकेच्या अंतरात कोणी भुकेला नाही याची खात्री करूनच जेवायचा प्रघात होता. हा ‘सनातन धर्म सोडून आपण मंडल-कमंडलच्या अभद्र चक्रात कसे अडकलो?
ही मते मांडल्यावर बहुधा प्रतिसाद असा आला, की आम्ही “जास्तच करतो”! असाही प्रतिप्रश्न आला, की “ओरिसाची जबाबदारी काय मध्यमवर्गानेच घ्यायची आहे?”
आम्ही (मी!) आमच्या एका गुरूचे, जॉर्ज ऑर्वेलचे मत मानतो, की समाज बदलतात ते फक्त मध्यमवर्गामुळे. त्यामुळे विचारांची प्रगल्भता, जबाबदारीची जाणीव, औदार्य, सौजन्य, सहिष्णुता, ज्ञानमीमांसा, या सा-या गोष्टी अंगी बाणवण्याची जबाबदारी मध्यवर्गाचीच फक्त आहे.
आमचे चुकते आहे का? आम्ही जास्त’ करतो आहोत का?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.