खरी पूजा

जर ह्या विश्वातील अद्ययावत वस्तुजाताच्या मुळाशी त्यांना धारण करणारी, चालन करणारी, किंवा जिच्या क्रमविकासाचे ते परिणाम होत आले आहेत अशी जी शक्ति आहे तिला देव म्हणावयाचे असेल तर त्या देवाने हे सारे विश्व, मनुष्यास त्याचा मध्यबिंदु कल्पून केवळ मनुष्याच्या सुखसोयीसाठीच निर्मिले ही भावना अगदी भाबडी, खुळी, आणि खोटी आहे.
काही झाले तरी मनुष्य हा ह्या विश्वाच्या देवाच्या खिसगणतीतही नाही. जशी कीडा, मुंगी, माशी, तसाच ह्या अनादि-अनंत कालाच्या असंख्य उलाढालीतील हा मनुष्यही एक.
विश्वाच्या देवाशी, वाटच्या भिकारड्याने सम्राटाशी जोडू पाहावा तसा कोणताही बादरायण संबंध जोडण्याची लालची हाव मनुष्याने आमूलाग्र सोडून द्यावी. विश्वाची आदिशक्ती ज्या काही नियमांनी वर्तते ते नियम समजून घेऊन मनुष्यजातीच्या हिताला पोषक होईल त्याचा उपयोग करून घेणे हीच खरी पूजा होय.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.