अचमत्कारी साधु श्री. वामनराव पै (सद्गुरु, बी. ए. ऑनर्स, वगैरे)

चमत्कारी बाबा, महाराज, योगी वा तांत्रिक यांना विरोध करणे सोपे व सोयीचे आहे. या लोकांच्या खोटारडेपणास बेपर्वाई, शुद्ध बावळटपणा, वगैरेंची जोड मिळून त्यांना हातोहात पकडणे वा कुठल्याही कायद्याखाली डांबणे, या गोष्टी शक्य होतात. अर्थात, हे सर्व असूनदेखील हे महंत ठिकठिकाणी प्रकट होतच असतात व अनेक लोकांना फसवतच असतात. त्यांना जरब बसविणे हे त्यामुळेच महत्त्वाचे काम असते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महाराष्ट्र वा “अ. भा.”) वा तत्सम संस्था हे काम करीत असतात.
अशा जनजागृतीच्या मोहिमांचा एक परिणाम म्हणून बरेचसे चमत्कारी’ बुवा ‘छुपे चमत्कारी’ बनतात. म्हणजे ही मंडळी असे म्हणू लागतात, की आम्ही चमत्कार घडवत नाही, तर ते घडतात. (“कर्ता-करविता” वेगळाच.) युकॅरिस्ट ख्रिश्चन पंथाची मंडळी “पंगुं लंघयते गिरिं” सारख्या गप्पा करतात. तुम्हाला लाभली तर वाहवा, आणि नाही लाभली तर परत द्या, या पद्धतीने हे चालते. युरी गेलर सारखे (मनःशक्तीने चमचे वाकविणारा वाकबगार) लोक या प्रवृत्तीचा पूर्ण फायदा उठवितात. युरी गेलर चमत्कारासाठी आल्यावर त्याला अनेक चमचे, सुया, काटे दाखविले जात. मग तो म्हणे, की प्रयत्न करणे माझ्या हातात आहे, पण यश हमखास काही नाही. मग प्रयत्न करणे व अयशस्वी होणे या मालिकेत एखादा चमचा वा सुरा वाकून जायचा, आणि गेलरच्या टोपीत आणखी एक मानाचा तुरा चढायचा.
आपल्या भक्तांकरवी/सहायकांकरवी आपली प्रसिद्धी घडवायची, पण आपण स्वतः मात्र त्याविरुद्ध बोलायचे; असा वकिली कावा काहीजण करतात. (उदा. हल्लीचे नरेंद्रमहाराज) तर काही जण इतके यशस्वी झालेले असतात, की त्यांच्याजवळ सुरक्षा रक्षकांचा (शारीरिक, मानसिक, कायदेशीर, वगैरे) ताफा असतो. मग अशा मंडळींना आव्हान देणे तर सोडाच, पण साधे काळे बिल्ले लावून त्यांच्या समोर जाणेही दुरापास्त असते. (सत्य साईबाबा, महेश योगी.)
या सर्व उघड वा छुप्या चमत्कारी महापुरुषांबरोबर आढळणारी आणखी एक जमात म्हणजे “अचमत्कारी बाबा’, यांचा बाज, प्रचाराची तन्हा, वगैरे गोष्टी ब-याच निराळ्या असतात. सहसा हे लोक चमत्कारी बाबा-महंतांना विरोध करीत नसले, तरी त्यांचे फोलपण ते दाखवितात. या संदर्भात आद्य शंकराचार्यांच्या एका गोष्टीची आठवण होते. शंकराचार्य असेच कुठे भ्रमण करीत असताना त्यांना एक सिद्धपुरुष भेटतो. त्याने “शेकडो वर्षे तपस्या करून एक अद्वितीय सिद्धी प्राप्त केलेली असते. ती सिद्धी म्हणजे पाण्यावरून चालण्याची कला. नदीच्या काठी या माणसाने केलेला प्रयोग पाहून शंकराचार्य त्या योग्याची किंमत होडीच्या भाड्याइतकी ठरवितात!
अशा लोकांना चमत्कार व त्यायोगे होणारी फसवणूक यांचे वावडे असते. प्रत्यक्षतः ते चमत्कारांविरुद्धही बोलताना आढळतात. चमत्कारांना ते अंधश्रद्धा म्हणून हिणवतात. लोकांना त्यापासून ते परावृत्त करतात. या करिता ती माणसे नावाजली जातात. सहसा त्यांच्या विरुद्ध लिहिले-बोलले जात नाही. सुशिक्षित म्हणविणा-या लोकांना ते आपलेसे वाटतात. आणि त्यामुळेच की काय, सुशिक्षितांना आकर्षक वाटणारी तत्त्वज्ञाने ही मंडळी सांगत असतात. त्यांचे स्वतःचे (पूर्वसुरींपेक्षा वेगळे) असे तत्त्वज्ञान त्यांनी तयार केलेले असते. त्यावर भर देणारी पुस्तके लिहिण्यात व प्रवचने देण्यात ही मंडळी मग्न असतात. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, पांडुरंगशास्त्री आठवले, भगवान रजनीश, स्वामी चिन्मयानंद, ही या प्रकारची उदाहरणे.
अशा मंडळींच्या तत्त्वज्ञानाची चिरफाड करणे, त्यातील इष्टानिष्ट ठरवणे, त्यांना विरोध करायचा की नाही हे तपासणे, या भानगडींत विवेकवादीही सहसा पडत नाहीत.
वामनराव पै हे याच परंपरेतील एक साधुपुरुष. त्यांची स्वतःची अशी जीवनविद्येची तत्त्वप्रणाली आहे. “तूच आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार” असे, प्रयत्नवादाची कास धरण्यास सांगणारे त्यांचे पुस्तक आहे. प्रयत्नवादाचा पाठपुरावा आणि अंधश्रद्धांना, कर्मकांडांना विरोध ते ब-याचदा करतात. ते सरकारी कार्यालयात नोकरी करीत असत, व उच्चपदावरून निवृत्त झालेले आहेत. त्यांचा अध्यात्माशी बराच जुना संबंध आहे. बयाच वर्षांपूर्वी त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली होती. त्यांवर लेखकाचे नाव “वामनराव पै, बी. ए. (ऑनर्स),” असे छापलेले होते. आता नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांत नावामागे “सद्गुरु”ची वाढ झालेली आहे. (जीवनविद्येचा मंगलकलश, लेखक सद्गुरु श्री. वामनराव गजाननराव पै; प्रकाशक नामसंप्रदाय मंडळ, मुंबई; प्रथम आवृत्ती १९८६.)
“जीवनविद्या” हे नवीन तत्त्वज्ञान या पुस्तकांमधून डोकावत असते. “ज्या विद्येने माणसाला आपले जीवन सुखी करता येते, त्या विद्येला जीवनविद्या असे म्हणतात.” “वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरून विकासवादाकडे झेप घेणे म्हणजे जीवनविद्या.” अशा शब्दबंबाळ वाक्यांतून त्याचा थोडासा अर्थबोध-झालाच तर–होतो. हे तत्त्वज्ञान प्रयत्नवादी म्हणावे, तर कर्मफळांवर त्याचा विश्वास दिसतो. एका बाजूला म्हणावे, की कर्म आपण करायचे व फळ दैवाने द्यायचे ही समजूत चुकीची आहे. (पा. १११) तर त्याच पानावर पुढे म्हणावे, की “जीवनात जी सुखदुःखे भोगतो त्या सुखदुःखांची फळे पूर्वी आपण जी शुभ आणि अशुभ कर्मे केलेली असतात त्याची फळे असतात.” ही कर्मे या जन्मीची की गेल्या जन्मीची, यातही द्वंद्व आढळते.
जीवनात संसारत्याग न करता, षड्विकारांचे तोंडीलावणे लावून, प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून चांगली कामे करा, असे काहीसे हे तत्त्वज्ञान आहे. पण याला वेगळे नाव देण्याइतके यात नावीन्य काय; तसेच जुन्यातले ग्राह्य वा त्याज्य काय वगैरे चिकित्सा वामनराव पै करताना दिसत नाहीत.
परमेश्वरासारखी सोपी संकल्पनादेखील “जीवनविद्येत सुस्पष्ट नाही. निसर्गाचे नियम आणि नियामक ही दोन्ही एकमेकांशी अत्यंत एकरूप असून ती दोन्ही मिळून जो, तो परमेश्वर;” “परमेश्वराच्या अनंत स्वरूपाची खुद्द खुदाला म्हणजे परमेश्वरालासुद्धा जाणीव नाही,” “सर्वव्यापक चैतन्यशक्तीला (cosmic life-force) परमेश्वर (God) असे जीवनविद्येत संबोधिले आहे”, “जगात देव इतकेच नव्हे तर हे चैतन्य सर्वत्र जीवनरूपाने नांदत आहे”. … अशी एकाहून एक उलटसुलट विधाने ग्रंथांमधून सर्वत्र आढळतात. परमेश्वर म्हणजे एखादी व्यक्ती’ नसून (योग्य-अयोग्य निर्णय करणारी, न्याय देणारी, कृपा करणारी, वगैरे) ती एक ‘व्यवस्था’ आहे, अशा पद्धतीचा नास्तिक विचार डोकावतो. पण कोठेही हे स्पष्ट नाही.
“तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार” असे म्हणणारे, गेल्या जन्मीच्या पापांची उठाठेव करतात. यातील विरोधाभास जीवनविद्येत उठून दिसतो. चांगल्या कर्माची चांगली फळे ही मुख्यतः व्यक्तीच्या मनावर झालेल्या परिणामांनी होतात, आणि त्यामुळे कर्मफल प्राप्त होते, असे बरेचदा ठासून म्हटले आहे. यामुळे मनाचा शोध, विविध प्रकारची मने, अंतर्मनाचे महत्त्व असे मानसशास्त्रातील विषय या पुस्तकातून येतात. त्यामागे फारसे विज्ञान दिसत नाही.
वामनराव पै यांचे इतिहासाचे ज्ञान वरवरचे दिसते. पोलंडवर आक्रमण करेपर्यंत हिटलरची कर्मे चांगली होती, म्हणून त्याचे कर्मफल चांगले होते, असे त्यांचे म्हणणे आहे. “टण टण टण, अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन” असे स्वतः जॉर्ज वॉशि टन (लहानपणी?) म्हणत असे; या आशयाची एक दंतकथाही पुस्तकात आढळते. आणि त्याबरोबरीनेच, “अशा प्रकारच्या नामस्मरणाने तो शेवटी प्रेसिडेंट झाला” अशी नामस्मरणाची महतीही त्यात येते.
इतिहास चुकीचा सांगणे वा भविष्योक्ती चुकीची ठरणे, हे वहुतेक धर्मग्रंथांना जड जाते. बायबलमधील विश्वनिर्मितीची कथा व कालक्रम हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्या सर्वांची सारवासारव करणारे तत्त्वज्ञान व मिथ्याविज्ञान यातून निर्माण झाले. (ज्यांना क्रिएशनिस्ट म्हणतात.) सद्गुरूने सांगितलेले सर्व जसेच्या तसे स्वीकारणे, अशा गुरुशिष्य-परंपरेत शंकेला वाव नसतो. श्रद्धा हे ज्ञानाचे मूळ स्थान आहे, असे या वर्गाचे म्हणणे आहे. (ह्याउलट शंका घेणे हेच ज्ञानाचे मूळ स्थान आहे, असे विवेकवादी म्हणतात.) वामनराव पै गुरुपरंपरा मानणारे आहेत. त्यांचे शिष्य अशा चुकीबद्दल काय भूमिका घेतात, हे अजून कळायचे आहे.
इतर सर्व अचमत्कारी साधूंप्रमाणे वामनराव पै हे देखील चमत्कारी। मांत्रिक, बुवाबाजीविरुद्ध आहेत. त्यांच्या नादी न लागण्याचा सदुपदेश ते वारंवार करताना दिसतात. थोड्याफार विवेकी भूमिकेतून कर्मकांडांच्या विरुद्धही ते बोलतात. या सर्वांमुळे सुशिक्षित वर्गास ते जवळचे वाटतात. तसेच इतर काहींना त्यांच्या शिकवणीमुळे फायदा होऊन ते चमत्काराचा मार्ग सोडून देत असतील.
याव्यतिरिक्त त्यांच्या शिकवणीत बरेच तोटे असू शकतात. एक म्हणजे वेळेचा अपव्यय, दुसरे विवेकाच्या मार्गापासून दूर नेणे. इतर सर्व अचमत्कारी साधूप्रमाणे वामनराव पै चमत्कारांच्या अशक्यतेबाबत बोलत नाहीत. मनाच्या चमत्कारी सामथ्र्यावर ते विश्वास ठेवताना दिसतात. (वॉशिंग्टनची गोष्ट) जप करणे, मनात ठसवणे, वगैरे उद्योगांनी “मनाप्रमाणे” गोष्टी होतात असे त्यांना वाटते. यातून त्यांच्या भक्तांना तोटाच होणार असे दिसते.
वामनराव पै यांच्या शिकवणुकीमुळे त्यांच्या भक्तांपेक्षा त्यांच्या स्वतःवर जास्त चांगला परिणाम झालेला दिसतो. अनेक शिष्यांचा आदरसन्मान त्यांना मिळालेला दिसतो. तसेच देशविदेशांतून त्यांना प्रवचनासाठी बोलावणी येतात व ते जातातही. त्यांना ‘मुद्दामहून त्यांनी केलेल्या चुका दाखविण्याचे प्रयोग व त्यांनी त्यास दिलेली उत्तरे, याबाबत मला माहिती नाही. पण असे काही न विचारणे, शंका न घेणे, वगैरे त्यांच्या भक्तांत आढळणे हे त्यांचे मोठे यश (व भक्तांचे अपयश) आहे, असे मी समजतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.