पुण्याचा सुधारक-मित्रमेळा

पुण्याला सुधारकचे आजी-माजी मिळून सुमारे २५० वर्गणीदार, नागपूर दूर एका टोकाला, पुणे मध्यवर्ती, तिथे सुधारकच्या सहानुभूतिदारांचा – हितचिंतकांचा एक मेळा होऊ देत, परस्परांच्या गाठी-भेटी होतील विचारांची देवाण घेवाण होईल अशा. आपुलकी वाढवणाच्या सूचना काही बुजुर्गाकडून येत. त्या आम्हालाही हव्याशा वाटणारयाच होत्या. डिसेंबरच्या शेवटी ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये काही विदेशस्थ वाचक मायदेशी असण्याची शक्यता हा एक जादाचा मुद्दा. या सगळ्यांचा संदर्भ देऊन सहकारी संपादक श्री दिवाकर मोहनींनी पुण्याच्या वाचक-मेळाव्याची घोषणा केलेली. (आ. सु. – सप्टेंबर-९९)
जानेवारीच्या ६ तारखेला हा मित्रमेळा ठरला. स्थळ साधना सभागृह. साधनेचे संपादक डॉ. नरेन्द्र दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते. त्यांचे उत्साही तरुण सहकारी भेटणार, त्यांनी पूर्वी केलेल्या मागणीचा – विवेकवादाच्या तात्त्विक बैठकीचा ऊहापोह – हा संदर्भ मनात धरून पूर्वार्धात सायं. ४ ते ६ कार्यकर्त्यांशी विचारविनिमय आणि ६ वाजता, उत्तरार्धात औपचारिक जाहीर सभेचा कार्यक्रम अशी आम्ही आखणी केली. दोन्ही अर्धात श्रोतृसंवादाला महत्त्व दिले होते. तसे कार्यक्रमपत्रिकेत लिहिलेही होते. पुणे हे विचारवंतांचे आगर एवढेच नाही तर कर्या सुधारकांचे माहेरघरही. आजचा सुधारकाच्या मित्र-मेळ्याच्या दोन्ही भागात त्यातले कोण कोण असतील याचा अंदाज कार्यक्रम-पत्रिकेत दिला होता. ६ तारखेला गुरुवार. हा काही सुटीचा दिवस नाही. त्यामुळे अगदी ४ पासून थेट कार्यक्रम संपेपर्यंत सगळ्यांनाच राहणे जमेल असे असणार नव्हते.
प्रत्यक्षात पूर्णवेळ अथवा अर्धवेळ हजेरी लावणारांत, प्रा. ग. प्र. प्रधान, डॉ. नरेन्द्र दाभोलकर, डॉ. अनिल अवचट, हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च सेंटरचे श्री. अन्वर राजन तसेच सुधारणावादी विविधजनांसी एक प्रकारचे आधार असलेले श्री. ताहेरभाई पूनावाला, इत्यादी नामवंत होते. जाहीर सभेचे अध्यक्षस्थान डॉ. श्रीराम लागू यांनी भूषवले. एवढे हे पूर्वी नियोजन केल्याप्रमाणे झाले. पण मुख्य पाहुणे – महाराष्ट्र फौंडेशनचे अध्यक्ष श्री. सुनील देशमुख पूर्वार्धाला काय ते हजर राहू शकले. नंतर अचानक उद्भवलेल्या कामासाठी त्यांना मुंबईला धाव घ्यावी लागली. म्हणून त्यांच्या वतीने अन् त्यांच्या इच्छेप्रमाणे म.फौ.च्याच डॉ. श्रीमती ललिता गंडभीर यांनी त्यांची जागा घेतली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांत श्री. प्रकाश व श्रीमती मंजिरी घाटपांडे, श्री. टी. बी. खिलारे, शुभांगी, यांचा सहभाग ठळकपणे लक्षात राहण्यासारखा झाला.
आजचा सुधारकाच्या आजवरच्या सुमारे १० वर्षांच्या कामाबद्दल – आक्षेप, अपेक्षा आणि अपेक्षाभंग, पुढच्या कामाची दिशा दाखवणाच्या सूचना पुन्हा नव्या – अपेक्षा अशी चर्चेची चौकट ठरवली होती.
चर्चेत ब-याच मित्रांनी आजचा सुधारकचे मुखपृष्ठ हे कमालीचे गद्य आहे. त्याला वेधक करा असा आग्रह धरला. (शुभदा कर्णिक). काही – पण थोड्या वाचकांनी आहे तेच ठीक आहे असे म्हणून ती सूचना खोडून काढली. (डॉ. मधुकरराव देशपांडे). असे पुष्कळदा झाले. जाहिरात करा, आजचा सुधारकाला प्रसिद्धी द्या, त्याचे नावगाव माहीत नसलेले खूप जण तुमचे भावी वाचक आहेत अशा सूचनांना (श्री. सुनील देशमुख) मात्र कोणी छेद दिला नाही. कदाचित् श्री. सुनील देशमुख आणि डॉ. ललिता गंडभीर ह्या अमेरिकन पाहुण्यांनी पूर्वार्धात या भूमिकेचा कैवार घेतल्यामुळे झाले असेल. डॉ. ललिता गंडभीरांनी तर स्वखर्चाने उत्तर अमेरिकेतल्या ‘एकता’मध्ये आ. सु. ची जाहिरात दिली होती.
सूचनांचा हा वर्षाव सभेच्या उत्तरार्धात देखील तितकाच जोमाने चालू होता. उभी कारकीर्द ‘संपादन’ या एका शब्दात संपृक्त झालेले श्री. मुकुंदराव किर्लोस्कर या बाबतीत आघाडीवर होते. मुखपृष्ठ आकर्षक करा इतकेच नाही तर आत देखील रेखाचित्रे घाला, होईल तितकी सजावट करा हे त्यांचे म्हणणे. सभोवताली घडणा-या महत्त्वाच्या घटनांबद्दल सुधारकला काहीच म्हणायचे नसते असे नका होऊ देऊ, हे त्यांचे कळकळीचे सांगणे. उदाहरणार्थ विधानसभेत काय की लोकसभेत काय, स्त्रियांना ३३ टक्के जागा देण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याच्या एवढ्या मोठ्या प्रश्नावर सुधारकाने काही लिहिले नाही हे कसे? दलितांच्या आरक्षणाची कालमर्यादा किंवा विस्तार यांसारख्या विषयावर लिखाण मिळवून प्रसिद्ध करा. पुढे निघावयाच्या अंकाची योजना आधीपासून करा – पुढील अंकात काय यायचे ते या अंकात छापा. विशेषांक काढा, आधी विषय घोषित करा, लेखकांची नावे जाहीर करा, वाचकांची उत्सुकता वाढवा, वाचकांच्या प्रतिक्रिया याव्या यासाठी अशा प्रेरणा द्या. पुढे चर्चा होईल, होत राहील हे पाहा. अशा अनेक सूचना होत्या त्यांच्या ह्या मताला पोषक अनुमोदन ग्रामीण विज्ञान वाहिनीचे डॉ. मधुकरराव देशपांडे यांनी केले. मधुकरराव अमेरिकेतले ३५ वर्षे गणिताचे प्राध्यापकीय काम सोडून के टकातल्या एस्. आर. हिरेमठांच्या पावलावर पाऊल टाकून भारतात परतले आहेत. आल्यावर आपल्या मनाजोगते ग्रामीण विज्ञान वाहिनीचे काम त्यांनी सुरू केले आहे. समाज कार्य करणा-या संस्था, आणि कार्यकर्ते यांच्या कामाचा परिचय आजचा सुधारकात येत जावा, हे त्यांचे म्हणणे. मुकुंदरावांचे आणखीही असे मत होते की, पाश्चात्त्य समाज-सुधारक, विशेषतः स्त्री-स्वातंत्र्यासाठी झटलेल्या महिला यांच्या कामाची ओळख येणे सुधारकाच्या
धोरणाला साजेले होईल.
आ. सु.च्या संपादक मंडळीत तत्त्वज्ञानाच्या अध्यापकांचा भरणा मोठा आहे याचा उल्लेख करून प्रा. ग. प्र. प्रधान (पूर्वार्धात) म्हणाले होते, की तत्त्वज्ञानातले नवे चिंतन, नवे ग्रंथ किंवा गाजलेले निबंधदेखील कधी चार दोन पानांत साररूपाने, तर कधी हप्त्याहप्त्याने अधिक विस्तृत स्वरूपात मराठी वाचकांना उपलब्ध करून देणे तुम्हालाच शक्य आहे. तसे करावे. हा धागा धरून डॉ. बोकील म्हणाले की अधिकारी व्यक्तींकडून लेखन मिळविणे किती जिकिरीचे आहे याचा अनुभव आम्हाला आहे. डॉ. बोकील फर्गसन कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आहेत. Indian Philosophica Quarterly या इंग्रजी आणि परामर्श या मराठी त्रैमासिकाशी त्यांचा संबंध संपादक आणि सल्लागार म्हणून. ही दोन्ही नियतकालिके पुणे विद्यापीठ प्रसिद्ध करते. डॉ. बोकील स्वतः तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक आहेत.
सुधारकाचे नाव जरी तुम्ही आजचा आहे असे म्हणता तरी ते म्हाता-यांनी, म्हातान्यांसाठी चालवलेले, म्हातारे मासिक आहे असा एक कडू शेरा नागपूरच्या आमच्या जिव्हाळ्याच्या एका हितचिंतकांनी दिला होता. दुस-या एका मुंबईच्या प्रसिद्ध साहित्यकारांनी म्हटले म्हणे की आ. सु.ची अनुक्रमणिका पाहिली की पुढे काही वाचायची गरजच नसते. तेच लेखक, तेच विषय. काय वाचायचे? काही नवे आणा! अं. नि. स.चे तरुण कार्यकर्ते श्री. टी. वी. खिलारे यांचाही आक्षेप प्रसिद्धच आहे. जातिभेदाविरुद्ध – उच्चनीचतेच्या रूढींबद्दल आ. सु.मध्ये आघाडी उभारली जाईल असे संस्थापक संपादक प्रा. दि. य. देशपांडे यांच्या पहिल्या लेखावरून वाटले होते. पण ती मोहीम कधी उघडलीच गेली नाही. उलट त्यांच्या इतकाही रॅशनॅलिझमचा कडवा पुरस्कार त्यांच्या नंतरच्या संपादकांकडून होत नाही ही खिलारेची आपुलकीची तक्रार. यांनी सवाल केला की, विवेकवादाच्या विरोधी लिखाण आ. सु.त प्रसिद्ध होते कसे? आणि प्रसिद्ध करायचे तर त्याचे खंडन करणारे लिखाण हाती असले तरच ते करायचे हे मूळ संपादकांचे पथ्य सध्या पाळले जात नाही ते का? आहारासंबंधी इतके नव-नवीन संशोधन आणि शास्त्रीयज्ञान पुढे येत असता ‘कच्च्या आहाराचा प्रयोग असा कालबाह्य लेख आ. सु.त यावा याचा त्यांना अचंबा व खेद वाटला. आ. सु.न्य लेखकांत एकाच जातीचे लोक जास्त का दिसतात हा त्यांचा गाजलेला जुना आक्षेप वाचकांना आठवत असेलच. सुधारकातले लेखक हे जणू परस्परांशीच बोलत असतात, असे दिसते. त्यांच्या ह्या संवादात आम्हाला स्वारस्य? (शुभांगी) असा एक अभिप्राय आला. तर अमरावतीचे प्रा. विवेक गोखले यांचे म्हणणे की तुम्ही एखादी चर्चा अर्धवट का सोडता? निर्णय होईस्तो चर्चा चालू ठेवत चला आणि आ. सु.च्या लेखनात अभिनिवेशाचा अभाव दिसतो तो का? मराठी भाषेचे भवितव्य हा असा एक अर्धवट सोडलेला विषय. प्रमाण भाषा आणि तिची प्रमाण लेखन-पद्धती या गोष्टींना गेल्या काही दशकांमध्ये फार घातक होतील अशा गोष्टी घडत आहेत. सरकारचा या बाबतीत दोष मोठाच, पण समाजातल्या विचारवंतांचेही चुकते आहे. परिणामी मराठी भाषा, मराठी संस्कृती, जीवन-पद्धती झपाट्याने विनाशाकडे चालली आहे. या प्रश्नावर आजचा सुधारकने पुरेसे लक्ष दिले पाहिजे असा मुद्दा श्री. गाडगीळांच्या पुढाकाराने चर्चेला आला. प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गापासून इंग्रजीचा प्रवेश कितपत इष्ट यावर साधकबाधक, लिखाण यावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त झाली. श्रीमती नित्सुरे यांनी काळजी व्यक्त केली की, चंगळवादाचा धोका मोठा आहे. सुधारकने या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन तसे लिखाण द्यावे. डॉ. ललिता गंडभीर आणि दुस-या काहींना चंगळवाद हे केवळ भारतापुढचे संकट वाटत नसून जगभर त्याच्या प्रादेशिक आवृत्या त्यांना दिसतात. त्या रोखता येतील असे वाटत नाही. प्रचंड मागणी वाढली की रोजगार वाढतो. प्रचंड पुरवठा होतो. पुरवठा वाढला की सोप्या युक्त्यांनी तो ग्राहकांकडे पोचवला जातो. मग त्याला सदैव कामाला वाहून घ्यावे लागते. एका दृष्टीने हा फायदा चंगळवादातून झाला आहे असेही एक मत.
सभेच्या पूर्वार्धातली चर्चा जास्त मोकळी झाली. श्री. सुनील देशमुख अनौपचारिकपणेच समारोपाचे भाषण करून गेले. अमेरिकेत झालेल्या एका वाचकमेळ्यात ते आणि डॉ. ललिता गंडभीर हे दोघेही होते. त्यावेळच्या चर्चेचा दाखला देऊन अमराठी वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आ. सु.ची हिंदी आवृत्ती काढण्याची त्यांनी आठवण दिली. प्रोत्साहन म्हणून स्वतः १० हजार रु. रोख देणगी दिली. अमेरिकेत तसेच भारतातही अमराठी वाचकांसाठी गुजराती नि इंग्लिश आवृत्त्या निघाव्यात या मागणीची डॉ. ललितांनी आठवण दिली. निदान हिंदी आवृत्ती शक्य होण्यासाठी त्यांनीही स्वतःची १० हजार रुपयांची देणगी दिली. ‘सुधारक’च्या आणखी १ हजार प्रती काढून वर्षभर महाराष्ट्रातल्या सर्व कॉलेजेस व लायब्रयांना पुरवा त्यासाठी आगरकर प्रतिष्ठानकडून आर्थिक साहाय्य देता येईल-देऊ अशीही घोषणा श्री. सुनील देशमुखांनी केली.
सुधारकातल्या लेखांची भापा हाही अनेकांचा काळजीचा विषय. कित्येक लेखांची मांडणी कठीण होते. शब्दांचे अर्थ कळत नाहीत. वाक्ये-भाषा आणि शैलीही अनेकदा फार शास्त्रीय होते की काय अशी भीती एक तरुण वाचक श्री. संजीव अत्रे यांनी व्यक्त केली. डॉ. ललिता गंडभीर यांनीही या मताला दुजोरा दिला. त्यांचे म्हणणे असे की एखाद्या लेखातला एखादा कठीण उतारा, सोप्या भाषेत कसा लिहिता येईल याचा नमुना तुम्ही दाखवा. जानेवारी २००० च्या अंकातल्या एका पत्रातही अशा कठीण शब्दांचे अर्थ देत चला अशी मागणी आहे इकडे कोणीतरी लक्ष वेधले. श्री. मुकुंदराव किर्लोस्कर याच पत्राच्या संदर्भात म्हणाले : पत्रे देखील जशीच्या तशी छापू नयेत. आपल्या जवळ जागा आणि वाचकांजवळ वेळ कमी म्हणून पत्रांतले निवडक मुद्दे काय ते द्यावेत. पुस्तक परीक्षणाचे सदर नियमित असावे हाही त्यांचा आग्रह.
आधीच्या आक्षेपांप्रमाणे भाषेच्या आक्षेपालाही परस्पर उत्तर दिले गेले. आ. सु.ला शास्त्रीय चर्चा वावडी नाही. लिखाणात काटेकोरपणा आणि प्रतिपादनात चोखपणा पाहिजे असेल तर कधीकधी पारिभाषिक शब्दही वापरावे लागतात. युक्तिवादांची मांडणी तर्कशुद्ध असावी लागते. म्हणून कठीण भाषेची सवय करून घेणे ज्ञानप्राप्तीसाठी अवश्य आहे असा सल्ला दिला गेला.
श्री. जयंत फाळके हे डॉ. मधुकरराव देशपांड्यांचे ग्रामीण विज्ञान वाहिनीतले सहकारी. त्यांचे मत हे की, तुम्ही एकतर जन्मतःच श्रद्धावान् असता किंवा अश्रद्ध. त्यामुळे आपल्या लिखाणाने कोणाचे श्रद्धेकडून अश्रद्धेकडे पक्षांतर होईल असे समजण्यात अर्थ नाही. याला अध्यक्षीय भाषणात डॉ. लागूंकडून उत्तर दिले गेले की ते स्वतः मुळात विवेकवादी नव्हते. विचारान्ती ते कन्व्हर्ट झालेले आहेत.
सुधारकात आहाराच्या औचित्याचा विषय का यावा ह्या प्रश्नाला अनुलक्षून श्री नंदा खरे म्हणाले की, ईश्वर नाकारणे ही जशी सुधारणा तशी अन्नाची नासाडी टाळणे ही सुद्धा सुधारणा आहे. लग्नाच्या पंक्तीत वांग्याच्या भाजीचा द्रोणाला आधार म्हणून दुरुपयोग करू नका हे सांगणे ही सुद्धा सुधारणाच आहे. सुधारणेचा प्रयत्न सर्व पातळ्यांवर हवा आहे.
श्री. खरे यांनी नव्या तंत्रज्ञानाने वस्तूंच्या उत्पादनात भरमसाट वाढ होते, त्यातून चंगळवाद फोफावतो या मुद्द्याच्या संदर्भात सांगितले की, नवे तंत्रज्ञान – (क्वांटम कॉम्प्युटिंग- which is to supercomputing as a Rocket is to an airplane) बहुतकरून सामान्य माणसांच्या विरोधात जाणारे आहे. चंद्रपूर-गडचिरोलीला-नागपूर, नागपूर-विदर्भाला पश्चिम महाराष्ट्र, आणि नंतर युरप अमेरिका अशा टप्प्यांचे शोषण आणि impoverishment in talent जास्त जास्त ‘रुळवणे’ नव्या तंत्रज्ञानाने होत आहे. यावर आपल्याला नियंत्रण करता येईल का, हा प्रश्न आहे.
डॉ. लागू यांनी अध्यक्षीय समारोपात म्हटले की विवेकवादी होणे फार कठीण आहे. मानवी इतिहासात मूठभरच विवेकी माणसे सापडतात. प्रयत्न, धीर, संयम, यांची गरज त्यामुळे जास्त आहे.
“आजचा सुधारक’ च्या वतीने श्री. दिवाकर मोहनी, श्री. प्र. ब. कुळकर्णी आणि श्री. नंदा खरे यांनी शक्य तेथे उत्तरे दिली. आ. सु.चा असा वाचक मेळापुनःपुन्हा व्हावा या श्रोत्यांच्या मागणीवरून, या मित्रमेळ्याचा हेतू पुष्कळच सफल झाला असे म्हटले पाहिजे. साधना सभागृह अपुरे पडून उपस्थितांना उभे राहावे लागले ह्या संख्यात्मक प्रतिसादाइतका वाचक-श्रोत्यांचा चर्चेतला गुणात्मक सहभाग आम्हाला उत्तेजनकारक वाटला. डॉ. अनिल अवचट, डॉ. स. ह. देशपांडे आणि अनेक मान्यवर तसेच नागपूरचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर लोथे, डॉ. मुकुंद्ध महाजन, प्रो. शेळके, प्रो. पारसनीस अशा अनेकांची उपस्थिती आम्हा नागपूरकरांना सुखावून गेली. सर्वच उपस्थितांचे आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.