चर्चा

– डॉ. वसंत चिपळोणकर
आजचा सुधारक हे वैचारिक मासिक चालवून आपण महाराष्ट्रात प्रबोधनाचे जे कार्य करीत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन. ‘चुकीच्या वर्तनासाठी जातीला जवाबदार धरण्यात येऊ नये’ हा विचार किंवा ‘गेली हजार वर्षे दलितांवर स्त्रियांवर सातत्याने अन्याय होत आला आहे. हे विधान बरोबर वाटले. मी यात भर घालून म्हणेन या धर्ममार्तंडांनी हिंदूंच्या आचारावर अनेक कालबाह्य विघातक नैतिक निबंध घालून हिंदुमनुष्याची अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्तीच कामकुवत केली. जागतिक विचारांशी त्याचा संपर्क तोडून हिंदुसमाजाची प्रगती थांबविली त्याचे एक दुर्बल, कर्तृत्वहीन लाचार व्यक्तींनी भरपूर अशा समाजात रूपांतरण केले.
पण आपल्या पुढील विधानाशी मी सहमत होऊ शकत नाही.
‘भूत, धर्म, देव मनाचे खेळ आहेत. आधुनिक विज्ञानाप्रमाणे सर्व सत्य सापेक्ष असल्यामुळे सर्वच गोष्टींमध्ये मनाच्या खेळाचा अंतर्भाव कमी जास्त प्रमाणात असतोच. सत्याचा शोध घेण्यासाठी नवी माहिती लागते. माहिती अनुभवाद्वारेच मिळू शकते. अनुभवाशिवाय फक्त विचारमंथन करून सत्याचा शोध लागू शकतो असे प्रज्ञावाद (Rationalism) मानतो’ विज्ञानाला हे मान्य नाही.
“अशरीरी आत्मा कोणी पाहिला नाही म्हणून आपली आत्म्याविषयीची कल्पना शरीरी मनाची आहे” शरीर-मन-आत्मा ह्यांमध्ये परस्परसंबंध काय? ही तत्त्वे वेगळी आहेत की एकाच तत्त्वाचे तीन आविष्कार याबद्दल आज विज्ञानाजवळ पुरावा नाही. मनुष्याची, बुद्धिमत्तेची कामे करणारा संगणक विज्ञानाने बनविला आहे त्यामुळे मन कसे कार्य करते याविषयी विज्ञानाजवळ खूप तपशीलवार माहिती उपलब्ध आहे. जी सर्वसामान्य विचारवंताला नसण्याचा संभव आहे.
मन जेव्हा विचार करते तेव्हा त्याच्या मेंदूत काही विशिष्ट विक्रिया होत असतात. त्यांचे उपकरणाद्वारे निरीक्षण करता येते. पण विचार व या विक्रिया यामधील परस्परसंबंध अजून तरी स्पष्ट झालेला नाही. विचार कोणी पाहू शकत नाही. त्यामुळे विक्रियाविरहित विकाराचे निरीक्षण करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. ह्यासाठी एक दाखला देता येतो. (जड) तांब्याची ताणलेली तार छेडली तर तिच्यापासून ध्वनी निर्माण होतो. हा ध्वनी कोणी पाहू शकत नाही पण तो तांब्याच्या तारेशी नेहेमीच बांधलेला नसतो. तिच्या पासून काही अंतरावर तो मुक्त अवस्थेत येऊ शकतो.
अवकाशात एक विद्युद्भार ठेवला तर त्याभोवती विद्युत्-क्षेत्र निर्माण होते. विद्युभार व हे क्षेत्र यामध्ये कोणतेही संपर्कबंध नसतात. विद्युभार जर आंदोलने करू लागले तर अवकाशात विद्युत्क्षेत्राचे प्रेषण होते. ते प्रवास करत असते. प्रकाशवेगाने त्याचा ज्यापासून ते उद्गम पावले त्याच्याशी काहीही संपर्कबंध नसतो.
या दाखल्यात आणखी एक गोष्ट स्पष्ट होते. त्यामधील खुलासा आधारित असतो फक्त मिळालेल्या अनुभवावर. हा अनुभव सामान्य बुद्धीला पटतो की नाही याबद्दल विचार करावयास कोणी थांबत नाही. आणखी एक उदाहरण पाहा. कोणाला विचारले, पृथ्वी सूर्याभोवती का फिरते? सगळे लोक उत्तर देतील कारण त्यामध्ये आकर्षणी, गुरुत्वाकर्षणी प्रेरणा असते? आता प्रश्न विचारला पृथ्वी व सूर्य यामध्ये माध्यम नाही तरी ही प्रेरणा इतक्या हजारो मैल दूर अंतरावर संपन्न कशी केली जाते? याला विज्ञानाजवळ, कोणाजवळ उत्तर नाही. परत ही प्रेरणाच जर नुसती असती तर पृथ्वी सूर्याला जाऊन चिकटावयास पाहिजे होती. ज्याप्रमाणे लोखंडाचा तुकडा लोह-चुंबकाला जाऊन चिकटतो. तसे का होत नाही? कारण सुरुवातीलाच पृथ्वीला काही तरी वेग होता. हा वेग का आला, त्यासाठी लागणारी ऊर्जा कोठून मिळाली? या प्रश्नाला परत सर्वमान्य उत्तरे नाहीत. कर्मविपाकमीमांसा किंवा प्रत्येक गोष्टीसाठी कारण हे असतेच या आपल्या तत्त्वावर असलेल्या मर्यादा या उदाहरणात स्पष्ट होतात.
कार्ल पॉपर यांनी कर्मसिद्धान्ततत्त्व मनुष्याला कोठून मिळाले याविषयी संशोधन केले, त्याचा निष्कर्ष-या तत्त्वासाठी विज्ञानाच्या क्षेत्रात प्रयोगाद्वारे पडताळा मिळाल्याचे आढळत नाही त्यावरून त्यांनी अंदाज केला आहे की हे तत्त्व मनुष्याला त्याच्या अंतःसंवेदनेपासूनच मिळाले असावे. आधुनिक भौतिकीमध्ये योगायोगाला महत्त्वाचे स्थान असते. योगायोगाने घडणा-या क्रियांसाठी कारण असे देताच येत नाही. युरेनियम अणूचे उस्फूर्तपणे विघटन होऊन एका कणाचे उत्सर्जन व शेष भागापासून नव्या अणूची निर्मिती या क्रियांमागे कारण काही असत नाही असे विज्ञानाने दाखविले आहे. सूक्ष्म स्तरावरील कणांच्या बाबतीत अशा उस्फूर्तपणे होणा-या क्रिया खूप सापडतात.
[संदर्भ : 1.Thinkers of 20th Century Editor E Devine & others. Himalaya Books Ltd, New Delhi 1987
2. Encyclopedia of Science, Editor R. M. Youngson, Guiness Publication UK 1994]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.