आगरकरांच्या विद्याभूमीत आजचा सुधारक

अकोल्याला आगरकरांची दोन स्मारके, एक तिथले जिल्हापरिषद आगरकर हायस्कूल आणि दुसरे मनुताई कन्या शाळा. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी आगरकरांनी ज्या सरकारी हायस्कुलात विद्या घेतली त्याला आता सरकारने त्यांचे नाव दिले आहे. मनुताई कन्याशाळेची कहाणी वेगळी आहे. आगरकरांनी अकोल्याला भागवतमामांच्याकडे राहून विद्या केली. त्यांपैकी अनंतराव भागवतांची मुलगी मनुताई चार वर्षे नाममात्र वैवाहिक जीवनाचे कुंकू लावून बालविधवा झालेल्या. आगरकरांच्या प्रेरणेने पुण्याला मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊन अकोल्याला त्यांनी प्रौढ स्त्रियांसाठी मोफत शिक्षण देणारे वर्ग काढले. पुढे ह्या वर्गांना लेडिज होम क्लास असे नाव देण्यात आले. तेथील शिक्षिका फुकट शिकवीत. १९३८ साली मनुताईंच्या निधनानंतर २७ वर्षे त्यांनी जिद्दीने चालविलेल्या या होम क्लासचे मनुताई कन्याशाळा या संस्थेत रूपांतर झाले.
आगरकरांचे सुधारक साप्ताहिकातून सनातन्यांशी आणि केसरीतल्या जुन्या सहका-यांशी जे कडाक्याचे वाद चालत त्यांचे ध्वनि-प्रतिध्वनी अकोल्यापर्यंत येऊन पोचत. तेव्हा त्यांचे मामा भागवत बंधू आणि त्यांच्या सरकारी हायस्कूलचे प्रसिद्ध हेडमास्तर महाजनी यांच्या सहानुभूतिपूर्ण पत्रांनी त्यांना मोठा धीर मिळत असे. १८९५ साली त्यांच्या अकाली निधनानंतर पत्नी यशोदाबाई आगरकर देखील अकोल्यालाच येऊन राहिल्या होत्या. अशा रीतीने अकोला हे आगरकरांशी आणि त्यांच्या कार्याशी पुण्यासारखेच निगडित शहर आहे.
मासिक आजचा सुधारक सुरू झाले तेव्हा आपल्याला तेथे ५ वर्गणीदार मिळाले. आता ती संख्या १५ वर गेली आहे. तरी हा प्रतिसाद समाधान वाटण्यासारखा नाही. आज अकोला पश्चिम व-हाडमधले एक गजबजलेले व्यापारी शहर आहे. तेथे पंजाबराव कृषि विद्यापीठ आहे. अनेक आर्ट्स, सायन्स, कॉमर्स महाविद्यालये आहेत. मातृभूमी, देशोन्नती, लोकमत यांसारखी वृत्तपत्रे तेथून निघतात आणि त. भा., लोकसत्तासारख्या पत्रांना अकोला आवृत्त्या पुरवणी म्हणून काढाव्या लागतात. तेथे आजचा सुधारकला अधिक वाचकवर्ग कसा मिळवता येईल यावर विचार करण्यासाठी फेब्रुवारीच्या ८ तारखेला एक आजी-माजी वाचकांची बैठक बोलावली होती तिचा हा अल्पसा अहवाल.
आगरकर हायस्कूलच्या प्रांगणातच शासकीय बी. एड्. महाविद्यालय आहे. प्राचार्य सुहासिनी पाठक ह्या आ. सु.च्या वाचक. त्यांच्यामुळे अल्प पूर्वसूचना असतानाही बैठकीसाठी जागा मिळाली. मंगळवारी ८ तारखेला सायं. ५ वाजता सभा ठेवली होती. उपस्थितांमध्ये नामवंत कवी नारायण कुळकर्णी-कवठेकर होते. सत्यकथेतून पुढे आलेले कथाकार दिवाकर कृष्ण आचार्य होते. पं. कृ. विद्यापीठातून निवृत्त प्राचार्य देवराव भालकर होते. अर्थशास्त्राचे नामवंत प्राध्यापक व पूर्वप्राचार्य अनिल फडके होते. सभेचे सूतोवाच करताना आ. सु.ची पार्श्वभूमी, आजवरची वाटचाल आणि विस्ताराची आकांक्षा या गोष्टी सांगितल्या गेल्या. दिवसेदिवस शिक्षणाबरोबर बुद्धिप्रामाण्यवादाचा स्वीकार वाढण्याऐवजी, बुवा-महाराज, संत-महंत यांचे प्रस्थ का वाढत आहे असा प्रश्न यावेळी उपस्थित केला गेला. तत्पर आणि विस्तृत प्रतिक्रिया आली प्रा. फडक्यांची. त्यांचे म्हणणे सुधारणावाद हा उपदेशाने किंवा नुसत्या बौद्धिक युक्तिवादाने वाढत नाही. आपल्या विचाराप्रमाणे आचार करणारे सुधारक समाजाला प्रभावित करू शकतात. साधुसंतांनी परंपराविरोधी बंडखोर विचार मांडले आणि स्वतःच्या जीवनाचा घडा जनतेसमोर ठेवला म्हणून आजही त्यांचे स्मरण होते आणि लोक त्यांच्यासाठी एकत्र येतात. श्री. नारायण कुळकर्णी कवठेकरांचे मत असे पडले की समतेचा सुधारकी विचार संतांना नवीन नाही. त्यांचे जीवन आणि कार्यच समतेचा प्रसार करण्यात गेले. धर्माला समाजजीवनात महत्त्व आहे. आजचा सुधारकी विचार धर्माला नुसताच बाजूला ठेवत नाही तर धर्माचा विरोध करणारा आहे. त्यामुळे त्याचे स्वागत होत नसले पाहिजे. दिवाकर कृष्णांना असे वाटते की सामान्य मनुष्याचे जीवन इतके वेगवान आणि व्यस्त झाले आहे की, जीवनासंबंधीचा विचार करायला त्याला सवडच उरत नाही. आ. सुधारकाचे आवाहन विचार करणा-यांसाठी आहे म्हणून ते एकापरी अनुत्तरित राहते. ज्यांना रिकामा वेळ आहे असे लोक विचाराला उद्युक्त होऊ शकतात. प्रा. फडक्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की, समाजातल्या वंचित-नाहीरे-गटांसाठी हा विचार (आ. सु.चा) आहे. धर्मश्रद्धांची जोखडे दूर झुगारून आपले ऐहिक जीवन सुधारण्याची खरी निकड त्यांना आहे. त्यांच्यापर्यंत पोचण्याचे उपाय शोधले तर आ. सु.चा वाचकवर्ग वाढू शकेल.
या बैठकीत भाग न घेऊ शकलेले पण आ. सु.चे हितचिंतक, वाचक अशा काही महानुभावांच्या भेटी प्राचार्य भालकरांमुळे घेता आल्या. डॉ. बोरले त्यांपैकी एक. त्यांचे बोलणे खूप मोकळे आणि अंतर्मुख करायला लावणारे वाटले. संतांच्या शिकवणुकीने काय साधले याबद्दल त्यांनी कोणाचेसे वचन ऐकवले ते ‘भजनात एकी नि भोजनात बेकी’. श्री. राहुल सावजी हे तरुण इंजिनीयर आ. सु.च्या प्रेमात पडले. VART या विदर्भातील कृषिसंशोधन व तंत्रविकास संस्थेचे काम माजी कुलगुरू डॉ. वथकल करतात. डॉ. वथकल, डॉ. वोरले, यांच्याप्रमाणे नवतरुण राहुल सावजी आ. सु.चे आजीव वर्गणीदार झाले आहेत. ही गोष्ट पुढील पिढीत सुधारक चालू राहील याचे चिन्ह समजायला हरकत नसावी. प्राचार्य भालकरांचे विशेष आभार.