प्रवाही कुटुंब (१) ई. आर्मी यांच्या फ्रेंच लेखावरून

“धर्म फेकून देतां येईल, नीति नेहमीच बदलत असते आणि कायदेहि बदलतां येतात. मनुष्यजातीच्या सुखाकरता हें सर्व बदलण्यास काय हरकत आहे?” आपल्या नीतिकल्पनांना धक्के देणारी ही विचार- सरणी. (व्यक्ति) ‘स्वातंत्र्या’ चा अर्थ इतका त्याच्या तर्कपूत मर्यादे पर्यंत ताणणे आपल्याला झेपेल ?
वाचकांनी प्रतिक्रिया दयाव्या. नाव गुप्त ठेवता येईल. मात्र कायदेशीर गरज म्हणून आमच्या दफ्तरी नाव-पत्ता आवश्यक आहे.
सवानऊ वाजेपर्यंत तुमची पत्नी तुम्हाला स्वर्गीय देवता भासत होती. जणू काय तुमचें पृथ्वीवरील आयुष्य सह्य व्हावें म्हणून ईश्वराने तिला मुद्दाम स्वर्गांतून तुमच्याकडे पाठवली होती. सर्वांगसुंदर अशी ही सगुणखनि तेथपर्यंत तुम्हाला अवर्णनीय आनंद देत होती. पण नऊ वाजून वीस मिनिटांनी तुम्हाला कळलें की या अप्रतिम पत्नीने काल, किंवा आठ दिवसांपूर्वी, गेल्या महिन्यांत किंवा कदाचित् सहा महिन्यापूर्वी असेल, तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाशीं तरी समागम केला होता. नऊ वाजून २५ मिनिटांनी (कारण मत बदलायला निदान पांच मिनिटें तर पाहिजेत!) तीच अप्रतिम स्त्री तुम्हाला अत्यंत किळसवाणी वाटू लागली आणि जिच्याबरोबर तुम्ही इतकीं सुखें, आणि विशेषतः दुःखें भोगलीं, तिला कायमची दूर करण्यापलीकडे तुम्हाला कांही मार्ग दिसत नाहीसा झाला. याला तुमचीं धार्मिक, नैतिक, सामाजिक, काय कारणे असतील तीं असोत, परंतु माझ्या मताने याला तीनच कारणें असूं शकतील : अज्ञान, दुष्टपणा किंवा वेड.
कांही अपात्र माणसांचे बाबतींत स्वैरसमागमाचा परिणाम अनिष्ट होईल की नाही हा येथे प्रश्न नाही. लैंगिक स्वातंत्र्य, बौद्धिक स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, हे सर्व प्रश्न एकाच जातीचे आहेत. इतर बाबतींत स्वातंत्र्याची घोषणा करणें आणि लैंगिक बाब मात्र वगळणें हें समंजस नाही, तर्कशुद्ध नाही.
समागमाची अमुक एक पद्धत चांगली असें मी म्हणतच नाही. या बाबतीत एकेरी विवाह किंवा अनेकपदरी विवाह, सामुदायिक विवाह किंवा स्वैरसमागम, यांपैकी ज्याला जे पसंत पडेल तें घेण्याचा किंवा अन्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीला असला पाहिजे. आणि धर्म, कायदा किंवा समाज, यांपैकी कोणीहि याच्या आड येतां नये व यावद्दल शिक्षा किंवा निंदा होतां नये, इतकेंच माझें म्हणणे आहे.
माझें असें ठाम मत आहे की प्रत्यक्ष समागमाशिवाय स्त्रीपुरुषांना एकमेकांची लैंगिक दृष्टीने माहिती होतं नाही आणि अशी माहिती ज्या व्यक्तीबद्दल नाही, अशा व्यक्तीशी स्वतःला लैंगिक वावतींत कायमचें वांधून घेणें, हा कमालीचा मूर्खपणा आहे. बऱ्याच दिवसांचा अनुभव असल्याशिवाय अशीं बंधने घालणें किंवा घालून घेणें, हा व्यक्तीवर आणि मानवजातीवर जुलूम आहे. मी असेंहि म्हणण्यास तयार आहें की स्वैरसमागमाचा कितीहि अतिरेक झाला तरी हल्लीच्या विवाहपद्धतीपेक्षा त्यापासून जास्त नुकसान होणार नाही.
कांही व्यक्तींना पातिव्रत्य किंवा एकपत्नीव्रत पसंत पडेल आणि मानवेल हें मला कबूल आहे. म्हणून अशा लोकांना इतरांस नियम घालून देण्याचा किंवा त्यांना नांवें ठेवण्याचा अधिकार कसा पोंचतो?
संततिनियमनाची साधनें विकण्यासंबंधी फ्रान्समधे जो कायदा आहे. त्या बद्दल बहुतेक स्त्रिया कांहीच बोलत नाहीत हें कसें? मर्जीविरुद्ध जिला मुलें होतात, तिला आर्थिक किंवा कोणत्याहि प्रकारचें स्वातंत्र्य कसे मिळणार ? स्त्रियांच्या मनांत असतें तर असे कायदे कधी झालेच नसते. पुरुष स्त्रियांना केवळ सुखसाधन मानतात अशी तक्रार करणाऱ्या स्त्रियांनी लक्षांत ठेवावें की ही केवळ पुरुषांचीच चूक नाही.
गाईला किंवा घोडीला संतति उत्तम बैलापासून किंवा घोड्यापासून व्हावी, हें कबूल करणारे लोक स्त्रीचे बाबतींत मात्र दुबळ्या पतीपासून संतति होण्यापेक्षा इतर सुदृढ मनुष्यापासून होणें इष्ट आहे हें विधान भयंकर अनीतीचें समजतात. परंतु हें शास्त्रीय सत्य नव्हे का?
कांही लोक कदाचित् असें म्हणतील की स्वैरसमागमास परवानगी दिल्यास संततीची वाट काय? आणि रोगांचा प्रसार होईल त्याचें काय? याला उत्तर इतकेंच की कांही लोकांनी स्वैरसमागमाचे दृष्टीने जर एखादा संघ केला तर त्यांना जरूर पडल्यास संततीचा व रोगांचाहि प्रतिबंध करणे सोपे आहे.
लैंगिक स्वातंत्र्य पाहिजे असें आम्हीं म्हटलें की लोक म्हणतात की तुम्हाला भावना नसल्यामुळे प्रेमभंगाच्या यातना तुम्हाला कळत नाहीत. हा आरोप सर्वथैव खोटा आहे. आमचें म्हणणें असें आहे की आमच्या भावना कितीहि दुखावल्या तरी कोणालाहि मर्जीविरुद्ध जखडून ठेवण्याचा आम्हाला हक्क नाही आणि त्याचप्रमाणे आम्हालाहि जखडून ठेवण्याचा कोणाला हक्क नाही. या बाबतीत पुरुषाची स्त्रीवर किंवा स्त्रीची पुरुषावर सत्ता चालतां नये.
सुदृढ प्रकृतीच्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या मनांत अनेक व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण उत्पन्न होणें अपरिहार्य आहे. हें जर खरें, तर या आकर्षणाला वाव न देतां प्रत्येक व्यक्तीला दुःख भोगायला लावण्यांत कोणाचा फायदा आहे? धर्मबाजी, नीति- बाजी आणि कायदेबाजी बाजूला ठेवल्यास यांत कोणालाहि सुख नाही. त्यापेक्षा या आकर्षणाला वाव देऊन सर्वांना सुखाचा मार्ग सुलभ करून देणें बरें नव्हे का? धर्म फेकून देतां येईल, नीति नेहमीच वदलत असते आणि कायदेहि बदलतां येतात. मनुष्यजातीच्या सुखाकरता हे सर्व बदलण्यास काय हरकत आहे?
बायको चोरणें हें बायबलाप्रमाणे पाप आहे. बायबलांत अनेक गोष्टी ईश्वराला नापसंत असल्याचें सांगितलें आहे. त्यांत असेंहि सांगितलें आहे की बापाची वायको (म्हणजे आईच असें नाही, कारण त्यावेळीं अनेक बायका असत) किंवा आपली बहीण, सून, आत, मावशी वगैरेंना नग्न पाहूं नये; भावजयीशी संबंध ठेवू नये; एकाच मनुष्याने आईशी व मुलीशी संबंध ठेवू नये (यांपैकी कांही गुन्ह्यांना मृत्युदंड सांगितला आहे); लज्जाहीन किंवा व्यभिचारी लोक स्वर्गांत जात नाहीत. तुम्हाला शरीर ईश्वराकडून मिळालें आहे, त्यावर तुमचा हक्क नाही. आजचे सर्व कायदे यावरच बसवलेले आहेत हें उघड आहे, परंतु आम्ही पुढारलेले, आम्हाला धर्म नाही, असें जोराने सांगणारांना तरी त्यांचें महत्त्व वाटतां नये. नाइलाज म्हणून कायद्यांप्रमाणे वागावें लागल्यास गोष्ट निराळी. परंतु पाहूं जावें तर पुढारलेल्या समाजसत्तावाद्यांत देखील इतकी समजूत दिसत नाही.
वस्तुतः जे गरजेला उपयोगी पडतात तेच स्नेही समजण्यास योग्य आहेत. या व्याख्येतून लैंगिक गरजा कां वगळाव्या, याला कांही शास्त्रीय, तात्त्विक किंवा नैतिक कारण नाही. आणि अशा विधानांनी ज्यांच्या मनाला धक्का बसतो ते धर्माच्या तावडीतून अजून सुटलेले नाहीत असेंच मी समजतों. अर्थात् एकाच्या गरजांकरता दुसऱ्यावर जुलूम किंवा अत्याचार होतां नये आणि कांही स्नेह्यांनी असा एखादा संघ काढल्यास ज्यांना हें पसंत असेल तेच त्यांत सामील होतील, इतरांनी होऊ नये. म्हणून अशा संघाला कोणी नांवें ठेवण्याचें कारण नाही.
रजिस्टर विवाह करणें म्हणजे भटांना धाब्यावर बसवणें आहे, विवाहा- शिवाय जोडप्याने एकत्र राहणें म्हणजे भटांबरोबरच सरकारी रजिस्ट्रारलाहि धाब्यावर बसवणें आहे. ही एक पायरी पुढे आहे पण स्वैरसमागम म्हणजे त्यापेक्षाहि एक पायरी पुढे आहे.
वौद्धिक, आर्थिक, शास्त्रीय किंवा क्रीडाविषयक संघांत सामील होणे सर्वांच्या अंगवळणी पडलेलें आहे. त्याचें कोणाला कांही वाटत नाही. पण प्रेमसंघाचें कोणी नांव काढल्यास लोकांच्या कपाळाला आठ्या पडतात आणि याचें कारण शोधू गेल्यास असें दिसतें की अधार्मिक म्हणवणारे लोक देखील धार्मिक असतात.
प्राचीन कालीं कांही लोकांत पाहुण्याला ज्याप्रमाणे उत्तम अन्न किंवा इतर सोयी, त्याचप्रमाणे उत्तम स्त्रीही पुरवण्याची चाल असे, आणि उत्तम पक्वान्न पाहुण्याने न खाल्ल्यास गृहिणीला जसें वाईट वाटेल, तसेंच पाहुण्याने त्या स्त्रीचा स्वीकार न केल्यास यजमानाला वाईट वाटत असे. हा उच्च प्रतीचा पाहुणचार होता, कांही लेखक म्हणतात त्याप्रमाणे अनीतीचें लक्षण नव्हतें.
चुंबन, पीडन, आलिंगन, समागम वगैरे शारीरिक गोष्टींना कमी प्रतीच्या लेखणें न्याय्य नाही. मानसिक गोष्टी देखील शारीरिक जीवनाचाच परिणाम होत. तेव्हा मानसिक म्हणजे उच्च आणि शारीरिक म्हणजे नीच समजण्याचें कारण नाही. स्त्रीपुरुषांमधील आकर्षणाचें आविष्करण परिस्थितीप्रमाणे कधी मानसिक व कधी शारीरिक होईल. त्यांत असा भेदभाव करणें चूक आहे.
मी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहें. व्यक्तीला जसें एकलकोंडें राहण्याचें स्वातंत्र्य आहे, त्याचप्रमाणे संघ करण्याचेंहि स्वातंत्र्य पाहिजे. ज्याप्रमाणे शास्त्रीय किंवा आर्थिक दृष्टीने केलेल्या प्रयोगांत एक दोन, दहा किंवा अधिक स्नेही भाग घेऊं शकतील, तसेंच लैंगिक प्रयोगांत कां असूं नये? कांही लोकांनी एखादा संघ करून जर असें ठरवलें की त्यांतील कोणत्याहि व्यक्तीने दुसऱ्या कोणत्याहि व्यक्तीला समागमाचे बाबतींत नकार देऊं नये, तर असा संघ करण्याची त्यांना पूर्ण मोकळीक असावी. अर्थात् कांहीतरी बाबतींत समानशील लोक असतील, तेच असा संघ करूं शकतील. असा संघ कोणत्याहि शारीरिक किंवा मानसिक बाबींवर उभारलेला असला तरी त्यामुळे त्याला उच्च किंवा नीच समजण्याचें कारण नाही.
माझें एखाद्या स्त्रीवर प्रेम असेल आणि ती जर मला नकार देत नसेल, तर ती वरील प्रकारच्या एखाद्या संघांत गेल्याचें मला मुळीच दुःख नाही. माझें समाधान होतें कीं नाही एवढेच मी पाहतों, बाकीच्या जगाच्या उठाठेवी मला काय करायच्या? माझें समाधान झालें, म्हणजे मला असूया वाटायला जागाच नाही.
पण एखादी स्त्री जर केवळ ‘प्लॅटॉनिक लव्ह’ (वासनारहित प्रेम) मला देऊं पाहील तर तें मला मुळीच कबूल नाहीं. हें माझें व्यक्तिस्वातंत्र्यच आहे. वासनारहित प्रेम मला अपुरें वाटतें, त्याला मी काय करूं?
अॅडॅमाइट् पंथांतील स्त्रिया रस्त्यांत नग्न हिंडत असत आणि स्वैरसमागम करीत असत, व त्याबद्दल त्या पैसा घेत नसत. त्या आपली वागणूक बदलण्यास तयार नव्हत्या म्हणून त्यांना १४५१ सालीं जिवंत जाळण्यांत आलें. त्या गात गात आनंदाने मेल्या.
वर सांगितल्याप्रमाणे जर कोणी संघ स्थापन केला तर त्यांतील कोणत्याहि व्यक्तीने शक्य असेल तोंपर्यंत समागमास नकार देतां नये असा नियम असला पाहिजे, कारण एरवी कित्येक स्वार्थी लोक स्वतःची मात्र सोय पाहतील आणि दुसऱ्याची सोय करण्याची वेळ आल्यास मागे घेतील. अशा व्यक्तींनी संघांत जातां नये.
प्रस्तुत एकेरी कुटुंबव्यवस्थेंत पतिपत्नी एकमेकांत इतकी गढून जातात की त्यांना एकमेकांचे दोष देखील लागतात आणि सामाजिक दृष्टीने त्यांची किंमत कमी होते. यासाठी मी असें म्हणतों की कुटुंब प्रवाही स्थितींत असावें म्हणजे पति- पत्नींची मधूनधून अदलाबदल करावी, मुलें देखील एका कुटुंबांतून दुसऱ्या कुटुंबांत जावीं, म्हणजे नेहमी नवीन प्रकारांची संवय होऊन मनुष्यांत जास्त जीवंतपणा राहील. मला कोणी पाहुणा म्हणून बोलावल्यास ज्याप्रमाणे माझी इतर सोय होईल त्याप्रमाणे लैंगिक गरजाही भागल्या पाहिजेत असें माझें मत आहे. एरवी मी पाहुणा जाणार नाहीं.
लहान मुलांना त्यांच्या मर्जीविरुद्ध जन्मावें लागतें आणि त्यांना आईबाप किंवा भावंडे कशी असावीं, या बाबतींत त्यांचा कोणी सल्ला घेत नाही. तेव्हा आपलें कुटुंब सोडून दुसऱ्या कुटुंबांत जाण्याची इच्छा असल्यास आणि त्या कुटुंबाने तें कबूल केल्यास त्यांना जाऊं द्यावें. त्यांनाहि व्यक्तिस्वातंत्र्य पाहिजे असें मला वाटतें.
१० व्या पासून १६ व्या शतकापर्यंत स्वैरसमागम रूढ असलेले पुष्कळ पंथ सर्व युरोपभर पसरलेले होते. त्यांच्यांत दारिद्र्य नव्हतें, न्यायाधीश नव्हते, भांडणें नव्हतीं. लहान मुलांची त्यांच्यांत जशी चैन होती, तशी एकेरी कुटुंबांत कधीच नसते. या पंथांत बाप कोण हें माहीतच नसतें, त्यामुळे ज्या पुरुषांना मुलांची खरोखर आवड असेल ते सर्व मुलांचे सारखेच लाड करीत.
कांही स्त्रीपुरुषांना एकच पति किंवा एकच पत्नी करण्याची पद्धत मनापासून पसंत असेल, असें मी तात्त्विक दृष्ट्या कबूल करीन. पण मला बहुधा असेंच दिसतें की पातिव्रत्याच्या किंवा एकपत्नीत्वाच्या पुरस्कर्त्यांपैकी बहुतेकांना समाजाची भीति वाटत असते, किंवा आपण उघडपणें इतरत्र संबंध ठेवल्यास पति किंवा पत्नी आपणास सोडून जाईल ही भीति असते. म्हणजे त्यांचें मत भीतीमुळे बनलेलें असतें, ती त्यांची खरी आवड नव्हे. परंतु माझें म्हणणें असें आहे की, पुष्कळ स्त्रियांशीं किंवा पुरुषांशी सबंध ठेवल्याने मनुष्याचा जास्त विकास होतो आणि सामाजिक किंमत वाढते. ग्रीक लोक एकेरी पद्धतीचे भोक्ते नव्हते आणि कलेच्या व तत्त्वज्ञानाच्या बाबतींन त्यांनी सर्व जगाला ऋणी करून ठेवलें आहे.
भरपूर कामवासना असणें हें सुदृढ प्रकृतीचें लक्षण आहे. ती नैसर्गिक आहे हें लक्षांत ठेवलें पाहिजे. तें व्यसन नाही. दारूची किंवा तंबाखूची इच्छा कोणाला आपोआप होत नाही. या संवयी लावून घेतांना त्रास होतो, परंतु भिन्नलिंगी व्यक्तींचें एकमेकांविषयीं आकर्षण सहजिक असतें. त्यांनी पायरीपायरीने समागमापर्यंत पोचणें हेंहि नैसर्गिक आहे. त्याला समाजाची काय आडकाठी असेल तेवढीच.
एखादा मनुष्य कोणाला तरी नग्न पाहिल्याबद्दल पोलिसाकडे तक्रार करतो. त्याच्या हें लक्षांत येत नाहीं की तो स्वतः आपला चेहरा आणि हात नेहमी लोकांना दाखवीत असतो आणि हे अवयव कोणाला आवडतात कीं काय याची तो मुळीच फिकीर करीत नाही. कोणाचा चेहरा कितीहि कुरूप असला तरी तो मला पाहावा लागतो. मी जर याबद्दल तक्रार करूं लागलों तर लोक मला म्हणतील, तिकडे पाहूं नका, मग शरीराचा मध्यभाग उघडा दिसल्याबद्दल तक्रार करणाराला असेंच कां सांगू नये ? ही केवळ परंपरा आहे, तिला झुगारून कां देऊं नये?
लैंगिक बाबतींत खरोखर पुढारलेले कोणाला म्हणावें? ज्यांना लैंगिक बाबतींत इतर कोणत्याहि विषयाइतकेंच मोकळ्या मनाने बोलतां येतें आणि ज्यांना या विषयाची कोणत्याहि प्रकारची लाज वाटत नाही किंवा हा विषय अश्लील वाटत नाही, तेच खरे पुढारलेले समजावे. ज्यांना या विषयाची लाज वाटेल किंवा तो अश्लील वाटेल, त्यांचें मन शुद्ध असणें शक्य नाही. अश्लीलतेसंबंधी कायदे करणारे स्वतःच अशुद्ध मनाचे असतात. शुद्ध मनाला कशांतहि अश्लीलता दिसत नाही.
ज्याला स्वतःच्या किंवा इतरांच्या कामवासनेसंबंधी व तदनुषंगिक इतर गोष्टींसंबंधी विचार करतांना लाज वाटते, तो अजून शुचिर्भूत झाला नाही, त्याच्या मनांत अजून धर्माची घाण शिल्लक आहे.
समाजस्वास्थ्य
जुलै १९३५ पृष्ठ क्र. १ (अपूर्ण)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.