एक लक्षवेधी संपादकीय

मार्च २००० चा आजचा सुधारक वाचला. प्र. ब. कुळकर्णी यांच्या चिंतनातून उतरलेले संपादकीय मननीय आणि विचारप्रवर्तक आहे. आतापर्यंत आ. सु. तील विवेकवादी विचारांचा मार्ग धुक्यात हरविल्यासारखा मला अस्पष्ट होता. प्र. व. ह्यांच्या संपादकीयातून विवेकवादी विचारसरणीला जे अपेक्षित आहे ते सुस्पष्ट झाले आहे. आजच्या सुधारकाने जी वैचारिक भूमिका घेतली आहे ती कर्मठांना आणि परंपरावाद्यांना मस्तकशूळ उत्पन्न करणारी आहे. आमचा स्वतःचा कर्मठपणाला आणि परंपरावादी विचारांना मुळीच विरोध नाही. त्यांच्या विचारातील हिंसेला आमचा विरोध आहे. शंकराचार्यांना आकल्प जगविण्यासाठी घुटी पाजणाऱ्या सनातनी विचारांचा आम्हाला संताप येत नाही. चार्वाकांचा जन्म होऊ न देण्यासाठी गर्भपात घडवून आणणाऱ्या सुइणींचा आम्हाला तिरस्कार आहे. नग्नतेवर आम्ही भगवे वस्त्र परिधान केले आहे हे शंकराचार्य सांगतात. भगव्याच्या आंत तुम्ही सारे नग्न आहात हे चार्वाक सांगतो. चार्वाक व्यवहार सांगतो. विवेकवादाचे नाते चार्वाकाशी अधिक जिव्हाळ्याचे आहे. संपादकीयातून विवेकवादी विचारसरणी जेवढी सुस्पष्ट झाली ती पाहता संपादकीय अर्थपूर्ण आहे. विशेष म्हणजे आपल्या विचारांच्या समर्थनार्थ संपादकाने पाश्चात्त्य पंडितांचा वॉकर घेतलेला नाही हे आमच्या दृष्टीने प्रशंसनीय.
‘मानवधर्माची संस्थापना, विषमतेचे आणि अंधश्रद्धांचे निर्मूलन, श्रुति- स्मृति – प्रामाण्याची निरर्थकता प्रस्थापित करणारी विचारधारा’ आजचा सुधारकातून प्रवाहित होत राहील असे आश्वासन संपादकीयातून मिळते. मराठीत अशा विचारधारांना प्रकाशात आणणारी मासिके नगण्य आहेत. आजच्या सुधारकाचे या दृष्टीने मराठी साहित्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. अध्यात्माची झिंग चढलेल्या शब्द- कळेच्या दांभिकतेला तो एक तर्कशुद्ध उत्तरे देणारा विचार म्हणून, नव्या पिढीला त्याची दखल घेऊन, अंतर्मुख करणारे माध्यम म्हणून, आजचा सुधारकाची भूमिका अप्रिय सत्य-निवेदनाची आहे हे स्पष्ट झाले आहे. आ. सु. तील विचारांचे महत्त्व उद्या पटणार आहे.
विवेकवाद हा अनीश्वरवाद आहे अथवा ते धर्मविरोधी मत आहे किंवा त्याचा संबंध बुद्धिप्रामाण्यवादाशी वा सुखवादी वा उपयुक्ततावादी विचारसरणीशी आहे, याचा आमच्या अल्पमतीला स्पष्ट बोध होत नसे. कारण तत्त्वज्ञान हा आमचा विषय नव्हता. मध्यंतरी विवेकवादावर आक्षेप घेणाऱ्या, संगणक-तर्कचूडामणी अशा भूमिकेत वावरणाऱ्या एका इंडोअमेरिकन, भाटे नावाच्या विद्वानाच्या, विचारधारेने विवेकवादावर प्रहार करणारे जे लेख लिहिले त्यामुळे तर या वयातही आपणाला विवेकवाद कळला नाही याची आमची आम्हाला खंत वाटू लागली. प्र. ब. कुळकर्णीच्या संपादकीयाने ही भ्रांत अवस्था काही अंशी दूर झाली आहे.
प्रा. प्र. व. कुळकर्णीच्या संपादकीयातील आणखी एक मुद्दा लक्षणीय आहे. तो मुद्दा आहे गेल्या दशकापासून अविरत सुरू असणाऱ्या वाचिवीरांच्या पारलौकिक दहशतवादाचा. आध्यात्मिक व्यासपीठावरून आणि दूरदर्शनाच्या माध्यमातून हे वाचिवीर श्रद्धाळू समाजात भक्तिगंड निर्माण करण्यात सफल झालेले आहेत. या आध्यात्मिक दहशतवादाकडे लक्ष वेधणारी प्रस्तुत संपादकीयाची ही प्रतिक्रिया सर्वप्रथम असावी. हे जे आध्यात्मिक आणि धार्मिक प्रवचनांचे पेव फुटले आहे त्यामुळे समाजाच्या प्रगतिशील विचारांच्या वाटा अवरुद्ध होत तर आहेतच पण सामाजिक अन्यायाचे जे तत्त्वज्ञान पुरोहितांनी, पोसून ठेवले आहे त्या तत्त्वज्ञानाला वा विचारसरणीला गौरविणारी विचार प्रवचनांद्वारे मुखरित होत आहे. बुवाबाजीवर प्रहार करणारे लेखन वेळोवेळी प्रसिद्ध होत गेले आहे. पण या मोक्षगुरूंच्या प्रवचनातून, जी पाप- मुक्तीची प्रमाणपत्रे कधी काळी पोपने विक्रीला काढली होती तीच विचारसरणी प्रगट होताना दिसते. संपादकाने या विचारसरणीतील सुप्त हेतू सर्वप्रथम प्रगट केलेला आहे. शब्दशिलेदारांची आध्यात्मिक पुंडाई ही बृहद् उपनिषदातील याज्ञवल्क्यापासून आज पर्यंत कायम असून ठराविक शब्दांची हेराफेरी करून हे ज्ञानशून्य, आळशी जीवन जगणारे, श्रम न करणारे मोक्षगुरू नामस्मरण, भक्ती, धर्मपरायणता, अशा संकल्पना गळी उतरवून अध्यात्माच्या हिरॉईनची गोळी देऊन विद्रोहाच्या अस्वस्थ जाणिवा बोथट करतात. स्वतः गडगंज संपत्ती जमवून आश्रमवासी होतात. श्रोता मात्र जिथे असतो तिथेच राहतो. भांडवलशून्य आध्यात्मिक धंदा हा प्रवचनकारांसाठी फायदेशीर असतो.
प्रवचनकारांच्या तत्त्वप्रणालीतला अपायकारक भाव जाणणारे हे संपा- दकीय एका प्रश्नाचे मात्र उत्तर देत नाही. प्रश्न असा आहे की या प्रवचनांना लक्षावधी लोकांची गर्दी का असते ? विशेषतः स्त्री-स्वातंत्र्याविषयी, शिक्षणाविषयी, विधवांच्या प्रश्नाविषयी स्त्री-मुक्तीविषयी आणि स्त्रियांच्या सामाजिक, धार्मिक, सहभागाविषयी, अत्यंत प्रतिकूल भूमिका घेणाऱ्या या प्रवचनांना स्त्री-समाज बहुसंख्येने आकृष्ट का होतो? पुरुषवर्गाचे एकवेळ समजू शकते. मराठी नाटकांना एके काळी, गर्दी करणारा जो, मालगुजार, जमीनदार, सावकार, दलालांचा, शालसुगंध-मंडित आळशी समाज होता त्याच विरासतीतून आलेला समाज अशा प्रवचनांनाही गर्दी करतो. पण त्यामागे स्त्रियांची मानसिकता कोणती याचा शोध घेणे आवश्यक आहे. आमच्या मते प्रत्येक स्त्रीच्या उपनेणीवेत मधुराभाव असतो. ‘सा तु अस्मिन् प्रेमस्वरूपा’ ही नारदीय भक्तिसूत्रातील भक्तीची व्याख्या, मधुराभाव निर्माण करते. प्रत्येक पुरुष हा जसा
मनाने बहुस्त्रीक असतो तशी प्रत्येक स्त्री ही मनाने बहुपुरुषेच्छुक असते असे एकी समाजशास्त्राच्या विद्वान प्राध्यापिकेने केलेले विधान या मधुराभावाची उकल करू शकेल. या मनोवृत्तीच्या अधिक तपशिलात जाण्याची आमची इच्छा नाही. मानस- शास्त्राच्या विदुषींनी त्यावर अवश्य प्रकाश टाकावा. कारण भागवताच्या दशम स्कंधा- वरील ओवीबद्ध प्रवचनातून रासलीलेचे वर्णन करताना गोपिकांच्या जारकर्माची, मधुराभावी अवस्था सांगताना कृष्णदयार्णवांनी हरिवरदात नको तेवढी वात्स्यायनी भूमिका प्रदर्शित केली आहे (हरिवरदा हा ग्रंथ अत्यंत मौलिक असा मराठीतील प्रथम ज्ञानकोश म्हणण्यासारखा) आहे. या मधुराभावी सुप्रवृत्तीमुळेच पुराणिक-प्रवचन- कार, हा लौकिक स्वरूपात ईश्वराचा दूत या नात्याने प्रियकरांच्या भूमिकेत येतो.
या प्रवचनांतून कोणतेच उद्बोधन होत नसते. ‘जगा आणि जगू द्या’ हा भारतीय संस्कृतीचा महान आदर्श. पण परंपरावाद्यांना अभिप्रेत असणारे जीवन जगाल तरच जगाल असा दंडकही त्यामागे असतो. पुरोहितांनी जगावे, शूद्रांना सन्मानाने जगू द्यावे या विचारसरणीवर आक्षेप घेता येणार नाही. पण अप्रत्यक्ष- पणे अन्यायाने परिपूर्ण असणाऱ्या कथांनी, श्रद्धावानांच्या विचारसरणीत अन्यायाचे उदात्तीकरण केले जाते. कथा परिचयाचीच असते. भागवतावर प्रवचन देणाऱ्या आमच्या एका ज्येष्ठ मित्राला माझ्या प्रश्न होता, ‘स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः’ हे वचन जर खरे असेल तर हिरण्यकशिपूचे काय चुकले ? प्रल्हादाचा नारायणी-धर्म हा शैव असणाऱ्या हिरण्यकशिपूला परधर्मच होता. साम, दाम दंड, भेद ह्या उपायांनी आपल्या प्रल्हाद नावाच्या पुत्राचे धर्मांतर थांबविण्याचा प्रयत्न हिरण्यकशिपूने केला. तो सफल झाला नाही म्हणून तो दहशतवादी झाला. आणि शेवटी नारायणी धर्माचा कैवार असणाऱ्या नृसिंहदेवतेने त्याला मारले. (ख्रिश्चन आणि मुसलमानांनी यापेक्षा वेगळे ते काय केले?) ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ ‘हीं प्रतिक्रिया उत्तरादाखल मिळाली. आमचे कुलदैवत असणाऱ्या भगवान कृष्णाची भूमिका संपूर्ण महाभारतात अन्यायी होती हे सांगताना ईश्वरी अवकृपेचे आम्हाला मुळीच भय नसते.
सत्संगाच्या व्यासपीठावरून, जीवनाच्या समस्यांविषयी उद्बोधन करणारे एकही विधान नसते. कारण सारे प्रश्न रामनामाने सुटणार असतात. रामनामानेच का सुटतात? कारण र कारो सूर्यबीज, मकारो चंद्रबीज’ असे अर्थशून्य विवरण दिले जाते. प्रश्न पडतो की रामनामाऐवजी ‘सूर्यचंद्र’ हाच जप का नाही करायचा? आम्ही स्वतः ईश्वरवादी आहोत. पण ईश्वरीसत्तेचा भयगंड निर्माण करून या समाजातील श्रमजीवी वर्गाला जसे नागविले गेले आहे, तसा भयगंड निर्माण करणारा आमचा ईश्वर नसून तो समतावादी आहे. आमच्या ईश्वराच्या देव्हाऱ्यात ज्ञानदेव चोखोबा, सुभगा, विधवा सारे एकत्र असतात. कथाकारांच्या आध्यात्मिक व्यासपीठावर हे असे होत नसते. भक्ती नामस्मरण, कुंडलिनी जागृती, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, अशा अर्थ-शून्य भ्रांत संकल्पना, कथा, दृष्टान्त यांच्या शब्दचावटीद्वारे तासन् तास सुरू असतात. येणारा प्रत्येक श्रोता उपनेणीवेत गुन्हेगार किंवा पातकी असतो. त्याला ज्ञानदेवांचा हरिपाठातील अभंग आश्वस्त करीत जातो.
‘पर्वताप्रमाणें पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तांसी । नाहीं ज्याशीं भक्ती ते पतित अभक्त । हरिशीं न भजती दैवहत । नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरींचीं ।’
या अशा ओळींनी पातके जळणार, गुन्ह्याला क्षमा मिळेल असे अप्रत्यक्ष आश्वासन मिळाले असते. या शब्दचावटांनी दैववाद, प्रारब्धयोग, पुरुषार्थ, ईश्वरी अनुग्रह, संचित अशा अर्थशून्य संकल्पनाच्या ढिगाऱ्याखाली माणसातील उपक्रम- शीलता मारून टाकली आणि भौतिकशास्त्रे दडपून टाकली. संतांची भूमिकाही इथे अपवाद ठरत नाही. तुकाराम महाराजांनी या शब्दचावटांचा कावा ओळखला होता. महाराज म्हणतात.
‘बोलाचीच कढी बोलाचाची भात । जेवूनिया तृप्त कोण झाला ।
कागदीं लिहितां नामाची साखर । चाटतां मधुर गोडी नाहीं ।
माप आणि गोणी । तुका म्हणे रितीं दोन्ही ।। ‘
भटाने भक्षण केलेल्या पुरणपोळीचे पोटात जे काय झाले असते तेच महाराच्या कदन्नाचे त्याच्या पोटात झाले असते. मग भट पवित्र का आणि महार अस्पृश्य का? प्रवचनकारांनो मोक्षगुरूची भूमिका घेऊ नका. प्रवचने देऊ नका असे आम्हाला म्हणायचे नाही. आता जोगी, दांडेकरी, साखरी, सातारकरी ज्ञानदेवीच्या ओव्यांचा अनुभव घ्यायला सांगण्याची गरज उरलेली नाही. तुकारामाची भूमिका घ्या. गाडगे महाराजांचे तत्त्वज्ञान सांगा. हे सारे संत ज्ञानगुरू होते. मोक्षगुरू नव्हते. मोक्षगुरू हाच मति भ्रष्ट करतो. ज्ञानगुरूंची भूमिका आक्षेपार्ह नसते. ज्ञानगुरू जिज्ञासूला ज्ञानाच्या वाटेने नेतो. मोक्षगुरू हा मधुराभावाच्या मार्गाने नेऊन जारकर्मास प्रवृत्त करतो. हे जारकर्म शारीरमानस अशा पातळीवर असू शकते. असो. संपादकाने एका जनहिताच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले याबद्दल धन्यवाद.
गुजरवाड्याजवळ, महाल,
नागपूर – ४४० ००२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.