पौगंडावस्थेतील दुर्लक्षित मुली

युनोतर्फे उद्घोषित केलेल्या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यास १९९८ सालीच पन्नास वर्षे पूर्ण झाली. जगातील सर्व व्यक्तींना समान मानवी हक्क असावेत व स्त्री-पुरुष किंवा मुलगा-मुलगी असा भेद नसावा हे त्याचे मुख्य सूत्र आहे. जग आता एकविसाव्या शतकात पदार्पण करणार आहे. अजूनसुद्धा समाजाचा निम्मा भाग- स्त्रीवर्ग कनिष्ठ व हीन समजला जाऊन त्याच्याविरुद्ध पक्षपात व अन्याय केला जातो. १९७५ ते १९८५ हे आंतरराष्ट्रीय महिला दशक साजरे झाले. भावी काळात मुलींच्याकडून भरीव कार्य व्हावे यासाठी त्यांच्या विरुद्ध होणारा पक्षपात थांबवून त्यांना सवल, सक्षम कसे बनवावे याबाबत जगातील शासनव्यवस्था व समाज यांनी निश्चित धोरण व उपाययोजना आखून अंमलात आणल्या पाहिजेत.
१९९८ च्या जुलई महिन्यात दिल्ली येथे द. अशियाई देशातील प्रति- निधींची पौगंडावस्थेतील (adolescents) लोकसंख्या, त्याचे स्वरूप व समस्या यावर परिषद झाली. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या व विकास परिषदेचा भाग म्हणूनच ही परिषद घेण्यात आली. त्यातील अंदाजानुसार पौगंड लोकसंख्या (adolescent popu- lation) या भागात १९ कोटी इतकी असून त्याचे निरक्षरता, कुपोषण, अनारोग्य असे प्रश्न आहेत. या परिषदेच्या अध्यक्षा डॉ. नफीस सादिक यांनी आपल्या भाषणातून या प्रश्नांचा उल्लेख करून १३ ते १९ वर्षे वयाच्या मुलींच्याबाबत याच वयाच्या मुलांशी तुलना केली असता शिक्षण, आरोग्य-सुविधा, पोषक अन्न याबाबतीत मुलींना वंचित ठेवले जाते व ग्रामीण भागातील मुलींचे जीवन अत्यंत निकृष्ट असते असे प्रतिपादिले. आपल्या देशात १९ वर्षे वयापर्यंतच्या मुलींची संख्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे १/४ आहे असा अंदाज आहे. भारतात सुमारे एक कोटी वीसलक्ष मुलींचा जन्म दरवर्षी होतो. त्यातील ३० लक्ष त्यांच्या १५ वर्षांपर्यंत जगत नाहीत आणि यातील १/३ मृत्यू पहिल्या वर्षातच होतात. यातील बरेचसे मृत्यू त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या पक्षपातामुळे, उपेक्षेमुळे होतात, असे काही लोकसंख्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.
मुलामुलींच्या बाल्यावस्था व प्रौढावस्था यातील मधल्या काळाला पौगंडावस्था (साधारणपणे १३ ते १९ वर्षांपर्यंतचा काळ ) म्हणतात. हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा व रम्य टप्पा असतो. शाळेत जाण्याची, खेळण्याची, कसलीही जबाबदारी न घेता आनंदाने जगण्याचा हा काळ. पण या काळात मुलांमुलींना वागविण्यात प्रत्येक बाबतीत दुजाभाव राखून पक्षपात केला जातो. घरापासूनच या पक्षपाताची सुरुवात होते. मुलींच्या बाबत गर्भापासून थडग्यापर्यंत पक्षपात सतत चालू राहतो. कपडे, खेळणी, खाद्यपदार्थ, पादत्राणे, औषधाच्या व शिक्षणाच्या सोयी इ. बाबतीत मुलांच्या गरजा अधिक चांगल्या रीतीने भागविल्या जाव्यात अशी आईवडिलांची सतत धडपड असते. दरिद्री कुटुंबात तर पुरुषांची जेवणे झाल्यानंतर अन्न उरले तरच मुलींना मिळते. शिळे अन्न नेहमीच त्यांच्या वाट्याला येते. अशा मुली कुपोषणामुळे बाल- वयातच मरण पावतात.
मुलींना हा पक्षपात अगदी लहान वयात कळत नाही. त्यांनी बालपणा- पासून ही दुय्यम प्रतीची वागणूक सहन करीत राहिले पाहिजे असेच वळण त्यांना बालपणापासून लावतात. मुलींनी हळू बोलावे, मोठ्याने हसू नये असे त्यांना शिकविले जाते. त्यांच्या जबाबदारीतून लौकर मुक्तता मिळावी म्हणून १४ ते १८ वर्षांतील ४० टक्के मुलींची लग्ने केली जातात. मग ओघानेच त्या लौकरच माता बनतात. या वयात त्यांची जननक्षमता पण नीट विकसित झालेली नसते. बऱ्याच मुली गरोदर- पणात किंवा बाळंतपणात मरण पावतात. काहींची मुले पण अशक्त राहण्याचा संभव असतो. लौकर लग्न व मातृत्व या जबाबदाऱ्यांमुळे अल्पवयीन मुलींना बरेच धोके पत्करावे लागतात. त्यामुळे मुलींचा मृत्युदर मुलांच्या मृत्युदरापेक्षा अधिक राहतो. त्यामुळे भारताच्या लोकसंख्येत स्त्रीपुरुषप्रमाण घटत आहे. १९०१ मध्ये हजार पुरुषांमागे ९७२ स्त्रिया असे असलेले हे प्रमाण १९९१ मध्ये ९२९ झाले.
ग्रामीण भागातील विशेषतः गरीब कुटुंबातील मुलींचे जीवन खरोखरी अत्यंत हालाखीचे असतो. त्यांची बाल्यावस्था सात आठ वर्षांपासूनच संपते. आई- बरोबर अनेक कष्टाची कामे त्यांना उरकावी लागतात. आईचा आजार किंवा बाळंतपण असेल तर घरकामाचे सर्व ओझे त्यांच्यावर पडते. कचरा काढणे, पाणी व सर्पण आणणे, भांडी घासणे, लहान भावंडांना सांभाळणे इ. सर्व कामे त्यांना उरकावी लागतात. अशा स्थितीत बापाला दारूचे व्यसन असेल तर काय होत असेल? या मुलींच्या शिक्षणाचा विचारसुद्धा केला जात नाही. त्या १३/१४ वर्षांच्या झाल्या की त्या लहान स्त्रिया समजल्या जातात. माहेरी किंवा सासरी कोणेही असल्या तरी कामाच्या प्रचंड ओझ्याखाली त्या दडपल्या जातात. शहरातील निम्न मध्यम वर्गीय व गरीब मुलींना सुद्धा पैसे मिळण्यासाठी घरगुती नोकर किंवा हॉस्पिटलमधील नोकर म्हणून काम करावे लागते. काही मुली कारखान्यांत पण काम करतात.
बाल्यावस्थेतून प्रौढपणा विकसित होण्याचा काळ हीच पौगंडावस्था. हा संक्रमणाचा काळ असून मुलामुलींच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. या काळाला आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व दिलेले आहे असे वाटत नाही. एकोणिसाव्या शतकात कन्या हा देवाचा शाप समजण्याचे दिवस होते. प्रश्न होता जन्मतः मरण की शापित आयुष्य -जो तिच्या जातीतल्या रूढीप्रमाणे आणि प्रदेशातल्या रीतीप्रमाणे सोडविला जाई. स्त्रीलिंगी अर्भकांचा मृत्यू ही रोजचीच गोष्ट होती. अलिकडे सुद्धा हुंडा देण्याचे टाळण्यासाठी बिहार, तामिळनाडू इ. भागात तान्हेपणातच मुलींचे मृत्यू घडवून आणले जातात. गर्भजल परीक्षेमुळे मुलींचे जन्मच टाळले जातात. वंशाचा दिवा म्हणून मुलांचे जन्म उत्साहाने साजरे केले जातात.
पश्चिमेकडील मुलांमुलींची वागणूक या काळात आपल्यापेक्षा भिन्न राहते. ती संघर्षशील होऊन आईवडिलांना व समाजात अधिकार गाजविणाऱ्या व्यक्तींना विरोध दाखवितात. बरीच मुले घर सोडून स्वतंत्रपणे राहतात व स्वतःचा जीवन- व्यवसाय ठरवून कालक्रमणा करतात. या वयात नवीन विचार, नवीन स्वप्ने, नवीन गरजा, लैंगिक भावना यांचा उगम होतो. स्वतःची अस्मिता. स्वत्व जपण्याची ऊर्मी पण निर्माण होते. या सर्व बदलाकडे योग्य लक्ष देणारे मार्गदर्शन आपल्याकडे मुलामुलींना होते का याची शंकाच वाटते. या वयात मुलींच्यात काही शारीरिक व मानसिक बदल होत असतात. त्यांचे शास्त्रीय व योग्य ज्ञान त्याना आईकडून व इतर पालकांकडून मिळतेच असे नाही.
या अज्ञानामुळे पौगंडावस्थेतील मुली आणखी एका मोठ्या धोक्यास बळी पडतात. दुर्दैवाने हा धोका काही ठिकाणी कुटुंबातूनच पोचतो. घरातील जवळचे नातेवाईक ज्यांच्यावर त्या मुलींचा विश्वास असतो अशांपैकी कोणाच्या तरी वासनेला ती वळी पडते. काका, चुलतभाऊ, मामा असे कोणीतरी सर्व विवेक सोडून हे अघोरी कृत्य करतो. अशा स्थितीत मुलीची फारच गळचेपी होते. बाहेर बोलणे कठीण. काहीवेळा ती आत्महत्येचा प्रयत्न करते किंवा तिला वेड लागते. स्त्रीरोगतज्ज्ञांकडे अशी बरीच उदाहरणे आढळतात. या वयात होणाऱ्या बदलांची योग्य कल्पना आईने मुलीला दिली पाहिजे.
मुलींच्यामुळेच मानवाचे सातत्य टिकून आहे पण त्यांच्या या जननक्षमते- मुळे त्यांचा दर्जा कुटुंबात किंवा समाजात उच्च गणला जात नाही. मुलींवर निर- निराळी दडपणे – बंधने लादली जातात. काही ठिकाणी त्यांचे पाय बांधून ठेवणे, पडदा पद्धती सक्तीची करणे हे चालू असते.
मुलांची वाल्यावस्था व पौगंडावस्था मुलींच्या इतक्या त्रासदायक असत नाहीत. बालपणात व नंतर पण त्यांचे कौतुक होत राहते. घरच्या कामाची त्यांच्या- कडून विशेष अपेक्षा नसते. पितृत्वाचे ट्रेनिंग त्यांना दिलेच पाहिजे असे मानले जात नाही. मुलगा घरचा कर्ता पुरुष होणार या दृष्टीने शिक्षण, आरोग्य व इतर सर्व सोयी त्याला उपलब्ध करून दिल्या जातात. मुलींबाबत होणाऱ्या पक्षपाताची जाणीव या पन्नास वर्षांत वरीच होत आहे. मुलींना शिक्षण, आरोग्य-सेवा, मालमत्तेचा हक्क, नोकऱ्या मिळणे इ. बाबत विविध राज्यांत विविध शासन व्यवस्था पाउले उचलत आहेत. युनिसेफने (United Nations International Children’s Emergency Fund) मुलींच्या विकासाला अग्रक्रम दिलेला आहे. भारत सरकारच्या महिला आणि बालविकास खात्यातर्फे १९९१-९२ साली इंदिरा महिला योजना आखून ११ ते १८ या वयातील पौगंडावस्थेमधील मुलींसाठी आरोग्य केंद्र, पोषक खाद्य, साक्षरता व अनौपचारिक शिक्षण इ. कार्यक्रम राबविले जातात.
ग्रामीण भागातील मुलींना शाळेमध्ये जाऊन औपचारिक शिक्षण घेता येत नाही. अशा मुलींना शिक्षणाचा लाभ व्हावा म्हणून अनौपचारिक शिक्षणाचे कार्यक्रम सुरू करून प्राथमिक शिक्षण दिले जाते. एक लाख लोकसंख्येच्या परिसरात १०० गावांमध्ये टप्प्याटप्प्याने अंशकालीन वर्ग चालवून दोन वर्षांमध्ये प्राथमिक शिक्षण दिले जाते. ही शिक्षणपद्धती अत्यंत सोपी व मनोरंजक ठेवावी लागते. या वर्गातील मुली वाचन लेखन, अंकज्ञान, स्वच्छता, आरोग्य, सामान्य ज्ञान याची क्षमता प्राप्त करू शकतात. या कार्यक्रमाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मान्यता मिळाली आहे. या पद्धतीने काम करणाऱ्या संस्थांना अनुदान पण मिळू शकते. आंध्रप्रदेशात काही ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे. महाराष्ट्र राज्यात मुलींसाठी काही कल्याण- कारक योजना राबविण्यात येत आहेत. शासकीय व निमशासकीय सेवेत मुलींना ३० टक्के आरक्षण, तांत्रिक वैद्यकीय व व्यवसायिक शिक्षणात विशेष आरक्षण, मुलींना
कृषि विषयक शिक्षणाच्या संधी योग्य प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात या हेतूने महाराष्ट्रा- तील सर्वच कृषिविद्यापीठात मुलींसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्याचे धोरण नुकतेच जाहीर झाले आहे. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह, सावित्रीबाई फुले पुरस्कार योजना, या हाती घेण्यात येत आहेत.
मुलीला एक स्वतंत्र व्यक्ती आणि नागरिक समजावे म्हणून परिस्थिती निर्माण करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण पावले टाकली जात आहेत. लहान मुलीचे जीवन रान-गुलाबाच्या रोपासारखे वाटते. त्या रोपास थोडीशी जमीन देऊन पाणी न घालता वाढावे म्हणून ठेवले तर ते उंच न होता बुटकेच वाढेल किंवा वाळून जाईल. प्रौढत्वाकडे जाणाऱ्या भारतीय मुलीचा पहिला जीवनकाल असाच असतो. तिच्या जन्माचे स्वागत नाही हे तिला अप्रत्यक्षपणे जाणविले जाते. पण भावी काळात ही परिस्थिती बदलावीच लागेल. मुलींवर होणारे अत्याचार, तिचा गैरवापर, तिच्याकडे होणारे दुर्लक्ष, तिची कुचंबणा, हे सर्व थांबविणे काळाची गरज आहे. तिच्यावरील सामाजिक व इतर बंधने, दूर करून निवड करण्याची परिस्थिती नाही. त्यातून तिला बाहेर काढले पाहिजे. लोकांच्या दृष्टिकोनात बदल झाल्यास मुलींची कामगिरी जगाला भावी काळात अधिक उपयुक्त ठरेल.
२६१, समर्थनगर, औरंगाबाद – ४३१००१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.