भारतीय शिक्षणपद्धती आणि माहिती-तंत्रज्ञान

आपले जग वेगाने बदलत आहे. विज्ञानाने आपल्याला माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात आणून सोडले आहे. मोठ्या प्रमाणात संगणकांचे उत्पादन झाल्याने ते स्वस्त होणार आहेत. आणि माहिती-महाजालावरील स्थानांसाठी होणाऱ्या स्पर्धेमुळे हे सारेच तंत्रज्ञान सामान्यांनाही ‘परवडणारे’ होणार आहे. इंटरनेट, माहिती- महामार्ग (किंवा महाजाल) आमच्या संकल्पना स्पष्ट करायला मदत करणार आहेत. इंटरनेटमुळे वर्गात वसून शिकवणे येत्या पाच वर्षांत कालबाह्य होणार आहे. अशा रीतीने ज्ञान सर्वांनाच सहज उपलब्ध होणार आहे.
हा ज्ञानाचा स्फोट झेपण्यासाठी उपलब्ध ज्ञानाचा योग्य वापर करता यायला हवा. आपली शिक्षणपद्धती बहुतांशी पाठांतरावर आधारित आहे. यात विद्यार्थ्यांवर फार भार पडतो आणि त्यांची शक्ती व त्यांच्या क्षमता ह्यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. एका ८-१० वर्षांच्या मुलाची ही कविता आपल्या शिक्षण- पद्धतीवर टीका करते
‘दुखरी बोटे, थकले डोळे
माहिती ठासणे तरी न सरे
आणि तेही अजून दमलेल्या मनात’
(The Evening Home work)
हे पाठांतर टाळता आले तर आपल्या शिक्षणाच्या पायातली एक वेडी तुटल्यासारखे होईल. नाहीतर ज्ञान कमावण्यातला, नव्या कल्पना शोधण्यातला आनंद शाळेच्या वयातच अकाली मरण पावतो. नव्या वाटा चोखाळणारी सर्जक भारतीय मुले जर या शिक्षणपद्धतीमुळे नष्ट होत राहिली तर नव्या उदारीकृत विश्वव्यापी अर्थव्यवस्थेतील स्पर्धेत भारतीय लोक टिकू शकणार नाहीत.
आपले अभ्यासक्रम व्यापक व्हायला हवेत. त्यातून वेगवेगळ्या विषयांचा सखोल अभ्यास करणे विद्यार्थ्यांना शक्य होईल. उदाहरणार्थ, संगणक-विज्ञानासाठी नुसत्या अंकपद्धती व बेरजा शिकवून चालणार नाही. वजाबाकी (जी बेरजेच्या विरुद्ध आहे), आणि गुणाकार भागाकार (जे बेरीज-वजाबाकीच्या पुनरावृत्तीतून येतात), हेही शिकवावे लागेल. नाहीतर सध्यासारखी अभ्यासक्रमाची ‘एक ना धड भाराभर चिंध्यां’ची स्थिती घडते.
डॉ. जयंत नारळीकरांनीही अभ्यासक्रमाबाबत विचार व्यक्त केले आहेत. मागच्या वर्षीचे अभ्यासक्रम पाहून त्यांच्यात कायकाय भर टाकता येईल, हेच अभ्यास- क्रम ठरवणाऱ्या समित्या पाहतात. यातून चक्रावून टाकणाऱ्या पाठ्यपुस्तकांच्या सूची घडतात. ही परिस्थिती दयनीय आहे.
माहिती-तंत्रज्ञानाने उपलब्ध झालेल्या प्रचंड ज्ञानसाठ्यासोबत योग्य परीक्षा- पद्धतीही घडायला हव्यात. सध्याची परिस्थिती ठार कालबाह्य आहे. परीक्षापद्धतीने प्रत्येक व्यक्तीची माहितीचा योग्य वापर करण्याची क्षमता तपासायला हवी. यासाठी परीक्षांमध्ये पाठ्यपुस्तके, शब्दकोश, टिपणे इत्यादींच्या वापराला परवानगी असायला हवी. समजा जीवनाबद्दल एखादी कविता पाठ्यपुस्तकात आहे, तर जीवनावरचीच एखादी ‘बाहेरची’ कविता प्रश्नपत्रिकेत असावी. प्रश्न असे असू शकतील अशाच विषयावरील एखादी कविता तुमच्या अभ्यासक्रमात आहे का? तिचे / तिच्या कवीचे नाव काय? तुम्हाला या दोन कवितांपैकी कोणती जास्त आवडली ते सकारण लिहा. तुमचे स्वतःचे अनुभव पद्यबद्ध करा. इ. इ.
डॉ. नारळीकर जेव्हा १९५७ साली उच्चशिक्षणासाठी केंब्रिजला गेले तेव्हाचे त्यांचे अनुभव येथे नोंदणे उद्बोधक ठरेल. त्यांना भारतात शिकलेल्या अनेक कल्पना विसराव्या लागल्या. परीक्षेसाठी ‘निवडक’ अभ्यास करणे, ही अशी एक कल्पना. मागील दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिका तपासणे केंब्रिजमध्ये असंबद्ध होते, जे भारतात अत्यावश्यक मानले जाई. केंब्रिजमध्ये मागे विचारलेला प्रश्न पुन्हा विचारणे असंभाव्य होते. तेथे दर्जाहीन ज्ञानाला स्थान नव्हते. तेथील धोरण असे की नीट ज्ञान कमावून तगा, नाहीतर ‘बुडा’!
आपल्या शिक्षणपद्धतीत मूलभूत बदल करणे अगत्याचे आहे. जी माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते त्यापैकी अर्धी तरी टाळून विद्यार्थ्यांना मनन करण्यासाठी व ज्ञान (स्वतः) शोधण्यासाठी वेळ उपलब्ध करून द्यावा लागेल. यामुळे जी माहिती विद्यार्थ्यांना स्वतः कमवावीशी वाटेल, तिच्यात त्यांना रस उत्पन्न होईल आणि योग्य समजही उत्पन्न होईल.
प्रा. रिचर्ड पी. फाईनमन हा भौतिकशास्त्रज्ञ (अमेरिकेतून) ब्राझीलला एका एंजिनीयरिंग कॉलेजात शिकवायला गेला तेव्हाचे त्याचे अनुभव बरेच काही सांगतात. शिकवले जात होते “दोन वस्तूंवर समान ‘torques’ लावल्या की समान प्रवेश जर उत्पन्न होत असेल, तर त्यांना समान मानावे ” मुले हे सारे लिहून घेत होती. कोणतीही कल्पना चर्चेशिवाय, स्पष्टीकरणाशिवाय, उदाहरणांशिवायच शिकवली जात होती. एखाद्या दाराच्या बाहेरच्या (बिजागऱ्यांपासून दूरच्या) भागावर वजने लावली तर दार उघडणे जड जाते, पण हीच वजने बिजागऱ्यांजवळ लावली तर सोपे जाते, असे काहीही सांगितले जात नव्हते. निरीक्षक म्हणून व्याख्यानाला हजर असलेला फाईनमन वगळता कोणालाही प्राध्यापक काय सांगत आहेत हे कळत नव्हते! पण मुले नोट्स पाठ करून परीक्षा मात्र पास होऊ शकत होती. हे ‘शिक्षण’ नव्हे.
एका भौतिकीच्या प्राथमिक पाठ्यपुस्तकातही फाईनमनला हीच वृत्ती आढळली. प्रायोगिक उदाहरणे कोठेच नव्हती. शिक्षकांचे एक आवडते पुस्तक चाळताना फाईनमनला एक वाक्य आढळले. “स्फटिकांना चुरडताना त्यांतून निघणाऱ्या प्रकाशाला ट्रायबोल्युमिनसन्स म्हणतात”, फाईनमन म्हणतो, “आणि हे विज्ञान आहे ? नाही! तुम्ही एका शब्दाचा अर्थ इतर शब्दांमधून सांगितला आहे. निसर्गाबद्दल तुम्ही काहीही सांगितलेले नाही. कोणते स्फटिक चुरडले जाताना प्रकाश निघतो, का निघतो, असे काहीही नाही. कोणाही विद्यार्थ्यांला ‘हे करून पाहावे’ असे वाटणार नाही. पण जर तुम्ही असे लिहिले”, खडीसाखरेचा खडा अंधारात सांडशीने फोडला तर एक निळसर प्रकाशाची ‘ठिणगी’ दिसते. इतरही काही स्फटिकांचे असे होते, पण असे का होते हे मात्र कोणालाच माहीत नाही. या गुणधर्माला ट्रायबोल्युमिनसन्स म्हणतात, “तर” ?
आपली विज्ञान शिकवण्याची पद्धत दुर्दैवाने ब्राझोलसारखीच आहे का ? आपले विद्यार्थी सूत्रे आणि तत्त्वे पाठ करतात की त्यांमागील विज्ञानाच्या सौंदर्याने मोहित होतात? आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे झाली. या काळात आपण एकही नोबेल विजेता उत्पन्न केला नाही. आपल्या शिक्षणतज्ज्ञांनी आत्मपरीक्षण करायला नको का?
नोबेल विजेता हरगोविंद खोराना म्हणाला, “मी जर भारतात राहिलो असतो तर कारकून झालो असतो”.
आपली परीक्षापद्धती विद्यार्थ्यांचे मोजमाप करतच नाही. आय. आय. टी., यू डी सी टी यांसारख्या आपल्या अग्रगण्य संस्था सर्व परीक्षार्थ्यांसाठी आपले दरवाजे खुले का करीत नाहीत? विद्यार्थ्यांचा यात फायदाच आहे. पदविकाधारक पदव्यां साठी अभ्यास करतील, पदवीधारक आयायट्यांसाठी (1.I.T.). वरच्या पातळीसाठी अभ्यास करण्याने समज जास्त स्पष्ट होते. असे करणे विद्यार्थ्यांना आवडणारे व जीव- घेण्या स्पर्धेपासून वाचवणारे ठरेल. आज थोड्याशा गुणांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्षेत्र नाकारले जाते. शिक्षणाचा पायाभूत हेतू असा हवा की विद्यार्थी ‘मोडण्याऐवजी त्यांच्या संपूर्ण क्षमतांचा वापर करायला शिकावेत.
माहिती-तंत्रज्ञानामुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा झपाट्याने रुंदावत आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रातील संशोधनासाठी अनेकांचा सहभाग आवश्यक होत आहे. एका बारा तेरा वर्षांच्या मुलीच्या काही रक्तवाहिन्या जन्मतःच ‘बंद’ होत्या. पौगंडावस्थेतील वाढ हृदयाला पेलवली नसती. मृत्यू अटळ होता. लंडनस्थित एका पाकिस्तानी हृदय शल्य-विशारदाने शस्त्रक्रियेने रक्तवाहिन्या उघडण्याचे ठरवले. त्याला यासाठी मजबूत, लवचिक, न तुटणारी नळी रक्तवाहिन्यांमध्ये घालावी लागणार होती. धातुशास्त्रज्ञ आणि यंत्रतज्ज्ञ अशी नळी घडवायला आवश्यक होते. सोबतच एक सूक्ष्म कॅमेरा, अडथळा कापणारी गिरमिटासारखी पाती, अडथळ्याचे रूप समजायला पॅथॉलॉजिस्ट, अशा अनेक लोकांना संघटित, एकत्रित प्रयत्न हवा होता. माहिती-तंत्रज्ञानाच्या मदतीनेच हा तज्ज्ञांचा संघ घडवता आला. उत्पादनप्रक्रिया, शेतकी, वैद्यक, क्रीडा, हरेक क्षेत्रात असे अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञांचे सांघिक प्रयत्न हवे असतात. यावरून हे निश्पन्न होते की, विद्यार्थांना सांघिक प्रयत्न. लवचीक पणा आणि चिकित्सक वृत्ती यांमध्ये प्राविण्य संपादावे लागेल.
गेल्या चाळीस वर्षांत शिक्षणपद्धतीत बदलच झालेला नाही. आजही मुले बीजगणित शिकतात, शेक्सपीयर वाचतात, बेडकांचे बिच्छेदन करतात, भाषा शिकतात; इतिहास, भूगोल, रासायनिक सूत्रे वगैरे पाठ करतात. कामाच्या जागी मात्र वेगळीच कौशल्ये – या आवश्यक मानली जातात. संघभावना, विश्लेषक वृत्ती, कसे शिकावे याचे कौशल्य, नवनव्या तंत्रज्ञानाला आत्मसात करण्याचे कौशल्य साऱ्या प्रत्यक्ष व्यवहाराच्या गरजा आहेत ज्यांचा अभ्यासक्रमांत मागमूसही नसतो.
विसावे शतकभर औद्योगिक अर्थव्यवस्थेतील प्रत्येक कामगार एकाच कामात गुंतलेला असे व त्यात कुशल असे. त्याचे कामही (काहीसे) स्वतंत्रपणे केले जात असे, व त्याला या स्वातंत्र्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जात असे. ही सारी कौशल्ये आज (जवळजवळ ‘रातोरात’) कालबाह्य झाली आहेत. आता मोठाल्या यंत्रांवर स्वतंत्रपणे काम करणे पुरणार नाही. आता अशी यंत्रे चालवणाऱ्या संगणकां- साठी सांघिक प्रयत्नातून आज्ञावल्या घडवण्याची गरज आहे.
थोडक्यात म्हणजे स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी व्यक्तींना नवी कौशल्ये, (वाढीव प्रमाणात अंगी बाणवूनच नव्या कार्यस्थळांमध्ये तगता येणार आहे. नवी कार्यस्थळे जास्तजास्त तरल, कमवायला जास्तजास्त अवघड अशा कौशल्यांची गरज उत्पन्न करीत आहेत. बदल ‘झेपणेच’ नव्हे तर बदलांची ‘भूक असणे’ पुढे आवश्यक ठरणार आहे. सोबतच तात्काळ निर्णय घेणे, स्वतःला नवनव्या आव्हानांसाठी प्रवृत्त करणे, यांचीही गरज भारणार आहे.
विसाव्या शतकातले अर्थपुरवठादार कारखाने, खाणी वगैरे वस्तुरूप उपलब्धींसाठी पैसा पुरवीत. एकविसाव्या शतकात कल्पनांना पैसा पुरवतील. माहिती-तंत्रज्ञानाने बिल गेट्सला जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनवले. भारतात इन्फोसिस, विप्रो वगैरेसारख्या कंपन्या ज्या उत्तुंग उंचीवर पोचल्या आहेत तिथे टाटा- बिर्लांची संपदाही पोचू शकत नाही. माहिती-तंत्रज्ञान घडण्याआधी धनिक लोक कल्पक लोकांना नोकरीवर ठेवत व हुकूम देत. आत पैशांच्या थैल्या कल्पक बुद्धी- मागे धावतात. या क्रांतिकारक माहितीयुगाची आव्हाने आपली शिक्षणपद्धती पेलू शकेल काय?
कांचनयश, वेस्ट पार्क रोड,
धंतोली, नागपूर ४४० ०१२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.