प्रिय वाचक

सुधारकात काय यावे आणि काय येऊ नये याबद्दल बरेच वाचक सल्ला देत असतात. अनेक विषयांवर साहित्य आम्हाला हवे असते, परंतु ते हाती येतेच असे नाही. तसेच काही विषयांवर आम्ही जे लिखाण देतो ते अनेकांना स्चत नाही. सर्वांना संतुष्ट राखणे आणि तेही सर्वदा, शक्य नसते. ‘आमच्या प्राचीन धर्मग्रंथांतले शेण तेवढे तुम्हाला दिसते, सोने मात्र दिसत नाही’ असा एका वाचकाने संतापाने टोमणा मारला. त्यावर आम्हाला प्र न इतकाच पडतो की अमुक एक पूर्वमत सोने आहे हे कसे ठरवावे? आणि कोणी? एक साधे उत्तर असे की सोने किंवा शेण ठरविण्याची कसोटी ही शेवटी आपल्या बुद्धीला अनुसरून आपण लावणार. मग नेहमीच बुद्धीने प्रमाणित केलेला निकष स्वीकारायचा की धर्मग्रंथ, पूर्वाचार्य, पूर्वज यांचा हवाला द्यायचा? आम्ही आपल्या अल्पमतीला प्रमाण मानतो. त्यामुळे कधीकधी मोठमोठ्या पंडितांचे साहित्य नाकारावे लागते. याचा अर्थात त्यांना राग येतो. धर्मग्रंथ, शास्त्रे, पुराणे, पूर्वाचार्य, पूर्वज यांचे म्हणणे अनेकदा कालबाह्य झालेले असते. पाराशर-स्मृति घ्या किंवा रघुनंदनासारखे भाष्यकार घ्या, ते स्मृतींचा जो अर्थ लावतात त्यामुळे शतकानुशतके कित्येक बालिकावधू मृत्युमुखी पडल्या आहेत हे आम्ही सांगितले असता, तमुक स्मृतीत पुष्कळ सोन्याचे कण आहेत, अमुक धर्मसिंधूत अमृताचे कुंभ आहेत असे आवेशाने सांगणारे लेखन आमच्याकडे येते. ते आमच्या प्रतिपाद्य मुद्द्याशी असंबद्ध असते. मुद्दा इतकाच असतो की, शास्त्रवचन म्हणून आंधळेपणाने कशाचाही स्वीकार करणे योग्य नाही. आपल्या बुद्धीची, युक्तायुक्ततेची कसोटी लावावी. हा मुद्दा तुम्ही धर्मसिंधूतले किंवा आणखी कोण्या स्मृतीतले अमृतकण वेचून सादर केल्याने खोडला जात नाही.
धर्म बदलत आला, धर्मशास्त्रे बदलत आली, नीतिकल्पना बदलत आल्या. आज अधर्म मानल्या गेलेल्या गोष्टी आपल्या पूर्वजांना धर्म्य वाटत होत्या. उदा. यज्ञीय हिंसा. पूर्वजांनी अधर्म्य समजलेल्या कित्येक गोष्टी आज आपण तशा मानत नाही. उदा. नहाण आलेल्या कुमारिकेला अविवाहित ठेवणे. हे पुराणमताभिमान्यांना पटवून घेणे जड जाते. इतिहास—प्राचीन इतिहास—समाजशास्त्र, धर्मशास्त्र, कायदा यांच्या अंगाने समाजसुधारणेचा विचार होत जातो, असे असता इतिहाससंशोधन हे आ. सु.चे काम आहे काय असा प्र न केला जातो. नीतिकल्पना वज्रलेप नसून स्थलकाल-सापेक्ष आहेत एवढे उमदेपणाने कबूल करणे या मान्यवरांना जड जाते.
मागील अंकात गुस्माहात्म्याचे अतोनात स्तोम हे आपल्या भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण दिसते असे आम्ही म्हटले होते. त्याच्या जोडीला पूर्वज-पूजा हेही दुसरे वैशिष्ट्य ठेवले पाहिजे. संततीच्या जीवितावर पित्याचे स्वामित्व आहे या समजुतीतून अमर्याद पितृनिष्ठा किंवा पितृपूजा हे मूल्य आमच्या संस्कृतीत रुजले आहे. मनुष्य जन्मतःच तीन ऋणे घेऊन येतो. देव-ऋण, पितृ-ऋण आणि आचार्य-ऋण. ही ऋणे फेडणे हे त्याचे कर्तव्य आहे असे भारतीय संस्कृती मानते. आई-वडिलांनी स्वानंदासाठी आपल्याला जन्माला घातलेले का असेना, आपले लालन-पालन केले याबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे आणि त्यांच्याशी प्रेमाने, आदराने वागले पाहिजे यात शंका नाही. त्यांच्या उतारवयात शुश्रूषा करून त्यांचे जीवन सुसह्य केले पाहिजे यातही शंका नाही. पण म्हणून आपल्या पूर्वजांनी पितृपूजेचा जो अतिरेक केला तो समर्थनीय ठरत नाही. जमदग्नीने आपली पत्नी रेणुका हिने व्यभिचार केला म्हणून पुत्र परशुराम याला तिचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. ती त्याने पाळली. दाशरथीरामाने पित्याच्या वचनपूर्तीसाठी राज्यत्याग केला आणि चौदा वर्षे वनवास भोगला. ययातीला हजार वर्षेपर्यंत विषयोपभोग घेता यावेत म्हणून त्याच्या पाच पुत्रांपैकी कनिष्ठ पुत्र पुरू याने हजार वर्षे त्याचे वार्धक्य आणि पंगुत्व स्वतःकडे घेतले. शंतनूला त्याचे मन जडलेल्या स्त्रीशी विवाह करता यावा म्हणून पुत्र देवव्रताने भीष्मप्रतिज्ञा कस्न आजन्म ब्रह्मचर्य व्रत घेतले. या सर्व पितृनिष्ठेच्या गोष्टी आहेत. त्या गतकालीन आहेत, आता असे घडत नाही, असे समजू नये. पितृ-आज्ञा पाळावी या एकाच तत्त्वापायी गेल्या शतकात अनेक सुविद्य पुरुषांनी समाजसुधारणांना नकार दिला. बालविवाह, घटस्फोट किंवा पुनर्विवाह या साध्यासाध्या सुधारणा वडिलांना नापसंत म्हणून लोकांनी नाकारल्या. न्या. महादेव गोविंद रानडे, सुधारणापक्षाचे नेते. त्यांनी वयाच्या ३१ व्या वर्षी केवळ पित्याच्या आज्ञेस्तव ११ वर्षांच्या कुमारिकेशी लग्न केले. एखाद्या प्रौढ बालविधवेशी पुनर्विवाह करण्याची त्यांची सुधारणेच्छा पित्याच्या आज्ञेपुढे त्यांना सोडून द्यावी लागली. पुढे मरेपर्यंत त्यांनी निमूटपणे जननिंदा सोसली. वडील म्हणजे जन्मदाते पिता, आजोबा, काका, मामा आणि पालक किंवा मोठे भाऊ अशा पुरुषांच्या आज्ञेत राहणे म्हणजे पुत्रधर्म किंवा नीती ह्या समजुतीचा आम्ही अतिरेक केला. केवळ वयाने वडील आहेत एवढ्यासाठी आजही क्वचित् अवंद्य लोकांपुढे मान तुकविण्यास सांगितले जाते.
आपले शेजारी राष्ट्र जे पाकिस्तान, तेथे तर घरातल्या वडीलधाऱ्या कर्त्या पुरुषांना न विचारता कन्येने लग्न केले तर तिला प्राण गमावण्याची तयारी ठेवावी लागते. म्हणजे तिच्या या वागणुकीने अपमानित झालेला असा कुणीही वडील पुरुष तिचा जीव घेऊ शकतो आणि या कृत्याबद्दल त्याला न्यायालयाकडून माफी मिळू शकते. जमदग्नीप्रमाणे कोणीही पाकिस्तानी नवरा आजही आपल्या पत्नीने व्यभिचार केला या कारणाने तिचा जीव घ्यायला मोकळा आहे. ती परपुरुषाकडे आकर्षित झाली किंवा तिने नवऱ्याची अवज्ञा केली तर या पातकाबद्दल नवऱ्याने तिला शासन कस्न अनुशासित (discipline) करावे अशी धर्माज्ञा आहे आणि तिचे पाकिस्तानात पालन केले जाते ते न्यायसंगत समजतात. या प्रकारच्या काही घटना आणि त्यांवरील भाष्ये यांचे ज्वलंत चित्रण B.B.C. वरील कार्यक्रमात दि. ९ एप्रिल २००० रोजी आम्ही पाहिले आहे. घराण्याची प्रतिष्ठा किंवा खानदान की इज्जत या नावाखाली वडिलांच्या इच्छेला मान तुकवणे इथपासून तर आपल्या जीवितावर त्यांचे स्वामित्व मान्य करणे इथपर्यंत प्रकार आजही समाजात स्ट आहेत. आम्ही त्यांचे समर्थन करू शकत नाही.
‘तुम्हाला फक्त हिन्दुसमाजच सुधारावयाचा आहे काय’ असाही एक प्र न आमचे धर्मनिष्ठ वाचक आम्हाला विचारत असतात. त्यावर आमचे उत्तर इतकेच की आम्हाला सर्व मानवजातच सुधारायला हवी आहे. पण आमचा आवाज किती कोता आहे याची आम्हाला जाणीव आहे. कोणत्याही सुधारणेप्रमाणे समाजसुधारणेचा आरंभ स्वतःपासून केला पाहिजे असे तत्त्व आहे. त्यामुळे आमचा समाज म्हणजे हिन्दुसमाज सुधारणे हा आमचा अग्रक्रम आहे. तुम्ही स्वतःला हिन्दू तरी मानता काय या उपरोधाने केलेल्या प्र नाला आमचे उत्तर असे आहे की, हिन्दु मुसलमान, ख्रिस्ती इत्यादी भेद व्यवहारसिद्ध आहेत. त्यानुसार हिन्दुसमाज हा आम्हाला आमचा समाज वाटतो.
एवढ्याने आमच्या धर्मनिष्ठ बांधवांचे समाधान होईल अशी आशा वाटते. मात्र खात्री देववत नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.