अमरावतीचा सुधारक-मित्र-मेळावा

अमरावती हे स्वर्गाधीश इंद्राच्या राजधानीचे नाव. ही आठवण राहावी म्हणून तिथल्या कोणा एका छांदिष्ट कलावंताने ‘इंद्रपुरी अमरावती’ या नावाचा चित्रपटही काही वर्षांपूर्वी काढला होता. भूलोकीची अमरावती विदर्भ राजकन्या सक्मिणी हिचे माहेर आहे. या गोष्टीची आठवण ठेवून शहराबाहेर योजनापूर्वक झालेल्या वस्तीला रुक्मिणीनगर असे नावही अमरावतीकरांनी दिलेले आहे. आता ती नवी वस्ती जुनी झाली आहे. आणि तिच्याकडे पाहून विदर्भराजाच्या वैभवाची कल्पना करणे कठीण झाले आहे. पण अमरावतीकर हे आदर्शाचा ध्यास घेणारे आहेत एवढी गोष्ट मात्र कोणालाही कबूल करावे लागेल. उमरावती(उंबरावती) या जुन्या परकोटाने वेढलेल्या शहराबाहेर पहिल्यांदा जेव्हा आखीवरेखीव नवे नगर वसविले गेले तेव्हा त्याला ‘नमुना’ हे नाव अमरावतीकरांनी दिले. हीही गोष्ट त्यांच्या आदर्शपूजनाची द्योतकच आहे.
२० व्या शतकातील व-हाडचे सांस्कृतिक नेतृत्व करणारे अनेक दिग्गज अमरावतीने दिले. लोकमान्य टिळकांचे उजवे हात आणि ‘बरार के नबाब’ असा लौकिक असलेले दादासाहेब खापर्डे अमरावतीचे. त्यांचा नबाबी वाडा आता तुम्हाला धुंडाळून सापडणार नाही. दुकानांच्या ओळींनी त्याला झाकून टाकले आहे. सर मोरोपंत जोशी आणि लेडी यशोदाबाई जोशी एकीकडे मवाळ राजकारण आणि सावध समाजकारण करणारे, तर दुसरीकडे टिळकांच्या उग्र, ज्वलज्जहाल राजकारणाची रणदुंदुभी वाजविणारे वीर वामनराव जोशी हे अमरावतीचेच. ज्ञानकोशकार डॉ. केतकर, म्युझिक डा(यरे)क्टर केशवराव भोळे, मराठी संगीत नाटकाला संजीवनी देणारे विद्याधर गोखले, एखादे व्रत घेतल्यासारखे ‘मी दर्जेदार साहित्यच प्रकाशात आणीन’ असे आपल्या कृतीने दाखविणारे हरिभाऊ मोटे, त्यांचे मित्र आणि आप्त, चित्रपट-दिग्दर्शक आणि नाटककार विश्राम बेडेकर हेही अमरावतीचे. बालवाडी आणि शिशुमंदिर या पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या तज्ज्ञ ताराबाई मोडक आणि कविवर्य मधुकर केचे, गझलकार सुरेश भट अशी खूप-खूप मोठी मंडळी अमरावतीने दिली. राष्ट्रभक्ती हे देवभक्तीचेच रूप आहे असा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी आणि विवेक आणि वैराग्य एकप केलेले संत गाडगेबुवा यांची समाधी अमरा वतीतच आहे. फार काय सांगावे, विदर्भ महाविद्यालय आणि डॉ. पंजाबराव देशमुख हे उच्च शिक्षणाचे व-हाडचे दोन संस्थापुरुष अमरावतीचेच. ह्या सगळ्या रोमांचित करण्याऱ्या परंपरेत यःक िचत का होईना कुठेतरी आपली अशी जागा आहे ही कल्पना मनाला सुखावून जाते. आ. सु.चे संस्थापक-संपादक दि. य. देशपांडे यांची अमरावती ही कर्मभूमी. विदर्भ महाविद्यालयात ते आणि त्यांच्या दिवंगत पत्नी मनूताई नातू हे प्राध्यापक होते. आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ देशपांड्यांनी आ. सु. सुरू केले. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा काल सुवर्णकाल असतो असा जर सिद्धान्त असेल तर आ. सु.च्या या विद्यमान संपादकानेही तो सुवर्णकाल अमरावतीला पाहिला आहे. या सगळ्या किंवा सगळ्या नसल्या तरी बऱ्याचशा गोष्टी कुठेतरी अंतर्मनात असतील म्हणूनच आमचे मित्र प्रा. हरिहर घोंगे त्या सभेत म्हणाले ना की आ. सु. हे तुम्हा आदर्शपूजक अमरावतकरांचे अपत्य आहे. आम्ही नागपूरकरांनी ते दत्तक घेतले आहे. आता आम्ही ते नीट वाढवितो की नाही हे तुम्ही पाहिले पाहिजे. अधूनमधून त्याला अमृताची घुटी दिली पाहिजे
मित्र मेळ्याच्या दिवशी १० आजीव आणि ८ वार्षिक सदस्यांची यादी समारंभाने संपादकांच्या हाती सोपविण्यात आली. एप्रिल म्हणजे काही शरद्-ऋतू नव्हे आणि २ तारखेची दुपार आणि १ ते ५ ही वेळ म्हणजे काही कोजागिरीची रात्र नव्हे तरी एप्रिलच्या २ तारखेला तापमान ४० अंश सेल्सियसवर चढले असताना, दुपारी १ ते ५, या वेळात गणेशदास राठी विद्यालयाचे सभागृह भरले होते. कार्यक्रम ठरल्या वेळी सुरू होऊनही शेवटपर्यंत श्रोत्यांचा आणि वक्त्यांचा उत्साह टवटवीत राहिला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मोतीलालजी राठी, दि. य. दे. आणि मनूताई नातूंचे ऋणानुबंधी. मनूताईंचे ते दोन वर्षे विद्यार्थी आणि पुढे सव्वीस वर्षे कौटुंबिक चिकित्सक राहिलेले. मनूताईंच्या पूर्वविद्यार्थिनी, नंतर सहकारी असलेल्या प्राचार्य डॉ. विजया डबीर आणि प्रा. डॉ. सुशीला पाटील ह्यांनी आपले एक तरुण सहकारी प्रा. अशोक थोरात ह्यांच्या मदतीने हा कार्यक्रम आखला नि यशस्वी केला. डॉ. सुशीला पाटील यांनी समयोचित प्रास्ताविक तर डॉ. डबीरांनी आ. सु.ची आजवरची वाटचाल आपल्या मनोज्ञ शैलीत कथन केली. प्रा. अलका गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रचालन केले.
मनूताई नातू संस्कारक्षम वयात आपल्याला शिक्षक म्हणून लाभल्या हे आपले भाग्य असे मानणाऱ्यांमध्ये या त्यांच्या विद्यार्थ्यांची गणना. आजही निवृत्ती-नंतरच्या परिपक्व वयात हा अभिमान त्यांच्या बोलण्यात कायम. साहजिकच घरचे कार्य समजून त्यांनी हा मित्रमेळावा फुलविला. प्रास्ताविकात अनेक आठवणी बोलत्या झाल्या. तरुण मनूताईंचे सुधारणेचे जे विचार त्यांच्या अंतःकरणात धगधगत ते त्या विद्यार्थ्यांमध्ये परोपरीने संक्रांत करत — कधी विषयाला धस्न तर कधी विषयांतर करून. मनूताईंनी जपलेल्या जीवननिष्ठा त्यांच्या स्मरणार्थ निघालेल्या या मासिकातून अभिव्यक्त होत आहेत या बाबतीत या सर्व वक्त्यांचे एकमत.
विवेकवाद या संकल्पनेत ‘विवेक’ बीजभूत आहे. या शब्दाला संदर्भानुसार वेगवेगळे अर्थ लाभतात. अध्यात्मात नित्य अनित्यवस्तुविवेक, आत्मतत्त्वविवेक असे प्रयोग होतात. ‘सदसद्विवेक’ असाही एक प्रयोग आहे. नैतिक अर्थाचा. जीवन जगताना इष्टानिष्टाचा विवेक ठेवावा हा विवेकवाद आ. सु.चे ब्रीद आहे. मासिकाचे कार्य मनोरंजन नसून बुद्धिचेतन आहे. त्यामुळे ते १० वर्षे टिकून आहे हीही अभिमानाची गोष्ट आहे. वैचारिकता समाजात कमी प्रमाणात फैलावते असे या वक्त्यांना वाटते. गेल्या दहा वर्षांत सुधारकाने इतक्या विविध विषयांना हात घातला आहे की पीएच. डी. च्या विद्यार्थ्यांना त्यातून भरपूर सामग्री मिळू शकेल. हा मेळावा किंवा असे मेळावे विचारमंथनासाठी आहेत. सर्वांनी त्यात मनमोकळेपणाने सामील व्हावे असे आवाहन या आघाडीच्या उभय वक्त्यांनी केले. पुढील वक्त्यांमध्ये संपादक-मंडळातील श्री. दिवाकर मोहनी यांनी प्रास्ताविकातील एका मताचा अनुवाद केला. भाषा आणि लिपी यांच्यामध्ये भाषा स्वाभाविक, पण लिपी कृत्रिम आणि उत्तरकालीन हे जसे, तसे विश्वास आणि श्रद्धा स्वाभाविक; परंतु विचार आणि विवेक हे कृत्रिम आणि प्रयत्नसाध्य असतात. त्यामुळे धर्मप्रसार जितका सहज तितकाच विवेकप्रसार अवघड अशी स्वतःची उपपत्ती सांगितली. ह्या मेळाव्यासाठी संपादक-मंडळातील श्री. नंदा खरे आणि प्र. ब. कुळकर्णी यांनी आ. सु. तर्फे आणि विशेष निमंत्रित म्हणून आ. सु.चे लेखक श्री. घोंगे आणि सौ. सुरेखा बापट यांनी आपले विचार मांडले.
श्री. घोंगे आणि सौ. बापट यांची भूमिका, आ. सु.ची समाजसुधारणेची जी भूमिका तीपेक्षा भिन्न पण दिशा एकच. आपापल्या वाटेने चालणारे आपण सहप्रवासी आहोत असा त्यांचा सूर. प्रारब्ध, योगायोग, ईश्वरेच्छा या भाषेतून सामान्य मनुष्याला संकटकाळी धीर मिळतो. त्यामुळे या संकल्पनांचा उपयोग आहेच, असा त्यांचा भाव होता. परंतु आ. सु.ची भूमिका ही नाही ही गोष्ट संपादक श्री. प्र. ब. कुळकर्णी आणि नंदा खरे यांनी तत्परतेने स्पष्ट केली. प्रारब्ध आणि कर्मसिद्धान्त ‘जे आहे’ त्याचेच समर्थन करतात. ज्यांना समाज सुधारावयाचा आहे त्यांना ही भाषा वर्ण्य आहे. नशीब, पूर्वजन्म, पुनर्जन्म ही भाषा परिवर्तनाच्या कामाची नाही. सुखाचा अधिकार नाकारला गेलेले स्त्री आणि शूद्र हजारो वर्षे समान संधीला वंचित होते. याच भाषेने त्यांना मुके केले. मूढ बनविले. दुःखे दैवजात असतात; मानवाचा पुत्र या जगती पराधीन आहे; ही भाषा आपल्या कामाची नाही. मनुष्याने निर्माण केलेले दुःख निवारायला देव येणार नाहीत. आपल्या चुका आपण निस्तरल्या पाहिजेत हे विवेकवादी तत्त्वज्ञान आहे असे उत्तर आ. सु. तर्फे दिले गेले. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत भेद करा. अंधश्रद्धा वाईट असतील त्यांचा त्याग करा पण श्रद्धा जीवन जगण्यासाठी शक्ती देतात, हे एक मत अशा मेळाव्यात नेहमी पुढे येते. तसे इथेही आले. या बाबतीत अर्थपूर्ण संवाद होण्यासाठी या शब्दांचे अर्थ आधी ठरविले पाहिजेत. ‘श्रद्धा’ या शब्दाचा उपयोग भारतीय वाङ्मयात बराच सैलपणे झाला आहे. जीवनात कशावरही विश्वास न ठेवता जगा असे कुणीही विवेकवादी म्हणत नाही. अनेक विश्वास आणि निष्ठा राखून जगावे लागते. ही गृहीते असतात. त्यांच्या आधारे नीतीची भाषा बोलता येते. विज्ञानेदेखील काही गोष्टी गृहीत धरतात. उदा. निसर्गात सर्वत्र कार्यकारणभाव आहे. आणि निसर्गनियम सर्वदा सर्व ठिकाणी एकसारखे राहतात हे विश्वास आहेत. ती विज्ञानाची गृहीते आहेत. यांना श्रद्धा म्हणणे शक्य आहे, पण आपण नुसता विश्वास किंवा निष्ठा असे म्हणू. आणि निसर्गनियमांची पर्वा न करता अनुकूल पुराव्याची साक्ष न काढता आणि प्रतिकूल पुराव्याला भीक न घालता जे विश्वास बाळगले जातात त्यांना आपण श्रद्धा म्हणू या. ही व्यवस्था मान्य झाल्यास संवाद सोयीचा होईल. मग श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा भेद नाहीसा होईल. श्रद्धावान मनुष्य निसर्गनियमांची पर्वा करीत नाही. असे लक्षात येते. परमानंद-माधवाची किंवा गुस्ची कृपा झाली म्हणजे मुक्याला वाचा फुटते आणि पंगूला हिमालय ओलांडता येतो हे तो अक्षरशः खरे समजतो. काही शब्दांच्या केवळ उच्चारणाने म्हणजे मंत्रजपाने रोग बरे होतात. मेलेल्यांच्या देहात प्रवेश करता येतो, मृताच्या पत्नीबरोबर स्त्रीसौख्याच्या अनुभव घेता येतो. तो देह सोडून पुन्हा पूर्ववत् ब्रह्मचर्याश्रमात प्रविष्ट होता येते. इ.इ. चमत्कार चुटकीसरशी घडून येतात असे श्रद्धावान मानतो. बुद्धी आणि अनुभव यांचा आधार सोडल्यावर मनुष्य कसा वाहवत जाईल याचा नेम उरत नाही. म्हणून ‘विश्वास’ आणि ‘निष्ठा’ ग्राह्य पण ‘श्रद्धा’ म्हणजेच ‘अंधश्रद्धा’ त्याज्य अशी आ. सु.ची भूमिका आहे.
प्राचार्य प. सि. काणे हे दि. य. दे. आणि मनूताई नातू यांचे स्नेही आणि चाहते. त्यांचा प्र न असा की (१) विवेकवाद म्हणजे नेमके काय ते सांगा. Rational scientific approach असा exclusive असू शकतो का? (२) धर्माची अत्युच्च तत्त्वे विवेकाच्या आड येतात का? विवेकानंदासारखे श्रेष्ठ राष्ट्रपुरुष तुमच्या व्याख्येप्रमाणे विवेकवादी होतील का? (३) शब्दांना असणारे अर्थ बरेचदा वाच्यार्थाने ग्राह्य नसतात. All man are born equal या वाक्यात सर्व मनुष्ये खरोखर जन्मतः सारखी आहेत असा अर्थ नसून त्यांना सारखे मानावे असा भाव आहे. विज्ञान प्रयोगशाळेतील पडताळणी महत्त्वाची मानते. परंतु Deep penetration of human cousciousness into existence हे शक्य आहे. Existence च्या realities काय आहेत ते वैज्ञानिक प्रयोगशाळेत न जाता कळू शकते. मला धर्म, श्रद्धा आणि विवेकवाद सारखेच ग्राह्य आहेत. श्रद्धा, भावना आणि बुद्धी यांच्यात विसंवाद असण्याचे कारण नाही. असे मत त्यांनी मांडले. मूर्तिजापूर येथील प्राचार्य तिडके यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा एकच आहेत हे सांगून भावनेवरही मनुष्य जगतो, तुकडोजी महाराज आणि गाडगेमहाराज धार्मिक संत असले तरी ते आपले प्रबोधनकार म्हणून स्वीकार्य आहेत असा विचार मांडला.
आ. सु.च्या संपादक-मंडळातील भूतपूर्व सदस्य प्रा. गोखले ह्यांनी श्रद्धा आणि विश्वास ही विभागणी अमान्य केली. आणि विवेकवाद म्हणजे आ. सु. सांगतो तो की खरोखरचा असा प्र न विचारला. या आणि अशा अनेक प्र नांना अनुलक्षून आ. सु. तर्फे सांगण्यात आले की इथे आम्ही उत्तरे देतो ती त्रोटक आहेत, तात्पुरती आहेत हे लक्षात घ्यावे. उपस्थित केलेले प्र न महत्त्वाचे आहेत, त्यांचे वि लेषण करून त्यांना विस्तृत उत्तरे आ. सु.मधून देण्यात येतील.
डॉ. राठींनी अध्यक्षीय भाषणात या चर्चासत्राचा चटकदार समारोप केला. प्रत्यक्ष व्यवहारात रुणाशी वागताना आणि उपचार करताना विवेकवादी भूमिकेला कसे अडथळे येतात याचा उल्लेख त्यांनी समारोपात केला. प्रा. अशोक थोरात ह्यांनी उपस्थितांचे, आयोजकांचे आणि पाहुण्यांचे आभार मानले. उपस्थितांमध्ये अमरा-वतीच्या समाजजीवनात आणि शिक्षणक्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर होते. त्यांत श्री. बबनराव मेटकर होते, श्री. बाबा मोहोड होते, अक्षरवैदर्भीचे संपादक डॉ. सुभाष सावरकर, प्रा. डॉ. नरेशचंद्र येथील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक श्री. ई. पी. डोंगरे हे होते. गणेशदास राठी विद्यालयाचे प्राचार्य श्रीराव यांचे सर्वतोपरी सहकार्य मिळाले म्हणूनच हा कार्यक्रम इतका यशस्वी होऊ शकला. सभेचे अध्यक्ष डॉ. राठी हे या संस्थेचेही अध्यक्ष आहेत त्यांचे आभार मानणे म्हणजे आम्ही आमचेच आभार मानणे होईल. ज्या मान्यवरांचा उल्लेख प्रस्तुत वृत्तान्तात नाही त्यांनी क्षमा करावी. प्रस्तुत निवेदकाची स्मरणशक्ती चुकली एवढाच त्याचा अर्थ.
ता. क. ही सभा संपल्यावर सभास्थानीच, श्री. किशोर फुले, डॉ. मनीषा जाधव, श्री. राजीव खिराडे व प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी आ. सु.ची सदस्यता घेतली, वाचक-मेळावा बराच प्रेरणादायी झाला असे यावरून म्हणता येईल.
१६, शांतिविहार, सिव्हिल लाईन्स, नागपूर — ४४० ००१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.