बॉम्बिंग बॉम्बे

(‘इंटरनॅशनल फिजिशियन्स फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ न्यूक्लियर वॉर (IPPMW)”, या नोबेल शांतिपुरस्काराने गौरवित संस्थेने प्रकाशित केलेल्या बॉम्बिंग बॉम्बे या एम. व्ही. रमण यांच्या पुस्तकाचा हा सारांश आहे.)
आपण कल्पनेने मुंबईवर एक हिरोशिमावर टाकला गेला होता तसा बॉम्ब टाकू. स्थळ असेल हुतात्मा चौकाच्या वर सहाशे मीटर. यात हुतात्मा चौकाचे ‘भावनिक’ महत्त्व आहे. नुसतीच माणसे मारायची झाली तर हा बॉम्ब चेंबूरजवळ टाकणे जास्त परिणामकारक ठरेल.
आपला बॉम्ब पंधरा किलोटन क्षमतेचाच फक्त आहे, म्हणजे पंधरा हजार टन टीएनटी या स्फोटकाएवढ्या संहारकतेचा. मध्यम आकाराचे हायड्रोजन बॉम्बही आजकाल याच्या दसपट विध्वंसकतेचे असतात.
आपण जमिनीच्या तीनेक फांग उंचीवर बॉम्बचा स्फोट घडवणार आहोत, हा मुंबईकरांवर उपकारच म्हणायचा. जर हाच बॉम्ब जमिनीवर उडवला तर आपण सहजपणे चोवीस वर्ग किलोमीटर भागातली माणसे मास्न वर तो भूभाग काही शतकांसाठी जीवसृष्टीला अयोग्य करू शकू. यामुळे ‘उंच’ स्फोटापेक्षा पावणे-तीन लाखांपासून ते बारा लाखांपर्यंत जास्त माणसे मरतील. आपला उंचीवरचा स्फोट या २.७५ ते १२ लाखांना अभय देत आहे.
आपण स्फोट घडवू त्यामुळे स्फोटाच्या केंद्राजवळील हवेचा दाब अपार वाढेल. या दाबाची एक लाट चहूबाजूंना अपार वेगाने पसरेल. या दाबाने दगड-विटांनी बांधलेली घरे पडतील. काँक्रीटच्या सांगाड्यांमध्ये वीटकाम असलेल्या इमारतींमधील भिंती पडतील. दाबाच्या लत्ताप्रहाराने विजेचे खांब, लोखंडी कपाटे, पाईप वगैरे वस्तू भिरकावल्या जातील. त्यांच्या वाटेत येणारी माणसे तगणार नाहीत. हा भुईसपाट करणारा दाब हुतात्मा चौकाच्या सर्व बाजूंना सुमारे अकराशे मीटरपर्यंत कार्यरत असेल. कुलाब्यापासून बोरीबंदर स्थानकापर्यंतचा मुंबईचा ‘आसिंधुसिंधु’ भाग नष्ट होईल. या टप्प्याबाहेरही दाबाचा परिणाम जाणवेल, पण तो इतक्या कार्यक्षमतेचा नसेल. आजच बाँबस्फोटांशिवाय मुंबईत दरवर्षी सव्वातीनशे इमा-रती पडतात. आपण या पडझडीला एक धक्का देऊ. स्फोटाच्या पूर्वेला आणि प िचमेला दाबाचा बराचसा परिणाम समुद्रावर ‘वाया’ जाईल, पण त्याला आपला नाइलाज असेल.
स्फोटाच्या जागेपासून सुमारे साडेसोळाशे मीटरांपर्यंतची सर्व माणसे दाहाच्या तीव्रतेने भाजून निघतील. हे ‘तिसऱ्या दर्जाचे’ (Third Degree) भाजणे असेल. क्षणार्धात जर शरीराचा वीसेक टक्के भाग तिसऱ्या दर्जाला भाजला गेला तर हा धक्का सहन न होऊन माणसे मरतात. एका अर्थी अशी ‘तात्काळ’ मरणारी माणसे सुखी असतील, कारण न मरणाऱ्यांना अपार वेदना होतील, व मरण टळण्या-चीही खात्री नसेल. या साडेसोळाशे मीटर अंतरातल्या इमारती नष्ट किंवा नष्टप्राय झालेल्या असतील, त्यामुळे माणसांना त्यांचे संरक्षण मिळणार नाही.
या वर्तुळाबाहेरची पाचेकशे मीटरांची पट्टी (स्फोटाच्या जागेपासून एक-वीसशे पन्नास मीटर) जरा कमी गरम असेल. या पट्टीतील माणसांना दुसऱ्याच दर्जाचे भाजणे (Second Degree Burns) भोगावे लागेल. या दर्जाच्या भाजण्या-तूनही मृत्यू ओढवू शकतो. अशा भाजण्याच्या जखमा तज्ज्ञ डॉक्टराच्या देखरेखी-खाली आणि पूर्णपणे निर्जंतुक वातावरणातच बऱ्या होऊ शकतात, व यालाही कित्येक आठवडे जावे लागतात.
पंचावन्न वर्षांपूर्वीच्या हिरोशिमापेक्षा आजची मुंबई अनेक अर्थांनी स्फोटक आहे. पेट्रोल-डीझेल वाहने जास्त ‘दाट’ आहेत. घरोघरी गॅसची सिलिंडर्स आहेत. गल्लोगल्ली कायदेशीर-बेकायदेशीर रसायनांचे कारखाने व गोदामे आहेत. जेव्हा स्फोटाचा अग्निगोल पसस्न विरेल, तेव्हा हे सर्व रसायनांचे आणि ज्वालाग्रही पदार्थांचे साठे ‘उपस्फोट’ घडवून आणतील. कागद, कापड, लाकूड, प्लास्टिक,रस्त्यांवरचे डांबर वगैरे सारे पेट घेईल. आपल्या एकवीसशे पन्नास मीटर त्रिज्येच्या वर्तुळात अक्षरशः आगडोंब उसळेल. ही आग भस्मासुरासारखी आजूबाजूच्या अनेक किलोमीटरांमधली हवा शोषून घेईल. स्फोटाच्या जागेकडे झंझावाती वारे वाहू लागतील. मूळ स्फोटाने जायबंदी झालेल्या इमारती कोलमडतील. प्रचंड भूभागावर ऑक्सिजनचे ‘दुर्भिक्ष’ उत्पन्न होईल. हिरोशिमा स्फोटानंतर मैलभर उंचीवरच्या विमानां-मध्ये ऑक्सिजन-मुखवटे वापरावे लागले होते. जे उंचीवर होईल ते दूरवरही होईल.
मुंबईजवळ अनेक रासायनिक कारखाने आहेत. तुर्भे व तारापूर येथे आण्विक ऊर्जा उत्पादन करणारी आणि संशोधन करणारी संस्थाने आहेत. यांच्यावर हे स्फोटाचे धक्के, आगडोंब व झंझावात काय परिणाम करतील, हे सांगणे शक्य आहे, जरी त्यात गणिती नेमकेपणा नाही. अनेक जखमी व भाजलेले लोक, बेघर, बेसहारा झालेले, मदतीसाठी आक्रोश करतील. पण याच वेळी प्रशासन कोलमडलेले असेल.
कुलाबा ते बोरीबंदर या भूभागात मंत्रालय येते. विधानसभा येते. अनेक मंत्र्यांची व उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांची घरे येतात. टाटा, बिर्ला, रिलायन्स अशा औद्योगिक दिग्गजांची मुख्यालये येतात. स्टॉक मार्केट व रिझर्व बँक येतात. मुंबई बंदराचा खूपसा भाग येतो. मध्य व प िचम रेल्वेची कार्यालये येतात. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे मुख्यालय येते. अनेकानेक बँका व विमा कंपन्यांची मुख्यालये येतात. प्रिन्स ऑफ वेल्स व बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी यांची संग्रहालये येतात. जहांगीर व कावसजी जहांगीर कलादालने येतात. मुंबई उच्च न्यायालय येते. रॉयल एशियाटिक सोसायटी, मुंबई विश्वविद्यालय वगैरेची ग्रंथालये येतात. . . चिल्लरखुर्दा तर किती येतो याची गणतीच नाही. पानिपताचीच आवृत्ती, ही!
रेल्वे, वीज, पाणी, बस सेवा, सारे क्षणार्धात कोलमडेल. एकदोन महत्त्वाची इस्पितळे नष्ट होतील. इतर इस्पितळे सणांच्या ओझ्याने कोलमडतील. एकूण प्राणहानीचे आकडे पावणे दोन लाखांपासून पावणे नऊ लाखांपर्यंत अपेक्षित आहेत. यात किरणोत्सारी द्रव्यांचा प्रसार, त्यातून पुढे अनेक वर्षे उद्भवत राहणारे हाडांचे, रक्ताचे, थायरॉईडचे व फुफुसांचे कर्करोग नाहीत. सापाचे डोके ठेचल्यावरही शरीर बराच वेळ आंचके देत राहते. मुंबई शहर हा परिणामही भोगेल. महाराष्ट्र राज्य व भारत देशही हे परिणाम भोगेल. या महामारीचे मानसिक परिणामही नंतर शेपन्नास वर्षे सुट्या नागरिकांमध्ये व शासकीय धोरणांमध्ये विकृती घडवत राहतील. आणि हे सारे अण्विक अश्मयुगातल्या पंधरा किलोटन अस्त्राने घडेल. याच्या दसपट आणि शतपट क्षमतेचे हायड्रोजन-बाँब्ज आज हजारांनी उपलब्ध आहेत.
मुंबईबाबत जे खरे आहे तेच कमी जास्त प्रमाणात दिल्ली, कलकत्ता, लाहोर, कराची, ढाका या सर्व शहरांबाबतही खरे आहे. या शहरांमध्येही अण्वस्त्रांनी याच प्रमाणात मृत्यू घडतील आणि त्या त्या प्रांताचे व देशांचे प्रशासन जायबंदी होईल.
राष्ट्रीय ‘अस्मिते’साठी अशा किमती मोजण्याची वा मागण्याची मानसिक तयारी मानवतेशी कितपत सुसंगत आहे?
१९३, शिवाजीनगर, मश्रूवाला मार्ग, नागपूर — ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.