प्रिय वाचक

प्रिय वाचक
आपल्या प्राचीन संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगताना गुस्माहात्म्य आणि पूर्वज-पूजा यांचा उल्लेख या आधी आम्ही केला. शुद्धीचे अतोनात स्तोम हे असेच एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. चित्तशुद्धीशिवाय ब्रह्मज्ञान नाही. देहशुद्धीशिवाय चित्तशुद्धी नाही अन्नशुद्धीशिवाय देहशुद्धी नाही. या अन्नशुद्धीच्या समजुतीत पोषक आहाराच्या शास्त्रीय चिकित्सेपेक्षा कल्पनारम्य भागच अधिक. उदा. अन्न शिजवणाऱ्याची तन-शुद्धी, पावित्र्य फार महत्त्वाचे. त्यासाठी त्याची जात तुमच्याइतकी किंवा जास्त शुद्ध हवी, काम शुद्ध हवे. जितके जास्त मेहनतीचे काम तुम्ही करता तेवढी तुमची जात खालची, कमी शुद्ध. म्हणून वरच्या जातीच्यांनी खालच्या जातीच्या हातचे अन्न भक्षण करू नये हा संकेत. सार्वजनिक आणि सार्वत्रिक स्वच्छतेचे काम करणारे सर्वांत अशुद्ध. ब्राह्मण स्त्रीला शूद्र पुरुषापासून झालेली संतती म्हणजे चांडाळ ही जात. ती जन्मानेच अस्पृश्य. चुकून स्पर्श झाला तरी सचैल स्नान करणे आवश्यक. खान पानातली ही आध्यात्मिक शुद्धीची कल्पना आम्ही पराकोटीला नेली. तिच्यामुळे धर्मनिष्ठ कर्मठ हिंदूंना प्रवास म्हणजे संकट होऊन बसले. आगगाडी सुरू झाली तेव्हा प्रवासात कोणाचाही स्पर्श होणार, अन्न-पाणी विटाळणार म्हणून ब्राह्मणांसाठी वेगळा डबा असावा अशी मागणी करण्यात आली होती. ईस्ट इंडिया कंपनीने ती झिडकारली ही गोष्ट वेगळी. पण शुद्धीच्या कल्पनेपायी आम्ही कोणत्या टोकापर्यंत जाऊ शकतो ह्याचे हे एक उदाहरण. समुद्रपर्यटनाला बंदी आली तिच्यामागे हा अतिरेकी अन्न-शुद्धीचा आग्रह असणार. देहशुद्धी राखता येणार नाही, असंगाशी संग होणार, हीच अडचण असली पाहिजे. पंडित मदन मोहन मालवीय इंग्लंडच्या प्रवासाला तर गेले पण जहाजात आणि विलायतेतील वास्तव्यात पुरेल इतके गंगाजलाचे पिंप घेऊन गेले होते. इतकेच काय शौचविधीनंतर हात धुण्यासाठी गंगाकिनारीची मातीही न्यायला ते विसरले नव्हते म्हणतात. ह्या गोष्टी जुन्यापुराण्या झाल्या, आता तसे लोक उरले नाहीत असे कोणी समजू नये. पंडित–फिलॉसॉफर–प्रॉजेक्ट नामक एका प्रकल्पात सहभागी होताना आम्हाला १९८७ साली बंगलोरला असे धर्मनिष्ठ शास्त्रीपंडित आढळले की जे घर सोडल्यावर स्वतःचा स्वयंपाक तर स्वतः करतातच पण नळाचे पाणी देखील वापरत नाहीत. जलाशयातून आपल्यापर्यंत पोचताना न जाणो कोणा कोणाचा स्पर्श त्याला झाला असेल? विहिरीतून स्वहस्ते पाणी शेंदून त्या जलाने स्वयंपाकसिद्धि करणाऱ्या या पंडितवर्यांच्या प्रवासाला किती मर्यादा पडत असतील याची कल्पना करावी. अन्न हे एक ब्रह्म, ते मुळात शुद्ध. त्यातून त्यावर मंत्रोच्चारांनी जलसिंचन केले असता त्याला लाभलेली शुद्धी कोणा हीन जातीच्या शूद्राच्या स्पर्शाने विटाळावीच कशी हा प्र न काही या कर्मठ धर्मनिष्ठांना पडत नाही.
अन्नशुद्धीइतकेच महत्त्व रक्तशुद्धीला. पुन्हा तेथेही शास्त्रीय — जीवशास्त्रीय दृष्टी नाही. पापपुण्याच्या कल्पनांचाच सगळा प्रभाव. वंशशुद्धी राखली नाही तर पूर्वजांना सद्गती लाभणार नाही. ते नरकात जातील. म्हणून वर्णसंकर–जातिसंकट-वर्ण्य. समुद्रपर्यटनाच्या बंदीमागे असली शुद्धी राखता येणार नाही ही धास्ती असलीच पाहिजे. कुलस्त्री, योनिशुचिता या संकल्पना हजारो वर्षे कुरवाळत बसणाऱ्या आमच्या पूर्वजांना त्यांच्या पावित्र्याच्या कल्पना आणि रोटी–बेटी व्यवहाराच्या बंद्या धुडकावून लावणाऱ्या यवनांनी, म्लेंच्छांनी आम्हाला नमविले, हजार वर्षे दास बनविले, आमच्यावर राज्य केले ते कसे, याचे उत्तर या रक्त–वंशशुद्धीच्या पाठिराख्यांनी दिले पाहिजे. नासिकच्या आ. सु. मित्र–मेळ्याचा वृत्तान्त या अंकात आहे. वृत्तसंकलनात थोडाबहुत विस्कळितपणा आढळला तरी सर्वांना मांडलेल्या विचारांना त्यात जागा दिली आहे हे लक्षात येईल. श्रद्धावाद्यांनी, ऐहिक अध्यात्मवाद्यांनी व्यवस्थित निबंध लिहायचे कबूल केले आहे. यथावकाश ते प्रसिद्ध होतील. आगरकरी विवेकवादाच्या पुरस्कर्त्या श्रीमती शकुन्तला परांजपे गेल्या महिन्यात निधन पावल्या. त्या ९४ वर्षांचे विविधांगी जीवन जगल्या. शरीर जराजर्जर झाल्यावर आणि स्वतःला किंवा दुसऱ्या कोणालाही ते सुखकारक राहिले नसता त्यांचा अंत झाला तर त्याचे दुःख मानावे काय? ब्रह्मदेशात देहपातानंतर आनंदोत्सव मानतात तो का? आध्यात्मिक कारणमीमांसा नसेल तर ही रीत अंतर्मुख व्हायला लावते. खूप दीर्घायुषी कर्तृत्ववान व्यक्तींच्या निधनाने समाजाची हानी झाली असे म्हणायची रीत आहे. हा खरे म्हणजे एक उपचार असतो. त्यांचे ऋण जरूर मानावे पण जाण्याचा शोक करू नये ही एक विवेकाची गोष्ट वाटते.
आपला प्र. ब. कुळकर्णी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.