बाळ : एक अज्ञातवासी ज्ञानोपासक

लहान मुलांना टी. व्ही.वरचा WWF म्हणून कार्यक्रम आहे, तो फार आवडतो. ज्यांना कोणाला तरी ठोकून काढायची इच्छा असते पण शक्य नसते अशी ही मुले असतात बहुधा. ज्ञानाच्या क्षेत्रात पुष्कळ तथाकथित मल्ल ठोकून काढायच्या लायकीचे आहेत, किंबहुना अशांचीच संख्या जास्त आहे. त्यांना सर्वांसमोर एक्स्पोज केले पाहिजे ही बाळची एक ख्वाईश होती. अधून मधून विद्येचे असे स्वयंमन्य दिग्गज समर्थ ज्ञानोपासकांकडून चीत झालेले पाहिले की बाळला फार आनंद होत असे. त्याने स्वतःही क्वचित् संधी आली असता अशा तोतयांचे पितळ उघडे पाडले आहे. पण एकूणच असे प्रसंग त्याला कमी आले. तो अजून जगता तर त्याच्या हातून पुष्कळ पराक्रम व्हायचा होता तो राहून गेला, याची हळहळ आम्हा त्याच्या जवळच्या वर्तुळातल्या सहकाऱ्यांना वाटते. कारण त्याच्या दीर्घ ज्ञानोपासनेचे आम्ही साक्षी आहोत.
भरताचे नाव माझ्या मनात दोन गुणांशी निगडित आहे. मोठ्या भावावर अकृत्रिम प्रेम आणि कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेली सेवा. बाळमध्ये मला असा भरत दिसत होता. तो ज्ञानव्रती होता. सेवाभाव सदैव जागा असलेला भरत होता आणि वस्न अज्ञातवासी होता. प्रसिद्धीपासून दूर होता. गेल्या मे महिन्याच्या २ तारखेला निधन पावलेल्या डॉ. बाळकृष्ण यशवंत देशपांडे उर्फ बाळ याच्या कर्तृत्वाचे मला दिसलेले अपुरे चित्र मी शब्दांत पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. या चित्रामध्ये मोठी रंगसंगती साधलेली असूनही ते पुरेसे उजेडात आले नाही अशी माझी खंत आहे. त्याच्या जवळचा एक सहकारी म्हणून, सोबती म्हणून.
त्याची माझी सोबत पुष्कळ जुनी होती, जवळची होती. आजचा सुधारक या आमच्या सध्याच्या मासिक उपक्रमात आम्ही सह-संपादक होतो ही तर आताची या गेल्या १० वर्षांतली गोष्ट झाली. आम्ही नोकरीही पुष्कळशी एका कॉलेजात केली. एकाच विषयाचे अध्यापन केले. इतकेच काय एम्. ए. च्या परीक्षाही बरोबरच उतरलो. तेथेही मी त्याच्या जवळच उभा होतो. तो पहिला होता. आम्ही तत्त्वज्ञानाचे धडेही एकाच ज्ञानसाधकापाशी घेतलेले होते. त्याचे पितृतुल्य ज्येष्ठ भ्राते प्राध्यापक दि. य. देशपांडे यांच्यापाशी.
माणसाला परिस्थितीचा फायदा मिळतो तसा तोटाही सहन करावा लागतो. काय कमी अन् काय जास्त हे आपण पुढे लाभत गेलेल्या यशावरून किंवा अपयशावरून मोजतो.
आमचा विषय तत्त्वज्ञान. तर्कशास्त्र अन् तत्त्वज्ञान. हा विषय काही लोकप्रिय नाही. लोकप्रसिद्धही नाही. लोकोपयोगीही नाही. लोकभावनांना व्यक्तिगत पातळीवर साहित्य साद घालते. सामूहिक स्तरावर इतिहासाने लोकभावना चेतवते. तर्कशास्त्राचे त्याच्या उलट आहे. तेथे भावनांना वाव नाही. अर्थशास्त्र-वाणिज्यादि विषयांना आपापली व्यवहारोपयोगिता आहे. तत्त्वज्ञानाजवळ तसे काही नाही. धर्म–संतसाहित्य शांतीचे, ऐहिक नि पारमार्थिक शांतीचे, अभयाचे आश्वासन देते. तत्त्वज्ञान अस्वस्थ, साशंक, सावध करते. जनसामान्यांच्या दृष्टीला त्याचे आकर्षण नसते आणि हे स्वाभाविक आहे. पा चात्त्य तत्त्वज्ञानात, ज्ञान व्यवहारोपयोगी असणे हा त्याला बट्टा मानला आहे. भारतीय तत्त्वज्ञान मोक्षाचा उपाय म्हणून आपली ओळख जाहीर करते याबद्दल पा चात्त्य तत्त्वज्ञ त्याला दूषण देतात. ज्ञानासाठी ज्ञान हा तत्त्वज्ञान-पंथ आहे. ज्ञान म्हणजे सत्यज्ञान. अर्थातच सत्याचे ज्ञान. असत्याला ज्ञान नाहीत म्हणत. सत्य आणि सत्ये यांचेबद्दल, उपयोग काय, हा प्र न अनुपपन्न आहे. सत्य, सत्य आहे हेच त्याचे मोल. तत्त्वज्ञान म्हणजे सत्याचे ज्ञान. सत्यांचे ज्ञान. खोल खोल अशा मूलगामी, मूलभूत सत्यांचे ज्ञान. ते कशासाठी, हा प्र न विचारायचा नाही. ही विचारसरणी पा चात्त्य जगात प्रतिष्ठित झालेली आहे. बाळचे मोठे बंधू प्रोफेसर दि. य. देशपांडे पा चात्त्य तत्त्वज्ञानाचे आजन्म साधक. त्यांच्यामुळे बाळ आणि त्यांच्या संगतीत माझ्या मगदुराप्रमाणे मी, गोखले अशी आमची मित्रावळ गोवली गेली. बाळला दि. यं.चा भाऊ, खूप लहान भाऊ, बावीस वर्षांनी लहान भाऊ असण्याचा, अहर्निश सान्निध्याचा साहजिकच सर्वांत अधिक लाभ झाला याबद्दल तो आमचा हेवाविषय होता.
आधुनिक पा चात्त्य तत्त्वज्ञान गणिताने, गणितीपद्धतीने प्रभावित झालेले आहे. विचारात वि लेषण, सूक्ष्मातले सूक्ष्म भेद करता येणे हे त्याचे एक वैशिष्ट्य. काय सिद्ध होते नि काय असिद्ध राहते याबद्दल कडक कसोट्या. प्रतिपादन नेटके, चोख भाषेत हवे. शब्दयोजना मोजून मापून केलेली, मार्मिक, विस्तारदोषरहित, लाघव-गुणाने युक्त, मिताक्षरी असावी. प्रा. दि. य. यांचे हे आदर्श, उग्र ज्ञानव्रताचे निकष आपोआप बा. य. यांचेकरिताही ठरलेला रस्ता होऊन गेले. बाळने तर्कशास्त्राच्या एक दोन ग्रंथांचे केलेले परीक्षण या क्षेत्रातल्या जाणकारांची दाद घेऊन गेले. पण या पद्धतीने तुम्हाला शत्रू अधिक होतात. तुम्हाला कशाचीच घाई नाही म्हणून घाईघाईने पुढे धावणाऱ्यांना तुमचा राग येतो. बसा तुम्ही शब्द निवडत, कीस काढत, आम्हाला कशाला मागे ओढता? असा चडफडाट !
बाळ आणि मी एम्. ए. बरोबर झालो खरे, पण मी नोकरीला लागलो. रमलो. बाळ शान्तिनिकेतनला गेला. विश्वभारती विद्यापीठात त्याने ४ वर्षे उच्चतर तर्कशास्त्राचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तेथे तो पुष्कळ शिकला. जर्मन शिकला. मोठ्या भावाने स्वप्रयत्नाने जर्मन भाषाज्ञान संपादिले होते. इंग्रजी हे पा चात्त्य तत्त्वज्ञानाचे महाद्वार खरे पण अंतर्गत दालनांमध्ये प्रवेश पाहिजे असेल तर जर्मन आले पाहिजे. वडील भावाकडे नसलेले आणिक एक तत्त्वज्ञानातले उपयोगी उपकरण म्हणजे गणित, ते त्याने बी. ए.लाच एक विषय म्हणून आत्मसात केले होते. बाळ मेधावी होता. मॅट्रिकला शिकलेले संस्कृत त्याने पक्के स्मरणात ठेवले होते. पुढे आम्ही बरोबर न्यायशास्त्र शिकलो ते संस्कृत माध्यमातून, शास्त्री पंडितांकडून. ते ऐकताना शिकलेल्या व्याकरणाची त्याची उपस्थिती बिनचूक असे. याप्रमाणे तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला म्हणजे आत्मसंस्थेला आवश्यक ती ज्ञानग्रहणसामग्री, संस्कृत, इंग्रजी, जर्मन ह्या भाषांमध्ये आणि गणितामध्ये गती त्याने संपादन केलेली होती. आत्म-संस्थेची किंमत अभिव्यक्ति-सामर्थ्याशिवाय कशी होणार? विचार वर दिलेल्या मिताक्षरा शैलीने व्यक्त करण्यासाठी मराठी–इंग्रजी भाषांवर त्याने लक्षणीय प्रभुत्व तर मिळविलेच होते. बंगालमधल्या ४ वर्षांच्या वास्तव्यामुळे भाषाप्रेमी बाळ बंगाली, मातृभाषेइतक्या सफाईने न बोलता तरच नवल! विश्वभारतीत त्याने वि लेषक तत्त्वज्ञान, (Analytic Philosophy) भाषिक तत्त्वज्ञान (Linguistic Philosophy) आणि सांकेतिक तर्कशास्त्र (Symbolic Logic) या विषयांमध्ये डॉ. शिबजीवन भट्टाचार्य, डॉक्टर सुंदरराजन, प्रोफेसर धर्मेंद्रकुमार या भारतीय कीर्तीच्या तत्त्व-ज्ञानातल्या महापंडितांकडून धडे घेतले. पुढे महाराष्ट्रात परतल्यावर, जवळजवळ १० वर्षे खपून तयार केलेला The Concept of Necessity हा आपला प्रबंध सादर करून त्याने पीएच. डी. संपादन केली. पा चात्त्य तार्किक युक्तिवादात प्राणभूत संकल्पना म्हणजे ‘अनिवार्यता’ (Necessity). देकार्त, लाइब्निझ, कांट, ह्यूम यांसारख्या युगप्रवर्तक तत्त्वज्ञांच्या लिखाणात अनिवार्यता ही संकल्पना कसकशी बदलत गेली याचा तो महत्त्वाचा अभ्यास होता. मोठमोठ्या, शास्त्रीय संगीत-महर्षीबद्दल आपण ऐकतो की त्यांची संगीत-साधना कधी संपतच नाही. तसेच ज्ञानसाधनेचेही आहे. अभिव्यक्ती थोडी आणि प्रासंगिक, पण उपासना अखंड आणि आजन्म. कडक आदर्श ठेवल्यामुळे बाळकडून तर्कशास्त्राच्या विद्यार्थ्यांना उपयोगी होईल असा एकच ग्रंथ निर्माण झाला. तोही आम्हा मित्र-मंडळींच्या आग्रहामुळे.
पण कडक दंडक, उंच आदर्श ह्याशिवाय आणखीही एका कारणाने त्याच्या हातून संपादित साधनेच्या मानाने व्हावी तशी ग्रंथ-निर्मिती होऊ शकली नाही. ते कारण म्हणजे त्याचा सेवाभाव. आई-वडिलांचे उतारवयातील अपत्य म्हणून त्यांची माया, छत्रछाया त्याला उदंड लाभली तशी त्यांच्या वार्धक्यात त्यांची सेवाही त्याने मनोभावे केली. अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात मी अतोनात रमलो होतो. तेथून मी नागपूरला बदलून गेलो तरच नागपूरहून बाळ अमरावतीला बदलून येऊ शकणार होता. ज्येष्ठ भ्राते दि. य. स्वतः निवृत्तीला येऊ घातलेले. आई आणि वडील दोघांचीही शुश्रूषा या वयात त्यांना करावी लागत होती. आई तीन वर्षांपासून पक्षाघाताने अंथरुणाला खिळलेली. देह– वस्त्रे यांची शुद्ध हरवलेली आणि वाचा गेलेली. अशा वेळी तरुण बाळ हाताशी हवा होता. पण दि. यं.नी काही मला तुम्ही नागपूरला जाता का हे विचारले नाही. त्यांच्या पत्नी मनूताईंनी मला सुचविले. मी कबूल झालो म्हणून बाळला आईवडिलांच्या सेवेसाठी अमरावतीला जाता आले. पुढे ६ वर्षांनी मनूताईंच्या निवृत्तीनंतर दि. य. आणि त्या नागपूरला स्थायिक झाल्या. खुद्द मनुताईंची तब्यत आणि दि. यं चीही, नंतर अशा अवस्थेला आली होती की त्यांना बन्धु, पुत्र, मित्र असे सारे एकच झालेला बाळ जवळ असायला हवा होता. म्हणून पुन्हा ८ वर्षांनी म्हणजे १९८६ साली बाळ आणि त्याची पत्नी डॉ. सुनीती देव यांना, नागपूरला बदली इष्टापत्ती ठरली. १९८८ साली मनुताई वारल्या. १९९० मध्ये त्यांचे स्मारक म्हणून दि. यं.नी आजचा सुधारक हे विवेकवादी मासिक सुरू केले. त्यावेळी दि. य. ७२ वर्षांचे होते. बाळ पन्नाशीचा. त्यांनी उभे केलेले हे सामाजिक काम, त्याला आपण हातभार लावलाच पाहिजे, त्यांचे काम हलके केले पाहिजे ही बाळची अनुच्चारित मनोमन विचारसरणी. अशी ५ वर्षे गेली. १९९५ मध्ये स्वतः दि. यं.ना पक्षाघाताचा झटका बसला. तेव्हा बाळ आणि सुनीती यांनी काटेकोरपणे आणि अनन्यभावाने केलेल्या शुश्रूषेमुळे ते दुखण्याचे काहीही चिन्ह मागे न राहता त्यातून बरे झाले. मग मात्र त्यांचे स्वतंत्र बि-हाड मोडून बाळ सुनीतीने त्यांना आपल्याजवळ आणले. दिवसाचे चोवीस तास परिचर्या केली. त्यांना जणू नवा जन्म लाभला. बाळला आपली बन्धुप्रीती किंवा भ्रातृभक्ती शेवटाला नेता आली ती मात्र पत्नी सुनीतीच्या मनापासून लाभलेल्या सहकार्याने. आता, अजून वर्षही झाले नाही, बाळ सेवानिवृत्त झाला होता. आपले लेखनाचे मनोरथ पूर्ण करता येतील अशी हवी तशी सेवानिवृत्ती त्याला मिळाली होती. पण केव्हा असेल कोण जाणे, कर्करोगाने त्याच्या देहात चोरपावलांनी प्रवेश केला होता. तो वेगाने वाढला. आणि हा हन्त, हन्त नलिनी गज उज्जहार ! सगळी स्वप्ने जागच्या जागीच राहिली.
बाळ व्यक्तिस्वातंत्र्याचा कडवा पुरस्कर्ता होता, त्याला स्वतःला ते फारसे घेता आले नाही म्हणून असेल. मुलाबाळांना मनाप्रमाणे वागू द्या. थोडी चुकली- माकली तरी चालेल पण मोकळीक द्या, असे त्याचे आग्रही मत होते. स्त्री-स्वातंत्र्य त्याला प्रिय होते. आपल्या समाजात स्त्रियांना दिली जाणारी विषम, अन्याय्य वागणूक पाहून तो चिडून उठत असे. सुधारणाप्रिय कुटुंबात, भावाजवळ वाढल्याने तो सुधारक होताच. पण . . . पण थोड्या फरकाने. आपला भारतीय समाज धर्माच्या प्रभावाची आणि प्राचीन संस्कृतीच्या परंपरेची नाळ कधी तोडू शकेल की नाही याची त्याला शंका होती. तो या बाबतीत हळुवार होता. तर्ककर्कश नवनीतीचा तो पुरस्कर्ता नव्हता. पण आम्ही त्याला राखीव खेळाडू मानून बिनधास्त होतो. त्याच्या इच्छेप्रमाणे मृत्यूनंतर अग्निसंस्कार किंवा पारंपारिक उत्तरक्रिया केली नाहीत. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी त्याने देहदान-पत्र केले होते, त्याप्रमाणे करण्यात आले. खाजगी जीवनात बाळ सेवाभावी पुत्र आणि भाऊ, दक्ष पती, प्रेमळ पिता असा कुटुंबवत्सल गृहस्थ होता. त्याच्या निधनाने ज्ञानक्षेत्राची, विशेषतः तत्त्वज्ञानविषयाची आणि आजचा सुधारकच्या कार्याची मोठी हानी झाली आहे. माझे त्याच्या स्मृतीला अभिवादन. मनात आलं ते केलं
‘मनात आलं ते केलं’ हे हलके -फुलके तत्त्वज्ञान बाळगणारी व्यक्ती केवढे भरीव काम करू शकते हे शकुन्तलाबाई परांजपे यांनी दाखवून दिले आहे.
“मी बहुधा फ्रान्समध्ये असताना वडिलांना लिहिले की मी आज सिग्रेट ओढली.” वडिलांनी उत्तर दिले, की “हे मला आवडले नाही. पण तू आता मोठी झाली आहेस. तुझ्या मनाप्रमाणे वाग.” पुढे जन्मभर, मनात आले ते केले असे ब्रीद ठेवून वागणाऱ्या शकुन्तला परांजपे ३ मे २००० रोजी वारल्या. दिवंगत झाल्या हे म्हणणेही येथे साजायचे नाही कारण मेल्यावर काहीच राहत नाही मग स्वर्गवास काय नि दिवंगत होणे काय, सारखेच निरर्थक असे मानणाऱ्या पंथाच्या त्या होत्या.
रँगलर परांजपे यांच्या त्या एकुलते अपत्य होत्या. स्वतः रँगलरसाहेब तेरा भावंडांमधले सातवे होते ही पार्श्वभूमी लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यांची आई ही प्रसिद्ध आनंदी–गोपाळ दाम्पत्यातल्या गोपाळरावांची पुतणी. गोपाळरावांजवळ ती वाढली. त्यांनीच तिला मॅट्रिक केले. तिचे लग्न ठरले तेव्हा कशाला करतेस लग्न, मी तुला आणखी शिकवतो असे ते म्हणाले होते.
वडिलांप्रमाणे रँगलर व्हायचे असे ठरवून त्या केम्ब्रिजला गेल्या. येथून B. Sc. होऊन गेल्या होत्या. केम्ब्रिजची गणित विषयातली उच्च पदवी म्हणजे Tripos. तिच्यात प्रथम वर्गात येणाऱ्याला रँगलर म्हणत. शकुन्तलाबाईंना रँगलर होता आले नाही तरी त्यांनी Tripos घेतला.
आपल्याकडे नीतिमत्ता म्हणजे स्त्रीपुरुष-संबंध, आणि त्यातही चालत आलेल्या स्ढी निमूटपणे पाळणे एवढाच अर्थ करतात. तसेच मितप्रमाणात मद्यपान, धूम्रपान केले तरी ते नीतिसंमत मानत नाहीत. शकुन्तलाबाई दोन्ही करीत. १७ जाने. १९०६ रोजी जन्मलेल्या या विदुषी ९४ वर्षांचे नुसते दीर्घायुष्यच नाही तर स्वच्छंद-सुखी विविधांगी जीवन जगल्या. त्या मॅट्रिकला होत्या तेव्हाची गोष्ट. वडील शिक्षण मंत्री होते. त्याच वर्षी मॅट्रिकला बसण्याची वयोमर्यादा १६ हून १ वर्षाने कमी करण्यात आली. पण आपण आपल्या मुलीकरिता ही वयोमर्यादा उतरवली असा ठपका येऊ नये म्हणून वडिलांनी त्यांना एक वर्ष थांबायला लावले. त्यांच्या मैत्रिणींना फायदा मिळून त्या मात्र पुढे गेल्या.
मनात आले ते केले या न्यायाने त्यांनी एका रशियन चित्रकाराशी लग्न केले. त्याचे नाव युरा स्लेप्टझॉफ, एका पार्टीत समानशील, मांजर-प्रेमामुळे तो ह्यांच्या डोळ्यात भरला. लग्नानंतर दोनेक वर्षांनी सईचा जन्म झाला नि लागोलाग त्यांनी घटस्फोट घेतला. त्या भारतात परतल्या. १९३८ पासून पुढे वीस वर्षे त्यांनी कुटुंबनियोजनाचे काम केले. लहान खेड्यात व मोठ्या शहरातील गरीब वस्त्यात फिस्न त्यांनी गरजू स्त्रिया हेरून त्यांना मदत केली. र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य या मासिकात त्या १९३८ पासून ग्रंथपरीक्षण करू लागल्या. त्यांनी कथाही लिहिल्या. नाटके, कादंबऱ्या, ललित निबंध अशी त्यांची ९ पुस्तके प्रसिद्ध आहेत. मिष्किल-पणे नर्मविनोदी शैलीत त्या
खुमासदार मराठी लिहितात. र. धों. कर्त्यांच्या कामाचे महत्त्व जाणून त्यांनी मनोभावे त्यांच्या कामात मदत केली. सामाजिक सेवेबद्दल १९५८ मध्ये त्यांना आमदार पदावर ६ वर्षांसाठी सरकारने निवडले. आपल्याला राज्यसभेवर घ्या, तिथून कुटुंबनियोजनाच्या कामाकडे देशाचे लक्ष वेधता येईल असे पत्र त्यांनी राष्ट्रपतींना लिहिले. अशा नेमणुका पंतप्रधानांच्या सांगण्यावरून होतात असे उत्तर डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांना लिहिले. म्हणून त्यांनी जवाहरलाल नेहरूंना लिहिले. त्यांनी, ह्या नेमणुका राष्ट्रपती करतात असे कळवले तेव्हा त्यांचे हे उत्तर त्यांनी राधाकृष्णन यांच्याकडे रवाना केले. परिणामी त्यांना १९६४ मध्ये राज्यसभेवर घेण्यात आले. तेथे त्यांनी महत्त्वाचे काम केले. केंद्राची आर्थिक मदत आणि लोक-सभेतले संख्याबळ राज्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर अवलंबून असते. लोक संख्येचा भस्मासुर आटोक्यात ठेवला पाहिजे हे पटून काही जी राज्ये कुटुंब-कल्याणाचा कार्यक्रम प्रामाणिकपणे राबवतात ती एका चमत्कारिक अन्यायाला बळी पडतात. हे त्यांनी सरकारला दाखवले. आर्थिक मदत व लोकसभेतील बळ यांचा संबंध लोकसंख्ये-पासून तोडल्याशिवाय हा अन्याय दूर होणार नाही ही गोष्ट त्या १० वर्षे ओरडून सांगत होत्या. शेवटी या वर्षी केंद्रसरकारने लोकसभेतील राज्यवार संख्या सध्या आहे तीच पुढे कायम ठेवण्याची घोषणा केली आहे.
स्वा. वीर सावरकरांच्या आधी माधव ज्युलियन — माधवराव पटवर्धनांनी भाषाशुद्धीसाठी काम केले असे मानले जाते. पण त्यांच्याही आधी शकुन्तलाबाईंनी मराठी लिहिताना इंग्रजीची भेसळ न करता लिहिण्याचा आग्रह धरला आणि पाळला. मजेदार प्रतिशब्द बनवले. झरता टाक (पेन) राखदाणी (अॅशट्रे) असे शब्द घडविले. अगदी 1ो कला आह.
अपरिहार्य झाल्याशिवाय इंग्रजी शब्द त्या मराठीत येऊ देत नसत. इंग्रजी धाटणीच्या वाक्यरचना त्यांनी आपल्या लिखाणात टाळल्या आहेत.
रणांगण कादंबरीचे परीक्षण त्यांनी जानेवारी १९४० च्या समाजस्वास्थ्यात केले आहे ते मोठे मार्मिक आहे. त्या म्हणतात, चक्रधर विध्वंस हा कथानायक लेखक इग्लंडहून स्वदेशी परतताना त्याच्यावर हर्टा नावाची ज्यू तरुणी भाळते. दोघांचे प्रेम जमते. चुंबन-आलिंगनापर्यंत वाटचाल होते. १५ दिवसांचा जहाजावरचा एकान्तवास, ज्ञातास्वाद प्रियकर; आणि अनुरक्त प्रेयसी स्वतः पुढाकार घेत असूनही हा नायक तिच्याशी समागमाबाबत उदासीनता दाखवतो हे काही पटत नाही असे त्यांचे रोखठोक समालोचन आहे. लेखकाचे शृंगाराविषयी लिहिण्याच्या हातोटीचे त्यांनी कौतुक केले आहे. अतिशयोक्ति न करता या नाजुक विषयातील खरीखुरी चित्रे हुबेहूब रंगवण्यात लेखकाने कमाल केली आहे अशी शाबासकी त्या देतात. एवढे सुदीर्घ आणि स्वच्छंद पण नीतिमान जीवन जगून समाजसेवा केल्या बद्दल आपण कृतज्ञतेने त्यांची आठवण ठेवली पाहिजे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.