प्रिय वाचक

चाटे कोचिंग क्लासेस निमित्ताने काही प्रश्न पुढे आले आहेत. सरकारी भरघोस मदतीवर शाळा कॉलेजेस चालू असताना कोचिंग क्लासेसची गरजच काय हा त्यातला एक प्रश्न. त्यांच्यावर बंदी घालावी हा तसलाच एक भाबडा उपाय. प्रचंड खर्च करून आणलेली अद्ययावत यंत्रसामग्री, सोयीस्कर इमारती आणि उत्तम तज्ज्ञ डॉक्टर सरकारी हॉस्पिटलमध्ये असताना खाजगी डॉक्टरांची, जशी आवश्यकता वाटत असते तसेच काहीसे कोचिंग क्लासेसचे आहे. दुसरे उदा. द्यायचे झाले तर प्रवासाच्या किमान सोयी पुरविणाऱ्या, माफक दरात चालणाऱ्या एस्. टी. गाड्या असता, नुसत्या दर्शनी आरामगाड्या हव्यात कशाला असाही प्रश्न पडू शकतो. खाजगी दवाखाने आणि प्रवासी वाहने यांनी आपली उपयोगिता सिद्ध केली आहे. त्याचप्रमाणे खाजगी शिकवणीवर्गांनीही केली आहे. त्यामुळे बंदी घालून हा प्रश्न सुटणारा नाही, हे लक्षात घ्यावे. सरकारी हात जेथे आणि जितका जास्त तेथे आणि तितकी कार्यक्षमता कमी हा एक व्यस्त प्रमाणाचा नियम आपल्याकडे झाला आहे. स्पर्धेतून गुणवत्ता वाढण्याला वाव मिळतो. शाळा कॉलेजेसमध्ये नाममात्र प्रवेश घेऊन लगेच खाजगी शिकवणीवर्गात विद्यार्थी जातात हे आपल्या व्यवस्थेला भूषणास्पद नाही. व्यावसायिक अभ्यासक्रमांना जाऊ इच्छिणारे विद्यार्थी प्रात्यक्षिके आणि प्रयोगशाळा यांच्या सोयीसाठी जो शाळेत प्रवेश घेण्याचा उपचार करतात तो टाळता येईल. प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके करण्यापुरती शाळा-कॉलेजेसची मदत आवश्यक ठेवून हे होईल. थिअरीच्या अभ्यासासाठी सरकारी किंवा सरकारमान्य संस्थेत जायचे की खाजगी शिकवणीवर्गात जायचे हे विद्यार्थ्याच्या मर्जीवर ठेवावे. ते किती तरी सोयीचे होईल! पैसा, वेळ, परिश्रम यांची बचत होईल! परीक्षापद्धती कडक आणि योग्यता मापक यंत्रणा विश्वासार्ह असली म्हणजे झाले. सध्या बी.ए., एम्.ए. किंवा कॉमर्सकडच्या पदव्या पूर्णपणे खाजगी प्रयत्नातून मिळवता येतात. विज्ञानात वरील प्रयोगशाळेचा अपवाद करता ती पद्धत आणायला काय हरकत आहे? इंदिरा गांधी मुक्तविद्यापीठ किंवा यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठ ही बंधने कमी कमी कस्न मोकळीक जास्त ठेवणारी संस्थाने आहेत. जनमानसात त्यांना अधिकाधिक प्रतिष्ठा मात्र लाभली पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर-पुतळा-प्रक्षालन या घटनेवर निंदक व समर्थक पत्रे गेल्या अंकात प्रसिद्ध झाली. बाबासाहेबांचा पुतळा सरसंघचालकांच्या स्पर्शाने अपवित्र झाला अशा पोरकट समजुतीतून तो धुतला गेला या र. वि. पांढरे यांच्या मताचे खण्डन प्रक्षालनात सामील झालेल्या प्रा. भा. ल. भोळे यांनी केले. त्यांच्या मते, पुतळा धुणे ही एक प्रभावी, प्रतीकात्मक कृती होती. धुणाऱ्यांच्या मनात बाट, विटाळ, अपवित्रता, शुद्धीकरण किंवा विटंबना असा कोणताही विचार नव्हता. त्यांचा हा खुलासा न पटलेली बरीच पत्रे आली आहेत. त्यातली काही या अंकात दिली आहेत. या प्रकाराबाबत आ. सु.ची भूमिका देण्याइतपत सवड मागच्या अंकात नव्हती. अंक तयार झालेला असताना भोळ्यांचे उत्तर हाती आले. आधीच उशीर होऊन गेलेला होता, म्हणून आमचे मत द्यायचे आम्ही राखून ठेवले होते.

पुतळा धुण्याचे काम हे एका राजकीय डावपेचाला दिलेले तितकेच स्टंटबाज राजकीय उत्तर होते — ही भोळ्यांची भूमिका आहे. परंतु आम्हाला प्रा. भोळे यांची कृती जशी पटली नाही तशी त्यांची ही भूमिकाही पटली नाही. पण म्हणून काय झाले? प्रा. भोळे यांनी राजकारण करावे की नाही, प्रत्यक्ष चळवळी कोणत्या कराव्यात किंवा कशा कराव्यात हा सर्वस्वी त्यांचा प्र न. राज्यशास्त्राचे अभ्यासक आणि सामाजिक प्रबोधनाचे निष्ठावान पुरस्कर्ते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. या नात्याने ते अगदी आरंभापासून आ. सुधारकचे सल्लागार आणि हितचिंतक आहेत. ‘सल्लागार मंडळाच्या सभासदाची मासिकाच्या धोरणाशी शंभर टक्के बांधिलकी अपेक्षित’ नाही. ‘ते मंडळ शिथिल बांधणीचे’ आहे. असा खुलासा म्हणा की निर्वाळा म्हणा यापूर्वी १९९२ मध्ये संस्थापक–संपादकांनी दिलेला आहे. (नोव्हें.-डिसें. १९९२, पृ. २२७)

आ. सु. धर्मापलीकडे जाऊन विचार करावा या पक्षाचा आहे. तरीही, डॉ. रूपा कुळकर्णीनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून त्यांना काढून टाकले असे म्हणणे विपर्यास करणारे आहे. ‘त्यांनी सल्लागार मंडळाचा राजीनामा देण्याचे प्रयोजन उरले नाही. त्यांचे सल्लागार मंडळाचे सदस्यत्व कायम आहे असे आम्ही समजतो’. (तत्रैव, पृ. २३१) असे संपादकांनी लिहिले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी डॉ. रूपा कुळकर्णी यांच्या आग्रहावस्न मार्च ९२ पासून त्यांचे नाव वगळले आहे. त्या अंकात तसा खुलासा आलेला आहे.

डॉ. विवेक गोखले सल्लागार नसून संपादक-मंडळात होते. मुख्य संपादकाच्या तात्त्विक भूमिकेविरुद्ध लिखाण सहसंपादकांपैकी एकाने करून त्याच पत्रिकेत छापण्याचा आग्रह धरणे हा प्रकार त्यांच्या बाबतीत झाला. डॉ. गोखले यांना त्यातले अनौचित्य दिसले नाही. शेवटी त्यांना मतत्यागाऐवजी पदत्याग कमी दुःखकारक झाला असावा असे त्यांना ओळखणारा कोणीही म्हणेल. डॉ. विश्वास कानडे हे स्वच्छेने सल्लागार-मंडळातून निवृत्त झाले आहेत. तसा खुलासा मे १९९६ च्या अंकात आलेला आहे. याप्रमाणे कुळकर्णी, कानडे, गोखले यांच्या बाबत श्री. र. वि. पांढरे व गं. र. जोशी (दर्यापूर) या पत्रलेखकांनी ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी व आपापले गैरसमज दूर करावेत. पु. ल. देशपांडे यांच्या निधनाने सर्वांना आपला वाटणारा आप्त निघून गेला आहे. ते आजचा सुधारक चे हितचिंतक होते, चाहते होते. आमच्या कामाची कदर करून त्यांनी पु. ल. देशपांडे फौंडेशनमधून त्याला आर्थिक हातभार लावला होता. सुरुवातीच्या दिवसांत ती मदत म्हणजे मोठे प्रोत्साहन होते. आम्ही त्यांच्या स्मृतीला नम्र अभिवादन करतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.